रोजगारावर आधारीत मगन संग्रहालयाची निर्मिती

चरख्यावर सुत कताईचे काम करताना महिला कामगार.
चरख्यावर सुत कताईचे काम करताना महिला कामगार.

आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावाचा विचार मांडणाऱ्या महात्मा गांधी यांनी वर्धा येथे ग्रामीण रोजगारावर आधारीत मगन संग्रहालयाची उभारणी केली. इतक्या वर्षांनंतर खेड्यातील युवक, युवती आणि गरजूंमध्ये कौशल्यावर आधारीत प्रशिक्षणाचे कार्य संग्रहालयाने आजही सुरू ठेवल्याने हजारो जणांना रोजगार मिळाला आहे.   सेवाग्राम आणि वर्धा जिल्ह्यात वास्तव्यास असताना महात्मा गांधी यांनी या भागात ग्रामीण रोजगारावर लक्ष्य केंद्रित केले. शेतीपूरक उद्योगांना चालना गावस्तरावरच मिळावी, असा त्यांचा विचार होता. ग्रामोद्योगाची चळवळ रुजविणारे डॉ. जे. सी. कुमारआप्पा यांच्या मदतीने त्यांनी मगन संग्रहालयाच्या माध्यमातून हा विचार पुढे नेला. मगनलाल गांधी हे महात्मा गांधी यांचे पुतणे त्यांच्या देखरेखीत ग्रामीणांना रोजगार देण्यासाठी पूरक कौशल्य निर्माण करण्याचे काम होत होते. त्यामुळेच पुढे याचे नामकरण मगन संग्रहालय असे झाले. महात्मा गांधी यांचे खंदे समर्थक देवेंद्र कुमार आणि आता देवेंद्र कुमार यांची मुलगी डॉ. विभा गुप्ता या मगन संग्रहालयाचे व्यवस्थापन सांभाळतात. कापूस ते कापड संकल्पना आणली प्रत्यक्षात महात्मा गांधी यांनी चरख्यावर सुत कताई व त्यापासून पुढे खादी कापड तयार केले. आजही मगन संग्रहालयात चरख्यावर सुत कताई त्यापासून तयार धाग्याचे हातमागावर कापड तयार होते. विधवा, परितक्‍या स्त्रिया ज्यांना गरज आहे त्यांना काम देण्याचे धोरण मगन संग्रहालयाकडून अवलंबिले गेले आहे. एक किलो सुत कताई केल्यास २७० रुपये प्रती किलो प्रमाणे पैसे मिळतात. एका दिवसाला (आठ तासात) एक किलो सुत कताई शक्‍य होते. दहा ते साडेपाच या वेळात हे काम होते. हात व सोलरचलीत चरखे या विभागात आहेत. खादी विभागात तब्बल २०० व्यक्‍तींच्या रोजगाराची सोय आहे. महिलांना दिले जाते प्रशिक्षण मगन संग्रहालयात रोजगारासाठी येणाऱ्या महिलांना सहा महिने ते एक वर्षाचे प्रशिक्षण सुरुवातीला दिले जाते. ब्लॉक प्रिंटिंगमध्ये असलेल्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. प्रशिक्षण काळात पाच ते सहा हजार रुपये विद्यावेत्तन देण्याची तरतूद आहे. सेंद्रिय कापसापासून खादी मगन संग्रहालयाव्दारे नियमितचा कापूस पूर्वी विकत घेतला जात होता. नजीकच्या काळात मागणीनुसार आता सेंद्रिय कापूस उत्पादनावर भर दिला गेला आहे. त्याकरिता समुद्रपूर, गिरड, सेलू या भागात शेतकऱ्यांशी सेंद्रिय कापूस उत्पादनाचा करार केला जातो. या कापसाला बाजार दरापेक्षा २० टक्‍के अधिक दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा देखील फायदा होतो. कापूस खरेदीनंतर सेलू, वर्धा येथे जिनींगचे काम होते. कापसापासून जिनींग, कार्डींग स्लायडर आणि त्यापासून पेळू तयार होतो. पेळूपासून धागा तयार होतो चरख्यावर आणि नंतर तो हातमागावर वापरत त्यापासून कापड तयार करण्याचे काम होते. सेलू