पुसद वन विभागाचा हायटेक  दर्जेदार नर्सरीचा प्रयोग, दरवर्षी विविध झाडांची एक लाख रोपनिर्मिती 

सिंगदची हायटेक नर्सरी म्हणजे उच्च तंत्रज्ञानाचे दालन आहे. एम.एससी. (फॉरेस्ट्री) करताना कलमांद्वारे रोपांची निर्मिती' हा माझ्या संशोधनाचा विषय होता. त्यानंतर तीन वर्षे खासगी क्षेत्रात याच विषयात काम केल्याने 'हायटेक नर्सरी'च्या निर्मितीत अनुभव उपयोगी पडला. दरवर्षी एक जुलै ते ३० सप्टेंबर आम्ही वन महोत्सव घेतो. त्या वेळी तहसील कार्यालय वा वन कार्यालयात सवलतीच्या दरांत आम्ही शेतकऱ्यांसाठी रोपे उपलब्ध करतो. त्यांच्या मागणीनुसार तयारही करून देतो. अरविंद मुंढे, उपवनसंरक्षक, पुसद
सिंगद येथे विविध झाडांची दर्जेदार रोपे तयार केली जातात.
सिंगद येथे विविध झाडांची दर्जेदार रोपे तयार केली जातात.

कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार रोपे तयार करण्याचा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यातील सिंगद येथील मध्यवर्ती रोपवाटिकेने यशस्वी राबविला आहे. पुसद वन विभागांतर्गत या हायटेक रोपवाटिकेत दरवर्षी विविध वृक्षांच्या एक ते सव्वा लाख गुणवत्तापूर्ण रोपांची निर्मिती होते. आत्तापर्यंत तीन लाखांपर्यंत रोपनिर्मिती झाली आहे. शेतकऱ्यांना वन महोत्सवाच्या माध्यमातून सवलतीच्या दरांत तसेच मागणीनुसारही रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  महाराष्ट्रातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. पुसद वन विभागाला यंदा ३१.७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पुसद वन विभागात सात वन परिक्षेत्र आहेत. रोपांची गरज भागविण्यासाठी पारंपरिक रोपवाटिका वन विभागाने विकसित केल्या आहेत. मात्र नियंत्रित वातावरण तंत्राच्या अभावामुळे त्यांना काही मर्यादा पडतात. अशा रोपवाटिकांचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होते. रोपांची निर्मिती प्लॅस्टिक पिशव्यांत करण्यात येते. मर्यादित प्रमाणात रोपे तयार होताना मोठ्या मनुष्यबळाची गरज भासते. सर्व अडचणी लक्षात घेऊन घेऊन कमी वेळेत, कमी जागेत, कमी मनुष्यबळात दर्जेदार रोपे तयार करण्यासाठी उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी पुढाकार घेतला. ‘आयएफएस’ ही शासकीय सेवेतील सन्मानाची परीक्षा ते २०१३ मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. पुसद-नागपूर राज्य मार्गावरील सिंगद (ता. दिग्रस) येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत हायटेक रोपवाटिकेची ऑक्टोबर २०१७ मध्ये उभारणी झाली.  अशी आहे ‘हायटेक नर्सरी’ 

