किफायतशीर दूध उत्पादनासाठी गाईची निवड 

चांगल्या वंशावळीची गाय खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे.
चांगल्या वंशावळीची गाय खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे.

गाईची निवड करताना शरीररचना, रंग याचबरोबर वैशिष्ट्ये लक्षात घ्यावीत. ज्यांच्याकडे गाईची वंशावळ आहे त्यांच्याकडून गाय खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे. पहिल्या, दुसऱ्या वेतातील गाईची निवड करावी. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी गायींची निवड महत्त्वाची आहे. गायीच्या वंशावळीसोबतच तिच्या इतर गुणधर्मांचाही विचार करावा. त्यामुळे दुग्धव्यवसाय फायदेशीर करणे शक्य होईल.

  •  गाय खरेदी करण्यापूर्वी ब्रुसेलोसीस, टीबी, जेडी, आयबीआर या रोगाची तपासणी करावी. अनेक उत्साही गोपालक कोणतीही चाचणी न करता गाईंची खरेदी करतात. त्यामुळे त्या रोगाचा प्रसार आपल्या भागातील जनावरात होण्याची शक्यता वाढते.
  •  चपळ बैलांची पैदास व दूध देण्याचा गुणधर्म असलेल्या गाईची पैदास हे भिन्न गुणधर्म आहेत. हे गुणधर्म एकाच जातीत उतरवता येणे शक्य नाही.
  •  उत्तम जातीची पैदास म्हणजे खात्रीच्या आनुवंशिक गुणांचा ठेवा. एकूण गोपालनात हा ठेवा ४० टक्के गुणवत्तेचा आणि उरलेले ६० टक्के हा रोजची देखभाल, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे.
  •  दुभती गाय निरोगी, स्वच्छ पाणीदार डोळे असलेली असावी. फार दूरच्या गावाहून घेतलेल्या गाईबाबत अपेक्षित दूध १० ते २० टक्क्यांनी कमी धरावे. उदा. पंजाबमधील वातावरणास १२ लिटर दूध देणारी गाय महाराष्ट्राच्या हवामानात ८ ते १० लिटर दूध देईल, असा अंदाज बांधावा.
  • सडांची लांबी, दोन सडांतील अंतर आणि ठेवण समांतर असावी. कासेवरील शिरा जाड, मोठ्या व नागमोडी असाव्यात. कासेवरील कातडी मऊ असावी. बऱ्याच जातीमध्ये उपजातीसुद्धा आढळून येतात. गायी खरेदी करताना कासेची चारही सडे सुरू आहेत का, हे तपासून पहावे.
  • उत्तम गाईची लक्षणे  जनावराच्या पाठीवर थाप मारली असता कातडी थरथरते. हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.  चांगले दूध देणारी गाय कधीही लठ्ठ नसते. गाईच्या छातीच्या शेवटच्या तीन फासळ्या दिसल्या पाहिजेत.  चांगला आहार, लसीकरण, जंतनिर्मूलन, गोठ्यातील घरमाश्यांचे नियंत्रण, चुन्याच्या निवळीची फवारणी, गोचीड नियंत्रणाकडे कायम लक्ष द्यावे. दूध काढताना घ्यावयाची काळजी

  •  दूध काढण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत.
  •  कास व पाठीमागील भाग स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ फडक्याने कोरडा करावा.
  •  दूध काढणारी व्यक्ती निरोगी व स्वच्छ असावी.
  •  दूध हलक्या हाताने व वेगाने काढावे .
  •  दूध काढण्याच्या वेळेत बदल करू नये.
  •  दूध काढण्याची भांडी स्वच्छ असावीत.
  •  दूध काढल्यानंतर गाळणीने अथवा स्वच्छ फडक्याने गाळून, मोजून थंड ठिकाणी ठेवावे.
  • रोग, उपचार व काळजी

  •  जिवाणूंमुळे होणारे रोग
  • घटसर्प, फऱ्या, काळपुळी, कासदाह, आंत्रविषार, हळवा, ब्रुसेलोसिस (सांसर्गीक गर्भपात) इत्यादी.
  •  विषाणूंमुळे होणारे रोग
  • लाळ्या खुरकूत, बुळकांड्या, तीवा इत्यादी.
  •  रक्तातील परजीविंमुळे होणारे रोग
  • सरा, थायलेरिआॅसिस, बबॅसिओसिस (लाल मूत्र रोग) इत्यादी.
  •  रोगी जनावरांना कळपापासून वेगळे ठेवावे, त्यांचे मलमूत्र व इतर स्त्राव दूर नेऊन अथवा जाळून टाकावे, त्यास मोकळ्या व हवेशीर जागेत ठेवावे.
  •  प्रथमोपचार करावेत, पशुवैद्यकाचा ताबडतोब सल्ला घ्यावा. निरोगी जनावरास रोग प्रतिबंधक लस टोचावी.
  •  रोगी व निरोगी जनावरांची देखभाल एकाच माणसाने करू नये.
  •  मेलेल्या रोगी जनावरांच्या नाकातोंडात व गुदद्वारात निर्जंतूक द्रवाचे बोळे घालून दूर अंतरावर चुना घालून खोल पुरावे.
  •  गोठा नियमित साफ ठेवावा व निर्जंतूक पाण्याने धुवावा.
  • संपर्क ः योगेश पाटील, ९६६५५९९८९९ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com