कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक 

व्यापाऱ्यांत संतोष यांच्या चवळीची चांगली ओळख तयार झाल्याने हंगामात आगाऊ मागणी केली जाते. त्यामुळे व्यापारी व बाजारपेठ निश्चित असल्याने विक्रीव्यवस्था उभी राहिली आहे.
पालखेडे यांच्या शेतात सुरू असलेली चवळीची प्रतवारी
पालखेडे यांच्या शेतात सुरू असलेली चवळीची प्रतवारी

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष पालखेडे यांची द्राक्षबाग गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे नुकसानीत गेली. मग हे पीक थांबवून अभ्यास करून चवळी पिकाचा पर्याय उभा केला. उन्हाळी हंगामात कमी खर्चात दरवर्षी साडेचार एकरांतील या पिकाने त्यांना मोठा आधार देत आर्थिकदृष्ट्या सावरण्याचे काम केले आहे.  नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर (ता. नाशिक) येथील संतोष पालखेडे यांची वडिलोपार्जित १५ एकर शेती आहे. पूर्वी संपूर्ण क्षेत्रावर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व्हायचे. २००१ मध्ये गारपिटीचा जोरदार तडाखा बागेला बसला. मोठे नुकसान झाले. यातून सावरून पुन्हा बागेच्या काड्या तयार केल्या, पण पुढे डाऊनी, भुरी यांसारखे रोग बागेची पाठ सोडेनात. मोठा खर्चही होऊ लागला. हाती काहीच येईना. अखेर हे पीक घेणे थांबवण्याच्या निर्णयापर्यंत संतोष आले.  चवळीचा पर्याय  द्राक्ष नाही तर मग पर्याय काय? असा प्रश्‍न उभा राहिला. भांडवल उपलब्ध नसल्याने कमी भांडवलावर नवीन पीकपद्धती विकसित करणे क्रमप्राप्त होते. अभ्यास व शोध सुरू झाला. यातून सुरवातीला टोमॅटोची लागवड केली. या पिकानंतर उन्हाळी हंगामात चवळी पीक घेण्याचा निर्णय घेतला.  कमी उत्पादन खर्च व बाजारपेठेत असलेली मागणी या बाबींच्या आधारे या पिकात जम बसू लागला.  अनुभव येत गेला तसतसे संतोष या पिकाच्या व्यवस्थापनात कुशल होत गेले. आज या पिकात त्यांनी हुकमत तयार केली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.  अशी आहे चवळीची शेती 

  • टोमॅटो काढणीनंतर उन्हाळ्यात चवळी 
  • दरवर्षी सुमारे चार ते साडेचार एकर क्षेत्र 
  • टोमॅटोसाठी बेडवर टाकलेल्या शेणखतामुळे चवळीची उगवण क्षमता चांगली येते. 
  • त्यातून पिकाला अधिक पोषणतत्त्वे मिळतात. 
  • प्रतिएकरी ३ किलो बियाणे वापर. प्रतिकिलो ३०० रुपयांप्रमाणे ९०० रुपयांचे बियाणे 
  • कोंबडीखताचा वापर, गरजेनुसार १८-४६-०, २३-२३-० खतांचा वापर 
  • काळा माव्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. 
  • संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन असल्याने पाण्याची बचत 
  • जानेवारीला बी लावल्यानंतर प्लॉट जून-जुलैपर्यंत (पावसाळा लांबल्यास) सुरू राहू शकतो. 
  • पावसात फुले व शेंगांचे मोठे नुकसान होऊ शकते. 
  • कमी पाण्यातील व कमी खर्चातील पीक  उन्हाळ्यात पाणीउपशासाठी आवश्यक वीजपुरवठा होत नाही. त्याचा परिणाम सिंचनावर झाल्याने उत्पादनावर फटका बसण्याची शक्यता असते. मात्र संतोष सांगतात की चवळीला तुलनेने कमी पाणी लागते. दोन दिवसांनी प्रतिदिन अर्धा तास मोटर चालवली तरी पुरते. अर्थात जमिनीच्या प्रकारावर ते अवलंबून असते. रोग-किडींचा प्रादुर्भावही कमी असल्याने कीडनाशकांवरील खर्च कमी होतो. एकूणच तुलनेने कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे चवळी पीक आहे.    तोडणीचे नियोजन : 

