agriculture story in marathi, Sahyadri Farmer Producer Company, Nasik has produced affordable weather stations for farmers.. | Page 2 ||| Agrowon

अत्याधुनिक हवामान केंद्रे आता शेतकऱ्यांच्या आवाक्यात, ‘सह्याद्री’ कंपनीकडून तीन प्रकारच्या केंद्रांची निर्मिती

मंदार मुंडले
बुधवार, 5 मे 2021

सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतील अशा तीन प्रकारच्या हवामान केंद्रांची (वेदर स्टेशन्स) निर्मिती व ती उपलब्ध करण्यासही सुरुवात केली आहे. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीकविमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतील अशा तीन प्रकारच्या हवामान केंद्रांची (वेदर स्टेशन्स) निर्मिती व ती उपलब्ध करण्यासही सुरुवात केली आहे. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीकविमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे. ‘नासा’ या जगप्रसिद्ध संस्थेत कार्य केलेल्या शास्त्रज्ञाचे तांत्रिक पाठबळ या प्रकल्पास लाभले आहे.
 
मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या सभासदांसाठी सातत्याने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असते. अलीकडील वर्षात ‘सह्याद्री’ने एका खासगी कंपनीसोबत करार करून ‘शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्रे (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स) उभारणी, ‘सॉप्टवेअर डेव्हलपमेंट’ व त्याआधारे सल्ला-मार्गदर्शन असा सामूहिक उपक्रम सुरू केला. अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल प्रणाली या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘प्रिसिजन फार्मिंग’ (काटेकोर शेती) ही त्याची संकल्पना होती. उत्पादन खर्च कमी करण्यासह प्रभावी व अचूक शेती व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण उत्पादन हे साध्य होते. त्याअंतर्गत नऊ स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी शेतकऱ्यांच्या शेतात झाली. देशातील हा वेगळा व स्तुत्य उपक्रम होता.

एक पाऊल पुढे
‘सह्याद्री’ने एक पाऊल पुढे जात आता स्वतःचीच सहयोगी कंपनी सुरू केली आहे. त्याद्वारे अत्याधुनिक व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्यात येतील अशी तीन प्रकारची ‘वेदर स्टेशन्स’ तयार करण्यास व उभारण्यास सुरुवात केली आहे. ‘आयआयटी’ मुंबई येथून इंजिनिअर झालेले व नासा (अमेरिका) या जगप्रसिद्ध संस्थेत सुमारे १२ वर्षे कार्य केलेले डॉ. पराग नार्वेकर भारतात परतले. इस्त्रो, बंगळूर येथील संस्था तसेच तेथील आयआयटी, अमेरिका कृषी विभाग (यूएसडीए) यांच्यासोबत त्यांनी काही प्रकल्पांवर काम केले. त्यानंतर ‘सेन्सरटिक्स’ नावाची कंपनी सुरू केली. आज हीच कंपनी ‘सह्याद्री’ची सहयोगी बनली आहे. ‘सह्याद्री’चे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, की पूर्वीच्या प्रकल्पात परदेशातील कंपनीकडून वेदर स्टेशन्स आयात केली जायची. प्रति स्टेशन किंमत एक लाख ६० हजार रुपये होती. सर्वसामान्य शेतकऱ्याला ते विकत घेणे, विविध प्लॉटमध्ये त्यांची उभारणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. आता आम्हीच कंपनी स्थापन करून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तीन प्रकारांत वेदर स्टेशन्स विकसित केली आहेत. त्यात दिलेल्या सुविधांनुसार बाराहजार रुपयांपासून ६० हजार रुपये एवढ्या कमी किमतीत ती उपलब्ध केली आहोत.

