‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट ग्राहक बाजारपेठ

शेतकरी समृद्ध, संपन्न होईल श्रीरंग सुपनेकर म्हणतात की माल पिकवणार शेतकरी आणि दर ठरवणार व्यापारी अशी आजची स्थिती आहे. शेतकऱ्याला कष्टाचे मोल मिळत नाही.रेसिड्यू फ्री मालाला फार मोठी मागणी आहे. तुलनेने तुटवडा जास्त आहे. हीच आम्हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी संधी आहे. अनेक वर्षांच्या अनुभवातून आत्मविश्‍वासपूर्वक सांगावेसे वाटते. की पिकांत विविधता ठेवली, पुरवठ्यात सातत्य ठेवले व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर पुणेच काय, मुंबई किंवा अन्य महानगरांच्या ग्राहक बाजारपेठाही आपल्या कवेत येतील. त्यातून शेतकरी समृद्ध, संपन्न होईल.
दी किसान हबचे पुण्यातील आऊटलेट व मोबाईल व्हॅनद्वारे थेट विक्री
दी किसान हबचे पुण्यातील आऊटलेट व मोबाईल व्हॅनद्वारे थेट विक्री

सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’ शेतीकडे वळले आहेत.  बाजारपेठेचे मोठे आव्हान  शेतकरी आव्हानांचा सामना करीत ‘रेसिड्यू फ्री’ शेतीद्वारे गुणवत्तेचे उत्पादन घेत आहेत. मात्र या मालाला अद्याप सक्षम वा संघटीत बाजारपेठ नाही. अनेकवेळा हा माल बाजार समितीत नियमित शेतमालासोबत आहे त्या दरांत विकावा लागतो. रेसिड्यू फ्री मालाला खात्रीची, शाश्‍वत आणि विस्तृत बाजारपेठ तयार झाली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आपले कष्ट, बुद्धी व गुणवत्ताप्रधान उत्पादन पिकवल्याचे समाधान मिळेल.  शेती ते विक्री व्यवस्थेपर्यंत - ‘किसान हब’  शेतकऱ्यांची हीच मुख्य समस्या व काळाची गरज ओळखली श्रीरंग सुपनेकर यांनी. दूरदृष्टीचे व कायम नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा ध्यास बाळगलेल्या सुपनेकर यांनी रेसिड्यू फ्री शेतमालाची बाजारपेठ सक्षम करण्याचा चंग बांधला. केवळ रेसिड्यू फ्री किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व या विषयी चर्चा करण्यापेक्षा युद्धभूमीत स्वतः लढले पाहिजे हा लढाऊ बाणाच त्यांनी स्वीकारला. काही वर्षांचे अथक प्रयत्न व गाढ्या अभ्यासातून आज ‘दी किसान हब’ ही रेसिड्यू फ्री मालाची शेतकरी ते थेट ग्राहक विक्री व्यवस्था यंत्रणा (प्लॅटफॉर्म) उभी करण्यात सुपनेकर यांना यश मिळाले आहे.  सुपनेकर यांची पार्श्‍वभूमी  पुणे स्थित सुपनेकर यांची सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथे १३ एकर शेती आहे. पहिल्यापासूनच रेसिड्यू फ्री शेती करण्याकडे त्यांचा कल आहे. ‘सुस्था भवन्तु कृषका धनधान्यसमान्वितः’ म्हणजेच सर्व शेतकऱ्यांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हा सिद्धांतच त्यांच्या शेतीचा मुख्य आधार आहे. प्राचीन कृषी विज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख मिलाफ त्यांनी शेतीत घडवला आहे. म्हणूनच आपल्या शेतीला त्यांनी दिलेले ‘कृषक आश्रम’ नाव सार्थ ठरते. सेंद्रिय शेतीवर त्यांची श्रद्धा आहेच. पण रसायनांचा समंजस, काटेकोर वापर करून त्यांचे अवशेष मालात मर्यादेपेक्षा जास्त आढळणार नाहीत अशा ‘रेसिड्यू फ्री’ रासायनिक शेतीवरही त्यांचा तेवढाच विश्‍वास आहे.  थेट विक्रीव्यवस्थेचा गाढा अनुभव  शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेचा आज सर्वत्र बोलबाला दिसतो. पण राज्यातील ज्या मोजक्या शेतकऱ्यांनी या संकल्पनेचा श्रीगणेशा करीत त्यास यशस्वी रूप दिले त्यात सुपनेकर यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. आपला माल व्यापारी, मध्यस्थांना विकण्यापेक्षा थेट ग्राहकांना विकून आपल्या कष्टाची सार्थ किंमत पदरी पाडून घ्यायची या उद्देशाने त्यांनी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोट बांधली. सर्व बाजारपेठा, आवक, दर आदींचा गाढा अभ्यास केला. मग सर्वांनी मिळून पुणे शहरातील मोठ्या गृहसोसायट्यांना काही टनांनी थेट शेतमाल विक्री करण्याचा उपक्रम सर्व आव्हाने झेलीत तडीस नेला. गोवा राज्यालाही दररोज काही टन माल पुरवण्याचे आव्हान लिलया पेलले. पीक उत्पादन ते थेट ग्राहक विक्री अशी ‘सिस्टीम’ कृषक आश्रम अंतर्गत स्थापीत केली.  किसान हबच्या रूपाने पुढील पाऊल  कृषक आश्रमाचेच पुढील ‘व्हर्जन’ म्हणजे दी किसान हब म्हणता येईल. सुपनेकर व त्यांच्या गटातील शेतकरी ही यंत्रणा चालवत आहेत. पुणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मुकुंदनगर येथे सुपनेकर यांनी ‘दी किसान हब’ नावाने ‘रेसिड्यू फ्री’ शेतमाल विक्री आऊटलेट सुरू केले आहे. पुण्यातील विविध उपनगरांतही विक्री वाढवण्यासाठी मोबाईल व्हॅन्स तैनात केल्या आहेत. आपल्या रेसिड्यू फ्री मालाला खात्रीची बाजारपेठ व समाधानकारक दर देणारा राज्यातील शेतकऱ्यांसाठीचा हा ‘प्लॅटफॉर्म’ असल्याचे सुपनेकर सांगतात.  अशी आहे ‘दी किसान हब’ यंत्रणा 

