दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादन

फरसबीचे उत्पादन घेणारे रामचंद्र कणसे
फरसबीचे उत्पादन घेणारे रामचंद्र कणसे

कमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने घेण्याने दरांची जोखीम कमी होते. त्याच दृष्टीने फरसबी (फ्रेंच बीन) हे पीक मी वर्षभर घेतो. घरचे अर्थकारण सक्षम करण्यास हेच पीक कारणीभूत ठरले अशी कबुली येतगाव (जि. सांगली) येथील रामचंद्र कणसे देतात. उत्कृष्ट व्यवस्थापन, तंत्रज्ञान व बाजारपेठांचा अभ्यास या जोरांवर त्यांनी या पिकात मास्टरी मिळवली आहे. सांगली जिल्ह्यात येतगाव (ता. कडेगाव) हे तालुक्यातील शेवटचे गाव. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या गावात पावसाचं प्रमाण तसं चांगलं, पण शाश्वत पाण्याची सोय नाही. केवळ विहिरी आणि कूपनलिकाच्या पाण्यावर शेती पिकते. गावातील रामचंद्र नारायण कणसे यांचे आठवीपर्यंत शिक्षण झालेले. त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती. बागायती पिकांसाठी दोन सामायिक विहिरी आणि अकरा कूपनलिका आहेत. माळरानावरच्या त्यांच्या शेतीत पाण्याची कमतरता असल्याने गहू, हरभरा या पिकांवर गुजराण व्हायची. एकत्र कुटुंब. आई खाशीबाई. रामचंद्र यांच्यासहीत चार बंधू. त्यातील बबन एमएबीएड असून, तेही शेतीच करतात. शेती पद्धती

  • वडिलोपार्जित शेती- ४ एकर
  • बंधूंची व कराराने कसण्यास घेतलेली शेती- ६ एकर
  • उत्पन्नातील खर्च वजा जाता चौथा हिस्सा मालकाला दिला जातो.
  • पिके- फरसबी, गहू, ज्वारी, हरभरा, पपई, मिरची व टोमॅटो
  • आव्हानाची शेती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतीत यश संपादन करण्याची कणसे यांची मोठी जिद्द होती. शिवाय उत्पनाचे दुसरे साधन नव्हते. सन २०१७ पर्यंत कोणत्याही योजनेचे पाणी शिवारापर्यंत पोचलेले नव्हते. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर शेती करणे आव्हानाचेच होते. सन २००२ च्या दरम्यान कणसे टोमॅटो, दोडका, मिरची आदींकडे वळले. त्यातून आर्थिक हातभार मिळू लागला. दरम्यानच्या काळात फरसबीचा (फ्रेंच बीन्स) प्रयोग केला. एका कंपनीबरोबर करार पद्धतीने ही शेती होती. त्यामुळे दर बांधून दिला होता. अनुभवातून विविध भाजीपाला पिकांचा अभ्यास झाला, मात्र बाजारपेठा, आवक आणि दर यांचे गणित मेळ खात नव्हते. शाश्वत उत्पन्नाच्या शोधात कणसे होते. उसाची शेती तालुक्यात अनेक भागांत टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले होते. उसाची लागवड वाढली होती. शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न देणाऱ्या या पिकाकडे कणसेदेखील वळले. एकरी ७० ते ८० टन उत्पादन मिळू लागले. त्यावेळी मिरचीची लागवड आणि निर्यातही केली. मात्र सर्वंकष अभ्यासानंतर फरसबी हेच मुख्य पीक घेण्याचे नक्की केले. आणि आजगायत त्यात सातत्य ठेवत त्यात मास्टरी मिळवली आहे. फरसबीची शेती सुरुवातीचे प्रयत्न

  • जवळच्या आणि लांबच्या बाजारपेठांत जाऊन फरसबीची आवक व वर्षभरातील दरांचा अभ्यास केला.
  • पिकाचा एकूण ताळेबंद पाहिला. या पिकात पूर्वी एकदा अनुभव घेतला होता. कोल्हापूर, निपाणी, विटा येथील व्यापाऱ्यांशी संपर्क झाले होते.
  • पहिल्यापासून मालाचा दर्जा चांगला ठेवला. मग मागणी येऊ लागली. त्यानुसार हंगामाचे नियोजन सुरू झाले. दोन वर्षांनंतर टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले. पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.
  • हंगाम व लागवड नियोजन

  • वर्षभर हे पीक घेण्यात येते. दर महिन्याला एक एकर असे क्षेत्र लागवडीखाली असते.
  • वाणनिहाय सुमारे सहा महिन्यांचा पिकाचा कालावधी.
  • सुमारे ५० दिवसांनंतर उत्पादनास सुरुवात.
  • साधारण तीन बहार घेता येतात.
  • एक मजूर दिवसभरात ४५ किलो शेंगांची काढणी करतात.
  • करपा आणि नागअळी यांचा प्रादुर्भाव होतो.
  • साडेचार फुटी बेडचा वापर, पॉली मल्चिंगचा वापर.
  • एकरी कोंबडी खत दोन टन तर गांडूळ खत ६०० किलो असा वापर.
  • गोमूत्र आणि जैविक खताच्या वापरावर भर.
  • पाण्याची शाश्‍वती हवी कणसे सांगतात की, फरसबी घेण्यासाठी पाण्याची शाश्‍वती हवी. पाणी कमी पडल्यास वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मागणी कालावधी

  • या पिकाला तशी बाराही महिने मागणी असते. मात्र गणपती, दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराई अशा काळात ही मागणी अधिक असते. पावसाळा दिवसांत मागणी कमी.
  • गर असलेल्या, कोवळ्या, मध्यम आकाराच्या शेंगांना मागणी.
  • प्रमुख बाजारपेठा कोल्हापूर, पुणे, विटा आणि निपाणी उत्पादन व उत्पन्न

  • एकरी उत्पादन सुमारे ९ ते १० टन. हिवाळ्यातील लागवडीचे उत्पादन १५ टनांपर्यंतही जाते.
  • वर्षभराची सरासरी घेतल्यास किलोला ४० ते ५० रुपये दर.
  • उत्पादन एकरी १० टन व ४० रुपये दर मिळाल्यास चार लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातून
  • दोन ते अडीच लाख रुपये खर्च धरल्यास उर्वरित नफा मिळवण्याची संधी असते.
  •  हाती आलेल्या उत्पन्नाची संधी गेली कणसे सांगतात की, शेतकऱ्याच्या मागील संकटे काही संपत नाहीत. अनेक वेळा चांगली संधी समोर आलेली असते. मात्र हातातून थोडक्यात जाते. अलीकडील एका अनुभवात मे महिन्यात फरसबीला किलोला तब्बल १२७ रुपये दर सुरू होता. त्या काळात माझ्याकडे सुमारे ४५० किलोपर्यंत माल विक्रीसाठी तयार होण्याच्या अवस्थेत होता. त्याचवेळी शेतातील ट्रान्सफॉर्मर जळाला. पाणी देता आले नाही. पीक अतितापमानात सापडले. अखेर ४५ किलो मालच त्या दराने विकणे शक्य झाले. अन्यथा हे पीक चांगले पैसे देऊन गेले असते. अलीकडील काळात लागवड व आवक वाढल्याने दरांवर परिणामही झाल्याचे दिसते. सध्या सहा रुपये दर सुरू असल्याचे कणसे म्हणाले. रामचंद्र कणसे- ९८६०१६११५२, ९९७५९००६०५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com