झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळख

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावशिवारात सुमारे ४० वर्षांपासून झेंडू व अन्य फुलांची शेती केली जाते. फुलांचे मुख्य पुरवठादार गाव म्हणून शिरसोलीने ओळख मिळविली आहे. दसरा, दिवाळी सणाला इथल्या फुलांना जिल्ह्यासह परराज्यांतही मागणी असते.
-शिरसोली परिसरात दसरा सणासाठी फुललेला झेंडू.
-शिरसोली परिसरात दसरा सणासाठी फुललेला झेंडू.

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावशिवारात सुमारे ४० वर्षांपासून झेंडू व अन्य फुलांची शेती केली जाते. फुलांचे मुख्य पुरवठादार गाव म्हणून शिरसोलीने ओळख मिळविली आहे. दसरा, दिवाळी सणाला इथल्या फुलांना जिल्ह्यासह परराज्यांतही मागणी असते. जळगाव जिल्ह्यात शिरसोली हे प्रमुख गावांपैकी एक आहे. सुमारे १५ हजारांपर्यंत लोकसंख्या असून, शिवार १७०० हेक्टरपेक्षा अधिक आहे. शेती मध्यम, हलकी, काळी कसदार आहे. काही भागांत जलसाठे मुबलक आहेत. जलसंकटावर मात करण्यासाठी गावात मध्यंतरी जलसंधारणाची कामे झाली. पण १०० टक्के शिवाराला त्याचा उपयोग झालेला नाही. गावात प्रमुख नदी नाही की सिंचन प्रकल्प नाही. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांनी जिद्द व कष्टातून रंगीबेरंगी फुले फुलवण्याची किमया घडवली आहे. गावातील तीनशेहून अधिक शेतकरी बारमाही विविध फुलांची शेती करतात. फुलशेती जोखीमेची आहे. अधिक पावसात किंवा उष्णतेतही नुकसानीचे धोके असतात. अशा सर्व प्रतिकूल वातावरणात शेतकरी परिश्रम घेतात. उंच गादीवाफा, सूक्ष्म सिंचन, संशोधित रोपांची निवड आदींवर शेतकऱ्यांचा भर असतो. काही शेतकरी दोन ते तीन वेळाही झेंडूची लागवड करतात. झेंडूची सर्वाधिक लागवड गावात कोरडवाहू शेती अधिक आहे. फुलांसह पानमळे, कापूस, भाजीपाला शिवारात दिसतो. सुमारे २५० हेक्टरवर फुले, त्यात सर्वाधिक २०० ते २२५ एकरांत झेंडू, शेवंती ४० ते ४५ एकरांत, तर गुलाबही साधारण तेवढ्याच क्षेत्रात आहे. गावात फुलशेतीची सुरवातच झेंडूपासून झाली. त्याची बारमाही लागवड असते. पूर्वी घरातील बियाण्याचा उपयोग व्हायचा. अलीकडे रोपवाटिकांमधून दोन रुपये प्रतिरोप दरात ती विकत घेतली जातात. ज्यांच्याकडे दोन एकर शेती आहे तो शेतकरी किमान १० ते १५ गुंठे क्षेत्र झेंडूसाठी राखीव ठेवतो. हंगामाचे नियोजन फुलांना गणपती उत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी व लग्नसराईत मागणी अधिक असते. सर्वाधिक दरही याच काळात मिळतात. दसरा, दिवाळीला फुले हाती येण्यासाठी जुलैपासून झेंडू लागवडीचे नियोजन सुरू असते. त्याच पद्धतीने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत फुले हाती यावीत यासाठीही लागवड हंगाम निश्‍चित केले जातात. प्रति दिन ५० क्विंटल आवक गणपती, दसरा, दिवाळीच्या काळात असते. डिसेंबर ते मार्च या दरम्यान गावशिवारातून प्रति दिन २० ते २५ क्विंटल झेंडूची आवक होते. थेट खरेदी गावात बारमाही फुलांचा व्यापार करणारे सुमारे आठ जण आहेत. शेतकऱ्यांकडून ते थेट खरेदी करतात. ताजी, टवटवीत फुले बाजारात पोहोचावीत यासाठी शेतकरी पहाटे तोडणी करतात. जळगाव शहर सुमारे १२ किलोमीटरवर आहे. त्यामुळे काही मिनिटांत फुले बाजारात पोहोचतात. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. सणासुदीला काही शेतकरी थेट जळगावात जाऊन किरकोळ विक्रीही करतात. काही शेतकरी परिचयातील व्यापारी, खरेदीदारांना गावातही विक्री करतात. गावातील बळिराम वराडे, श्रीराम बारी व अन्य खरेदीदार झेंडू, गुलाब, शेवंती, लिली, मोगरा आदी फुलांची खरेदी करून ती पुणे, नाशिक, नागपूर, गुजरातेत पाठवतात. या थेट खरेदीमुळे गावातील शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचतो. त्यांना दोन पैसे अधिकचे मिळतात. जळगाव शहरातील फुलांच्या बाजारात ८० टक्के अडतदार शिरसोलीमधील आहेत. अर्थातच शिरसोलीकरांनीच फुलाच्या शेतीसह फुलबाजारही विस्तारण्यासाठी मोलाचे योगदान, काम केले आहे. जनाई रोपवाटिकेद्वारे बळिराम वराडे पिवळ्या व केशरी झेंडूची दर्जेदार रोपे गावातच उपलब्ध करतात. शिरसोलीसह अन्य गावांमध्ये दरवर्षी काही लाख रोपांची विक्री ते साध्य करतात. दरांचे गणित झेंडू फुलांना सर्वाधिक ५० ते ६० रुपये प्रति किलो दर दसरा, दिवाळी सणाच्या वेळेस मिळतात. पुढे लग्नसराईत म्हणजेच फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान हे दर ३० ते ४० रुपयांच्या दरम्यान असतात. गेल्या वर्षी जून, जुलैमध्ये कोविडची समस्या मोठी होती. टाळेबंदीच्या भीतीने अनेकांकडे लागवडीवर मर्यादा आल्या. त्यामुळे दसरा, दिवाळीला झेंडूचे दर तेजीत राहिले. दसऱ्याला कमाल प्रति किलो २५० रुपयांपर्यंत दर झेंडूला मिळाला होता. यंदा मात्र परिस्थिती सुधारत असून, जानेवारी २०२१ ते सप्टेंबर अखेर कमाल ४० व किमान २५ रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. अर्थकारण मजबूत फुलशेतीच्या बळावर शिरसोली गावाचे अर्थकारणही मजबूत झाले आहे. महिन्याला काही लाख रुपयांची उलाढाल होते. तर ८०० पर्यंत मजुरांना त्यातून रोजगार मिळतो. दसरा, दिवाळी या काळात तर दररोज अविरत काम राहते. सुमारे तीनशे फूल उत्पादकांना आर्थिक हमी मिळाली आहे. कोविडचा काळ वगळता फुलशेतीमध्ये तोटा आल्याचे उदाहरण फारसे नाही. गुलाबाच्या फुलांची ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये प्रति दिन सरासरी २५ ते ५० हजार नगांची काढणी किंवा पुरवठा शिरससोलीतून होत असतो. शेवंतीच्याही सुमारे १० क्विंटल फुलांचा पुरवठा जळगावच्या बाजारात दररोज होतो. मे व जून या काळात मात्र झेंडू फुलांचा पुरवठा कमी होतो. या दरम्यान काढणीसाठी फारशी फुले नसतात. मागणीही कमी असते. संपर्क- बळिराम वराडे, ७०२०१६३७७१, ९९७००८५३३७ गोपाल उंबरकर- ९६५७९०४२८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com