जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्र

सौर शुद्धजल संयंत्र
सौर शुद्धजल संयंत्र

दुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सौर शुद्धजल संयंत्राचा वापर करता येतो. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते त्यामुळे प्रदूषण होत नाही. या संयंत्रासाठी खर्चही कमी येत असल्यामुळे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. समुद्राच्या खाऱ्या, मचुळ पाण्याचे तसेच अशुद्ध पाण्याचे गोड्या पाण्यात/शुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. सौर शुद्धीजल यंत्रणेद्वारे मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याची सोय केली जाऊ शकते. हे पाणी पिण्यासाठी तसेच मोटार उद्योग, बॅटरी चार्जिंग स्टेशन, आरोग्य केंद्र, शासकीय मोटार कार्यशाळा, प्रयोगशाळा तसेच प्रक्रिया उद्योगामध्ये वापरले जाऊ शकते.  सौर शुद्धजल संयंत्राची रचना व कार्यप्रणाली

  • सौर शुद्धजल सयंत्र एक हवाबंद चौकोनी उतरता डबा असतो, तो हवाबंद करण्यासाठी फायबर रेनफोर्सड प्लॅस्टिक या विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकचा उपयोग केला जातो. या डब्याच्या आतील बाजूस अॅल्युमिनियम पत्र्याचे आवरण असून त्यावर उष्णताशोषक काळ्या रंगाचे सिलव्हर्टीव्ह कोटींग केलेले असते. त्यामुळे सूर्याची किरणे डब्याच्या आतील भागात शोषली जाऊन आतील तापमान वाढते. या चौकोनी (१ मी × १ मी) डब्याच्या वरच्या बाजूला ४ मि. मी. जाड काचेचे आवरण असून अॅल्युमिनियम किंवा प्लॅस्टिक पट्टीच्या सहाय्याने ही काच डब्यावर घट्ट बसविली जाते. चौकोनी डबा व काच यांच्यामध्ये रबर सिलिंग वापरून डबा हवाबंद करण्यात येतो. या संयंत्रामध्ये अशुद्ध पाणी भरण्याकरिता पाईपची रचना केली जाते.
  • एक चौरस मीटर सौर शुद्धजल संयंत्रामध्ये अशुद्धजलाचा सर्वसाधारण एक इंच जाडीचा थर होईल (अंदाजे ५ लिटर) इतके पाणी भरण्यात येते. अशुद्ध पाणी चौकोनी डब्यात भरल्यानंतर पाणी आत सोडणाऱ्या पाईपचे तोंड बूच लाऊन बंद केले जाते. सौर शुद्धजल संयत्राच्या वरील काचेच्या आवरणातून सौर किरणे आतील काळा रंग (सिलेक्टिव्ह कोटींग) दिलेल्या आवरणावर शोषली जातात. त्यामुळे आतील पाण्याचे तापमान वाढून बाष्पीभवन क्रियेने पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते.
  • चौकोनी डब्यामधील वाफ आपल्या नैसर्गिक गुणधर्मानुसार वरच्या बाजूस सरकते. ही वाफ काचेच्या आतील बाजूने अडविली जाते, परंतु काचेची बाहेरील बाजू थंड असल्यामुळे वाफेचे रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होते. काचेच्या उतरत्या रचनेमुळे असे अनेक पाण्याचे थेंब सरकत खालच्या बाजूस असणाऱ्या संकलन पाईपमध्ये जमा होतात. या संयंत्राद्वारे एक चौरस मीटर आकाराच्या चौकोनी डब्यातून दररोज २ ते २.५ लिटर शुद्धजल मिळते.
  • फायदे

  • कोणत्याही प्रकारच्या (विद्युत) खर्चिक ऊर्जेची गरज भासत नाही.
  • गढूळ / मचूळ पाण्याचे रूपांतर शुद्धजलामध्ये करता येऊ शकते.
  • या संयंत्रामध्ये कोणताही गंजणारा भाग नसून वापरण्यास अत्यंत सोपे आहे.
  • दुर्गम भागात तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळवता येते.
  • कोणतेही प्रदूषण होत नसून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
  • वैशिष्ट्ये

  • एक चौरस मीटर सौरशुद्धजल संयत्राद्वारे दररोज २ ते २.५ लिटर शुद्ध पाणी मिळते.
  • हे संयंत्र वापरण्या करिता पारंपरिक विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही.
  • या संयंत्राच्या वापरामुळे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही.
  • कार्यप्रणालीवर परिणाम करणारे घटक सौर किरणे ः सौर शुद्धजल संयंत्राचे कार्यक्षमता सौर किरणावर अवलंबून असते. शुद्धजलाची निर्मिती ही सौर ऊर्जेच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. जर सौर किरणांची तिव्रता जास्त असेल, तर सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढते. वाऱ्याची गती ः जशी वातावरणामध्ये वाऱ्याची गती वाढत जाते, त्याप्रमाणे शुद्धजल संयंत्रातील उष्णतामान कमी होते. वाऱ्याची गती जर कमी असेल, तर संयंत्रापासून जास्त प्रमाणात शुद्धजल प्राप्त होते. वातावरणातील तापमान ः जसे-जसे वातावरणातील तापमान वाढत जाते, त्याप्रमाणात सौर शुद्धजल संयंत्राची उत्पादन क्षमता वाढत जाते. संयंत्रातील पाण्याची पातळी ः संयंत्रामधील मचुळ पाण्याची पातळी जास्त असेल तर आतील पाण्याचे तापमान कमी राहते. त्यामुळे संयंत्राची उत्पादन क्षमता कमी होते. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पाण्याची पातळी कमीत कमी ठेवणे आवश्यक आहे. एक चौरस मीटर संयंत्रासाठी एक इंच पाण्याची पातळी ठेवावी. संयंत्रामधील काचेचा उतार ः संयंत्रातील वरील बाजूस असलेल्या काचेचा उतार कमीत कमी असेल तर उत्पादन क्षमता जास्त असते, परंतु काचेचा उतार जर ४०० पेक्षा जास्त असेल, तर पाण्याचे थेंब संयंत्राच्या संकलन पाईपमध्ये न जाता संयंत्रामध्येच पडतात. त्यामुळे काचेचा उताराचा कोन २०-३० अंशामध्ये असावा.    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com