  • रेसिड्यू फ्री तसेच सेंद्रिय शेतमालाची विक्री. त्यासाठी मुकुंदनगर येथे सुमारे दोनहजार चौरस फूट जागेची सुविधा. 
  • सातारा, फलटण भागातील सुमारे ६० शेतकऱ्यांचे तर नगर, श्रीरामपूर भागातील सुमारे २५ शेतकऱ्यांचे नेटवर्क 
  • सध्या सुमारे पंधराहून अधिक भाजीपाल्यांची होते थेट विक्री. येत्या काळात विविध फळे, अन्नधान्ये, गूळ, मध व अन्य प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीचे उद्दीष्ट. हुरडा पार्टी, फळांचा ज्यूस विक्रीही प्रस्तावीत. 
  • ग्राहकांमध्ये विश्‍वासार्हता जपण्यासाठी 

  • आपला माल रेसिड्यू फ्री किंवा सेंद्रिय असल्याची ग्वाही देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या शेताचे ‘ग्लोबलगॅप’ किंवा ‘एनपीओपी’ किंवा पीजीएस सेंद्रिय प्रमाणपत्र. 
  • क्यू आर कोड- ‘आऊटलेट’ मध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला ‘क्यू आर कोड’ लेबल. मोबाईलद्वारे स्कॅन केल्यास संंबंधित शेतकऱ्याचे नाव, गाव, शेती, पिके, प्रमाणपत्र, नोंदणीकरण क्रमांक आदी तपशील पाहण्याची सोय. 
  • शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार  शेतमालाची ‘एमएसपी’  शेतकऱ्यांना दरांची हमी म्हणजेच प्रत्येक शेतमालाची ‘एमएसपी’ (किमान आधारभूत किंमत) निश्‍चित केली आहे. ‘दी किसान हब’ यंत्रणेचे हेच बलस्थान असल्याचे सुपनेकर सांगतात. या यंत्रणेत सहभागी प्रयोगशील व अनुभवी शेतकरी वेळोवेळी एकत्र बसतात. प्रत्येक हंगाम, कालावधीत बाजार समिती वा अन्य ठिकाणी असलेल्या दरांचा मागोवा घेतात. प्रत्येक हंगामात पीकनिहाय आलेल्या उत्पादन खर्चाचा ताळेबंद मांडण्यात येतो. त्यावरून सर्वानुमते ‘एमएसपी’ ठरवण्यात येते.  सद्यस्थितीत एमएसपीचे दर (प्रति किलो) प्रातिनिधीक 

