दुष्काळातही सोलापुरातील गुलाबशेतीला बहर !

दुष्काळातही सोलापुरातील गुलाबशेतीला बहर !
दुष्काळातही सोलापुरातील गुलाबशेतीला बहर !

सोलापूर ः व्हॅलेंटाइन डे अवघ्या दोन दिवसांवर आल्याने सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापुरातील फूलशेतीसाठी ओळख असलेल्या वडजी, पिंजारवाडी, तांदुळवाडीसह खास लांब दांड्याच्या गुलाबासाठी विकसित झालेल्या मंद्रूप, माळकवठा या भागामध्ये गुलाब फुलांचा दरवळ चांगलाच वाढला आहे. यंदा दुष्काळी स्थिती आणि थंडीमुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला असला, तरी "व्हॅलेंटाइन डे'च्या काळात गुलाब बाजी मारणार हे नक्की. दक्षिण सोलापुरातील वडजी व परिसरातील दहा ते बारा गावात गुलाबाची शेती होते. वडजी येथील शेतकरी कंपनी गुलाबजलाचे उत्पादन करत असून, त्यासाठी खास सुगंधी गुलाबाची लागवड या परिसरात आहे. याच तालुक्‍यातील मंद्रूप, माळकवठा, निंबर्गी भागात काही शेतकरी डच गुलाबाचे उत्पादन घेतात. लांब दांड्याच्या या गुलाबांची विक्री नगावर होते. सोलापूरच्या स्थानिक बाजारपेठेत त्यांचेही व्यापारी आणि ग्राहक ठरलले आहे. विशेषतः लग्नसराई, श्रावण महिन्यात या गुलाबाला सर्वाधिक मागणी असते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर या भागातील शेतकरी नियोजन करतात. अनेकांनी फक्त गुलाबशेती तर काहींनी आंतरपीक म्हणूनही देशी गुलाबाचे उत्पादन घेतले आहे. या दोन्ही भागातील गुलाबाचे क्षेत्र सरासरी शंभर एकराहून अधिक आहे.

वर्षभर गुलाब, दरही ठरलेला मंद्रूप येथील श्रीशैल काळे यांची आठ एकर शेती असून, एक एकर गुलाब आहे. त्यात पेरूचीही काही झाडे लावलेली आहेत. रोज ५०० ते ८०० गुलाब त्यांना मिळतात. मंद्रूप आणि सोलापूर येथील बाजारपेठेत प्रतिफूल एक रुपयाप्रमाणे दर ठरवून घेतलेला आहे. दर ठरलेला असल्याने हंगाम, मागणी किंवा दरातील चढ-उतार काही असली तरी त्यांना फारशी अडचण येत नाही.   गुलाबाचा बाजार स्थिरच सोलापूर बाजार समितीमध्येही गेल्या आठवड्यापासून गुलाबाची आवक-जावक वाढली आहे. साध्या गुलाबाची रोजची आवक ५०० ते ७०० किलो आणि दांड्याच्या गुलाबाची आवक ३०० ते ५०० नगापर्यंत आहे. व्हॅलेंटाइन डेसाठी या दोन दिवसांत जवळपास दुपटीने आवक वाढेल. सध्या बाजारात दांड्याच्या गुलाबाला प्रतिनग एक ते दोन रुपये दर आहे, तर साध्या गुलाबाला प्रतिकिलो ४० ते ७० रुपये असा दर आहे. व्हॅलेंटाइनसाठी मागणी वाढणार असली, तरी आवक होण्याची शक्‍यता असल्याने बाजार काहीसा स्थिर राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com