‘एसआरटी’ तंत्रातून भाताची एकरी तीन क्विंटल वाढ 

एसआरटी पध्दतीचा फायदा पांडे यांनी एसआरटी पध्दतीचा वापर करून भाताचे एकरी १५ क्विंटल उत्पादन घेतले आहे. पारंपरिक पध्दतीत त्यांना हेच उत्पादन १२ क्विंटल मिळायचे.
पांडे यांनी एसआरटी पद्धतीने केलेली भात लागवड
पांडे यांनी एसआरटी पद्धतीने केलेली भात लागवड

खुमारी (जि. नागपूर) येथील श्रीनिवास पांडे यांनी यंदा तीन एकरांत ‘एसआरटी’ तंत्राचा वापर करून दुष्काळी स्थितीतही भाताचे उत्पादन एकरी तीन क्विंटलने वाढवले. चिखळणी, मळणी, रोवणी, तसेच मजुरी व निविष्ठा खर्चात मोठी बचत केली. भातानंतर गहू घेताना शून्य मशागत तंत्राचा वापर करून मशागत खर्चातही बचत केली. प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांच्या मार्गदर्शनातून  त्यांनी आपला प्रयोग यशस्वी साधला आहे.  खुमारी (ता. रामटेक, जि. नागपूर) येथील श्रीनिवास पांडे यांची सुमारे साडेआठ एकर शेती आहे. संगणकीय विज्ञान या शाखेतील पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. वर्तमानपत्र व प्रसारमाध्यम विषयांतील दोन संस्थांच्या माध्यमातून त्यांनी तांत्रिक विभागात सुमारे २३ वर्षे नोकरी केली. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांनी हे क्षेत्र पूर्णपणे सोडून देत शेतीच करणे पसंत केले आहे.  आता ते पूर्णवेळ शेतकरी झाले आहेत.  ‘एसआरटी’ तंत्राचा प्रयोग  पांडे यांना शेतीची आवड होतीच. मात्र, पूर्वी नोकरीमुळे त्यात वेगवेगळे प्रयोग करून पाहणे शक्य होत नव्हते. मात्र, प्रयोगशीलतेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच मागील वर्षी रायगड, कर्जत या भागात काही कामानिमित्त गेले असता, तेथे एसआरटी (सगुणा राईस टेक्निक) पद्धतीने भात लागवड पाहण्यास मिळाली. प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी ही पद्धत विकसित केल्याचे त्यांना सांगण्यात आले. या पद्धतीचे फायदे लक्षात आल्यानंतर आपणही त्याचा प्रयोग करून पाहावा, असे पांडे यांनी ठरवले.  मार्गदर्शनानुसार शेती सुरू  पांडे कायम भडसावळे यांच्या संपर्कात होते. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एसआरटी तंत्राद्वारे भातशेती सुरू केली. त्यातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे 

  • सुमारे तीन एकरांत हा प्रयोग. उर्वरित क्षेत्रात कपाशी, तूर 
  • पाण्यासाठी विहिरीचा पर्याय. तुषार सिंचनाचा वापर 
  • २५ बाय २० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे. 
  • यंदा खरिपाचा पाऊस सुरू झाला खरे. मात्र, परतीच्या पावसाने दगा दिला. पीक नुकसानीत जाईल, अशी स्थिती होती. मात्र, शेततळ्यातील पाण्याच्या भरवशावर पीक वाचविता आले. तरीही अखेरच्या महत्त्वाच्या दोन टप्प्यांत पाणी दिल्यानंतर शेततळ्यातही पाणी उरले नाही. 
  • खर्च, वेळ, श्रम वाचवणारी एसआरटी पद्धत 

  • पारंपरिक भातशेतीत रोपे (पर्हे) तयार करण्यासाठी चिखलणी करावी लागते. सुमारे २१ दिवसांनंतर रोपवाटिकेतील रोपांची पुनलागवड करताना पुन्हा चिखलणीचे काम करावे लागते. 
  • एसआरटी पद्धतीत थेट रोवणी केल्याने चिखलणी, मळणी व पुनर्लागवड अशी तीनही कामे वाचली. 
  • त्यातील खर्चातही बचत झाली. 
  • एसआरटी पद्धतीत साडेचार फूटी बेड ठेवला. याच बेडवर रोवणी केली जाते. पंचवीस बाय २५ सेंटीमीटर असे अंतर दोन रोपांत ठेवले. 
  • ट्रॅक्‍टरचलीत ‘बेडमेकर’चा वापर केला. त्यापोटी ६०० रुपये प्रतितास भाडेशुल्क देण्यात आले. --पारंपरिक पद्धतीत एकरी एक बॅग (सुमारे १० किलो) बियाण्याची गरज भासते. एसआरटी पद्धतीत हीच गरज केवळ पाच किलो राहिली. 
  • रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि तास (पाण्याचा निचरा होण्यासाठी) अशी कामे ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून करण्यात आली. 
  • मजूरबळ लागले कमी 

