पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी ! नक्की वाचा...

करंजकर यांची पुदिना शेती
करंजकर यांची पुदिना शेती

मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पिकातील महत्त्वाचा पट्टा असलेल्या कसबे सुकेणे येथील रवी करंजकर यांनी तीन एकरांत पुदिना हे पीक सुमारे ११ वर्षांपासून घेत त्यात मास्टरी मिळवली आहे. अत्यंत कष्टपूर्वक सुयोग्य व्यवस्थापनातून वर्षभरात सुमारे सात वेळा उत्पादन घेत मुंबई बाजारपेठेत आपल्या हिरवेगार, ताज्या, सुगंधी पुदिन्याला ‘गुडवील’ तयार करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. नाशिक जिल्ह्यात कसबे सुकेणे हा अत्यंत महत्त्वाचा द्राक्षपट्टा मानला जातो. याच गावातील रवी करंजकर यांची तीन एकर शेती आहे. त्यांच्या आजोबांनी शेती विकत घेतली होती. पूर्वी गहू, बाजरी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी यांसारखी भाजीपाला पिके ते घेत. शेतीत सातत्याने बदल करताना द्राक्षाची निवड केली. त्यानंतर झेंडूची लागवड करून राजस्थानपर्यंत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मार्केटिंग केले. कमी कालावधीच्या पिकांची निवड व त्यातून अधिक अधिक उत्पादनासह उत्पन्न मिळविणे यावर त्यांचा भर असतो. करंजकर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये -कमी उत्पादन खर्च व अधिक उत्पन्न हे सूत्र अवलंबून बाजाराच्या गरजेनुसार पीक बदल पुदिन्याचा प्रयोग : करंजकर यांची पूर्ण तीन एकरांत द्राक्षबाग होती. मात्र पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने त्यात समस्या व खर्च वाढला. पीकबदल करणे भाग पडले. बाजारपेठ, हवामान, अर्थकारण आदी महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास करून पुदिना हे पीक निश्‍चित केले. त्याचे व्यवस्थापन समजावून घेतले. आज सुमारे १२ ते १२ वर्षांच्या या पिकातील तपश्‍चर्येनंतर या पिकात रवी यांनी मास्टरी संपादन केली आहे. अशी आहे रवी यांची पुदिना शेती

  • लागवडीच्या अंगाने
  • -एकूण क्षेत्र- ३ एकर, सर्व पुदिन्यासाठी
  • -नांगरटीनंतर वाफे तयार करून एकरी ४ ट्रॅक्टर शेणखताचा वापर
  • -लागवड केल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी उत्पादन सुरू
  • -प्रत्येक दीड महिन्याने कापणी येते. वर्षभरात अशा सहा ते सात कापण्या होतात.
  • -एकदा लागवड केल्यानंतर सुमारे चार वर्षे पीक चालते. आमच्या भागातील एका शेतकऱ्याने पंधरा वर्षांहून अधिक काळ हे पीक ठेवल्याचे रवी सांगतात.
  • -जनावरांचा उपद्रव व पिकाचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपण
  • -कीडनाशकांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक
  • -शेतमजुरांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र मालकीची वाहतूक व्यवस्था
  • कापणी व उत्पादन

  • आठवड्यातून एकदा कापणी. जुड्या जागेवरच बांधल्या जातात. यासाठी गरजेनुसार मजुरांची मदत घेण्यात येते.
  • प्रति जुडीचे वजन साधारण २५० ग्रॅम.
  • १०० जुड्यांचा एक डाग होतो.
  • एका कापणीवेळी २० ते ३० डाग तयार होतात.
  • प्रति डागाचे वजन- २५ किलो
  • एकरी उत्पादन- सुमारे ४०० ते ४५० डाग
  • विक्री, दर, उत्पन्न

  • गेल्या १० वर्षांपासून वाशी, दादर, भायखळा या मार्केटमध्ये विक्री. येथील व्यापाऱ्यांमध्ये आपल्या पुदिन्याचे गुडवील तयार झाल्याचे रवी सांगतात.
  • मागणीनुसार पुदिना पाठविला जातो. व्यापारी थेट संपर्क करतात.
  • एकरी उत्पादन खर्च- सुमारे ३० हजार रुपये.
  • दर- प्रति डाग- ३०० ते ३५० रुपये
  • यंदा पावसाळ्यात हाच दर कमाल २००० रुपये मिळाला.
  • किमान दर १०० ते १५० रुपये
  • रवी सांगतात

