गावरान पोल्ट्री व्यवसायातून उंचावले अर्थकारण 

 कुक्कुटपालनासाठी उभारलेले शेड.
कुक्कुटपालनासाठी उभारलेले शेड.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावळे (ता. वैभववाडी) येथील संभाजी श्रीरंग रावराणे यांनी सद्यस्थितीत सुमारे १८०० पक्ष्यांच्या संगोपनातून कुक्कुटपालन व्यवसायात चांगला जम बसविला आहे. अंडी, नर पक्षी व पिले यांच्या विक्रीतून त्यांनी विक्री व्यवस्था उभारली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलजवळ मित्रासोबतच्या भागीदारीतून त्यांनी हॅचरीजही उभारले आहे. आंबा, काजू, भातशेतीला या पोल्ट्रीची जोड दिल्याने अर्थकारणही मजबूत केले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावळे (ता. वैभववाडी) हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. वैभववाडी-नावळे रस्त्यालगतच नावळे येथे संभाजी श्रीरंग रावराणे यांचे घर आहे. आजूबाजूला निसर्गाचा हिरवा शालू परिधान केलेल्या डोंगररांगा दृष्टीस पडतात. या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे भात हेच प्रमुख पीक आहे. अलीकडे काजू लागवडीवर येथील तरुण शेतकऱ्यांनी अधिक भर दिला आहे. परंतु कुक्कुटपालनातून या सर्वापेक्षा थोडी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न रावराणे यांनी केला आहे.  रावराणे यांची गावरान पोल्ट्री  कोकणात पूर्वी घरगुती कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री व्यवसाय केला जायचा. अलीकडे हे प्रमाण कमी झाले आहे. संभाजी व पत्नी सौ. सुविधा या रावराणे दांपत्याने मात्र या व्यवसायला पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पोल्ट्री व्यवसाय कोणकोणत्या बाबींना कशी मागणी आहे याचा अभ्यास केला. पिलांना मोठी मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पूर्ण क्षमतेने या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.  प्रकल्प वाटचाल  प्रकल्प उभारण्यासाठी शेड, पाण्याची सोय, पक्षी आणि अन्य आवश्‍यक सोयीसुविधांची उपलब्धता करणे गरजेचे होते. त्यासाठी साडेनऊ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार केला. तशा प्रकारचा प्रस्ताव बँकेकडे दिला. त्यातून पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. उर्वरित रकमेची जमवाजमव स्वउत्पन्नातून केली. साधारण २०१७ मध्ये कामाला सुरवात केली. सुमारे ६० बाय २२ फूट आणि ६० बाय १५ फूट अशा दोन शेडसची उभारणी केली. आवश्‍यक वीज पुरवठा, पाण्याची सोय आणि आवश्‍यक गोष्टींची पूर्तता करून मे २०१७ मध्ये व्यवसायाला सुरवात झाली.  गावरान वाणाची निवड  पोल्ट्रीचा विचार रावराणे यांच्या मनात काही वर्षांपासून घोळत होता. त्यामुळे गारगोटी (जि. कोल्हापूर) येथे या व्यवसायाचे १२ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. या कालावधीत कोणत्या भागात कोणती जात उपयुक्त आहे याची माहिती झाली होती. कोकणात तीनही ऋतब जवळपास कडक असतात. एप्रिल- मे चा उन्हाळा, जून-जुलैचा अति पाऊस आणि नोव्हेंबर- डिसेंबरची थंडी या अशा वातावरणात गावरान संकरीत जात तग धरू शकते असा निष्कर्ष त्यांनी आपल्या निरीक्षणातून काढला. त्याच स्थानिक वाणाची निवड केली.  