‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह गुणवत्तेत वाढ

भातशेतीत काशिनाथ व सौ. सुमन हे खोले दांपत्य
भातशेतीत काशिनाथ व सौ. सुमन हे खोले दांपत्य

पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या गावातील काशिनाथ चेंडू खोले यांनी सुमारे सहा वर्षांपासून सगुणा राईस टेक्नॉलाॅजीद्वारे (एसआरटी) भातशेती सुरू केली आहे. पूर्वी एकरी १२ क्विंटलपर्यंत असलेले त्यांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने एकरी १८ क्विंटलपर्यंत पोचले आहे. उत्पादन खर्च, बियाणे, मजुरी यातही लक्षणीय बचत करून भातशेती सुकर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.     राज्यातील सर्वात उंच शिखर कळसूबाई डोंगराच्या पायथ्याशी पेंडशेत गावातील काशिनाथ चेंडू खोले हे प्रयोगशील शेतकरी आहेत. पत्नी सुमनबाई यांच्यासोबत ते शेती करतात. त्यांना तीन मुले. एक नोकरीत, दुसरा शिक्षण तर तिसरा भंडारदरा धरणाच्या परिसरात हॉटेल व्यवसाय करतो.  खोले यांची शेती  पेंडशेत परिसरात (ता. अकोले, जि. नगर) दरवर्षी तीन-चार महिने जोरदार पाऊस कोसळतो. या भागातील शेतकरी खरिपात भात घेतात. येथील काशिनाथ खोले यांची बारा एकर जमीन आहे. त्यांचेही भात हेच मुख्य पीक असून यंदा ते सहा एकरांवर आहे. कळसूबाईच्या डोंगराला लागून असलेल्या जमिनीवर जांभूळ, उंबर, सादडा, बेहरडा, आंबा, हिरडा, निलगिरी, मोह, बावा, बोंडारा, भोकर, गुलचाई, चंदन आदी एक हजारांहून अधिक झाडे आहेत. खोले त्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतात. खोले यांच्या प्रगतीला दूध व्यवसायाचा मोठा आधार मिळाला. आजोबांपासून हा व्यवसाय केला जायचा. एकेकाळी साठ गायी होत्या. येथून भंडारदरा साधारण सहा किलोमीटरवर आहे. तेथे दूध विकले जायचे. आज गोमूत्र, शेणासाठी दोन डांगी गायी आहेत.  सुधारीत तंत्राने भाताची शेती 

  • वन विभागाचे रनळकर व पाटील यांनी खोले यांना नेरळ (जि. रायगड) भागातील प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांच्याकडे ‘एसआरटी’ पद्धतीने भात लागवड तंत्राच्या प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. भडसावळे यांनीच हे तंत्र विकसित केले आहे. त्यानंतर खोले या तंत्राकडे वळले. 
  • यंदा दीड एकरावर इंद्रायणी व आंबेमोहोर, वीस गुंठे काळभात, वीस गुंठे कोळपी वाणाची लागवड. 
  • सगुणा पर्पल अर्ली व सगुणा पर्पल लेट एल या नव्या वाणांच्या चाचण्या यंदा सुरू. 
  • पारंपरिक शेतीतील त्रुटी 

  • उन्हाळ्यात झाडाच्या फांद्या तोडून त्या जाळून रोप टाकण्यासाठी जमीन भाजावी लागते. 
  • रोपे एकवीस दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवड. खेकड्याच्या त्रासाने रोपे खराब होतात. जास्त पावसात सडून जातात. लागवडीवेळी शेताची चिखलणी करावी लागते. वाहत्या पाण्यातून जमिनीतील कर्ब वाहून जातो. 
  • एकरी सुमारे ५० किलो बियाणे लागते. दोन रोपांतील अंतर काहीवेळा निश्‍चित नसते. अंदाजेच लागवड असते. त्यामुळे फवारणीत अडथळे येऊ शकतात. 
  • असे वापरले एसआरटी तंत्र 