‘पाचशे’ केंद्रांचे उद्दिष्ट
शिंदे म्हणाले, की येत्या काळात पाचशे ‘वेदर स्टेशन्स’ सभासदांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट घेऊन कामांस सुरुवात झाली आहे. सह्याद्रीचे सदस्य नसलेल्या शेतकऱ्यांनाही पुढील काळात मागणीनुसार ‘स्टेशन्स’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सिंचन प्रणालीत ज्याप्रमाणे ‘प्लॉट’निहाय व्हॉल्व्हज व फर्टिगेशन, त्यानंतर सर्व प्लॉटसाठी मिळून सेंट्रल युनिट व सर्व शेतकऱ्यांची मिळून सामुदायिक स्तरावर पाणीवापर संस्था असे विविध टप्पे असतात. वेदर स्टेशन्सबाबतही काहीशा अशाच स्वरूपाची संकल्पना वापरली आहे.

पीकविम्यासाठी गरजेचे
श्री.. शिंदे म्हणाले की पीकविमा मिळवण्याच्या दृष्टीने सर्वसामाईक स्तरावरील पर्जन्यमान व संबंधित डाटा यापेक्षाही संबंधित शेतकऱ्याच्या वैयक्तिक प्लॉटमध्ये वेदर स्टेशन व त्याचा डाटा उपलब्ध झाल्यास त्याची परिणामकारकता व अचूकता अधिक असेल. विम्याची भरपाई मिळण्याच्या दृष्टीने शास्त्रीयदृष्ट्या त्यामुळे अधिक पुष्टी मिळेल.
 
स्थानिक स्तरावर निर्मिती
सह्याद्री- ‘सेन्सरटिक्स’चे कार्यकारी संचालक डॉ. पराग नार्वेकर म्हणाले, की ‘हार्डवेअर्स’ व सॉफ्टवेअर्स वापरून मोहाडी येथेच वेदर स्टेशन्सची निर्मिती करीत आहोत. त्यासाठी लागणारे सेन्सर्स व इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स आदी ८० टक्क्यांहून अधिक उपकरणे येथेच तयार झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ती सहज उपलब्ध होणारी आहेत. साहजिकच त्वरित मार्गदर्शनही मिळण्याची सोय झाली आहे. उच्च दर्जाचे ‘रेनगेज’ किंवा तत्सम महत्त्वाचे भागच अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीकडून आयात करीत आहोत. त्यांच्यासोबत ‘टाय अप’ केले आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राला (पुणे) आमच्या सदस्यांकडील ‘वेदर स्टेशन्स’चा डाटा पाठवला जाईल. शास्त्रज्ञांमार्फत त्याचे विश्‍लेषण होऊन स्थानिक स्तरासाठी अचूक ठरणारे पीक संरक्षण व व्यवस्थापन मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळेल. विशेष म्हणजे स्वतःच्या प्लॉटमधील ‘डाटा’ हा संबंधित शेतकऱ्याचाच असल्याने पुढेही त्याला संदर्भ म्हणून त्याचा वापर करता येईल.
 
पंचवीस स्टेशन्सची उभारणी
आत्तापर्यंत दिंडोरी, निफाड, मालेगाव तालुक्यांत मिळून सुमारे २५ पर्यंत स्टेशन्सची उभारणी झाल्याचे कंपनीचे अभियंते सागर मोगरे यांनी सांगितले. यात प्रत्येकी पाच मास्टर्स व ट्रेसर्स तर १५ स्केलर्सचा समावेश आहे.