नियोजनबद्ध काम  पोल्ट्री व्यवसाय जितका फायदेशीर दिसतो तितकाच तो जोखमीचादेखील आहे. त्यामुळे रावराणे यांनी आपल्या प्रकल्पात नियोजनबद्धतेला अधिक महत्त्व दिले. ठरलेल्या वेळी कोंबड्यांना खाद्य, पाणी देताना लसीकरणाचा कार्यक्रमही ते काटेकोर राबवतात. याशिवाय साफसफाई वेळेवर करावी लागते. एवढेच नव्हे कोंबड्यांवर दररोज बारीक लक्ष ठेवावे लागते. एखाद्या कोंबड्याची हालचाल संशयास्पद वाटली त्याची चिकित्सा करून वेळेत उपचार करण्यात येतात. सुरवातीला दीडशे पक्ष्यांपासून सुरू झालेला व्यवसाय आज १८०० पक्ष्यांच्या संख्येपर्यंत पोचला आहे.  पत्नीची भक्कम साथ  रावराणे यांना या व्यवसायात पत्नी सुविधा यांची भक्कम साथ लाभली आहे. घरातील जबाबदाऱ्या सांभाळून त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून या व्यवसायात राबतात. त्यांनीही कुक्कुटपालनाचे तीन दिवसांचे प्रशिक्षण दोन वेळेस पूर्ण केले आहे. त्यामुळे दोघांपाशीही पक्षी संगोपनाचे चांगले ज्ञान जमा झाले आहे.  विक्री व्यवस्था  रावराणे यांनी अंडी, नरपक्षी व पिले यांची विक्री करण्यावर भर दिला आहे. गावरान कोंबडीच्या पिलांना मोठी मागणी आहे. रावराणे यांच्याकडील पिले जिल्हाभर विक्री होतात. त्याचबरोबर कोल्हापूर, कर्नाटक, बेळगाव या परिसरातही पिलांना मोठी मागणी आहे. विक्रीआधी निम्मी रक्कम खरेदीदार रावराणे यांच्या बँक खात्यात जमा करतो. पिलांचा पुरवठा झाल्यानतंर उर्वरित रक्कम मिळून जाते. वैभववाडी, कणकवली व देवगड या तीन तालुक्यांतील आठवडे बाजारांत रावराणे विक्री करतात.  आठवड्यातील चार दिवस ही विक्री होत असल्याने ताजे उत्पन्न हाती पडते. सुरवातीची दीड वर्षे बाजारपेठ मिळविण्यासाठी धडपड करावी लागली. परंतु आता बाजारपेठेतील मागणी समजल्याने त्यानुसार पुरवठा करणे शक्य होत आहे. त्यामुळेच कागल येथील हॅचरीचा आधार घेतला आहे. त्याद्वारेही उत्पन्न हाती पडते आहे. मोठ्या आकाराची अंडी हॅचिंगसाठी पाठविण्यात येतात. तर छोट्या आकाराची अंडी विक्रीसाठी किवा पांरपरिक पद्धतीने उबविण्यासाठी वापरली जातात.  कोंबडीखताचा वापर  रावराणे यांच्याकडे काजूची सुमारे ४००, हापूस आंब्याची ८२ तर नारळाची ३५ झाडे आहेत. याशिवाय भातशेतीतूनही उत्पन्न मिळते. या सर्व शेतीसाठी कोंबडीखताचा चांगला उपयोग होतो. त्यातून रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी झाला आहे.  उत्पादन वाढविणार  राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत चांदा ते बांदा योजना राबविली जात आहे. या योजनेत कुक्कुटपालनावर भर दिला आहे. त्यामुळे पिले पुरविण्याची जबाबदारी घेणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले. उलट्या पिसाच्या कोंबड्यांना कोल्हापूर आणि अन्यत्रही मोठी मागणी आहे. या कोंबड्यांना मोठी किंमत मिळते. त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढविण्याचाही प्रयत्न आहे. त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली आहे.  रावराणे यांचा पोल्ट्री व्यवसाय दृष्टिक्षेपात 

  • सद्यस्थितीत अंडी देणाऱ्या कोंबड्या- ३८२ 
  • तीन महिन्यांची पिले- ३८० 
  • नर- ८० 
  • दररोज मिळणारी अंडी- सुमारे १८० 
  • दर आठवड्याला उपलब्ध होणारी पिले- ५००० 
  • प्रति पिलू मिळणारा दर- २४ रुपये 
  • मासिक उत्पन्न- एक लाख रुपयांपर्यंत 
  • खाद्य, लसीकरण, वीजबिल, कामगार असा खर्च वगळता 
  • सुमारे ३० ते ४० टक्के नफा 
  • संपर्क- संभाजी रावराणे- ९४२११४४७६८, ८८०५५९४४०२८ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com