  • मध्यवर्ती रोपवाटिका चार हेक्टर क्षेत्रात वसली आहे. 
  • त्यात प्रत्येकी २६ बाय २० मीटर क्षेत्रावर पॉलिहाउस आणि शेडनेट असे विभाग 
  • रोपांच्या जोमदार वाढीसाठी आर्द्रता ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आणि तापमान ३५ ते ३८ अंश से. ठेवण्यात येते. पालिहाउसमध्ये या बाबी नियंत्रित केल्या जातात. 
  • फॉगर्स, कूलिंग पॅड, एक्झॉर्स्ट फॅन यांची व्यवस्था 
  • मातीऐवजी कोकोपीट आणि गांडूळखत यांनी भरलेल्या 'रूट ट्रेनर'मध्ये रोपनिर्मिती 
  • छोट्याश्या जागेत एका रूट ट्रेनर ट्रेमध्ये २४ रोपे वाढतात. त्यात मुळांना योग्य तऱ्हेने वाढीसाठी वळण दिले जाते. मनुष्यबळाचीही बचत होते. 
  • कोकोपीटमध्ये बियांची रुजवण कमी काळात होते. 
  • बिया लावलेला रूट ट्रेनर ट्रे २५ दिवस पॉलिहाउसमध्ये नियंत्रित परिस्थितीत ठेवण्यात येतो. 
  • यालाच उपवनसंरक्षक अरविंद मुंढे ऑपरेशन थिएटर असे संबोधतात. 
  • त्यानंतर रोपे शेडनेटमध्ये हलविण्यात येतात. याला आयसीयू युनीट संबोधले जाते. 
  • रूट ट्रेनर ट्रे उंचावर ठेवल्याने रोपट्यांचे ‘एअर प्रूनिंग’ (शेंड्यांचे मजबुतीकरण) होते. 
  • हार्डनिंगही होत असल्याने ही रोपे १५ ते २० दिवसांत बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेतात. 
  • त्यानंतर बाहेर नैसर्गिक वातावरणात दीड फूट उंचीची दर्जेदार रोपे लागवडीयोग्य होतात. 
  • यांची रोपे उपलब्ध 

  • साग, कडुनिबं, करंज, सीताफळ, रिठा, वड, पिंपळ, बेल, चारोळी, मोहा, उंबर, सिरस, चंदन, आवळा, जांभूळ, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेवगा. 
  • काही दुर्मीळ प्रजातींवरही प्रयोग करण्यात आले. याद्वारे उगवण कालावधी कमी करण्यात यश मिळाले आहे. उदा. सागाच्या बियांची बाहेरील वातावरणात ४५ दिवसांत उगवण होते. सिंगद येथील नर्सरीत हीच उगवण सुमारे १० दिवसांनी आधी झाल्याचे आढळले. बेहडा ३५ ऐवजी २५ दिवसांत, चारोळी ३० ऐवजी २० ते २५ असे निष्कर्ष आढळले आहेत. 
  • रोपनिर्मिती क्षमता  सिंगद येथील या हायटेक नर्सरीत प्रतिबॅचमध्ये ४५ हजार रोपे तयार होतात. तीन महिन्यांत एक बॅच पूर्णत्वास जाते. अशा प्रकारे वर्षभरात एक लाख ते सव्वालाख रोपे उत्पादित होतात. ही रोपे थेट जमिनीत वा पिशव्यांत लावता येतात. या नर्सरीतून आत्तापर्यंत सुमारे तीन लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक मुंढे यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी आनंद धोत्रे, क्षेत्र सहायक प्रकाश जाधव येथील देखभाल करतात.  अन्य सुविधा  या नर्सरीसाठी कायम विजेची आवश्यकता असते. विजेचा खंडित प्रवाह टाळण्यासाठी सौरऊर्जा पॅनेल्स उभारण्यात आले आहेत. पाण्याची गरज ओळखून विहीर खोदून १५ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुसद वन विभागात सागाचे जंगल आहे. त्यामुळे सागाची रोपे तयार करण्यासाठी ५०० बेड तयार करण्यात आलेले आहेत. शास्त्रीय व आधुनिक पद्धतीने सागाचे स्टम्पस त्याद्वारे तयार करण्यात येतात. मजुरांसाठी कुटी तयार करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी शौचालयाचीही सुविधा आहे. या नर्सरीला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन 'सेंटर ऑफ एक्स्लन्स' अशी पावती दिली आहे. यवतमाळचे वनसंरक्षक रवींद्र वानखडे, मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे आणि तत्कालीन मुख्य वनसंरक्षक प्रदीप राहुरकर यांनीही भेटी देऊन प्रशंसा केली आहे.  संपर्क- अरविंद मुंढे-९४०४५८२०४४  उपवनसंरक्षक, पुसद   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com