  • सन २०१३ पासून या तंत्राचा वापर. तेव्हापासून नांगरणी नाही. 
  • १०० बाय ७५ रुंद सेंटिमीटर आकाराचे लोखंडी यंत्र तयार केले. त्याद्वारे टोकणीसाठी छिद्रे पाडली जातात. 
  • जमीन भाजण्याची, रोपे टाकण्याची गरज नाही. गादीवाफ्यावर बियाण्याची टोकण. 
  • दोन रोपांतील अंतर २५ सें.मी. तर दोन वाफ्यातील अंतर शंभर सें.मी. दोन वाफ्यात दीड फुटाचा थोडासा खोलगट चर. वाफे तयार केल्यानंतर पुन्हा तयार करण्याची गरज नाही. जूनमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर त्वरीत टोकण. 
  • गांडूळखताच्या वापरावर अधिक भर. दर वर्षाला दोन टन खतनिर्मिती 
  • शेण, गोमूत्र, बेसन पीठ आणि गुळावर आधारीत जीवामृताचा वापर 
  • गोमूत्राचा वापर. सध्या दीडशे लिटरची साठवणूक. 
  • होणारी बचत (एकरी) 

  • पारंपरिक पद्धत एसआरटी पद्धत 
  • एक एकर लावणीसाठी ३० १४ 
  • बियाणे ५० किलो १४ किलो 
  • उत्पादन- १२ क्विंटलपर्यंत यंदा १८ क्विंटल 
  • सुधारीत तंत्राचे झालेले फायदे 

  • पूर्वी उत्पादन खर्च एकरी २१,४५० रुपये व्हायचा. आता १२ हजार ८५० रुपये होतो. 
  • रान भाजण्याची, चिखलणीची गरज नाही. त्यामुळे मातीतील कर्ब, लाभदायक जिवाणूंच्या संख्येत वाढ -गादीवाफा असल्याने पाणी धरून राहण्यास मदत. 
  • सर्व बाबींचा काटेकोर वापर. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेत वाढ 
  • पर्यटन व्यवसायातून रोजगार  हरिश्चंद्रगड, कळसूबाई, पट्टा किल्ला, भंडारदरा प्रकल्प, रतनगड, रतनवाडी, घाटघर आदी पर्यटकांची आवडती स्थळे या भागात आहेत. खोले यांनी प्रयोगशील शेती करताना पर्यटनातून रोजगार मिळवला आहे. कळसूबाईचा डोंगर चढण्यासाठीची वाट खोले यांच्या शेतातूनच जाते. पर्यटकांची राहण्याची व्यवस्था तसेच हिवाळ्यात ट्रेकर्ससाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते करतात. मालकीच्या शेताला लागून वनविभागाच्या जागेत असलेल्या पाहणी मनोऱ्यावरून डोंगराळ भागातील सौंदर्य न्याहाळता येते.  पुरस्कार व भेटी 

  • नगर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श शेतकरी म्हणून गौरव 
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इगतपुरी येथील भात संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, ‘आत्मा’चे तत्कालीन प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, श्री. जगताप, प्रवीण गोरे, बाळनाथ सोनवणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, चंद्रशेखर भडसावळे तसेच तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी खोले यांच्या शेताला भेट दिली आहे. 
  • खोले यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

  • आदिवासी, दुर्गम भागातही सातत्याने प्रयोग 
  • भात काढणीनंतर गेल्या वर्षी रब्बीत त्याच गादीवाफ्यावर हरभरा, वाटाणा, मसुराचे यशस्वी पीक 
  • सुमारे ७५ शेतकऱ्यांकडून खोले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसआरटी’ पद्धतीने भात लागवड 
  • महिलांच्या रोजगारासाठी पुढाकार घेऊन सावित्रीबाई फुले महिला बचत गट 
  • दर्जेदार तांदूळ निर्मितीसाठी यंत्राअैवजी हातसडी पद्धतीचा वापर. धान्य महोत्सव, महिला बचत गट प्रदर्शनात तांदळाची विक्री 
  •  स्व उत्पादित हरभऱ्याची जात्यावर डाळ तयार करून विक्री. विविध रानभाज्यांचीही विक्री 
  • कृषी विभागाच्या मदतीने वीस गुंठ्यात मिरी, जायफळ, वेलदोडे यासह मसाले पिकांचे नियोजन 
  • संपर्क - काशिनाथ खोले- ९६८९५८१९९७ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com