नांदेड फुलबाजारामुळे परिसरात फुलली फुलशेती

नांदेड ः फुलांच्या मार्केटमधील गुलाब फुलांची आवक
नांदेड ः फुलांच्या मार्केटमधील गुलाब फुलांची आवक

नांदेड (प्रतिनिधी)ः मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध अशा नांदेड येथील फुलांच्या बाजारपेठेमध्ये देशी गुलाबासह डच गुलाबाची आवक होत आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त गुलाब फुलांच्या मागणीत वाढ होते, तसेच दरात जवळपास दुपटीने वाढ होत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. पूर्वी नांदेड शहरातील कलामंदिर परिसरामध्ये फुलांचा बाजार भरत असे. १९९० च्या दरम्यान फुलांची चांगली बाजारपेठ विकसित झाली. त्यामुळे २०१५ मध्ये स्थानिक प्रशासनाने शहरातील हिंगोली गेट भागातील उड्डाण पुलाच्या खाली फुलबाजारासाठी जागा दिली. येथे १० अडते आणि ३० ते ४० किरकोळ व्यापारी आहेत. मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून खरेदीदार फुलांच्या खरेदीसाठी येतात. त्याचप्रमाणे येथून हैदराबाद, मुंबई, इंदूर, यवतमाळ, तुळजापूर या भागामध्ये विविध प्रकारची फुले पाठवली जात असल्याचे जेष्ठ अडत व्यापारी करिमखान पठाण यांनी सांगितले. नांदेड परिसरातील मुदखेड, नांदेड, अर्धापूर या तीन तालुक्यांमध्ये फुलशेतीचा चांगला विस्तार झाला आहे. उमरी, भोकरसह अन्य काही तालुक्यांतील सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडे फुलशेती रुजली आहे. जिल्ह्यात फुलशेतीखालील क्षेत्र सुमारे ५०० एकरपर्यंत आहे. कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत ६० ते ६५ शेडनेटगृह आणि १८ ते २० पाॅलिहाउस उभारले आहेत. त्यात गुलाब, गलांडा, काकडा, मोगरा, लिली, झेंडू, निशिगंध, बिजली, जरबेरा आदी फुलांची लागवड केली आहे. २००५ नंतर गुलाबाचे क्षेत्र वाढले आहे. नांदेड येथील फुलबाजारामध्ये नांदेडसह शेजारच्या परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९०० ते १००० शेतकरी फुले विक्रीसाठी आणतात. लिलाव पद्धतीने बोली बोलून शेतकऱ्यांसमक्ष फुलांची खरेदी केली जाते. गुलाब फुलांची किंमत त्याच दिवशी दिली, तर काकडा, मोगरा आदी फूल उत्पादकांना आठवड्याला पट्टी काढली जाते. गुलाबाची आवक आणि दर ः

  • शिर्डी गुलाबाची दररोज १५ ते २० क्विंटलपर्यंत आवक होते. त्यास २० ते ४० रुपये किलोपर्यंत दर मिळतात. लग्नसराईमध्ये वाढलेल्या मागणीनुसार दर वाढतात. सोमवारी (ता. ११) शिर्डी गुलाबाचे दर १०० ते १२० रुपये किलो होते. लग्नसराईमध्ये ३०० रुपये किलोपर्यत दर वाढले होते.
  • रंगीत गुलाबाच्या १० फुलांच्या बंचचे दर ४० ते ५० रुपयेपर्यंत असतात.
  • शेडनेट, पाॅलिहाउस उभारणी खर्चिक असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकरी डच गुलाबाची लागवड ओपनवर घेतात. बाजारात डच गुलाबाची दररोज १५० ते २०० बंच (प्रतिबंच २० फुले) आवक होते. त्यास ८० ते १०० रुपये दर मिळतो.
  • व्हलेंटाइन डेच्या दिवशी मागणी वाढल्याने डच गुलाबाच्या दरात दुपटीने वाढ होते. गतवर्षी (२०१८) व्हॅलेंटाइन डेला डच गुलाबाच्या बंचला १८० ते २०० रुपये दर मिळाला होता. या काळात शिर्डी गुलाबाच्या बुकेंनाही मागणी असते.
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत गुलाब फुलांची आवक अधिक असली तर त्यानंतर मात्र सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांची फुले बाजारात येतात. उन्हाळ्यात लग्नसराईमुळे मागणी वाढलेली असते. तुलनेत आवक कमी असल्याने दर चांगलेच वधारतात.
  • जरबेराच्या दहा फुलांच्या बंचला ५० ते ८० रुपये दर मिळतात. ते व्हॅलेंटाइन डे काळात सव्वा ते दीड पटीने वाढत असल्याचे व्यापारी मोहंमद तकिय्योद्दिन यांनी सांगितले.
  • आमच्याकडे १० एकर शेतीपैकी तीन एकरवर फुलशेती आहे. गुलाब, शेवंती, झेंडू, गलांडा, ओपनमध्ये डच गुलाबाचे उत्पादन घेतो. सर्व मिळून दररोज १ क्विंटल फुले निघतात. शिर्डीत गुलाबास ५० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतात. - गणेश कव्हळे, फूल उत्पादक, इळेगाव (ता. उमरी) गावापासून फुलाची बाजारपेठ जवळ असल्याने पारंपरिक शेतीला फुलशेतीची जोड दिली आहे. शिर्डी गुलाबासह, बिजली, गलांडा अशी ५ ते १० किलो फुले विक्रीसाठी आणतो. जाहीर लिलाव पद्धतीने बोली फुलांची खरेदी होऊन, त्वरित रक्कम हाती मिळते. - अमोल सावंत, फूल उत्पादक, मालेगाव (ता. अर्धापूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com