इथे नांदते गोकूळ सौख्याचे...

कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्रकाश व बाळासाहेब या सावंत (हवलदार) बंधूंनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्यासह १२५ जनावरांचे गोकूळ उभारले आहे. घरचे सदस्य आपापली जबाबदारी समजून राबतात. त्यामुळेच दररोज ६५० लिटरपर्यंत संकलन होणारा दुग्ध व्यवसायकोणा मजुराविना यशस्वी करणे शक्य झाले आहे.
सावंत यांचा गोठा. यंत्राद्वारे दूधकाढणी.
सावंत यांचा गोठा. यंत्राद्वारे दूधकाढणी.

कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्रकाश व बाळासाहेब या सावंत (हवलदार) बंधूंनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्यासह १२५ जनावरांचे गोकूळ उभारले आहे. घरचे सदस्य आपापली जबाबदारी समजून राबतात. त्यामुळेच दररोज ६५० लिटरपर्यंत संकलन होणारा दुग्ध व्यवसाय कोणा मजुराविना यशस्वी करणे शक्य झाले आहे.   कोल्हापूर जिल्ह्यात नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्रकाश व बाळासाहेब या सावंत (हवलदार) बंधूंचे नाव दुग्ध व्यवसायात पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. सन २००४ मध्ये एचएफ जातीची संकरित गाय आणून दुग्ध व्यवसायास त्यांनी प्रारंभ केला. नफा व्यवसायातच गुंतवत टप्प्याटप्प्याने जनावरे विकत आणली. त्याचबरोबर गोठ्यात पैदास करून संख्या वाढवली. एकदम मोठ्या प्रमाणात जनावरे न आणता थोड्या थोड्या प्रमाणात संख्या वाढवण्याचे नियोजन केल्याने व्यवसायातील धोके व आर्थिक ताण कमी केला. सन २०१४ पासून जातिवंत कालवडी तयार करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले. कृत्रिम रेतनावर भर दिला. कुटुंब राबतेय गोठ्यात दुग्ध व्यवसायात मजुरांची जुळवाजुळव करावी लागते अनेकजण बाहेरील राज्यातील मजूर व्यवस्थापनासाठी ठेवतात. पण सावंत यांच्याकडे केवळ कुटुंबातील सर्व सदस्य राबतात. सुरुवातीला कमी जनावरे असल्याने मर्यादित सदस्य व्यवस्थापन पाहायचे. संख्या वाढू लागल्याने कुटुंबातील दुसरी पिढीही त्यात गुंतली. विशेष म्हणजे कुटुंबातील सर्व युवा व महिलावर्ग व्यवस्थापनात कुशल आहे. प्रकाश व बाळासाहेब मुख्य जबाबदारी पाहतात. पुढील पिढीतील ऋषिकेश, संतोष, सुशांत, प्रशांत यांच्यासह शिवानी, रेवती, ऐश्‍वर्या या सुनाही आनंदाने गोठ्यातील सर्व कामे सांभाळतात. त्यांना सविता व अलका यांचे मार्गदर्शन होते. अकरा जणांचे हे कुटुंब सव्वाशे जनावरांचा पसारा लीलया सांभाळते. प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली असल्याने कामात विस्कळीतपणा येत नाही. पहाटे पाचपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत चारा देणे, दुधाच्या धारा काढणे, जनावरांची व गोठ्याची स्वच्छता, दूध संकलन अशी आपापली कामे प्रत्येक जण व्यवस्थित पार पाडतो. दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन

  • गोठ्याचे तीन भाग. पहिल्या भागात गायी, दुसऱ्या भागात म्हशी आणि तिसऱ्या भागात कालवडी.
  • सुमारे ७० गायी, २० म्हशी, १० रेड्या व पंचवीस कालवडी. गाई एचएफ, म्हशी मुऱ्हा जातीच्या.
  • साडेचार एकर शेती. त्यातील अडीच एकरांत गवतवर्गीय चारा तर उर्वरित क्षेत्रात मका. त्यामुळे चाऱ्याची टंचाई वर्षभर भासत नाही. दररोज दोन वेळेला चाऱ्याची कापणी.
  • जनावरांचे मूत्र व शेण स्लरीसाठी टाकी. मड पंपाद्वारे ती शेतीला दिली जाते.
  • मका, गहू, हरभरा, सरकी पेंड, कडबाकुट्टीही दिली जाते. प्रति जनावराला दिवसाला सोळा किलो चारा. दुधाळ जनावराला लिटरला ४०० ग्रॅम तर गाभण व भाकड जनावरांना प्रत्येकी चार किलो खाद्य.
  • गोकूळ दूध संघाला दूध दिले जाते. त्यामुळे संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकंडून लसीकरण व उपचार केले जातात. तातडीने मदत लागल्यासही अधिकारी सेवा देतात. शिवाय घरचा प्रत्येक सदस्य सातत्याने गोठ्यात असल्याने प्रत्येक जनावराकडे बारकाईने लक्ष देणे शक्य होते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी आहे.
  • अर्थशास्त्र प्रत्येक गाय दिवसाला १६ ते २४ लिटरपर्यंत, तर म्हैस १२ ते १४ लिटरपर्यंत दूध देतात. गायी व म्हशींचे मिळून दररोज ७५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. वर्षभराचा विचार केल्यास ही सरासरी ६५० लिटर (प्रति दिन) राहते. महिन्याला सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यातील ७० टक्के खर्च व्यवस्थापनावर खर्च होतो. सुमारे ३० टक्के रक्कम नफा म्हणून शिल्लक राहते. याशिवाय वर्षाला १२५ ते १५० ट्रॉली शेणखत तयार होते. स्वतःच्या शेतात वापरून उर्वरित शेणखताची सरासरी दोन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने स्थानिक भागात विक्री होते. त्यातून वर्षाला सुमारे अडीच ते तीन लाख रुपये मिळतात. वर्षाला दूध संघाकडून दोन लाख रुपयांच्या पुढे रिबेटही मिळते. कुर्यात सदा मंगलम् केवळ शेती म्हटलं, की शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देणे हे सध्याच्या काळात कठीण बनले आहे. नव्या पिढीतील मुलींना गोठ्यात काम करणं आवडत नाही अशी धारणा समाजात आहे. पण सावंत कुटुंबीयांना मात्र लग्ने जमविताना फारशा अडचणी आल्या नाहीत. घरी जनावरांचा एवढा मोठा पसारा, साहजिकच आपल्यालाच ते व्यवस्थापन करावे लागणार हे समजूनही सावंत कुटुंबीयांत सुना दाखल झाल्या. त्यांनी हे काम आनंदाने स्वीकारले. घरकाम व गोठा व्यवस्थापन असा सुरेख समन्वय घरातील महिलावर्गाने साधला आहे. एकत्र राहण्याची इच्छाशक्ती, आवड, व्यवस्थापन कौशल्य व सर्वांना समजून घेण्याची वृत्ती असेल तर मोठे कुटुंब सक्षमपणे गुण्यागोविंदाने नांदू शकते हेच सावंत यांनी दाखवून दिले आहे. संपर्क ः सुशांत सावंत, ९०२१२९३९३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com