  • भेंडी - २५ रु. 
  • ढोबळी मिरची, कारले - २५ रु. 
  • कोबी - १० रु. 
  • फ्लॉवर - १५ रु. 
  • बाजार समितीत भेंडीला प्रति किलो १५ ते २० रुपये किंवा काही वेळा ३० रुपये दर असेल त्या वेळी ‘दी किसान हब’कडून २५ रुपये हमी भाव राहिल. म्हणजे दरांच्या पडत्या काळात शेतकऱ्यांना दरांचे संरक्षण असेल. बाजारपेठेत भेंडीचा दर ३५ रुपयांवर गेला तर ‘दी किसान हब’ कडूनही ठरावीक प्रमाणात एमएसपीचा दर वाढवून मिळण्याची संधी आहे.  वाहतुकीसाठी स्वतंत्र पैसे  माल वाहतुकीसाठी प्रति किलो तीन रुपये दर एमएसपी व्यतिरिक्त देण्यात येईल. शेतकऱ्याच्या कष्टाचे मोल अधिकाधिक वाढावे हाच त्यामागे प्रयत्न आहे.  शेतकऱ्यांनीच करायची प्रतवारी  शेतमालाची प्रतवारी शेतकरीच उत्तमरित्या करू शकतो. त्यामुळेच ‘दी किसान हब’ने प्रतवारीची जबाबदारी शेतकऱ्यांवरच सोपवली आहे. जेणे करून त्यांना हक्काने उत्तम ग्रेडच्या मालासाठी चांगला दर मिळवता येईल.  प्रमाणपत्र आवश्‍यक 

  • 'ग्लोबलगॅप’, ‘एनपीओपी’, ‘पीजीएस’ यापैकी प्रमाणपत्र किंवा त्या प्रक्रियेत असणे आवश्‍यक. 
  • शासनाच्या ‘व्हेजनेट’ प्रणालीत नोंदणीकरण असल्यासही स्वीकार. 
  • कोणतेही प्रमाणपत्र सामूहिक किंवा वैयक्तीक स्तरावर मिळवण्यासाठी किसान हबतर्फे सर्वतोपरी मार्गदर्शन. 
  • सुपनेकर यांनी आपल्या शेतीचे ‘एनपीओपी’ तर गटातील इतरांनीही अशी प्रमाणपत्रे घेतली आहेत. 
  • शेतमालाचे प्रमोशन व ब्रॅंडिंग 

  • कृषक आश्रम या नावाची बेवसाईट. त्यावर आपल्या शेती पद्धतीचे संपूर्ण वर्णन सांगणारा व्हिडीओ उपलब्ध. भारतीय कृषी परंपरेचा वारसा सांगणाऱ्या पुस्तकाची आवृत्ती मोफत डाऊनलोड करण्याची मुभा. 
  • 'दी किसान हब’ नावाने देखील बेवसाईट 
  • ‘फ्री सॅंपलींग’ व माहितीपत्रक 

  • आरोग्यदायी, सकस, अस्सल चवीचा भाजीपाला ग्राहकांच्या पसंतीस उतरावा म्हणून मुकुंदनगर भागात घरोघरी जाऊन कोबीचे मोफत वाटप केले. मालासोबत माहितीपत्रकही दिले जाते. यात रासायनिक अवशेषमुक्त मालाचे महत्त्व, एनपीएओपी व पीजीएस प्रमाणपत्रे यांचे महत्त्व आदी सविस्तर माहिती. 
  • आकर्षक पॅकिंग व किसान हबचे लेबल असलेल्या या मालाला ग्राहकांकडून चांगलीच दाद मिळत आहे. 
  • अनेक ग्राहक हे आऊटलेट शोधत खरेदीला येत असल्याचा अनुभव सुपनेकर यांनी सांगितला. 
  • विक्री व्यवस्थेतील सर्व उपक्रम व त्यांचा विस्तार करण्यात मुलगा अमेय सुपनेकर व पुण्याचेच विनीत सांकला यांनी मोठी जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे. सुपनेकर यांना पत्नी सौ. नीता देखील पतीच्या खांद्याला खांदा लावून हिरिरीने प्रत्येक कामात सहभाग घेत आहेत. 
  • सध्याची दररोजची थेट ग्राहक विक्री (पुणे शहरातील उपनगरे) 

