नैसर्गिक शेतमालाला जागेवरच तयार केले मार्केट 

नैसर्गिक शेतीचा फायदा पूर्वी रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावर होणारा ३० ते ४० टक्के खर्च सोनटक्के यांनीकमीकेलाआहे.जमिनीचा पोतही सुधारू लागला आहे. घरच्या घरी नैसर्गिक कीडनाशके बनवल्यानेरासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळता आले. किंमतीपेक्षा आरोग्यदायी अन्न हा घटक महत्त्वाचा असून, त्यामुळेच ग्राहकांचे नेटवर्क जपल्याचे ते सांगतात.
शाम सोनटक्के आपल्या आले शेतात. ते कामगंध सापळ्यांचा वापरही करतात.
शाम सोनटक्के आपल्या आले शेतात. ते कामगंध सापळ्यांचा वापरही करतात.

लोहारा (जि. लातूर) येथील शाम चंदरराव सोनटक्के यांनी काळाची पावले ओळखत नैसर्गिक शेतीची वाट धरली आहे. सुमारे ९० एकरांपैकी ६५ एकर लागवडीयोग्य जमिनीत या शेती पद्धतीद्वारे कांदा, लसूण, मूग, तूर, आले आदी पिकांची शेती सोनटक्के करतात. विशेष म्हणजे उत्कृष्ट उत्पादनातून ६० व्हॉटसॲप ग्रूपवर कार्यरत राहून आपल्या मालाची विश्‍वासार्हता व मार्केट त्यांनी काबीज केले आहे.  लोहारा (जि. लातूर) येथील शाम चंदरराव सोनटक्के यांच्या संयुक्त कुटूंबाची ९० एकर शेती आहे. पैकी ६५ एकर शेती लागवडीखाली आहे. पूर्वी हंगामी पिकांबरोबर उसाचे पीकही होते. मात्र उत्पादन समाधानकारक मिळत नव्हते. उत्पादन खर्च वाढत होता. तो कमी करण्याबरोबर रासायनिक अंशमुक्त अन्नच पिकवायचे असे सोनटक्के यांनी ठरवले. त्यानुसार वाटचाल सुरू केली.  नैसर्गिक शेतीची वाटचाल  लातूर येथे नैसर्गिक शेतीतील प्रशिक्षण शाम यांनी घेतले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काडसिद्धेश्‍वर यांच्या सेंद्रिय आश्रमातही त्यांनी ही शेती पद्धत शिकून घेतली. त्यानंतर सुरवातीला पाच एकरांत नैसर्गिक शेतीचा प्रयोग राबविला. त्याचे कारण सर्व क्षेत्रावर हा प्रयोग राबविणे जोखमीचे होते. पहिली दोन वर्षे उत्पादनात २५ टक्क्याने घट जाणवली. मात्र मिळणाऱ्या रूचकर अन्नाची गोडी वाढली. घरात कोणतेही कार्य असो घरच्या विषमुक्त अन्नाचा वापर वाढला. यातून अनेकांना अन्नाची चव चाखायला मिळाली. हळूहळू ग्राहकांकडून या मालाला मागणी वाढली. मग या पद्धतीचा विस्तार केला.  सोनटक्के यांची नैसर्गिक शेती 