  • दर ४ दिवसांनंतर तोडा होतो. यासाठी ७ ते ८ मजूर काम करतात. 
  • साडेचार एकरांत एकूण ४० पोती (प्रति पोती ५५ ते ६० किलो) माल खुडून होतो. 
  • असे पीक कालावधीत एकूण १५ ते २० खुडे होतात. 
  • संतोष यांच्या पत्नी सौ. सुनीता स्वतः महिला मजुरांसोबत तोडणी करतात. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे काम चालते. दुपारी २.३० ते ५.३० वाजेपर्यंत चवळी निवडून प्रतवारी करून पॅकिंग केले जाते. 
  • हाताळणी, प्रतवारीमुळे अधिक दर  तोडलेली चवळी एके ठिकाणी जमा केली जाते. प्रतवारीनुसार दर ठरत असतो. कवळी, मध्यम व पक्व अशा तीन पद्धतीत प्रतवारी होते. त्यानंतर बंडल्स करून रबराच्या साह्याने ते बांधले जातात.  ते ५० किलो वजनाच्या गोणीत व्यवस्थित भरले जातात. त्यामुळे गुणवत्ता व व्यापाऱ्यांची मागणी टिकून राहिल्याने मालाला अधिक पसंदी मिळते.  मुंबई बाजारपेठ विक्रीचा उत्तम पर्याय  हिरव्या (कोवळी) चवळीला वाशी (मुंबई) मार्केटमध्ये चांगली मागणी असते. स्थानिक वाहतुकीच्याा माध्यमातून माल पाठवला जातो. प्रत्येक गोणीमागे ८० रुपये खर्च होतो. मालाचे वजन झाल्यानंतर पेमेंट रोख किंवा ‘ऑनलाइन’ केले जाते. व्यापाऱ्यांत संतोष यांच्या चवळीची चांगली ओळख तयार झाल्याने हंगामात आगाऊ मागणी केली जाते. त्यामुळे व्यापारी व बाजारपेठ निश्चित असल्याने विक्रीव्यवस्था उभी राहिली आहे.  मिळणारे दर- प्रतिकिलो ८ ते ९ रुपये, कमाल- १२ रुपये  खर्च जाऊन मिळणारा दर- ५ रुपये  अन्य पिकांची लागवड  टोमॅटो, कोबी, गवार, वांगी, मिरची आदी पिकेही बाजारपेठेचा अंदाज घेऊन केली जातात. त्यामुळे हंगामनिहाय पिकांचे आगाऊ नियोजन करण्यावर भर असतो. खरिपात भाताचीही लागवड असते.  संतोष यांच्या शेतीची ठळक वैशिष्ट्ये 

  • कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड 
  • शेतीच्या अचूक नोंदी, त्यानुसार खर्चाचे नियोजन व गुंतवणूक 
  • व्यक्तिनिहाय शेतीकामाच्या जबाबदाऱ्या निश्चित 
  • बहुतेक सर्व अवजारांची उपलब्धता. घरच्या घरी मशागतीची कामे 
  • रासायनिक खते व कीडनाशकांचा गरजेनुसार वापर 
  • मालाची हाताळणी व प्रतवारी 
  • बाजाराची गरज व मागणीनुसार मालाचा पुरवठा 
  • कुटुंबाची भक्कम साथ   वडिलांच्या निधनानंतर संतोष यांना आई छायाबाई यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत असते. त्या काळात मॅट्रिक झालेल्या छायाबाई अभ्यासू व प्रयोगशील आहेत. शेतीविषयक अभ्यास व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी त्या आग्रही असतात. शेतीची जबाबदारी असताना निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. पत्नी सौ. सुनीता पिंपळगाव गरुडेश्वरच्या पोलिस पाटील आहेत. त्यांचीही समर्थ साथ मिळते. हृतिक व अनिकेत या मुलांचीही मदत होते. संतोष शेती सांभाळून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात.  संपर्क - संतोष पालखेडे - ९८५०४९०६२८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com