agriculture story in marathi, Sironcha Tahsil of Gadchiroli Dist has became hub of red chilli.. | Agrowon

दुर्गम सिरोंचा झाले लाल मिरचीचे हब

विनोद इंगोले
मंगळवार, 6 एप्रिल 2021

दुर्गम गडचिरोली जिल्ह्याची ओळख आर्थिक दृष्ट्या मागास अशी आहे. तेलंगण राज्याच्या सीमेजवळ जिल्ह्यातील सिरोंचा तालुका लाल मिरचीचा ‘हब’ झाला आहे. लाल मिरचीला असलेली मागणी लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी पीकबदल साधला. चोख व्यवस्थापन व सातत्य यातून प्रगती साधली आहे.

दुर्गम गडचिरोली जिल्ह्याची ओळख आर्थिक दृष्ट्या मागास अशी आहे. तेलंगण राज्याच्या सीमेजवळ जिल्ह्यातील सिरोंचा तालुका लाल मिरचीचा ‘हब’ झाला आहे. लाल मिरचीला असलेली मागणी लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी पीकबदल साधला. चोख व्यवस्थापन व सातत्य यातून प्रगती साधली आहे.
 
गडचिरोली हा दुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जातो. आर्थिक दृष्ट्या मागासलेला म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाणही प्रचंड आहे. त्यामुळे विविध पिके घेण्यावर मर्यादा येतात. अलीकडील वर्षांत जिल्ह्यातील सिरोंचा तालुका मिरचीचे हब म्हणून नावारूपाला आला आहे. सिरोंचा येथील मिरची उत्पादक शेखर रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यात
मिरचीचे क्षेत्र सुमारे १० हजार एकरांवर तर सिरोंचा परिसरात ते दीडहजार ते दोनहजार एकरांवर
असावे. येथील शेतकरी खासगी कंपन्यांच्या सुधारित वाणांचा उपयोग करतात. काही यांत्रिकीकरणाचा पर्यायही अवलंबितात.

घडला पीकबदल
या भागातील शेतकरी सुमारे वीस वर्षांपूर्वी मूग, उडीद, तीळ यासारखी हंगामी पिके घ्यायचे. तेलगंण राज्याच्या जवळ सीमा असलेल्या या गावातील कापूस हे देखील मुख्य पीक आहे. कमी कालावधीतील हंगामी पिकांची एकरी उत्पादकता जेमतेम पाच क्विंटलपर्यंत मिळायची. विक्रीनंतर मिळणाऱ्या पैशांतून कौटुंबिक गरजांची पूर्तता देखील होत नव्हती. त्यामुळे या शेतकऱ्यांना इतरांकडे मजुरीसाठी जावे लागे. आंध्र प्रदेशातील सहा शेतकऱ्यांनी मग भाडेतत्त्वावर तालुक्यात शेती कसण्यास सुरवात केली. त्यासाठी मिरचीचे पीक त्यांनी निवडले. उत्पादन आणि उत्पन्नक्षम असल्याचे लक्षात आल्यानंतर या पिकाखालील लागवड क्षेत्र टप्प्याटप्प्याने वाढत गेले. मिरचीतून पीकबदल घडला.

प्रगतीकडे वाटचाल
मिरचीच्या शेतीत सातत्य राखण्याचा फायदा झाला. शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बदलली. कधीकाळी कौलारू आणि जुनी घरे असलेल्या या भागात आता उंच इमारती उभ्या राहत आहेत. चांगल्या उत्पन्नाची शाश्‍वती मिळाल्याने अनेक शेतकरी अधिक क्षेत्रावर करारशेतीत गुंतले आहेत. ५० हजार रुपये प्रति एकर असा दर त्यासाठी आकारला जातो.

शेतकऱ्यांची अपेक्षा
मूळ तेलंगण येथील शेखर रेड्डी आता सिरोंचा येथे वास्तव्यास आहेत. सुमारे २० ते २५ वर्षांपासून ते
मिरचीच्या शेतीत आहेत. ते सांगतात की लाल मिरचीला या भागात जास्त मागणी असते.
त्यामुळे झाडावरच लाल करून, तोडणी करून वाळवून विक्री केली जाते. व्यापाऱ्यांकडून पाच टक्‍के ‘कमिशन’ कापून खरेदी होते. मिरची पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांनी थेट खरेदी केल्यास त्यामध्ये व हमाली दरात कपात होऊन नफ्याचे मार्जिन वाढेल. त्यामुळे कंपन्यांनी आमच्याशी संपर्क करावा अशी अपेक्षा आम्हा शेतकऱ्यांची आहे.

