पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून पीक बदल, काशीफळाचा प्रयोग ठरला आश्‍वासक 

तोडणी केलेली व नागपूर मार्केटला नेलेली वजनदार काशीफळे दाखवताना शिवाजी देशमुख
तोडणी केलेली व नागपूर मार्केटला नेलेली वजनदार काशीफळे दाखवताना शिवाजी देशमुख

नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील उच्चशिक्षित प्रयोगशील शेतकरी शिवाजी देशमुख यांची केळी व हळद ही मुख्य पिके आहेत. तरीही पाऊस कमी होत चालल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार त्यांना पिकांचे नियोजन बदलावे लागते. त्यातूनच हुशारीने त्यांनी यंदा एकरात काशीफळ (लाल भोपळा) घेत त्याचे १५ टन उत्पादन घेतले. पाण्याची गरज कमी असलेल्या ड्रॅगनफ्रूटचाही प्रयोग करून त्यांनी दुष्काळातही उत्पन्नाचे स्त्रोत चांगल्या प्रकारे सुरू ठेवण्याचे आव्हान पेलले आहे.  नांदेड जिल्ह्यात पारडी येथील शिवाजी राजेश्वरराव देशमुख हे प्रयोगशील व उच्चशिक्षित शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी एम.एम.,एम.एड. एम. फील या पदव्या संपादन केल्या आहेत. जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेत चार वर्षे त्यांनी नोकरी केली. परंतु शेती हाच विकासाचा व आर्थिक कणा असल्याचे त्यांना जाणवले. आता नोकरी सोडून पाच- सहा वर्षांपासून ते पूर्णवेळ शेती करीत आहेत.  देशमुख यांचे शेती नियोजन  देशमुख कुटुंबीयांची पारडी (ता. अर्धापूर) शिवारात १५ एकर तर हदगांव शिवारात २० एकर शेती आहे.  पारडी येथील शेती शिवाजी तर त्यांचे बंधू सचिन (बी.ए.बीएड) हदगांव येथील शेती पाहतात.  सिंचनासाठी दोन विहीरीची व्यवस्था आहे. एक विहिरी नदीकाठी तर दुसरी शेतात आहे. नदीकाठच्या विहिरीवरून पाइपलाइनव्दारे शेतात पाणी आणले आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचन पद्धतीने सिंचित केले जाते.  पीक पद्धतीचे आव्हान  दरवर्षी प्रत्येकी चार एकरांपर्यंत हळद व केळी अशी मुख्य पिके असतात. मात्र अलीकडील काळात पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याने उत्पन्न टिकवण्याच्या दृष्टीने पीक पध्दती व क्षेत्र नियोजन आव्हानात्मक झाल्याचे शिवाजी यांना वाटते. अर्धापुरी भाग केळीचा मुख्य पट्टा असल्याने साहजिकच देशमुख यांनीही हे पीक टिकवून धरले आहे. दरवर्षी जूनच्या दरम्यान ग्रॅंड नैन या जातीची लागवड होते. याशिवाय चार एकरांवर केळीचा खोडवाही असतो. केळीचे एकरी २५ ते ३० टनांपर्यंत ते उत्पादन घेतात. अर्धापूर येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. यंदा किलोला १४ रुपयांपर्यंत दर सुरू असल्याची समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले.  हळदीची विक्री ग्रेडिंग करून  हळद हे देखील देशमुख यांचे नगदी पीक आहे. गादीवाफा पध्दतीने सेलम जातीची लागवड ते करतात. वाळवलेल्या हळदीचे एकरी ३० ते ३२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. काही शेतकरी हळदीचे दर्जेदार उत्पादन घेतात. मात्र ग्रेडिंग न करत विक्री करीत असल्याने दर कमी मिळतात. त्यामुळे देशमुख लोखंडी तारेच्या वेगवेगळ्या चाळण्यांव्दारे हळदीचे ए, बी व सी असे ग्रेडिंग करतात.  ए ग्रेडच्या हळदीची साठवण करून ठेवता येते. बाजारपेठेत तेजी आल्यानंतर विक्री केल्याने फायदा होतो. ग्रेडिंगमुळे अन्य हळद उत्पादकांच्या तुलनेत प्रति क्विंटल १००० ते १२०० रुपये जास्त मिळतात.  शेती व्यवस्थापन - ठळक बाबी 

