दुष्काळात गोडी अॅपलबेरची, थेट विक्रीतून मिळवले ‘मार्केट’ 

  ऍपल बेर बागेत लक्ष्मणराव व सौ. सुरेखा हे खटींग दांपत्य
ऍपल बेर बागेत लक्ष्मणराव व सौ. सुरेखा हे खटींग दांपत्य

परभणी जिल्ह्यातील सायाळा खटींग येथील लक्ष्मणराव खटींग यांनी पारंपरिक हंगामी पिकांव्यतिरिक्त ॲपल बेर या फळपिकाची निवड केली. कमी खर्च, कमी देखभाल व पीक व्यवस्थापन अन्य व्यावसायिक फळांच्या दृष्टीने कमी ही वैशिष्ट्ये त्यांनी अभ्यासली. व्यापाऱ्यांकडून कटू अनुभव आल्याने स्वतःची थेट विक्री व्यवस्था उभारली. सर्व प्रयत्नांतून हे पीक दुष्काळातही यशस्वी केले.  सायाळा खटींग (ता. जि. परभणी) येथील लक्ष्मणराव वामनराव खटींग यांच्या वाट्याला कुटुंब विभक्तीनंतर सहा एकर शेती वाट्याला आली. त्यांचा मोठा मुलगा सुनील एसटी खात्यात नोकरीस आहे तर धाकटा श्रीकांत कृषी विषयतील शिक्षण घेत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात लक्ष्मणराव कृषी सहायक पदावर नोकरीत होते. सन २०१५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचे ठरविले. त्यांची जमीन जेमतेम एक ते दीड फूट मातीचा थर असलेली हलक्या प्रतीची आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणी उपलब्ध होत नाही. या भागात सोयाबीन, तूर आदी पारंपरिक पिके होतात. त्यातून फारसे हाती लागायचे नाही.  पीकपद्धतीत बदल  कृषी विद्यापीठातील सेवेतील अनुभव, चौकसबुद्धी व अभ्यासूवृत्तीतून विविध पीक पद्धतींचा अभ्यास केला. दुष्काळातून मार्ग काढण्यासाठी उत्पादन, उत्पन्नाच्या खात्रीसाठी पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. चार एकरांसाठी सामाईक विहिरीचे पाणी कमी पडत होते. त्यामुळे गावाच्या शिवारात अन्यत्र दोन एकरांत बोअर घेऊन सिंचनाची सुविधा निर्माण केली.  ॲग्रोवनच्या यशकथांनी दिली प्रेरणा  ॲग्रोवन व साम चॅनेलच्या माध्यमातून ॲपल बेर विषयीच्या यशकथा वाचनात आल्या. नाशिक जिल्ह्यातील येवला भागात स्वतः गेले. तेथे हे पीक, बाजारपेठ व अर्थशास्त्र याविषयी माहिती घेतली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील ज्या शेतकऱ्यांच्या यशकथा प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांच्याकडून व यू ट्यूब चॅनेलवरून अधिक माहिती मिळाली.  ॲपल बेरविषयी बोलताना लक्ष्मणराव...  (video) ॲॅपल बेरचा प्रयोग  कमी पाण्यात ॲपल बेर येऊ शकते. गावशिवारात त्याचे फारसे उत्पादन घेतले जात नाही या बाबी लक्षात घेतल्या. सायाळा शिवारात एक एकरात लागवड करण्याचे ठरविले. मार्च २०१५ मध्ये येवला तालुक्यातील रोपवाटिकेतून प्रतिनग २० रुपये दराने रोपे आणली. प्रतिरोप १५ रुपये वाहतूक खर्च लागला.  दुष्काळातही जगविली बाग  लागवडीच्या वर्षी कमी पाऊस झाला. बोअरचे पाणी कमी पडू लागले. मग दररोज पंधरा मिनिटे ठिबकने पाणी दिले. त्या वर्षी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून बाग जगवली. सन २०१६ च्या उन्हाळ्यात पाण्याअभावी शेजारच्या विहिरीचे पाणी मजुरांकरवी डोक्यावरून वाहून आणून बाग जगविली.  खटींग यांच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • लागवड मार्चमध्ये. उत्पादन वा विक्री हंगाम डिसेंबरला सुरू. तो ६० दिवस चालतो. 
  • फेब्रुवारी, मार्च महिन्यांमध्ये पाण्याचा ताण. 
  • एप्रिलमध्ये छाटणी. त्यानंतर पाणी. त्यानंतर फुटवे. 
  • आंतरमशागतीसाठी बैलचलित वखराने दोन ओळीतील तणकट काढणी. उर्वरित तणकट काढण्याठी खुरपणी. 
  • फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ११ गंध सापळे 
  • फळधारणा झाल्यानंतर फवारणी नाही. 
  • फळधारणेनंतर प्रवाही पद्धतीने पाणी. 
  • दरवर्षी प्रतिझाड चांगले कुजलेले शेणखत वापरतात. 
  • स्वतः उभारली विक्री व्यवस्था  उत्पादन मिळाले पण विकण्याचे आव्हान होते. खटिंग यांनी व्यापाऱ्यांसोबत बोलणी केली. पण व्यापारी किलोला १२ ते १३ रुपये एवढाच दर देऊ करीत होते. त्यांच्याकडून कटू अनुभवाचा सामना करावा लागला. पण खटिंग हतबल झाले नाहीत. स्वतःच फळे विकायची असे मनोमन ठरवले.  त्यासाठी परभणी शहरातील काही ठिकाणांचा अभ्यास व निरीक्षणे केली.  -ही ठिकाणे विक्रीसाठी निवडली 