अडते देतात आगाऊ रक्‍कम
हंगामापूर्वी होणाऱ्या खर्चाची पूर्ती व्हावी यासाठी शेतकरी अडत्यांकडून आगाऊ रक्‍कम घेतात.
त्यातून हंगामातील बियाणे, खते व अन्य निविष्ठांची खरेदी होते. त्यामुळे पुढे दर कमी असले तरी त्याच अडत्याला मिरची पुरवठा करणे शेतकऱ्यांना भाग पडते. अशा प्रकारांतून शेतकऱ्यांचे नुकसानही
अनेकदा होते. परंतु आमचा नाइलाज असतो असे शेतकरी सांगतात. नागपूर सोबतच तेलंगणातील वारंगल, गुटूंर या बाजारपेठांचा पर्याय देखील शेतकऱ्यांकडे आहे.

मिरची शेतीतील बाबी
मिरचीचा लागवड हंगाम जुलै महिन्यात सुरू होतो. रोपे तयार करणे, ऑगस्ट दरम्यान पुर्नलागवड असे नियोजन असते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते मेअखेरपर्यंत मिरचीची काढणी सुरू असते. सरासरी तीन ते चार पर्यंत एकूण तोडे होतात. एकरासाठी बियाण्याच्या सुमारे १५ ते २० पाकिटांची गरज राहते. बियाणे, खते, कीडनाशक फवारणी वा एकूण उत्पादन खर्च एकरी किमान पावणेदोन लाख रुपयांपर्यंत येत असल्याचे रेड्डी सांगतात. नोंदणीसाठी प्रति मजूर २०० ते २५० रुपये खर्च होतो. १० ते १२ क्विंटलच्या एका तोड्यासाठी ८० मजुरांची तर तीन तोड्यांमागे किमान २५० मजुरांची गरज भासते. अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्‍टर व तत्सम अवजारे आहेत. रेड्डी सांगतात की पाण्याची समस्या आम्हाला कोणत्याच हंगामात फारशी भेडसावत नाही. आमच्याकडे बोअरवेल्स आहेत व पाण्याची प्रतही चांगली आहे. पावसाचे अति प्रमाण असलेल्या या भागात अन्य कोणत्याही पिकापेक्षा मिरची हे पीक फायदेशीर ठरल्याचे रेड्डी सांगतात.

उत्पादन व दर
रेड्डी सांगतात की एकरी सरासरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास किलोला १२० ते १५० रुपये म्हणजेच क्विंटलला
१२ हजार ते १५ हजार रुपये दर लाल मिरचीला मिळतो.

बाजारपेठ
गडचिरोली जिल्ह्यात मिरची खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तेलंगण मधील वारंगल किंवा सिरोंचापासून चारशे किलोमीटर अंतरावरील नागपूर बाजारपेठेचा पर्याय आहे.
शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाहतुकीवर होतो. वारंगल बाजारपेठेत या भागातील मिरचीला तेवढी मागणी राहत नाही. परिणामी नागपूरच्या तुलनेत दर प्रति क्विंटल पाचशे रुपये कमी मिळतात. सोबतच वारंगल बाजारपेठेत चोरीचे प्रकारही होतात. त्यामुळे मिरची विक्री होईपर्यंत तिथेच हजर राहावे लागते. या कारणांमुळे बहुतांशी शेतकरी नागपूरच्या कळमना बाजार समितीला पसंती देतात. वारंगल बाजार समितीत मिरचीचे व्यवहार दररोज तर कळमना बाजार समितीत दर सोमवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात.

कळमना बाजार समितीतील लाल मिरचीचे दर (क्विंटल)

  • २०१८- ६ हजार ते ८ हजार रू.
  • २०१९- ८ हजार ते ११ हजार रू.
  • २०२०- ८ हजार ते १५ हजार रू.
  • २०२१- ७ हजार ते १२ रुपये

संपर्क- शेखर रेड्डी- ९४२२९४०५६३ 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...