  • दोन बैलजोड्या व सालगडी. गरजेनुसार मजुरांची गरज घेतली जाते. 
  • आखाड्यावर शेतमाल साठवणुकीची व्यवस्था 
  • दोन जर्सी गायी, म्हशी. दररोज १० लिटर दूध डेअरीला. 
  • शिवाय जनावरांचे शेण व मुत्राचा वापर शेतीत. 
  • सुमारे ५० टक्के सेंद्रिय पद्धतीचा वापर  आपल्या शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर ५० टक्के होत असल्याचे देशमुख सांगतात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उपयुक्त बुरशी कल्चरचा वापर ते करतात. जीवामृतचीही निर्मिती करण्यात येते. यंदा काशीफळाचे अधिकाधिक सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले. पुण्यातील व्यापाऱ्याकडून १४ रुपये प्रति किलो दराने मागणी होती. मात्र सेंद्रिय प्रमाणपत्र आवश्‍यक होते. ते नसल्याने दराची ही संधी घेता न आल्याचे देशमुख म्हणाले. आता त्याकडे लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  वेगळ्या पिकांचे प्रयोग  ड्रॅगन फ्रूट  तुलनेने कमी पाण्यावर येऊ शकणाऱ्या ड्रॅगन फ्रूटच्या शंभर झाडांची लागवड केली आहे. त्यासाठी  सिमेंटचे २५ खांब रोवून प्रत्येक खांबावर चार रोपांची लागवड केली आहे. मागील पहिल्या वर्षी सर्व मिळून ७० ते ८० किलोपर्यंत उत्पादन मिळाले. नांदेड मार्केटमध्ये १२० रुपये प्रति किलो दर मिळाला. यंदा दोन क्विंटल पर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. यंदा सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेशातून आणून सुमारे १०० झाडांचा प्रयोग केला आहे. सध्या झाडे दोन महिन्यांची आहेत.  काशीफळाचा आश्‍वासक प्रयोग  काही शेतकरी शेतातील धुरे, बांध आदी ठिकाणी काशीफळाची (लाल भोपळा) थोडीफार लागवड करून उत्पादन घेतात. परंतु काहिशा दुर्लक्षित मात्र फायदेशीर अशा या फळाची मागणी लक्षात घेऊन शेतकरी त्याचे व्यावसायिक उत्पादन घेत आहेत. देशमुख यांनीही यंदा २७ मे रोजी एक एकरात सहा बाय दोन फूट अंतरावर काशीफळाची लागवड केली. सुरवातीपासून ठिबक संचाव्दारे पाणी दिले. १०-२६-१६ खताच्या दोन बॅग्जचा वापर केला. फळमाशीच्या नियंत्रणासाठी सापळे लावले.  सत्तर दिवसांत उत्पादन  सुमारे ७० दिवसांत हे पीक उत्पादन देण्यास सुरवात करते असे देशमुख म्हणाले. आता प्लॉट संपला असून एकरी एकूण १५ टन उत्पादन मिळाले आहे. पैकी १० टन मालाची विक्री झाली आहे.  नागपूर हे मार्केट भोपळ्यासाठी चांगले असल्याचे त्यांना जाणवले आहे. प्रति किलो सरासरी सात रुपये दर मिळाला. अर्थात देशमुख यांना १० ते १२ रुपये दराची अपेक्षा होती. तरीही यंदा खरिपात पाऊस जवळपास झालाच नाही. सध्याही तो पडण्याची शक्यता दिसत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर या पिकाने आश्‍वासक उत्पन्न दिल्याचे देशमुख म्हणाले. उत्पादन खर्चही दहाहजार रुपयांच्या पुढे गेला नाही. फवारण्याही कराव्या लागल्या नाहीत. अन्य भाजीपाला पिकांच्या विशेषतः उन्हाळ्यातील कलिंगडाच्या तुलनेत काशीफळाचा खर्च कमी असल्याचे जाणवले आहे. सध्याही दीड एकरात नवी लागवड केली आहे.  संपर्क- शिवाजी देशमुख - ९९७०६७०३६९   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com