बागायतदार अनुभव
मोहाडी (ति. नाशिक) येथील गणेश कदम यांची १० एकर द्राक्ष बाग आहे. क्रिमसन, क्लोन टू व थॉम्पसन वाण आहेत. एकरी ११ टन उत्पादकता असून, पैकी ९ टन निर्यातक्षम उत्पादन मिळते. त्यांनी ‘मास्टर’ स्टेशन उभारले आहे. अलीकडील वर्षांपासून त्यांच्या बागेत ‘सह्याद्री’तर्फे हवामान केंद्रांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे गणेश यांचा त्यात पक्का अनुभव तयार झाला आहे. ते म्हणाले, की झाडांच्या मुळांना पाण्याची गरज भासली किंवा बागेत एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर त्याचा अलर्ट मिळतो. तापमान, आर्द्रता, ‘लीफ वेटनेस’ या बाबी कळून येतात. त्यानुसार पूर्वनियोजन करता येते. मुख्य म्हणजे मालाची गुणवत्ता वाढते. सुमारे ३० टक्के फवारण्या वाचवता येतात. ‘मास्टर’ व्हर्जनमुळे एकूण हवामान अंदाज लक्षात येतो. मात्र दहा एकरांत विविध प्लॉटनिहाय व्यवस्थापनासाठी ‘स्केलर’सारख्या व्हर्जनचीही आवश्‍यकता भासू शकते. त्याच्या किमती आवाक्यात असल्याने एक ते दोन एकरधारक द्राक्ष किंवा टोमॅटो उत्पादकालाही अशा स्टेशन्सची उभारणी करणे शक्य होणार आहे.

असे आहेत वेदर स्टेशन्सचे प्रकार
स्केलर स्टेशन

 • द्राक्ष किंवा कोणत्याही शेतीत उत्पादन खर्च पर्यायाने अन्नद्रव्ये व कीडनाशकांवरील खर्च कमी करणे गरजेचे असते. त्यादृष्टीने पीक वाढीच्या प्रत्येक अवस्थेत सर्वेक्षण (मॉनिटरिंग) व सिंचन नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. या स्टेशनमध्ये वापरलेले सेन्सर्स माती व कॅनोपी यांवर देखरेख करतात.
 • यातील सेन्सर्स मातीच्या खाली मुळांच्या कक्षेत विविध थरांत ठेवलेले असतात.
 • ते मातीतील ओलावा, मातीतील इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी व तापमान मोजण्याचे कार्य करतात.
 • कॅनोपीत हे सेन्सर्स सापेक्ष आर्द्रता, कॅनोपी तापमान आणि पानांतील ओलावा मोजतात.
 • जर या दोन बाबी योग्य वेळेत समजल्या तर बुरशीजन्य किंवा अन्य कोणत्याही रोगाच्या प्रादुर्भावाबाबत बऱ्याच आधी पूर्वानुमान देणे किंवा भाकीत करणे शक्य होते. त्यातून पिकाच्या विशिष्ट अवस्थेत योग्य, प्रभावी व प्रतिबंधक उपाय करणे शक्य होते.
 • विविध प्लॉटमध्ये विविध व्यवस्थापन सुरू असते. त्यामुळे प्रत्येक प्लॉटमध्ये स्केलर स्टेशन उभारून कॅनोपी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे साधता येते.

 ट्रेसर स्टेशन

 • हे स्केलर स्टेशनच्या पुढील व्हर्जन आहे. स्केलर स्टेशनमधील सर्व सेन्सर्स व सुविधांचा यात समावेश.
 • त्या व्यतिरिक्त ‘पाणी व्यवस्थापन’ हा यातील महत्त्वाचा घटक. जगातील सर्वोत्कृष्ट रेनगेज (पाऊस मोजण्याचे उपकरण) यात आहे. पीकविमाधारकांसाठी हा घटक महत्त्वाचा ठरणारा आहे.
 • हवामान सेवा, प्रसारमाध्यमे, इंटरनेट आदींच्या माध्यमातूनही गाव किंवा तालुका स्तरावर
 • पाऊस, थंडीची लाट आदींबाबतची माहिती शेतकऱ्यांना समजते. मात्र ‘वॉटर बॅलन्स इक्वेशन’ काढण्यासाठी आपल्या वैयक्तिक शेतात होणाऱ्या पावसाची माहिती असणे गरजेचे आहे.
 • त्या दृष्टीने पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन नियोजन हंगामापूर्वीच करणे सोपे होते.
 • रेनगेज आपल्या स्वतःच्या शेतात उभारलेले असल्याने प्रत्यक्ष त्या ठिकाणी झालेला पाऊस समजतो. या सुविधेमुळेच पीकविमा योजनेसाठी हा मुद्दा सर्वांत आधारभूत ठरू शकतो.