  • मुकुंदनगर आऊटलेट - २०० किलो 
  • मोबाईल व्हॅन - 
  • गंगाधाम सोसायटी - २०० किलो (तीन तास कालावधीतील) 
  • अन्य ठिकाणी व्हॅनची नुकतीच सेवा सुरू 
  • कल्याणीनगर व विमाननगर- सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत 
  • वानवडी, औंध, बाणेर - संध्याकाळी 
  • लवकरच मोबाईल व्हॅनमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित करणार. जेणे करून व्हॅनचे लोकेशन मोबाईलद्वारे जाणणे ग्राहकांना शक्य. 
  • शेतकऱ्यांनो सहभागी व्हा, संधी प्रचंड!  सुपनेकर म्हणाले, की माल पिकवणार शेतकरी आणि दर ठरवणार व्यापारी अशी आजची स्थिती आहे. शेतकऱ्याला कष्टाचे मोल मिळत नाही. भाजीपाला व फळे तर नाशवंत असल्याने हा विषय फार आव्हानाचा आहे. सध्या रेसिड्यू फ्री मालाला फार मोठी मागणी आहे. तुलनेने तुटवडा जास्त आहे. ग्राहकच असे अन्न कुठे मिळेल याचा शोध घेताना दिसतो आहे. हीच आम्हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी संधी आहे. अनेक वर्षांच्या अनुभवातून आत्मविश्‍वासपूर्वक सांगावेसे वाटते. की पिकांत विविधता ठेवली, पुरवठ्यात सातत्य ठेवले व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केले तर पुणेच काय, मुंबई किंवा अन्य महानगरांच्या ग्राहक बाजारपेठाही आपल्या कवेत येतील. त्यातून शेतकरी समृद्ध संपन्न होईल.  ‘दी किसान हब’ टीमची शेती  ‘दी किसान हब’ गटातील प्रातिनिधीक उदाहरणे सांगायची तर साखरवाडी (जि. सातारा) येथील हणमंत भोसले यांची ५० एकर शेती आहे. सध्या ते कोबी, फ्लॉवर, केळी सेंद्रिय पद्धतीने घेतात.  सेंद्रिय गुळाची निर्मिती ते करतात. द्राक्षे, डाळिंब आदी पिकांचाही अनुभव आहे. याच गावचे सलीम तय्यब मुजावर यांनी यंदा खरिपात अडीच एकरांत कारले, मिरची सेंद्रिय पद्धतीने पिकवली. तत्पूर्वी टोमॅटो घेत दोन तोडे जास्त घेतले. फळगळ कमी केली. याच गावचे नंदकुमार भोसले देखील अत्यंत प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी व्यापाऱ्यांमार्फत दर्जेदार भेंडी परदेशात निर्यात केली आहे. जवळच्या फडतरवाडीचे कल्याण काटे सोयाबीन, भुईमूग, हरभरा पिकांतील उत्कृष्ट बीजोत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेतच. उत्कृष्ट गटशेती संघटक आणि सेंद्रिय भाजीपाला पिकांमध्येही त्यांनी आपली ओळख तयार केली आहे.  तरुण शेतकऱ्यांची ताकद  अकलूज येथील सागर कुदळे व निनाम पाडळीचे प्रणय जाधव हे दोघे युवा प्रयोगशील व धडपडे शेतकरी ‘दी किसान हब’ गटशेतीत तांत्रिक बाजू सांभाळतात. सागर आपल्या २७ एकरांपैकी अडीच एकरात डाळिंब, केळी, ऊस व भाजीपाला घेतात. त्यांची डाळिंब शेती सेंद्रिय प्रमाणीत आहे. ५८० झाडांचे संगोपन ते करतात. प्रति झाड साडे २१ किलो उत्पादन घेतात. पाच वर्षे वयाच्या या झाडांच्या बागेत मर रोगाची जराही समस्या नसल्याचे ते सांगतात. तणनाशकांचाही वापर न करता ग्रासकटरच्या साह्याने तण नियंत्रण होते. स्युडोमोनास, ट्रायकोडर्मा आदींचा वापर रोग नियंत्रणासाठी होतो. नत्र, स्फुरद व पालाश यांचे योग्य संतुलन करण्यावर भर असतो.  ‘दी किसान हब’- शेती व्यवस्थापन - ठळक बाबी 

  • शेतीतील खर्च कमी करून मालाची गुणवत्ता वाढवणाऱ्या बाबींचा अंगीकार 
  • सेंद्रिय प्रमाणीत निविष्ठा वापरांवर भर 
  • वापराविषयीच्या संगणकीय नोंदी. निविष्ठा वापर वेळापत्रक. 
  • गटातील शेतकऱ्यांना बांधावर सल्ला. ‘फॉलोअप’ व ‘रिझल्ट’ तपासणी 
  • गटातील शेतकऱ्यांना माती परीक्षण बंधनकारक. त्यानुसार पुढील शिफारसी. 
  • 'वेस्ट डीकंपोझर’, जीवाणू संवर्धके (पीएसबी, केएसबी), सिलिका, दशपर्णी अर्क, बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम ॲनिसोप्ली , आदी निविष्ठांचा वापर 
  • ब्रीक्स मीटरद्वारे पिकातील साखरेचे मापन, 
  •  झाड काटक, मजबूत करण्यावर भर 
  • चिकट तसेच मक्षीकारी सापळे यांचा वापर  संपर्क- 
  • श्रीरंग  सुपनेकर-९५११८३१४३७ 
  • अमेय सुपनेकर-७०६६०७७३७७  प्रणय जाधव-९५१८९८१२७१  सागर कुदळे-८७८८३१४३४६
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com