वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास फायदेशीर

जनावरे मूरघास आवडीने खातात.
जनावरे मूरघास आवडीने खातात.

सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी महिन्यापर्यंत हिरवा चारा उपलब्ध असतो. अशा वेळी मुरघास बनविण्याचे नियोजन करावे. मुरघास बनविण्यासाठी एकदल पिकांची निवड करावी. कारण, त्यामध्ये कर्बोदके आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांची आंबवण्याची प्रक्रिया चांगली होते. जनावरांची कार्यक्षमता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा पुरविणे आवश्यक असते. विशेषतः दुभत्या व कामाच्या जनावरांना हिरव्या वैरणीची अत्यंत आवश्यकता असते. चारा वाळवताना सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातील काही अत्यंत महत्त्वाचे अन्नघटक नाहीशे होतात. खरीप हंगामात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. त्यानंतर हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू लागते. जास्तीचा चारा वाळवून ठेवला जातो. इतर काळात विशेषतः उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा तुटवडा भासतो. त्यामुळे बहुतेक जनावरांमध्ये रातांधळेपणा, अशक्तपणा, भाकड दिवस जास्त असणे, जन्मताच वासरू मरणे अशा समस्या दिसून येतात. मुरघास आणि ताजा हिरवा चारा यांची तुलना होऊ शकत नसली, तरी मुरघास ही एक हिरवा चारा टिकवून ठेवण्याची उत्तम पद्धत आहे. मुरघास बनविण्याची पद्धत

  • १ फूट लांब, १ फूट रुंद व १ फूट खोल आकाराच्या खड्ड्यामध्ये १५ किलो मुरघास तयार होतो. १ मीटर लांब, १ मीटर रुंद व १ मीटर खोल या आकाराच्या बांधकामामध्ये खड्ड्यामध्ये ६५० ते ७०० किलो मुरघास तयार होतो.
  • मुरघास तयार करण्यासाठी खड्डा जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या वरही वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. सर्वसाधारण जनावरांच्या संख्येनुसार व हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार खड्ड्याचा आकार ठरवावा.
  • जागा उपलब्ध नसेल तर २५ ते १००० किलो क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिक ड्रममध्येही मुरघास बनविता येतो.
  • गरज असेल तर कापलेले पीक जागेवरच एक दिवस सुकू द्यावे. त्यानंतर चॉफ कटरच्या साह्याने चाऱ्याचे २ ते ३ सें.मी. लांबीचे तुकडे करून टाकीत किंवा पिशवीत भरावेत. एक टन चाऱ्यासाठी एक किलो मिठाच्या पाण्यात द्रावण तयार करून हे द्रावण मुरघास भरताना प्रत्येक थरावर शिंपडावे.
  • चाऱ्याचा प्रत्येक थर भरल्यानंतर चांगला दाब द्यावा; जेणेकरून कुट्टी केलेल्या चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही. कारण, हवा राहिली तर तेथे बुरशीची वाढ होऊन मुरघास खराब होतो. म्हणून चारा चांगला दाबून भरावा. टाकी किंवा बॅग भरल्यानंतर त्यावर जड वस्तू ठेवाव्यात; जेणेकरून मुरघास चांगला दाबून राहून मुरण्याची प्रक्रिया चांगली होईल.
  • सर्वसाधारणपणे ५० ते ६० दिवसांत मुरघास तयार होतो. तयार झालेल्या मुरघासाचा आंबट-गोड वास येतो. त्याचा रंग फिक्कट हिरवा ते तपकिरी ते तपकिरी हिरवा रंगाचा असतो. खराब झालेल्या मुरघासाचा रंग काळपट असतो. तसेच, तेथे बुरशीची वाढ दिसते.
  • मुरघासकरिता उपयुक्त चारापिके व काढणीची वेळ

  • सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो. मात्र, द्विदल वर्गातील पिकांचा मुरघास तयार करताना त्यात एकदलवर्गीय पिकाचा ६० ते ७० टक्के समावेश करणे आवश्यक आहे.
  • बहुतेक सर्व तृणधान्य चारापिकापासून उत्तम मुरघास तयार होतो. ज्वारी आणि मका तर उत्तमच; परंतु उसाचे वाढे, बाजरी, नागली, गिनीगवत, हत्तीगवत, पॅरागवत इत्यांदी चारा पिकापासूनही चांगला मुरघास तयार होतो.
  • चाऱ्याची कापणी करताना त्यामधील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे ६५ ते ७० टक्के असावे.
  • चारापीक ः कापणीची योग्य वेळ

  • मका ः पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
  • ज्वारी ः पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी कापणी करावी.
  • बाजरी ः पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना सर्वसाधारपणे पेरणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी कापणी करावी.
  • ओट ः पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
  • बहुवर्षीय वैरणपिके - संकरित हत्ती गवताच्या प्रजाती (यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इत्यादी), गिनी गवत सर्वसाधारण पहिली कापणी पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी (१० आठवड्यांनी) व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येकी ३० ते ४० दिवसांनी कराव्यात.
  • उत्तम मुरघास कसा ओळखावा?

  • तयार झालेल्या चांगल्या मुरघासाचा आंबूस वास येतो.
  • फिक्कट हिरवा किंवा तपकिरी रंग दिसतो.
  • उत्तम दर्जाच्या मुरघासाचा सामू (पी. एच.) ३.५ ते ४.५ असतो.
  •  ७५ ते ८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.
  • मुरघास जनावरांना किती व कसा खाऊ घालावा

  • उग्र वास येणारा, काळसर किंवा करड्या रंगाचा मुरघास कमी प्रतीचा समजावा.
  • आवश्यकतेनुसार खड्ड्यातून मुरघास काढावा. मुरघास काढल्यानंतर खड्डा व्यवस्थित झाकून ठेवावा.
  • सवय होईपर्यंत जनावरांना सुरवातीला मुरघास इतर खाद्यामध्ये थोडा मिसळून द्यावा.
  • पूर्ण वाढ झालेल्या जनावरास रोज १५ किलो मुरघास दिला तरी चालतो. बैलांना ७ ते ८ किलोपेक्षा जास्त देऊ नये. वासरांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे मुरघास द्यावा.
  • १ वर्षापेक्षा कमी वयाच्या वासरांना मात्र अर्ध्या किलोपेक्षा जास्त मुरघास देऊ नये.
  • शेळ्या-मेंढ्यांना दररोज किलोभर मुरघास पुरेसा होतो.
  • दुधाळ जनावरांना मुरघास नेहमी धार काढल्यानंतर घालावा, नाहीतर दुधास आंबट वास येतो.
  • दहा किंवा त्यापेक्षा अधिक जनावरे विशेषतः दुधाची जनावरे असल्यास मुरघास करण्याचे नियोजन करावे.
  • संपर्क ः योगेश पाटील, ९६६५५९९८९९ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा गांधी मिशन नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com