  • या पिकाला पाण्याची शाश्‍वती लागते. पाणी दररोज द्यावे लागते.
  • मंदीत परवडणारे व तेजीत अर्थकारण उंचावणारे पीक. मात्र या पिकात कष्ट भरपूर आहेत.
  • रात्री झोपण्याचा कालावधी सोडला तर मी सतत पुदिना शेतीतच व्यस्त असतो असे ते म्हणतात.
  • हे पीक नाजूक असून त्यास जपावे लागते. हाताळणी व वाहतुकीत काळजी घ्यावी लागते.
  • वाहतुकीत अधिक तापमानात पुदिना काळा पडण्याची शक्यता असते.
  • मात्र आज कष्टाचे चीज झाले असून या पिकाने बदल घडविला. राहणीमानात बदल झाला. अर्थकारण उंचावले.
  • पुदिना पिकातील जोखीम काय? पुदिन्याला तशी वर्षभर मागणी असते. मात्र पावसाळा काळात दर अधिक मिळतात. काही वेळा व्यापाऱ्यांकडून पुदिना पाठवू नका, असेही सांगण्यात येते. अशा वेळी संपूर्ण प्लॉट वाया जातो. आर्थिक मोठे नुकसान होते. नाशिक हे या पिकासाठी कमी आवकेचे मार्केट असल्याने तेथे माझाच माल जास्त प्रमाणात गेला तर अन्य शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तेथे विकण्यावर भर नसल्याचे रवी यांनी सांगितले. कुटुंब केंद्रित कामाचे नियोजन : रवी व पत्नी तनुजा हे दोघे संपूर्ण शेतीची जबाबदारी सांभाळतात. रवी स्वतः वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. सन १९९१ मध्ये एमकॉमची पदवी संपादन केल्यांनतर त्यांनी नोकरीचा शोध घेतला. बँकेची परीक्षा केवळ एक मार्काने ते अनुत्तीर्ण झाले. पण मग खचून न जाता आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीत करायचे ठरवले. त्यात वेगवेगळे प्रयोग शेतीत केले. त्यामुळे प्रयोगशीलता रुजत गेली. तनुजा या मूळच्या मुंबईच्या असल्याने त्यांना शेतीचा कुठलाही अनुभव नव्हता. मात्र त्यांनी सर्व शेती कामे शिकून पतीला मोठा हातभार लावला आहे. खते, रोग-कीड नियंत्रण, विक्री व्यवस्था ही जबाबदारी रवी सांभाळतात. तर मजूर व्यवस्थापन, कापणी, प्रतवारी ही जबाबदारी तनुजा पाहतात. वेळेवर गतीने व स्वयंपूर्ण अशी कामाची पद्धत दांपत्याने विकसित केली आहे. सिंचनाची व्यवस्था पाण्याची टंचाई जाणवत असल्याने द्राक्षबाग तोडावी लागली. मात्र पाण्याचा स्रोत वाढविण्यासाठी विहिरीचे खोलीकरण केले. सुमारे ७० फुटांपर्यंत विहीर खोल केल्याने पाणीसाठा वाढला. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रावर इनलाइन ठिबकची व्यवस्था केली आहे. कष्टातून कुटुंबाला दिला आकार अत्यंत कष्ट अन् जिद्दीतून रवी यांनी शेती व्यवसाय प्रयोगशीलतेतून पुढे नेला. वर्षभरात सात वेळा मिळत असलेल्या उत्पन्नाचे योग्य आर्थिक नियोजन त्यांनी केले. कौटुंबिक गरजा, शेती खर्च याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी वेळोवेळी बचत केली. आपल्या दोन्ही मुलांना इंजिनिअर घडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेतीसह संपूर्ण कुटुंबाला त्यांनी आकार दिला आहे. संपर्क : रवी करंजकर- ९८२२५३३३१४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com