पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या कोठीपोटमध्ये जाते.
यशोगाथा
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा वारसा
येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी पिढीनं माडग्याळी मेंढीपालनाचा वारसा जपला आहे. पंधरा मेंढ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आज १०० मेंढ्यांपर्यंत विस्तारला आहे.
येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी पिढीनं माडग्याळी मेंढीपालनाचा वारसा जपला
आहे. पंधरा मेंढ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आज १०० मेंढ्यांपर्यंत विस्तारला आहे. त्याच जोरावर शेती घेत २० एकर जिरायती क्षेत्र शेती बागायती केली. ही मेंढी पवारांची अस्मिता झाली आहे.
सांगलीपासून शंभर किलोमीटरवर जत तालुका आहे. एका बाजूला म्हैसाळ योजनेचे पाणी आलं. शिवारं हिरवी गार झाली. दुसऱ्या बाजूला आजही पाण्याची भटकंती सुरूच आहे. पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष. उष्ण तापमान. जिकडं पहावं तिकडं माळरान. तरीही शेतकऱ्यांनी शाश्वत पाण्याची सोय करून द्राक्ष आणि लाल गर्द डाळिंबं पिकवली. इथं पशुपालन त्यातही माडग्याळी मेंढीपालन खेडोपाड्यात, वाडी वस्तीवर, तांड्यावर विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात दिसून येतं. दारात एक खंडी (खंडी म्हणजे २० मेंढ्या) मेंढी पाहायला मिळते.
पोटापाण्यासाठी उद्योग
जत शहरापासून वीस किलोमीटरवर येळवी गाव आहे. गावात रावसाहेब पवार यांचं कुटुंब राहतं.
काळ १९७२ च्या आधीचा. परिस्थिती बेताचीच. माळरानावर कुसळच उगवायचं. त्यामुळं दुसऱ्यांच्या शेतात जाऊन राबायचं. त्यातून पोटा-पाण्याची व्यवस्था हा जणू रावसाहेबांचा पारंपारिक शिरस्ता. कसंबसं सहावीपर्यंत शिकता आलं. पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड सुरुच होती. एक भाऊ सैन्यात भरती झाला. दुसरा गोव्यात कामाला लागला. सन १९७२ ला दुष्काळ पडला. मग रावसाहेबांनी सैन्यात भरती होण्यासाठी कोल्हापूर गाठलं. तसं तब्येत आणि वजन बघता निवडीची शक्यता कमीच होती. आणि तसंच झालं. रावसाहेब अखेर गावी परतले. भावानं गोव्याला बोलावलं. तिथं तिथंही काम जमलं नाही.
जगण्याची दिशा मिळाली
मन अस्वस्थ व्हायचं. मार्ग संपले असं वाटायचं. पण हार कधीच मानली नाही. अडचणीच्या काळात पत्नी सुमननं मोलाची साथ दिली. सन दोनहजारच्या दरम्यान पवार कुटुंब वैलं (वेगळे) झाले. वाट्याला माडग्याळी १५ मेंढ्या व काही शेती आली. कुटुंबाला परिस्थितीने जगण्याची दिशा दाखविली. आर्थिक चणचणीमुळे शरद आणि दीपक यांचं शिक्षण पूर्ण झालं नाही. वाट्याला आलेल्या मेंढ्यांच्या उत्पन्नातूनच गुजराण होऊ लागली. मुळातच मेंढ्या काटक आणि वजनाला चांगल्या असल्याने विक्री चांगली होत होती.
अस्मिता टिकली
हळूहळू १५ च्या २० असं करीत मेंढ्या वाढत गेल्या. परिसरातील शेतकरी घरूनच खरेदी करू
लागले. मिळत असलेल्या उत्पन्नातून जिरायती शेती बागायती करण्याचा प्रयत्न सुरु झाला. ज्या शेतात कुसळं उगवायची त्यात गाळ टाकून ती सुपीक करण्यास सुरवात केली. विहीर खोदली. पुरेसे पाणी मिळाले. पाच सहा एकरांपर्यंत असलेली शेती पंधरा एकरांपर्यंत पोचली. बागायती झाली. म्हैसाळ योजनेचंही पाणी आलं. पिवळ्या गवताच्या जागी हिरवागार ऊस उभा राहिला.