 मास्टर स्टेशन

 • स्केलर’ व ‘ट्रेसर’ या दोन्हींच्या पुढील व्हर्जन म्हणजे मास्टर स्टेशन. प्रिसिजन फार्मिंग’साठी सर्वसुविधांनी युक्त अद्ययावत.
 • आधीच्या दोन्ही स्टेशन्समधील सेन्सर्स व सुविधांव्यतिरिक्त वाऱ्याचा वेग, दिशा, प्रकाश संश्‍लेषणासाठी आवश्‍यक सूर्यकिरणे, बाष्पीभवन (इव्हॅपो ट्रान्सपिरेशन), हवेचा दाब आदी बाबी माहीत करून घेता येतात.
 • आपल्या कॅनोपीतील व स्थानिक भागातील आर्द्रता व तापमान यांच्यातील फरक समजून घेता येतो.
 • ‘ट्रेसर’ व ‘स्केलर’ स्टेशन्सच्या तुलनेत यात सेन्सर्सची संख्या अधिक आहे. साहजिकच
 • व्यापक क्षेत्रावर म्हणजे पाच बाय पाच किलोमीटर परिघापर्यंत त्याचा वापर करता येतो. म्हणजेच गाव स्तरावर हवामानाच्या नोंदी संकलित करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
 • शेतकरी समूहाद्वारे एकत्र येऊन सामाईक स्तरावर त्याचा वापर करू शकतात. त्यावरून प्रादेशिक किंवा स्थानिक स्तरावरील हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात येऊ शकतो. तर ट्रेसर व स्केलर स्टेशनचा उपयोग आपल्या वैयक्तिक शेतात प्लॉटचा आकार व गरजेनुसार करता येऊ शकतो.
 • मास्टर स्टेशन’द्वारे संकलित झालेल्या डाटाचा वापर संबंधित कृषी हवामान विभागासाठी किंवा अधिक व्यापक क्षेत्रासाठी हवामान अंदाज देण्याच्या अनुषंगाने करता येईल.

वेदर स्टेशन्स, सेन्सर्स प्रकार व त्यातील ‘पॅरामीटर्स’
मास्टर स्टेशन

 • वाऱ्याचा वेग व दिशा
 • सौर किरणे (सोलर रेडिएशन)
 • वातावरणाचा दाब
 • पिकांचे बाष्पीभवन
 • पर्जन्यमान (रेनफॉल)
 • पानांवरील ओलावा
 • आर्द्रता (ह्युमिडिटी)
 • किमान व कमाल तापमान
 • पानांमधील तापमान
 • मातीच्या ओलाव्यातील चार स्तर
 • मातीतील वाहकतेचे चार स्तर
 • मातीचे तापमान

फायदे

 • न्यूट्रिशन सेन्सर आधारित व्यवस्थापन
 • प्रयोगशाळा व सेन्सर अहवाल एकत्रीकरण
 • उपग्रह छायाचित्रावर आधारित (सॅटेलाइट इमेज) निरीक्षण
 • चालू वेळेतील हवामान माहिती व विस्तार व विस्तारित हवामान अंदाज
 • पीकविमा सुविधा
 • पिकांच्या पोषण स्तरावरील माहिती
 • किडी- रोगांबाबत आगाऊ सूचना
 • सिंचन नियोजन

ट्रेसर स्टेशन

 • -पर्जन्यमान (रेनफॉल)
 • पानांवरील ओलावा
 • आर्द्रता (ह्युमिडिटी)
 • किमान व कमाल तापमान
 • पानांमधील तापमान
 • मातीच्या ओलाव्यातील चार स्तर
 • मातीतील वाहकतेचे चार स्तर
 • मातीचे तापमान

फायदे

 • चालू-वेळेतील हवामान माहिती व विस्तार व विस्तारित हवामान अंदाज
 • पीकविमा सुविधा
 • पिकांच्या पोषण स्तरावरील माहिती
 • किडी- रोगांबाबत आगाऊ सूचना
 • सिंचन नियोजन