येथे अंबर चरखा असून त्या ठिकाणी स्पिनींगचे काम होते. तीन हजार मीटर महिन्याला तयार होते. शर्टिंग, पायजमा, दुपट्टे, साड्या अशा प्रकारची उत्पादने या ठिकाणी तयार होतात. सेंद्रीय कापसासाठी प्रोत्साहन सेंद्रीय कापूस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता संस्थेच्या वतीने तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. हंगामात किंवा ज्या गावातील शेतकरी संस्थेच्या प्रकल्पात सहभागी होण्यास तयार असतील, अशा शेतकऱ्यांना पूरक माहिती दिली जाते. त्यानंतर तिसऱ्या वर्षापासून सरासरी कापूस खरेदी केली जाते. नैसर्गिक रंगांचा होतो वापर व्हेजीटेबल डायींग, ब्लॉक प्रिंटिंग केले जाते. खादीला साजेस अस डायींग अर्थात कलर कॉम्बीनेशन केले जाते. नैसर्गिक रंगाचा ज्यामध्ये बेहडा, पळसफुल, डाळिंबाची साल यासारख्या तब्बल ६० उत्पादनांचा वापर होतो. मदना, नवरगाव, जामनी अशा जवळपासच्या गावातून या वस्तूंचे संकलन केले जाते. त्यांना देखील वेगळे पैसे दिले जातात. डाळिंबाच्या सालीचा नगर जिल्ह्यातून पुरवठा होतो. फळगळ झाल्यानंतर त्यांना बाजारात भाव राहत नाही. त्यांना वाळवून डाळिंब सालीपासून रंग तयार होतो. यापासून पिवळा रंग मिळतो, असे मुकेश लुथडे सांगतात. लाल रंगासाठी मंजिष्ठाचा वापर होतो. याप्रमाणे शरीराला पोषक असेच कापड या ठिकाणी उत्पादित होते. मगन खादीच्या ब्रॅण्डला मागणी मगन खादी ब्रॅण्डखाली येथे उत्पादित खादीची विक्री होते. याला देशभरातून मागणी असल्याची माहिती डॉ. विभा गुप्ता यांनी दिली. दिल्ली, मुंबई त्यासोबतच खादी ग्रामोद्योग, टाटा तनेरा, गुड-अर्थ, फॅब इंडिया, खादीजी (मध्यप्रदेश), पारस फॅशन (केरळ) अशा नामांकित संस्था देखील त्यामध्ये समावेश आहे. स्वराज एम्पोरियम (नागपूर) यांच्याव्दारे दोन ते अडीच लाख रुपयांची खरेदी होते. स्वदेशी डॉट कॉम, बेटर इंडिया (बंगलोर), कार्नीवाल अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मगनची खादी उपलब्ध आहे. बदलतेय खादी मगन संग्रहालयाने युवकांमध्ये टिशर्टची वाढती क्रेझ असल्याचे जाणले. याच जाणिवेतून खादी टिशर्ट देखील उपलबध करून देण्यात आले आहेत. त्याला देखील देशभरातून वाढती मागणी असल्याचे मुकेश सांगतात. जीएस कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत याची खरेदी केली. आमच्या बापाच्या शिवारातील कापसापासून हे तयार झाल्याची जाणीव आम्हाला ही खादी नेहमी करून देत राहील, त्यामुळेच महाग असले तरी खादी टिशर्टच आम्ही घालणार असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. एकंदरीत वैष्णव जन तो... तेने कहियेजे पिड परायी जाने रे ! याच गांधी विचारातून ग्रामीण भागातील गरजूंना रोजगार उपलब्धतेचे काम अखंडितपणे मगन संग्रहालयाच्या माध्यमातून केले जात आहे. यातूनच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचाही उद्देश साध्य होत आहे.   संपर्क : मुकेश लुथडे संचालक, खादी उत्पादन विभाग, मगन संग्रहालय वर्धा संपर्क- ९५०३६१९८५३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com