अत्याधुनिक यंत्राद्वारे मूरघास निर्मिती, श्री भद्रा ब्रॅंडने १५०० टन विक्री

यांत्रिक पद्धतीने मूरघास तयार केल्याने पौष्टिक चाऱ्याचा बारमाही प्रश्‍न मिटतो आहे. यंदा नगर जिल्ह्यातील एका मोठ्या दूध संघासोबत मूरघासासाठी करार शेती करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. सध्या त्यांच्याकडून १० टन बुकिंग झाले आहे. -दीपक चव्हाण संचालक, स्वरूप शेतकरी उत्पादक कंपनी ९४२१३०५५५५
मुरघासाचे बेल तयार करणारे यंत्र
मुरघासाचे बेल तयार करणारे यंत्र

श्री भद्रा ब्रॅंडने १५०० टन विक्री सुलतानपूर (जि. औरंगाबाद) येथील स्वरूप शेतकरी उत्पादक कंपनीने मूरघास निर्मितीसाठी स्वयंचलित अत्याधुनिक यंत्राचा वापर सुरू केला आहे. दुष्काळाची दाहकता ओळखून 'श्री भद्रा’ ब्रॅंडने कमी काळात तब्बल दोन हजार टन मूरघास निर्मिती व पंधराशे टन विक्री करण्यापर्यंत कंपनीने मजल मारली आहे. येत्या काळात मूरघासाची करार शेती करण्याकडेही कंपनीने पावले टाकली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर (ता. खुलताबाद) येथील प्रयोगशील शेतकरी दीपक चव्हाण यांच्या पुढाकारातून स्वरूप शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली. आज तालुक्‍यातील सुलतानपूरसह तीन, चार गावांतील सुमारे दोनशे शेतकरी कंपनीचे सदस्य आहेत.  प्रत्येकी एक ते पाच एकरापर्यंत शेती असलेल्या सदस्यांनी गहू, हरभरा, तूर आदी सुमारे पाचशे टन मालाचे प्रति वर्षी क्लिनिंग-ग्रेडिंगचे काम केले. सुमारे तीनशे न तुरीची हमीभावाने खरेदीही केली. मक्याची १५०० टन खरेदी करून त्याचा पुरवठा पोल्ट्री उद्योगाला करण्याचेही काम आहे.  मूरघासातील नवे तंत्रज्ञान  सध्या सर्वत्र दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. अशा वेळी  पारंपरिक पद्धतीच्या मूरघास निर्मितीपेक्षा आधुनिक तंत्राद्वारे हे काम मोठ्या प्रमाणात कसे करता येईल याची चाचपणी कंपनीचे नेतृत्व करणारे दीपक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. गुजरातमध्ये ‘तुर्की मेड’ पाच यंत्रे व त्याचे फायदे पाहण्यास मिळाले. तंत्रज्ञानाचा सर्वांगीण अभ्यास केल्यानंतर ते खरेदी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.  यांत्रिक पद्धतीने मूरघास निर्मिती 

  • यंत्राची किंमत ६० लाख रु. नाबार्डतर्फे ‘स्वरूप’ कंपनीला ५0 लाख रुपयांचे कर्ज 
  • कंपनीला आत्तापर्यंत झालेला नफा व भागभांडवलातून उर्वरित रकमेचा विनियोग 
  • एक यंत्र हार्वेस्टिंग व चॉपिंग करते, तर दुसरे बेल तयार करते. 
  • स्वयंचलित यंत्रणा 
  • पॅकिंगच्या दर्जेदार पद्धतीमुळे बुरशीचा धोका नाही. 
  • यंत्राची मूरघास मिर्मिती क्षमता- ४ टन प्रति तास, २४ तासात सुमारे ३० ते ४० टन 
  • आत्तापर्यंतची एकूण निर्मिती- २००० टन 
  • विक्री- १५०० टन 
  • पैकी स्थानिक सुमारे ३०० ते ४०० टन, मुक्ताईनगर- १००० टन, उर्वरित- ओरिसासाठी 
  • मूरघासाचा दर- प्रति टन ६,७५० रु. 
  • मार्केटिंग  -औरंगाबाद येथे ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनासह पुणे व अन्य ठिकाणच्या कृषी प्रदर्शनांमध्ये स्टॉल उभारल्याने मूरघासाचा प्रचार झाला. खासगी डेअऱ्यांसह दूध उत्पादक ग्राहक तयार झाले. मराठवाड्यात विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळामुळे यांत्रिक मूरघास निर्मितीला लागणारा पुरेसा मका उपलब्ध होणे शक्‍य नव्हते. त्यामुळे जळगाव जिल्ह्याकडे कंपनीने मोर्चा वळविला. मुक्ताईनगर (जळगाव) परिसरात स्वावलंबन शेतकरी गटाच्या सहकार्याने मग मूरघास निर्मिती शक्य झाली.  शेतकऱ्यांकडून खरेदी- त्याचे फायदे 

  • शेतकरी एकरी जेवढे टन मका उत्पादन घेतात त्यानुसार पेमेंट करून त्यांच्याकडून मका घेतला जातो. 
  • उदा. २० टन उत्पादनासाठी ४० हजार तर ३० टनांसाठी ६० हजार रुपये दिले जातात. 
  • हुरड्यात येताच तयार केला जातो मूरघास 
  • सुमारे ९० दिवसांत शेत होते खाली 
  • शेतकरी उत्पादक कंपनीच्या ११ जणांना मिळाला रोजगार 
  • पाणी, कापणी, मळणी, वाहतुकीच्या खर्चात बचत 
  • एकरी चार ते साडेचार हजारापर्यंत मजुरी खर्चात बचत 
  • मक्याची खरेदी करण्यासोबत मका उत्पादकाला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिटनाप्रमाणे मुरघास तयार करून दिला जातो. 
  • भविष्यातील नियोजन 

  • सदस्य शेतकऱ्यांना मका लागवडीसाठी प्रोत्साहन 
  • सेंद्रिय पद्धतीने मका व मूरघास निर्मिती 
  • पौष्टिक चाऱ्याची समस्या दूर करणार 
  • दहा टन मागणी नोंदविल्यास जागेवर पोहोच. (वाहतूक खर्च वेगळा) 
  • प्रतिक्रिया 
  • दुधाचे फॅट, एसएनएफ अपेक्षेप्रमाणे येण्यासाठी मूरघासाचे महत्त्व आहे. स्वरूप कंपनीकडून त्यासाठीच त्याची खरेदी केली आहे.  -नारायण गोल्डे  कल्याण दूध उत्पादक संस्था, आपदगाव, जि. औरंगाबाद  पाच दुभत्या गायी, दोन बैल, ३५ शेळ्यांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मूरघासाद्वारे निकाली निघाला.  काही घरी तयार केला. तर काही विकत आणला. शेळ्या सुदृढ झाल्या आहेत. गायींचं दूध वाढलं आहे. अन्य जनावरेही सुधारली आहेत.  -शिवाजी कुकलारे  सुलतानपूर  ९६०४२८०५००  मागील वर्षी ६५०० रुपये प्रति टन दराने मूरघास विकत आणला होता. यंदा घरचाच मका होता. त्यामुळे तो बनविण्यासाठी तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति टन मजुरीचा फक्त खर्च आला.  दुधाच्या उत्पादनात दहा टक्‍के वाढही झाली.  -सतीश वेताळ  सुलतानपूर  ९८६०४९७२२७   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com