  • १) कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ- 
  • दररोज सकाळी नऊ तसेच दुपारी चारनंतर 
  •  सायाळा येथील शाळा 
  • ३) शेताजवळील परभणी-लोहगांव रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या प्रवांशांसाठी स्टॉल 
  • ४) परिसरातील आठवडे बाजार. 
  • ताज्या, गोड, मधाळ फळांना ग्राहकांची पसंती 
  • थेट विक्रीचा दर- २० रुपये प्रति किलो 
  • व्यापाऱ्यांनी देऊ केलेला दर- १२ ते १३ रूपये 
  • बोरांचे सादरीकरण 

  • लक्ष्मणराव पत्नी सौ. सुरेखा यांच्यासोबत व प्रसंगी मजुराच्या मदतीने तोडणी करतात. 
  • इलेक्ट्राॅनिक काट्यावर वजन करून नाॅयलाॅनच्या जाळीमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी ५०० ग्रॅम वजनाचे पॅकिंग 
  • उत्पादन 

  • सध्याचे -एकरी सहा टनांपर्यंत 
  • पहिल्या वर्षी प्रतिझाड १० किलो. एकूण एकरी ३ टन 
  • त्यास ३० रुपये प्रतिकिलो दर 
  • पुढील वर्षी प्रतिझाड २० किलोपर्यंत उत्पादन. 
  • संरक्षित सिंचनाची सुविधा 

  • मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत २५ बाय २५ मीटर बाय तीन मीटर खोलीचे शेततळे 
  • त्यात शेताशेजारुन जाणाऱ्या नाल्याचे पाणी वळविले. सामायिक विहिरीची पाणी पातळी वाढली. 
  • यंदा या भागात कमी पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्यामुळे अनेकांना रब्बीची पेरणी करता आली नाही. खटींग यांना मात्र शेततळ्यातील पाण्यावर तीन एकरांत रब्बी ज्वारीची पेरणी करता आली. तुरीला पाणी देता आले. 
  • शेततळ्यातील मत्स्यबीजही अतिरिक्त उत्पन्न देणार आहे. 
  • गावगाड्याची जबाबदारी  लक्ष्मणराव ग्रामपंचायतीचे उपसरंपच, गावातील सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत. स्वच्छता अभियान, वृक्षलागवड, पावसाचे वाहून जाणारे पाणी शिवारात अडविण्यासाठी नाला खोलीकरण, बंधाऱ्यांची तीन कामे होण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत आठ शेततळ्यांची कामे झाली. यामुळे गावशिवारातील विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे.  संपर्क- लक्ष्मणराव खटींग-९८९००६३०६७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com