  • पारंपरिक शेतीत एकरी १० याप्रमाणे तीन एकरांत ६० जणांचे मजूरबळ व तेवढे पैसे लागले असते. 
  • हा खर्च एकरी ३००० ते ५००० रुपयांपर्यंत पोचला असता. त्या तुलनेत एसआरटी तंत्राद्वारे बियाणे रोवणीसाठी चार मजुरांचीच गरज भासली. 
  • रोवणीसाठी एसआरटी साचा (लोखंडी) हाताळणीचे काम त्यांच्याव्दारे होते. त्यात दोन मजूर साचा उचलण्यासाठी, तर दोन मजूर बियाणे विशिष्ट जागेत लावण्यासाठी असतात. साच्यामुळे एकसंघ रोवणीचा उद्देश साधता येतो. 
  • पिकाला होतो फायदा  दोन बेडसमध्ये पुरेसे अंतर ठेवल्याने हवा खेळती राहते. त्याचा पुढे उत्पादनावर परिणाम होतो, असे पांडे यांचे निरीक्षण आहे. या पद्धतीत युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर शक्‍य होतो. जिथे पारंपरिक पद्धतीत रासायनिक खतांचे तीन डोसेस द्यवे लागतात, तिथे या पद्धतीत एक डोस व त्यावरील खर्च वाटल्याचे ते म्हणाले. खत वाहून जाण्याचा धोका राहात नाही. थेट मुळांना खत मिळत असल्याने कमी मात्रेमध्ये त्याची परिणामकारकता साधता येते.  किडीचा प्रादुर्भाव कमी झाला  प्रतिकूल वातावरणात खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. परंतु एसआरटी पद्धतीत हवा खेळती राहते. तसेच शेतात फवारणीसाठी फिरणे सोयीस्कर होत असल्याने फवारणी चांगली होऊन खोडकिडीवर नियंत्रण मिळविणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत मात्र तास सोडलेला नसल्याने किडी- रोग निरीक्षणावेळी अडचणी येतात. त्यामुळे किडी-रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो, असे पांडे सांगतात.  झालेले फायदे- ठळक बाबी 

  • पारंपरिक लागवड पद्धतीत रोपाला १५ ते २० फुटवे येतात. एसआरटी पद्धतीत ३० हून अधिक फुटवे येतात असे निरीक्षण मिळाले. 
  • पारंपरिक पद्धतीत पुनर्लागवड करताना रोपे एक ठिकाणावरून दुसरीकडे लावताना मुळांना इजा होण्याचा धोका असतो. एसआरटी पद्धतीत मात्र थेट बियाणे लावले जात असल्याने असा धोका संभवत नाही. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत साधारणतः आठ दिवस आधीच पीक कापणीस येते. 
  • भात काढणीनंतर हरभरा किंवा गहू लागवड शक्‍य होते. 
  • जमिनीला सेंद्रिय कर्ब मिळतो- भात काढणीनंतर धसकटे न जाळता तशीच ठेवली जातात. त्यातून जमिनीला सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतो. एकंदरीत जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. 
  • ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने बेड तयार केल्यानंतर त्याचा उपयोग पुढे अजून काही कालावधीपर्यंत करणे शक्‍य होते. त्यामुळे बेड तयार करण्यासाठी दर वर्षी खर्च करावा लागत नाही. 
  • एसआरटी साचा वापरून दुसऱ्या वर्षी पुन्हा लागवड करणे शक्‍य होते. गहू, हरभरा लागवडीसाठीही याच पद्धतीचा उपयोग केला जातो. 
  • यंदा भात काढणीनंतर शून्य मशागतीवर गहू घेतला. त्यासाठीचा एकरी ३५०० ते ४००० रुपये खर्च वाचला. एसआरटी साच्याचा वापर करून दोन रोपांतील अंतर ५० सेंमी ठेवले. 
  • उत्पादनात वाढ 

  • पारंपरिक पद्धत- एकरी १२ क्विंटल 
  • यंदा एसआरटी पद्धतीत- १५ क्विंटल. (तीन एकरांत ४५ क्विंटल) 
  • संपर्क- श्रीनिवास पांडे-९४२३४०७०२७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com