agriculture story in marathi, Sharad Shelke framer from Nagar Dist. faced accident incident. Eventhough he faced the challenges & stand up with new determination. | Page 2 ||| Agrowon

पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र चालवताना अपघात होऊन शरद शेळके (वाकडी, जि. नगर) यांना हात मनगटापासून गमवावा लागला. सारं संपलं असं वाटलं. पण घरच्यांनी धीर दिला. शरद यांनी संकटांशी लढत व्यवसाय पुन्हा सावरला. घरचे व बाहेरील प्रति दिन दोन हजार लिटर दूध संकलनापर्यंत भरारी घेत दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रत्यय घडवला. आदर्श व यशस्वी शेतकरी म्हणून शरद यांनी स्वतःला सिद्ध केले.

दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र चालवताना अपघात होऊन शरद शेळके (वाकडी, जि. नगर) यांना हात मनगटापासून गमवावा लागला. सारं संपलं असं वाटलं. पण घरच्यांनी धीर दिला. शरद यांनी संकटांशी लढत व्यवसाय पुन्हा सावरला. घरचे व बाहेरील प्रति दिन दोन हजार लिटर दूध संकलनापर्यंत भरारी घेत दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रत्यय घडवला. आदर्श व यशस्वी शेतकरी म्हणून शरद यांनी स्वतःला सिद्ध केले.
 
नगर जिल्ह्यात वाकडी (ता. राहता) येथील भारत व शरद या शेळके बंधूंची अडीच एकर शेती आहे. मोठे बंधू भारत हे पुणे येथे नोकरी करतात. शरददेखील नाशिकला खासगी कंपनीत नोकरी करायचे. पण वेतन परवडत नसल्याने दीड वर्षानंतर ते शेतीच करण्यासाठी २००४ मध्ये गावी परतले. सुमारे बारा वर्षे फळबाग, भाजीपाला उत्पादन घेतले. मात्र उत्पन्नात स्थिरता नसल्याने २०११ मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू केला. पन्नास हजार रुपये खर्च करून पाच संकरित (एचएफ) कालवडी खरेदी केल्या. पुढे मुक्तसंचार गोठा उभारला. दूधविक्रीतील उत्पन्नातून २०१६ पर्यंत गायींची संख्या २० पर्यंत पोहोचली.

इच्छाशक्ती पडली भारी
दहा लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला व्यवसाय दोनशे लिटरपर्यंत पोहोचला. भरभराटीचे दिवस सुरू होताहेत तोच व्यवसायाला जणू दृष्ट लागली. कुट्टी यंत्र चालवताना अपघात होऊन शरद यांना डावा हात मनगटापासून गमवावा लागला. सारे कुटुंब हतबल झाले. दुग्ध व्यवसाय, शेतीवरही संकट आले. काही दुभत्या गायी विकून पैसे उभे करावे लागले. वर्षभर व्यवसायात विश्रांती घेतली. पण दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून शरद पुन्हा व्यवसायासाठी सरसावले. हिंमत एकवटून उभे राहिले. कुटुंबातील सर्वांनी आधार दिला. आठ कालवडी गोठ्यात होत्या. एक हात नसल्याने गोठ्यातील कामे, दूध काढणीची अडचण निर्माण झाली. पण पत्नी माया, आई कालिंदी यांनी कामे करण्याची तयारी दर्शविली. माया यांना तर शेती, दूध व्यवसायाचा अनुभव जवळपास नव्हताच. पण शरद यांच्या आईकडून त्यांनी सारी कामे शिकून घेतली. वडील सोपानराव देखील चारा तसेच अन्य व्यवस्थापन पाहत कामांना हातभार लावू लागले. मोडून पडलेला दुग्ध व्यवसाय पुन्हा जोमाने उभा राहिला.

कामांचे व्यवस्थापन
एक हात अधू झाला असला तरी गोठ्यातील दैनंदिन कामे, संकलन, विक्री व्यवस्था आदींमधील ५० टक्के कामे शरद स्वतः करतात. दुचाकी सराईतपणे चालवतात. घरच्या सदस्यांचे मोठे योगदान आहे. पहाटे पाच वाजता कुटुंब कामाला सुरवात करते. अगदी रात्रीपर्यंत त्यात खंड नसतो. सर्व अडचणी, संघर्ष, निराशा यावर मात करत शरद यांची एकहाती झुंज सुरू आहे.

गायींची वाढती संख्या लक्षात घेऊन आपल्या अडीच एकरांत केवळ मका, लसूण घास, नेपियर गवताचे उत्पादन घेण्यात येते. चार एकर शेती कराराने कसण्यास घेतली आहे.

व्यवसायातील प्रगती

  • सुमारे ७० टक्के गायींची पैदास गोठ्यात. लहान-मोठ्या मिळून सध्या सुमारे २० गायी.
  • प्रति दिन १९० ते २०० लिटर दूध संकलन.
  • २०१९ मध्ये १२ लाख रुपये खर्चून १० गुंठ्यांत विस्तारित पद्धतीचा मुक्तसंचार गोठा.
  • चाराटंचाई भासू नये यासाठी सव्वाशे टनांपर्यंत मुरघास निर्मिती. गरजेनुसार मका खरेदी.
  • गहू व अन्य भुश्‍शाचाही वापर.
  • सुमारे ४० ट्रॉली शेणखत वर्षाला उपलब्ध. मुक्त संचार गोठ्यातील खत पावसाळ्यात दररोज उचलून गोठा स्वच्छ ठेवला जातो. शेतातही शेणखताचा वापर. त्यातून जमिनीचा पोत सुधारला आहे.

दूध संकलन केंद्र
अपघातानंतर सारी शक्ती पणास लावून नवा आशावाद व उत्साह अंगात भरून शरद यांनी शेताजवळच जय मल्हार दूध संकलन केंद्र सुरू केले. त्यांना परिसरातील युवा सहकाऱ्यांची मोठी साथ मिळाली.

आमच्या जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध संकलन स्पर्धा असतानाही आमच्याकडे दोन हजार लिटरपेक्षा अधिक संकलन होत असल्याचे शरद यांनी अभिमानाने सांगितले. अमूल डेअरीला २५ ते २६ रुपये प्रति लिटर दराने दूध पुरवठा होतो. ते म्हणतात, की महागाईचा विचार करता अलीकडे हा व्यवसाय परवडण्याजोगा राहिलेला नाही. तरीही खर्च कमी करून, चारा उत्पादन स्वतः करून, बाहेरील मजूर न ठेवता घरच्या सदस्यांनी राबून आम्ही तो किफायतशीर करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

...आणि पुन्हा उभे राहिलो
शरद व माया हे शेळके दांपत्य सांगतं, की २०१६ मध्ये दुष्काळ पडला. त्याची धग भागातील सर्वच शेतकऱ्यांना बसली. त्यातच जुलैमध्ये अपघाताने आमच्यावर संकट कोसळले. वाटलं, सारं संपलं. मनात विचारांचं काहूर माजलं. उपचार घेऊन घरी आलो. भेटायला येणारे लोक वेगवेगळे सल्ले देत. त्यातून अजून मन खचत जाई. या सर्व बाबीपासून काही दिवस दूर राहण्यासाठी पुन्हा एका दवाखान्यात आठ दिवस राहिलो. एक हात राहिला नसला तरी दोघांचे मिळून हात एक केले. तेथेच ठरवले पुन्हा दुग्ध व्यवसाय उभा करायचा आणि कुटुंबांच्या बळावर त्यात प्रगतीही घडवली.

संपर्क-  शरद सोपान शेळके, ९८३४८१७६०४, ९८८१५५८००५
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून...१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....