ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदल

तुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद रणदिवे यांनी ऊसपट्ट्यात केळी लागवडीतून पीकबदल साधला आहे. केळी उत्पादनाचा त्यांचा नवा अनुभव उत्साह वाढवणारा ठरला असून, निर्यातदारांमार्फत दुबई येथे केळी पाठवण्यातही ते यशस्वी झाले आहेत.
शिवानंद रणदिवे आपल्या केळीच्या बागेत
शिवानंद रणदिवे आपल्या केळीच्या बागेत

तुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद रणदिवे यांनी ऊसपट्ट्यात केळी लागवडीतून पीकबदल साधला आहे. केळी उत्पादनाचा त्यांचा नवा अनुभव उत्साह वाढवणारा ठरला असून, निर्यातदारांमार्फत दुबई येथे केळी पाठवण्यातही ते यशस्वी झाले आहेत.   मोहोळ-पंढरपूर महामार्गावर तुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे शिवानंद रणदिवे यांची वडिलोपार्जित शेती आहे. गेली वीस वर्षे ते शेती करतात. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. मोठे रामचंद्र, मधले शिवानंद व लहान इंद्रजित असे तीन बंधू, आई, पत्नी, भावजय, मुले, पुतणे-पुतणी असे १३ सदस्यांचे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. रामचंद्र शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. तेही दोन्ही भावांसमवेत शेती करतात. प्रयोगशील शेतकरी म्हणून या कुटुंबाची ओळख आहे. शेतीतील उत्पन्नातून पूर्वीच्या २० एकरांवरून त्यांनी ५० एकर शेती नव्याने घेतली. सध्या ७० एकरांत २० एकर केळी, तीन एकर द्राक्ष, १० एकर शेवगा व ३० एकर ऊस आणि नव्याने आणखी १० एकरांत केळी आहे. असा घडला पीकबदल तुंगत हा सर्वाधिक ऊसपट्टा म्हणून गणला जातो. अगदी काही अंतरावरील भीमा नदी आणि उजनी धरणाच्या कालव्यामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता या भागात आहे. शिवानंद यांनीही उसाचे एकरी ११० टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. पण दरातील चढ-उतार आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्यानं पीकबदल हवा होता. त्यातूनच २०१५ मध्ये डाळिंबाची लागवड केली. मात्र त्यातून फारसे हाती लागले नाही. त्यानंतर गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेत २०१८ मध्ये केळी लागवडीचा निर्णय घेतला. नवीन पीक असल्यानं सुरुवातीला कठीण वाटलं. पण माघार नाही असं म्हणत त्यात उडी घेतली. आवश्यक माहिती घेतली. अभ्यास केला. व्यवस्थापनातील बाबी केळीसाठी जी-9 वाणाची टिश्युकल्चर रोपे निवडली. सहा बाय पाच फूट व सात बाय पाच फूट अशा अंतरावर लागवड केली आहे. लागवडीनंतर दहा दिवसांनी १९-१९-१९ व ह्युमिक ॲसिड यांचा वापर केला. मुख्य विद्राव्य खतांचा वापर करताना तिसऱ्या महिन्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फेरस सल्फेट आणि दुय्यम अन्नद्रव्ये देण्यात आली. नवव्या महिन्यात फॅास्फोरिक ॲसिड आणि पोटॅशिअम सोनाइट प्रत्येकी पाच लिटर आलटून-पालटून दोन वेळा दिले. अकराव्या महिन्याच्या सुमारास केळी काढणीस आली. केळी पोहोचली दुबईला ग्रॅंड नैन वाणाच्या उतिसंवर्धित वाणांची रोपांची लागवड केली आहे. गेल्या वर्षी विक्रीसाठी त्यांना बाजारात जाण्याची गरज लागली नाही. निर्यात करणारी व्यापारी कंपनी थेट बांधावर पोचली. सरासरी १३ रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळाला. एकरी ३५ टनांच्या आसपास उत्पादन मिळाले. प्रति रास २५ किलोच्या पुढे व ३० किलोपर्यंत मिळाली. पाच एकरांतून मिळालेल्या उत्पन्नातून हा प्रयोग उत्साह वाढवणारा ठरला. यंदाही खोडवा केळीची काढणी सुरू आहे. प्रति किलो १० रुपये दर आहे. आतापर्यंत एकरी १० टन उत्पादन मिळाले आहे. सध्या प्लॅाट सुरू असून, किमान महिना-दीड महिन्यापर्यंत हंगाम चालेल. यंदा नव्याने क्षेत्रविस्तार सध्या १० एकर क्षेत्र केळीखाली आहे. नव्यानेच गेल्या आठवड्यात १० एकरांत लागवड वाढवली आहे. तर आणखी पंधरवड्यानंतर पुन्हा १० एकरांत नव्या लागवडीचा विचार आहे. त्याची तयारी सुरू आहे. शिवानंद यांनी पीकबदल महत्त्वाचा मानताना शेवगा आणि द्राक्षांसारखी फळबागही घेतली. सध्या शेवग्याची दहा एकरांत तर द्राक्षाची तीन एकरांत लागवड आहे. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने नावीन्याचा शोध घेण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. केळी लागवडीमध्ये अवघ्या दोनेक वर्षांपासून शिवानंद आहेत. पण त्याबद्दलची नेमकी आणि अचूक माहिती मिळवत त्याचा चांगला अभ्यास त्यांनी केला आहे. संपर्क- शिवानंद रणदिवे, ८८३०८२२०७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com