शृंगारे यांची शेती खरोखरच ‘सोन्या’वाणी !

पुरस्काराने सन्मान शेतीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी गंगाधर यांना राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी तसेच कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठांसह अन्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. पंडित यांचा जिल्हा परिषदेतर्फे कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मान झाला आहे.
शृंगारे यांची शेती खरोखरच ‘सोन्या’वाणी !
शृंगारे यांची शेती खरोखरच ‘सोन्या’वाणी !

टाकळगव्हाण (जि. हिंगोली, ता. कळमनुरी) येथील शृंगारे कुटुंबातील पाच भावांनी आपले कुटुंब व शेती यांची विभागणी होऊ न देता एकीचे बळ शेतीत उभारले आहे. विविध हंगामी पिके, बीजोत्पादन, दुग्ध, रेशीम व्यवसाय, गांडूळखत युनिट आदींच्या माध्यमातून एकात्मिक शेती विकसित केली आहे. जमा- खर्चाच्या नोंदी ठेऊन शेतीतले अर्थकारण त्यांनी सुधारले आहे.   हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्याच्या काहीशा दुर्गम भागातील टाकळगव्हाण गावाची सव्वादोनशेपर्यंत लोकसंख्या आहे. येथील ज्येष्ठ शेतकरी बळवंतराव शृंगारे यांना भास्कर, गंगाधर, श्रीधर, पंडित व प्रभाकर ही पाच मुले आहेत. या पाचही बंधूंते कुटुंब आज एकत्र नांदते. कुटुंबात लहान- मोठे मिळून सुमारे २० सदस्य आहेत. गावशिवारात त्यांची खोल काळी माती असलेली ४५ एकर भारी जमीन आहे. सहा बोअर्सच्या माध्यमातून हंगामी सिंचनाची सुविधा आहे. अशी आहे शेती

