मिरचीच्या भिवापूरमध्ये तलावात शिंगाड्याची शेती 

शिंगाडा बाजारपेठ भिवापूर भागात सुमारे ३५ एकरांतील तलावातून दररोज सरासरी १५ ते २० क्‍विंटल शिंगाडा उत्पादन उपलब्ध होत राहते. याला नागपूर येथे मुख्य बाजारपेठ आहे. येथील सक्‍करदरा भागात ठिकठिकाणचे शिंगाडे विक्रीसाठी येतात.
शिंगाडा तोडणी करताना मजूर
शिंगाडा तोडणी करताना मजूर

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसह नागपूर हा देखील तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांनी तलाव भाडेतत्वावर घेत त्यात शिंगाड्याची शेती केली आहे. त्यातून आर्थिक स्राेत निर्माण केला आहे. भिवापूर (जि. नागपूर) येथील रामाजी दिघोरे यांचा तर अनेक वर्षांपासून शिंगाडा शेतीत हातखंडा तयार झाला आहे.  नागपूर जिल्ह्यातील भिवापूर हे गाव मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मिरचीने भाैगाेलिक निर्देशांक (जीआय) देखील मिळवला आहे. याच गावातील रामाजी दिघोरे यांनी जयकिसान सेंद्रिय हदळ-शिंगाडा उत्पादक गटाची बांधणी केली. गटात अकरा सदस्य असून त्यांनी १५ लाख रुपयांत तीन वर्षांसाठी गावालगतचा तलाव शिंगाडा उत्पादनासाठी करारावर घेतला आहे. सुमारे ३५ एकरांवर तो विस्तारला आहे. या तलावासोबतच आपल्या पाच एकरांतही दिघोरे शिंगाडा उत्पादन घेतात.  अशी होते शिंगाड्याची शेती  कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांनी शिंगाडा पिकावर भरपूर काम केले आहे. येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार सांगतात, की शिंगाडा हे खरिपातील पीक आहे. याच्या वेलींना फुले येतात व त्यांना पुढे फळांसारखे शिंगाडे लागतात. या शेतीसाठी पाणथळ किंवा तलावासारखी जमीन म्हणजे एक मीटर खोल पाणी असलेली जमीन लागते. याची रोपवाटिकाही केली जाते. कोंब उगवल्यानंतर वेली पुढे तलावात वाढवल्या जातात. दिघोरे सांगतात, की सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असलेल्या ठिकाणी शिंगाडा उत्तम वाढतो. त्यानुसार एकरी चार ट्रॉली शेणखत दिले जाते. दोन हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे शेणखताची खरेदी होते. सेंंद्रिय पद्धतीवर भर असल्याने कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर होतो.   

काढणी  सप्टेंबरच्या अखेरच्या ठवड्यात शिंगाडा काढणीस येतो. पहिल्या काढणीत सुमारे दोन ते तीन क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. पुढे होणारे काढणीचे टप्पे लक्षात घेता हे उत्पादन पाच ते सहा क्‍विंटलपर्यंत मिळू शकते.  काढणीपश्‍चात प्रक्रिया  पक्‍व झालेले शिंगाडे तोडून पाण्याच्या माठात भरले जातात व उकडले जातात. रंग परिवर्तन व त्याचा टणकपणा यावरून ते शिजले की नाहीत हे निश्‍चीत केले जाते. प्रक्रिया झालेल्या शिंगाड्याची विक्री दोन दिवसांत करणे आवश्‍यक असते. अन्यथा ते खराब होतात असे दिघोरे यांनी सांगितले. प्रक्रिया न केलेला शिंगाडा अधिक टिकतो. त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी कच्चा शिंगाडा पाठवून त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्यावर भर दिला जातो.  बाजारपेठ  सुमारे ३५ एकरांतील तलावातून दररोज सरासरी १५ ते २० क्‍विंटल शिंगाडा उत्पादन उपलब्ध होत राहते. याला नागपूर येथे मुख्य बाजारपेठ आहे. येथील सक्‍करदरा भागात ठिकठिकाणचे शिंगाडे विक्रीसाठी येतात. तोडणीसाठी प्रतिदिवस ३०० रुपये मजुरी द्यावी लागते. शिंगाडा उत्पादनात हाच खर्च सर्वाधिक असल्याचे दिघोरे यांनी सांगितले. दर चांगले मिळाल्यास फायदा वाढतो. खर्च वजा जाता हंगामात एकरी १५ ते २० हजार रुपयांचा नफा मिळतो. सध्या लागवड क्षेत्र वाढीस लागल्याने बाजारात आवकही वाढली. परिणामी दरात घसरण झाली आहे. मात्र हे पीक अन्य पिकांच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्याचेही ते म्हणाले. तलावातील शिंगाडा विक्रीनंतर नफ्याचे समान वितरण होते. महिन्याच्या अखेरीस गटातील सदस्यांच्या इच्छेनुसार रकमेचे वितरण होते. शिंगाडा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने थेट बांधावरून खरेदीवरही व्यापारी भर देतात. दिघोरे यांच्याद्वारे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली परिसरात विक्री होते. नागपूर येथे प्रती १० किलोसाठी ३०० रुपये तर स्थानिकस्तरावर हाच दर २०० रुपये मिळतो.  उकडलेल्या शिंगाड्यांची विक्री  डॉ. डोंगरवार म्हणाल्या, की विदर्भात शिंगाडा उकडूनदेखील त्याची विक्री करणारे व्यावसायिक आहेत.  त्याला ग्राहकांची मागणी देखील असते. आमच्या केव्हीकेत या पिकाविषयी चांगला अभ्यास झाला आहे.  शिंगाड्याच्या जाती 

  • डॉ. डोंगरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंगाड्याच्या तीन प्रचलित जाती आहेत त्या पुढीलप्रमाणे. 
  • भगवा शिंगाडा- आकाराने मोठा. २० ते २५ ग्रॅम वजन. चवदार. पीक कालावधी १८० ते २१० दिवस. 
  • प्रतिहेक्‍टरी ३५ क्‍विंटलपर्यंत उत्पादनक्षमता. 
  • लालसर शिंगाडा- कमाल वजन २० ग्रॅम. पीक कालावधी १८० ते २०० दिवस. प्रतिहेक्‍टरी उत्पादन २८ ते ३० क्‍विंटल.  
  • हिरवा शिंगाडा- आकाराने लहान जात. पीक कालावधी १८० दिवसांपेक्षा कमी. उत्पादन २२ ते २५ क्‍विं. प्रतिहेक्टर 
  • शिंगाड्याचा वापर व फायदे 

  • पीठ तयार केले जाते. उकडूनही खाल्ले जाते. 
  • विविध विकार- आजारांवर शिंगाडा उपयुक्त आहे. त्यामुळेच आयुर्वेदात त्याचे महत्त्व आहे. 
  • यात विविध खनिजद्रव्ये, प्रथिने असतात. मेदयुक्त घटकांचे प्रमाणही अल्प असते. 
  • संपर्क- रामजी दिघोरे- ९४२३६३४१०४  डॉ. उषा डोंगरवार- ९४०३६१७११३ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com