  • सध्या ६५ एकरांवर शंभर टक्के नैसर्गिक शेती 
  • भात, कांदा, लसूण, आले, तूर, हरभरा, सोयाबीन, अशी पिके 
  • घरच्या घरी जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, संजीवनी अर्क, लसूण-मिरची अर्क आदींचा वापर 
  • रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर पूर्ण बंद. 
  • शेतीत पेरणीची वेळ महत्त्वाची असून वेळेत पेरणी केल्यास नैसर्गिक शेतीची फायदा होतो असा अनुभव. 
  • शाम सांगतात की रासायनिक शेतीच्या पद्धतीपेक्षा नैसर्गिक शेतीत एकरी उत्पादन थोडे कमी मिळते. 
  • मात्र ते सत्त्वयुक्त व निरोगी असते. त्याला दरही चांगला मिळतो. 
  • स्वतः तयार केले मार्केट  विक्रीसाठी कोठेही बाजारपेठेत जाण्याची गरज शाम यांना भासत नाही. घरूनच ग्राहक शेतमाल घेऊन जातात. हंगामातच आगाऊ नोंदणी होते. देशी वाणांची चव चाखायला मिळाल्याने अनेक ग्राहक तयार केले आहेत. शाम ६० व्हॉटसॲप ग्रूपला जोडलेले आहेत. आपल्या पिकांचे किंवा शेतमालाचे काही सेकंदाचे व्हिडीओ तयार करून ते या ग्रूपवर अपलोड करतात. या ग्रूपमध्ये डॉक्टरवर्ग किंवा अन्य ग्राहकही आहेत. साहजिकच त्यांच्याकडून सतत मागणी येते, असे शाम म्हणाले. हुरडा पार्टीच्या हंगामात सुमारे २०० व्यक्ती शाम यांच्या शेतात ज्वारीच्या हुरड्याचा आनंद घेण्यास येतात. साहजिकच हेच ग्राहक पुढे शेतमालाची प्रसिद्धी करतात. विक्रीसाठी बाजारपेठेत जाण्याची गरजच उरलेली नसून बांधावरच मार्केट तयार केल्याचे शाम सांगतात.  अशी होते विक्री  आंध्र प्रदेशातून भाताचे सुवासिक बियाणे आणले आहे. भाताची किलोला ८० रुपये दराने विक्री होते. अकलूज येथून दोन क्विंटल भातला सध्या मागणी आली आहे. मुगाचे एकरी ३ क्विंटल उत्पादन मिळते. त्याची १२० रुपये प्रति किलो दराने डाळ विक्री केली आहे. तुरीचे एकरी ४ क्विंटल उत्पादन मिळते. त्यास किलोला ८० ते ९० रुपये दर मिळाला आहे. लसणाची चेन्नई येथे ४ क्विंटल तर हैदराबाद येथे एक क्विंटल विक्री झाली आहे. कांद्याचे एकरी ८० ते ९० क्विंटल तर आल्याचे ६० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.  नैसर्गिक शेतीचा फायदा  पूर्वी रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावर होणारा ३० ते ४० टक्के खर्च आता कमी झाला आहे. जमिनीचा पोतही सुधारू लागला आहे. घरच्या घरी नैसर्गिक कीडनाशके बनवल्याने रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळता आले. कीड येण्याआधीच प्रतिबंधात्मक फवारणी हे या शेतीचे गमक असल्याचे शाम सांगतात. विषमुक्त माल असल्याने त्याची किंमत अव्वाच्या सव्वा न ठेवता बाजारभावापेक्षा थोडीच जास्त ठेवली आहे. किंमतीपेक्षा आरोग्यदायी अन्न हा घटक महत्त्वाचा असून, त्यामुळेच ग्राहकांचे नेटवर्क जपल्याचे ते सांगतात.  नैसर्गिक अन्नामुळे समाधानी घर  शाम यांचे तीन भावांचे मिळून सुमारे १६ सदस्यांचे मोठे कुटूंब आज गुण्यागोविंदाने एकत्र नांदते.  आपल्या संपूर्ण घरासाठी सत्वयुक्त अन्न मिळते याचे त्यांना समाधान आहे. सुमार दहा देशी गायी आहेत.  त्यांचे आरोग्यदायी दूधही उपलब्ध होते. आपल्या मुलाच्या लग्नासाठी सुमारे आठहजार लोकांसाठी घरातील नैसर्गिक अन्नाचा स्वयंपाक केला. तसेच साखरपुडा व परिसरातील काही कार्यक्रम असतील तर तेथेही आपल्या घरातील शेतमालाचा स्वयंपाक देण्याची शाम यांची पद्धत आहे. त्याचे मोठे समाधान आपल्याला मिळाल्याचे ते सांगतात. त्यांनी काही वर्षे कै. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनसाठी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्षपदही सांभाळले आहे.  संपर्क - शाम सोनटक्के - ८८३०६०१७२५   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com