मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने शेतीची जपणूक

पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल, पाण्याचा काटेकोर वापर, सेंद्रिय घटकांचा वापर, जोडीला शेडनेट शेती व त्यात काकडी, मिरचीची लागवड. याप्रमाणे राजेवाडी(जि. जालना) येथील रायसिंग सुंदरडे यांनी व्यवस्थापनावर भर देत व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती करून उत्पादकता वाढवली आहे.
सुंदरडे यांची मोसंबी बाग.
सुंदरडे यांची मोसंबी बाग.

पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल, पाण्याचा काटेकोर वापर, सेंद्रिय घटकांचा वापर, जोडीला शेडनेट शेती व त्यात काकडी, मिरचीची लागवड. याप्रमाणे राजेवाडी (जि. जालना) येथील रायसिंग सुंदरडे यांनी व्यवस्थापनावर भर देत व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती करून उत्पादकता वाढवली आहे.   जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील राजेवाडी या सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या छोट्या गावशिवाराचे क्षेत्र ९५५ हेक्‍टर आहे. अलीकडील वर्षात मोसंबीचे क्षेत्र वाढल्याने सुमारे ५५० हेक्‍टरवर मोसंबी बागा विस्तारल्या आहेत. याच गावचे रायसिंग सुंदरडे यांची वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. समाजशास्त्र विषयात एम.ए. केलेल्या रायसिंग सुंदरडे यांनी खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. पण शेती पाहणाऱ्या मोठ्या भावाचे अचानक निधन झाल्याने त्यांना शेतीत उतरावे लागले. आज त्यांचा १० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. दहा एकरांत मोसंबी, तर १० एकरांत हंगामी पारंपरिक पिके, तर ३० गुंठ्यांतील शेडनेटमध्ये ढोबळी मिरची व काकडी घेण्यात येते. मोसंबीची सुधारित शेती शेतीत उतरल्यानंतर रायसिंग यांनी पारंपरिक मोसंबीचे उत्पादन वाढवण्यासाठी अडचणींचा अभ्यास करणे सुरू केले. पूर्वी १८ बाय १८, २० बाय २० फूट अंतरावर लागवड असायची. हे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला. हलकी, मध्यम व भारी जमिनीच्या प्रकारानुसार अनुभवातून टप्प्याटप्प्याने १४ बाय १४, १६ बाय ९, १६ बाय ११ असे विविध अंतरांचे प्रयोग केले. त्यातून झाडांची एकरी संख्या वाढली. चौथ्या वर्षापासूनच उत्पादन घेणे सुरू केले. घन पद्धतीच्या या बागेतील उत्पादन घटू नये, फळांचा दर्जा चांगला राहावा यासाठी बहर नियोजन केले. त्यात दहा एकरांपैकी आलटून पालटून पाच एकर आंबिया, तर पाच एकरांत मृग बहर घेण्यास सुरुवात केली. रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखत, जिवामृताचा वापर वाढवला. त्यातून फळांचा दर्जा मिळून जास्तीचा दरही मिळू लागला. शेडनेटमधील शेती केवळ मोसंबीच्या बागेवरच अवलंबून न राहता कृषी विभागाच्या योजनेतून २०१३-१४ मध्ये २० गुंठे क्षेत्रावर, तर त्यानंतर दहा गुंठ्यांचे शेडनेट घेतले. त्यामध्ये नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ढोबळी मिरची व मार्च ते मे दरम्यान काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. खर्च वजा जाता या संरक्षित शेतीतून मिळणारे उत्पन्न कुटुंबाचा, मजुरांचा तसेच अन्य खर्च भागविण्याचा आधार ठरते आहे. त्याचबरोबर मोसंबी बागेचे उत्पन्न आर्थिक सक्षमतेसाठी हातभार लावते आहे. गेल्या तीन वर्षांचा अभ्यास केल्यास काकडीचे शेडनेटमधील उत्पादन १० टनांच्या पुढेच मिळत आहे. त्यास प्रति किलो १५ रुपयांपासून ते २५ रुपये दर मिळाला आहे. कोरोना काळात हाच दर किलोला ३ ते ५ रुपयांपर्यंतही खाली घसरला होता. तरीही हे पीक रायसिंग यांना दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देते. ढोबळी मिरचीचे उत्पादनही प्रति २० गुंठ्यांत २० टन वा त्याहून अधिक मिळते. त्यास किलोला १० ते १२ रुपयांपासून ते २२ रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. पाणी व्यवस्थापन बाग ठिबक सिंचनावर आहे. उन्हाळ्यात आंबिया बहर फोडताना व मृग बहरापूर्वी ‘एनपीके’ व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यानंतर ठरल्यानुसार पाण्याचे नियोजन होते. आंबिया बहरात प्रत्येकी ८ लिटर प्रति तास क्षमतेचे चार ड्रीपर्स आहेत. त्या साह्याने ताशी ३२ लिटर पाणी प्रत्येक झाडाला सोडण्यात येते. बागेची गरज लक्षात घेऊन सुरुवातीस दोन तास, त्यानंतर चार तास व अखेरीस सहा तास बागेला पाणी देण्याचे नियोजन असते. सन २०१३-१४ मध्ये ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे घेतले. दोन बोअरवेल्स व एक विहीर आहे. जमिनीचा पोत जपण्याचे काम सशक्‍त माती तर पिकेल शेती हे तत्त्व जपण्याचे काम रायसिंग यांनी केले आहे. दर एक ते दीड महिन्याने बागेत उगवणारे गवत ‘ग्रास कटर’च्या साह्याने कापून त्याचे आच्छादन करून ते जागेवरच कुजविले जाते. याशिवाय प्रत्येक झाडाला ४० किलो शेणखत व १० लिटर जिवामृत प्रत्येक वर्षी दिले जाते. यासोबतच मे महिन्यात धैंचाचा वापर करून तो जमिनीत गाडला जातो. सुमारे चार वर्षांपासून अधिक सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर सुरू केला आहे. ‘पीजीएस’ प्रमाणीकरणांतर्गत त्यांची शेती आहे. शेणखताच्या उपलब्धतेसाठी चार गीर गाई व दोन बैल आहेत. पुरस्काराने गौरव आंध्र प्रदेशातील सतगुडी या मोसंबी वाणाचे सुमारे ३८० झाडांमधून तीन वर्षे सातत्याने अनुक्रमे ५५, ५० व ४५ टन उत्पादन घेण्याची किमया रायसिंग यांनी केली. सन २०१६- १७ मध्ये नागपूर येथे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते उत्कृष्ट मोसंबी उत्पादक म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे. राज्य शासना सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. त्यांनी सुंदरनगर, (२० सदस्य), राजेवाडी (२२ सदस्य) व रमदूलवाडी (२४ सदस्य) अशा तीन सेंद्रिय गट तयार केले आहेत. त्यांना तीन वर्षांपासून ते मार्गदर्शन करतात. वर्षभरापूर्वी राजेवाडी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना मोसंबी उत्पादकांच्या समन्वयातून केली आहे. संपर्क : रायसिंग सुंदरडे, ८३२९४०७५६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com