  • सोयाबीन- २० ते २५ एकर, हळद ८ एकर, चारा- ३ ते ४ एकर. दोन एकर तुती.
  • गोठा, गोदाम, गांडूळ खतनिर्मिती, रेशीम कीटक संगोपनगृह
  • प्रयोगांतून बदल टाकळगव्हाण गावशिवारातून कयाधू नदी वाहते, त्यामुळे जमीन सुपीक आहे. गावची ओळख पूर्वी उसासाठी होती. पुढे पावसाचे प्रमाण कमी झाले. हवामान, दर या समस्या वाढल्या. उसाखालील क्षेत्र घटले. शृंगारे यांच्याकडेही पीकपध्दती सुधारण्याचे काम सुरू होते. गंगाधर यांनी बी.ए.बीएड. व त्यानंतर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर पदव्या घेतल्या. सन १९९९ पासून ते पूर्णवेळ भावांच्या मदतीने शेती करू लागले. शेतीतील सुधारणा सुरवातीपासूनच जमा- खर्चाच्या हिशोबाच्या नोंदी ठेवण्यास गंगाधर यांनी महत्त्व दिले. अर्थशास्त्रीय दृष्टिकोन जपला. सुरवातीला कपाशी उत्पादनावर भर दिला. परंतु, खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने पीक घेणे थांबवले. मग खरिपात सोयाबीन आणि रब्बीत हरभरा या पध्दतीचा अंगीकार केला. आता सरकारी बियाणे कंपनीसाठी ते सोयाबीनच्या विविध वाणांचे बीजोत्पादन घेतात. त्यातून बाजारभावापेक्षा अधिक दर मिळून फायदा होतो. पेरणीतही दोन ओळीतील अंतर १८ इंच ठेवले त्यामुळे एकरी बियाणे प्रमाणही २० ते २२ किलोपर्यंत कमी झाले. सोयाबीनचे एकरी १० ते १२ क्विंटल तर हरभऱ्याचेही तेवढेच व कमाल १५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. हळदीची गादीवाफा पध्दतीने लागवड होते. एकरी ३० ते ३२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. शेती नियोजनातील ठळक बाबी गंगाधर अभ्यासू शेतकरी आहेत. त्यांनी राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन अनुभव जाणून घेतले. कुटुंबातील मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात सुरवातीला दररोज उत्पन्न देणारा दुग्धव्यवसाय आणि त्यानंतर दर महिन्याला शाश्वत उत्पन्न देणारा रेशीम उद्योग सुरू केला. सर्व भाऊ आपापसात विचारविनिमय करून निर्णय घेतात. एकमेकांबद्दलाचे प्रेम, आदर, समन्वय यातून कुटुंबाचा एकोपा कायम आहे. प्रत्येकजण आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी कसोशीने पार पाडतो. ३) थोरल्या भास्कररावांकडे पीक नियोजन ते काढणीपर्यंत, गंगाधर यांच्याकडे धोरणात्मक जबाबदारी आहे. विविध कार्यकारी सोसायटींचे ते अध्यक्ष तसेच कळमनुरी येथील गोदा फार्म शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आहेत. नाबार्डअंतर्गत कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवितात. श्रीधर रेशीम, पंडित दुग्धव्यवसाय तर सर्वात धाकटे बंधू प्रभाकर यांच्याकडे ट्रॅक्टर तसेच कृषी अवजारांच्या देखभालीची जबाबदारी आहे. ताजे उत्पन्न देणारा रेशीम उद्योग सुमारे १२ वर्षांपासून हे कुटुंब रेशीम शेती करते. दोन एकरांत तुती लागवड आहे. प्रती २०० अंडीपूंजापासून कोषउत्पादन क्षमतेच्या रेशीम कीटकसंगोपनगृहाची उभारणी केली आहे. वर्षभरात सहा ते सात बॅचेस घेतात. प्रतिबॅच सरासरी १३० ते १५० किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते. कर्नाटकातील रामनगर येथे विक्री होते. महिन्याला सुमारे ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. दुग्ध व्यवसायाचा विस्तार सन २००७ मध्ये दोन जर्सी गायी खरेदी करून दुग्ध व्यवसायास सुरवात केली. सध्या या व एचएफ गायींसह ३० गायी व पाच म्हशी आहेत. दररोज सरासरी २०० ते २२५ लिटर दूध संकलित होते. सिमेंटची गच्ची आणि गव्हाणी असलेला सुसज्ज गोठा आहे. मुक्तसंचार गोठा पध्दतीचा अवलंब करण्याचा मानस आहे. गावाला दुग्ध व्यवसायाची गोडी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शृंगारे यांच्या अनुभवातून प्रेरणा घेत दुग्धव्यवसाय सुरू केला. प्रत्येक कुटुंबात दोन संकरित गायी आहेत. शृंगारे यांच्यासह गावात प्रतिदिन सुमारे ६०० लिटर दूध संकलित होते. त्यासाठी खासगी डेअरीचे दूध संकलन शृंगारे यांनी सुरू केले आहे. दुधाच्या गुणवत्तेनुसार गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर २८ ते ३० रुपये तर म्हशीच्या दुधास ५० ते ५५ रुपये दर मिळतो. पशुखाद्याची एकत्रित खरेदी होते. त्याचा फायदा होतो. पशुआरोग्य सुविधाही एकाच वेळी उपलब्ध होतात. दुग्धव्यवसायाचा फायदा दुग्धजन्य पदार्थांचा आहारात दररोज समावेश असल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत झाली आहे. तर शेणखत, गोमुत्राचा वापर शेतीत होत असल्याने जमिनीची सुपीकता टिकून आहे. -बारा वर्षांपासून कटुंब स्वयंपाकासाठी बायोगॅसचा वापर करते. त्यातील स्लरी गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरली जाते. व्हर्मीवॅाशचेही संकलन होते. दरवर्षी ४० ट्रॅाली शेणखत तर १२० ते ११५० क्विंटल गांडूळ खतनिर्मिती होते. आता रासायनिक खतांवरील खर्चही कमी झाला आहे. शिल्लक गांडूळ खत, व्हर्मीवॉश व गोमूत्राच्या विक्रीतून उत्पन्न स्त्रोत तयार झाला आहे. संपर्क- गंगाधर शृंगारे- ९८५०३२६७९८  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com