स्केलर स्टेशन
-आर्द्रता (ह्युमिडिटी)
-किमान व कमाल तापमान
-पानांमधील तापमान
-मातीच्या ओलाव्यातील चार स्तर
-मातीतील वाहकतेचे चार स्तर
-मातीचे तापमान

फायदे

 •  हवामान अंदाज
 •  पिकांच्या पोषण स्तरावरील माहिती
 •  किडी- रोगांबाबत आगाऊ सूचना
 • सिंचन नियोजन

वेदर स्टेशन्सच्या किमती (यात बदल होऊ शकतो.)

 •  
 • मास्टर- ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत.
 • ट्रेसर- २० हजार रु.
 • स्केलर- १० हजार ते १२ हजार रु.

भविष्यातील शेती ‘सेन्सर’द्वारेच
वेदर स्टेशन आणि त्याला जोडलेले सेन्सर्स हीच भविष्यातील शेती आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ‘सह्याद्री’च्या ‘ॲग्रॉनॉमी’ विभागाचे प्रमुख सतीश वाळुंज म्हणाले, की पाऊस, ढगाळ वातावरण, झाडाची कॅनोपी, मूळ शाखा विस्तार आदी सर्व बाबी अभ्यासून आम्ही हवामान केंद्रांना विविध सेन्सर्स लावले आहेत.

अलीकडे सतत पाऊस होत आहे. एप्रिल छाटणीचे दिवस आहेत. छाटणीनंतरचे ४० ते ७० दिवस महत्त्वाचे आहेत. सरीत पाऊस झाल्यास त्यातील क्षार मुळांजवळ जातात. नत्राचे प्रमाण वाढते. पुढे गर्भधारणेवर त्याचा परिणाम होतो. ऑक्टोबर छाटणीत घड जिरण्यात हा परिणाम दिसतो. त्यामुळे आताच्या काळात मुळांजवळ पाणी दिल्यास क्षार त्या कक्षेतून दूर जाण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीत ओलावा किती आहे, पाणी केव्हा व किती दिवसांनी द्यायचे हे सेन्सर सांगतो. मुळांच्या कक्षेखाली चार इंचावर एक, मुळांच्या कक्षेत व मुळ्या सुरू होतात त्या ठिकाणी एक असे तीन सेन्सर्स आम्ही लावले आहेत. मुळांजवळ क्षार (ईसी), ओलावा या बाबी त्यातून स्पष्ट होतात.

कॅनोपीतील सेन्सर
ढगाळ वातावरण, मिळणारा सूर्यप्रकाश, कॅनोपीचा विस्तार किती आहे या बाबी माहीत करून तिथे ‘ॲक्यूमलेट’ होणारा नत्र या बाबी माहीत करून अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापनासाठी कॅनोपीत सेन्सर लावला आहे. पानांमधून बाष्पीभवन किती होत आहे (इव्हॅपो ट्रान्सपिरेशन) त्यावरून किती पाणी द्यावे लागेल हे देखील सेन्सर सांगतो.

रोग-किडींची पूर्वसूचना
तापमान, आर्द्रता, पाऊस, क्लाऊड कव्हर आदी बाबींच्या आधारे डाऊनी, पावडरी मिल्ड्यू, करपा, थ्रिप्स आदींच्या धोक्यांबाबत शेतकऱ्यांना आलेख व त्यावरील लाल, हिरव्या रंगांच्या रेषांवरून आगाऊ सावध केले जाते. उदा. एखाद्या रोगाबाबत लाल रेषा असेल तर दोन दिवस आधी प्रतिबंधात्मक फवारणी घेण्याचे नियोजन शेतकरी करतो.

संपर्क- डॉ. पराग नार्वेकर, ८०८७११३६००
(वेदर स्टेशनसंबंधी)
सतीश वाळुंज, ९४२२१७८९८६


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...