निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात बीजोत्पादनाचे मळे 

गेल्या वर्षी जे एस ३३५ सोयाबीनचे वाण बिजोत्पादनासाठी घेतले होते. पण वेळेवर पाऊस नसल्याने बीजोत्पादनाच्या दृष्टीने उपयुक्त प्रत झाली नसल्याने सोयाबीन नियमितपणे बाजारात विकले. येत्या हंगामात भात बीजोत्पादन करणार आहे. सध्या उसाचा बेणे मळा केला आहे. बीजोत्पादनासाठी चांगले बी व उत्पन्नही चांगले मिळत असल्याने भविष्यात खरीप पिकांच्या बीजोत्पादनावर भर देणार आहे. -मनोज खाडे, सातवे
चाऱ्यासाठी संकरित नेपिअर गवताचे उत्पादन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
चाऱ्यासाठी संकरित नेपिअर गवताचे उत्पादन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात विविध पिकांच्या बीजोत्पादनाचे प्रयोग राबवले जात आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. संकरित नेपीयर गवत, भुईमूग, नाचणी, हळद अशी यातील काही मुख्य पिके आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य अशी पन्हाळा तालुक्‍याची ओळख आहे. पन्हाळा तालुका तर राज्यातील समस्त शिवप्रेमींसाठी मुख्य आकर्षण असते. डोंगराळ भागात छोट्या छोट्या गावांबरोबर वाड्या-वस्त्यांमध्ये वसलेल्या या तालुक्यात भात, काही प्रमाणात नाचणी अशी पिके घेतली जातात. येथील शेतकरी मुख्यतः अल्पभूधारक आहे. अलीकडील वर्षांत हा तालुका बीजोत्पादनात पुढे येतो आहे. कृषी विभागाच्या ‘आत्मा’च्या सहकार्याने तालुक्‍यातील विविध गावांत काही गुंठ्यापासून ते काही एकरांपर्यंत बीजोत्पादनाचे प्रयोग केले जात आहेत.  दुर्गम भागासाठी वेगळी वाट  बीजोत्पादनात मुख्यतः सोयाबीन, नाचणी, संकरित नेपियर गवत, हळद आदीं पिकांवर भर देण्यात येत आहे. तालुक्यातील दुर्गम भागांसाठी खरं तर ही वेगळी वाट आहे. उसाबरोबर भात प्रत्येक वर्षी घेतला जातो. सर्वाधिक पावसाचा हा भाग असला तरी डोंगराळ भाग व छोटे क्षेत्र असल्याने पावसाच्या पाण्यावरच मुख्यतः शेती केली जाते. परिणामी, पावसाळा संपला की येथे ऊस न घेणारे शेतकरी शेत मोकळे ठेवणेच पसंत करतात. अशा परिस्थितीत तालुक्‍यात बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.  भुईमूग बीजोत्पादन ठरले उपयोगी  तालुक्यातील किसरुळ येथील सर्जेराव पाटील म्हणाले, की गेल्या हंगामात फुले उनप या भुईमुगाचे बीजोत्पादन करण्यास सुरवात केली. कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील संशोधन केंद्रातून २२ किलो बियाणे आणले. वीस गुंठ्यात साडेआठ क्विंटल शेंग मिळाली. यातून चांगली शेंग बाजूला काढून ती परिसरातील शेतकऱ्यांना १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली. त्यातून ५० हजार रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळाले. काही शेगांचा वापर तेल गाळणीसाठीही केला. त्यातूनही पंधरा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. बीजोत्पादन उसाला पर्याय ठरू शकत नसले तरी अन्य पिकांपेक्षा उपयुक्त व उत्पन्नाला आधार ठरू शकते. उसाचा बेणेमळाही केला आहे. यात विविध जाती घेतल्या आहेत. त्याची वाढ चांगली आहे. त्याचेही बेणे विकणार आहे. शेंग विकण्यासाठी व्हॉटस ॲप ग्रुपचा मोठा आधार झाला. बियाण्यांचे फोटो ग्रुपवर पोस्ट केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांच्या कालावधीतच सर्व शेंगेची विक्री झाली. कोल्हापूर जिल्ह्याबरोबर सांगली, सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही खरेदी केली.  संकरित नेपियरचे बेणे व चाऱ्याहीही विक्री  माले येथील अविनाश सूर्यवंशी म्हणाले, की बंगळूर येथून संकरित नेपियर गवताचे बेणे आणले होते. मागील वर्षी त्याच्याच आधारे मेमध्ये अठरा गुंठ्यात एक डोळा पद्धतीने त्याच्या कांड्या लावल्या. बियाणे व वैरणीसाठी अशा दोन्ही पद्धतीने गवताची विक्री केली. बियाण्यासाठी पंधरा धाटांच्या पेंडीला पन्नास रुपये तर वैरणीसाठी प्रतिसरीला २००० रुपये अशा पद्धतीने विक्री झाली. गावातीलच शेतकऱ्यांनी खरेदी केली. दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर सव्वा महिन्यांच्या कालावधीत येते. यंदाच्या मे महिन्यापर्यंत नऊ कापण्या पूर्ण झाल्या. बियाणे व चारा अशा दोन्ही विक्रीतून ७५ हजार रूपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. वर्षभर विक्रीची प्रक्रिया सुरू असल्याने अन्य पिकांपेक्षा चांगला नफा मिळू शकतो असा अनुभव आला आहे. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे नेपियरचे उत्पादन फायदेशीर ठरणार आहे.  नाचणीच्या बीजोत्पादनाचा पर्याय  सन २०१८-१९ हे वर्ष पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नाचणीचे उत्पादन घेतले जाते. सध्या आहारात नाचणीचे महत्त्व वाढले आहे. मात्र, लागवडीच्या प्रमाणातही वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. नाचणीचे उत्पादनक्षम बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी आत्मा, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, शेंडापार्क, कोल्हापूर आणि बियाणे क्षेत्रातील शासकीय कंपनी यांच्या सहकार्याने पन्हाळा तालुक्‍यातील काही गावांमध्ये मिळून १५ एकरांवर ऊन्हाळी नाचणी बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये १८ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. फुले नाचणी या सुधारित जातीचे बियाणे, निविष्ठा, युरीया- डीएपी ब्रिकेट्‌स यांचे वाटप करण्यात आले आहे. जागतिक अन्न आणि कृषि संघटनेचे भारतातील सल्लागार डॉ. राजशेखर यांनी या प्रात्यक्षिकांना भेट दिली. पंधरा एकरांवरील प्रात्यक्षिकांमधून सुमारे १०० क्विंटल बियाणे उत्पादित होण्याची शक्‍यता आहे. त्याद्वारे येत्या खरिपात प्रतिएकरी दीड किलो याप्रमाणे ६,५०० एकरांवर लागवड करणे शक्य होईल. उसाचे क्षेत्र वा उत्पादन कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा हा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.  प्रतिक्रिया नाचणीच्या बीजोत्पादनाला शासनाच्या वतीने बाजारभावापेक्षा वीस टक्के जादा दर आणि प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. भविष्यात पन्हाळा तालुका वेगवेगळ्या पिकांत बीजोत्पादनाचे हब होण्यासोबतच बियाणांबाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी आमच्यातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.  -पराग परीट-९९२११९०६७१  तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, पन्हाळा  संपर्क-  सर्जेराव पाटील, किसरुळ- ९४०३४४९६३०  अविनाश सूर्यवंशी, माले- ९७६३३२०२०८  मनोज खाडे, सातवे- ९७३०१८१६१०   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com