मेंढीपालन दृष्टीक्षेपात
- आज पवार कुटुंबाची तिसरी पिढी मेंढीपालनात
- त्यातील शरद आणि पत्नी अस्मिता गावी असतात. दीपक मुंबईत कामगार आहेत. त्यांची पत्नी पूनम गावीच असते.
- सध्या पाच खंडीपर्यंत म्हणजे सुमारे १०५ मेंढ्या.
माडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये
- कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे काटक. जतसारख्या दुष्काळी भागातील हवामान अनुकूल. (अवर्षणात टिकाव धरण्याची क्षमता)
- दिवसभर माळरानात फिरतात. रोगांना प्रतिकारक.
- लोकर कमी. त्यामुळे सातत्याने कातरण्याची गरज नाही व खर्च कमी.
- पांढरा रंग. त्यावर तपकिरी रंगाचा भाग. फुगीर नाक.
- लांब पाय, निमुळती व लांब मान
- वर्षातून एकदा प्रजोत्पादन
- जुळ्या कोकरांना जन्म देण्याची क्षमता
- चार ते पाचव्या महिन्यांपासून विक्री
- १५ किलोपासून ते ५० किलोपर्यंत वजन
- दूध, पेंड, ज्वारी, असा खुराक
मार्केट
माडग्याळचा शेळी-मेंढीचा शुक्रवारचा तर जतचा गुरूवारचा आठवडी बाजार प्रसिद्ध आहे. त्यामध्ये
माडग्याळी मेंढ्या विक्रीला येतात. खरेदीसाठी मुंबई, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकातील व्यापारी येतात. माडग्याळी मेंढी चांगल्या वजनाची असतेच. शिवाय त्यांचे मांसही चवीला चांगले असते. पर्यायाने बाजारात स्पर्धा वाढूनही दर चांगले मिळतात. सांगली, कोकण, गोवा, कोल्हापूर, विजापूर, पुणे या भागातून या मेंढीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे या भागातील व्यापारीही बाजारात दृष्टीस पडतात. बाजारात आलेले व्यापारी नेहमी संपर्कात असतात. इकडे येण्याआधी फोनद्वारे संपर्क करून मेंढ्यांची गरज कळवतात व खरेदी करतात.
विक्री व दर
- प्रामुख्याने मांसासाठी मेंढीची विक्री
- पिल्लांचे दर- सहाहजार, सातहजार ते साडेआठ हजारांपर्यंत
- मोठ्या मेंढ्याला ६० हजार व क्वचित ८० हजारांपर्यंतही दर
- महिन्याला चारा, खाद्यावरील खर्च- ३० हजार रुपये
- गरजेनुसार चाराखरेदीही
- बकरी ईद, ३१ डिसेंबर यासारख्या सणादरम्यान घरातूनच विक्री
- वर्षाला सात लाखांपर्यंत एकूण उत्पन्न
- वर्षाकाठी सुमारे १२ ट्रॉली लेंडीखत. घरच्या शेतातच वापर.
दुभत्या जनावरांचे संगोपन
- गाई-म्हशींचेही संगोपन. सुमारे १६ जनावरे.
- गायींचे दररोज ३५ लिटरपर्यंत तर म्हशींचे १५ ते २० लिटरपर्यंत दूध.
- म्हशीच्या दुधाचे रोजचे रतीब. ही जबाबदारी शरद शेतीसह सांभाळतात.
प्रतिक्रिया
माडग्याळी मेंढीनं आमची उन्नती केली आहे. ती आमची लक्ष्मीच आहे. अलीकडे वन्य प्राण्यांचा धोका वाढला आहे. त्यामुळे मेंढ्यांच्या संरक्षणासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे.
-रावसाहेब पवार
संपर्क- शरद पवार- ९७६६३५३२४७
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››