जनुकीय सुधारणेद्वारे ज्वारीचे उत्पादन दुप्पट करणे शक्य

नेहमीच्या ज्वारीमधील दाण्यांचे प्रमाण (डावीकडे). योग्य त्या जनुकीय सुधारणा केल्यानंतर वाढलेले दाण्यांचे प्रमाण. (उजवीकडे)
नेहमीच्या ज्वारीमधील दाण्यांचे प्रमाण (डावीकडे). योग्य त्या जनुकीय सुधारणा केल्यानंतर वाढलेले दाण्यांचे प्रमाण. (उजवीकडे)

ज्वारी पिकातील संप्रेरकांच्या निर्मिती करणाऱ्या जनुकांच्या गटाला कार्यान्वित करणे शक्य झाल्यास प्रतिरोप फुले आणि बियांच्या उत्पादनावर अपेक्षित परिणाम घडवून आणणे शक्य होणार आहे. यातून पिकाचे उत्पादन दुप्पट करणे शक्य होणार असल्याचे कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी येथील वनस्पती शास्त्रज्ञ सांगतात. ज्वारी हे गवतवर्गीय पीक मानवी आहार, पशुखाद्य आणि जैवइंधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. दुष्काळ, उष्णता आणि अधिक क्षारतेच्या स्थितीमध्ये चांगल्याप्रकारे वाढण्याची, तग धरण्याची क्षमता असल्याने प्रारूप पीकही मानले जाते. या पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी येथील प्रो. डोरीन वारे आणि सहकारी संशोधन करत आहेत. त्यांचे सहकारी झांग्यू शीन यांनी ज्वारीतील एमएसडी२ जनुकांतील वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय बदलांची ओळख पटवली आहे. त्यामुळे धान्यांच्या उत्पादनामध्ये २०० टक्क्याने वाढ शक्य होणार आहे. एमएसडी२ ही जनुके जास्मोनिक आम्लांचे (एक संप्रेरक) प्रमाण कमी करून फुलांच्या फलन क्रियेला चालना देतात. हे संप्रेरक बिया आणि फुलांच्या विकासावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. प्रो. वारे यांच्या प्रयोगशाळेतील पोस्टडॉक्टरल संशोधक निकोलस ग्लॅडमन यांनी सांगितले, की ज्या वेळी जास्मोनिक आम्लांचे प्रमाण कमी होते, त्या वेळी बियांच्या विकासाला चालना मिळते. ही प्रक्रिया सामान्यतः घडत नाही. या प्रक्रियेमध्ये फुलांतील स्त्रीकेसर पूर्णपणे विकसित होतात, पर्यायाने फलनांच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते. हे संशोधन ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलेक्युलर सायन्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी वारे यांच्या प्रयोगशाळेतील संशोधनामध्ये एमएसडी२ च्या नियंत्रणासाठी कार्यरत असलेले एमएसडी१ हे जनुक ओळखण्यात आले होते. त्याविषयी माहिती देताना यिनपिंग झियाओ यांनी सांगितले, की बहुतांश तृणधान्य पिके ही उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत एकमेकांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यांच्यातील अनेक जनुके ही एकसारखी कामे करत असतात. एमएसडी२ ही जनुके ज्वारी पिकांच्या धान्य उत्पादनावर नियंत्रणाचे काम करत असते. या संशोधनाचा उपयोग मका किंवा भातासारख्या पिकांमध्ये करणे शक्य आहे. या जनुकीय विश्लेषणाचा उपयोग भविष्यांमध्ये नव्या पिकांच्या जनुकीय सुधारित जातींच्या विकसनामध्ये करणे शक्य होणार आहे. एमएसडी १ किंवा २ या जनुकांच्या सुधारणेनंतर ज्वारीच्या पिकांच्या विस्तृत क्षेत्रावर चाचण्या करण्यासाठी अमेरिकी कृषी विभागासोबत काम करण्याची इच्छा संशोधकांनी व्यक्त केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com