महिलांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योग

सोयाबीनवर प्रक्रिया करुनच विविध पदार्थांची निर्मिती करावी.
सोयाबीनवर प्रक्रिया करुनच विविध पदार्थांची निर्मिती करावी.

सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे, मांस व मासे यांच्या तुलनेत दुप्पट, अंड्याच्या तिप्पट व दुधाच्या दहापट इतके आहे, त्यामुळे सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती अाणि विक्रीसाठी मोठा वाव आहे.   सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योगाची स्थापना करण्यापूर्वी त्या भागातील लोकांची खाद्यपदार्थांची अावड अाणि पसंत इ. चा विचार करून पुढील पदार्थांच्या उत्पादनावर भर द्यावा.

सोयाबीन सेवनाचे फायदे

  • हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.
  • सोयाबीनमध्ये कर्बोदके कमी प्रमाणात असल्यामुळे मधुमेही व्यक्तींना वापरण्यासाठी एक चांगले कडधान्य आहे.
  • सोयाबीनच्या नियमित सेवनाने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
  • लॅक्‍टोज सहन न होणाऱ्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे.
  • सोयाबीनचा वापर करताना घ्यावयाची काळजी

  • सोयाबीनमध्ये पौष्टिक घटकांबरोबर अपौष्टिक घटकही समाविष्ट आहेत. त्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन आरोग्यास हानी होऊ शकते.
  • सोयाबीनमधील अपौष्टिक घटक, जसे मॅलॅक्‍टोज, स्टॅचिओज, फायचीक आम्ल ओलीगोसॅकराईडस इ. घटकांमुळे सोयाबीनचे पचन सुलभरीत्या घडून येत नाही. शरीरात वायुविकार प्रबळ होतात.
  • सोयाबीन प्रक्रियेविना आहारात वापरल्यास दीर्घ काळानंतर मूत्रपिंड, पचनक्रिया, यकृत, रक्तशर्करा इ. विकार उद्‌भवतात म्हणून प्रक्रिया करूनच सोयाबीनचा आहारात वापर करावा.
  • ब्लॅंचिंग प्रक्रिया

  • सोयाबीन स्वच्छ करून वाळवून गिरणीतून डाळ करून साल काढावी.
  • तीन लिटर पाणी उकळून त्यामध्ये एक किलो सोयाडाळ २५ मिनिटांपर्यंत उकळावी.
  • उकळत्या पाण्यातून सोयाडाळ काढून कडक उन्हामध्ये वाळवावी.
  • या सोयाडाळीचा उपयोग पीठ, भाज्या तयार करण्यासाठी करता येतो.
  • १ किलो सोयाडाळ अाणि ९ किलो गहू या प्रमाणात चपातीसाठी वापरावी.
  • १) सोया चकली

  • तांदूळ १ किलो, हरभराडाळ - २५० ग्रॅम, मूगडाळ १०० ग्रॅम, उडीदडाळ १०० ग्रॅम, प्रक्रियायुक्त सोयाडाळ ४५० ग्रॅम, पोहे १०० ग्रॅम, जिरे २५ ग्रॅम, धने २५ ग्रॅम हे सर्व साहित्य वेगवेगळे लालसर भाजून एकत्र करून दळावे.
  • १ किलो पीठ, लाल मिरची पावडर २५ ग्रॅम, हळद १० ग्रॅम, तीळ २० ग्रॅम, खाद्यतेल १०० मि.लि. (मोहनासाठी), तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
  • पिठामध्ये सर्व साहित्य मिसळून तेल गरम करून तेलाचे मोहन घालून पीठ चांगले मळून घ्यावे. चकल्या बनवून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.
  • १०० ग्रॅम सोया चकलतील पोषणतत्त्वे प्रोथिने - १०-११ ग्रॅम, स्निग्धपदार्थ - २५-२७ ग्रॅम, ऊर्जा - ४९०-५२० किलो कॅलरीज.

    २) सोया - पोहा लाडू

  • सोयापीठ २०० ग्रॅम, बेसन १०० ग्रॅम, दगडी पोहे १५० ग्रॅम, शेंगदाणा कूट १०० ग्रॅम, पिठीसाखर २५० ग्रॅम, तूप - २०० ग्रॅम.
  • सोयापीठ व बेसन थोड्या तुपात वेगवेगळे लालसर खमंग भाजावेत.
  • दगडी पोहे गरम तुपात चांगले तळून घ्यावे. थंड झाल्यावर हाताने चुरा करावा.
  • पिठामध्ये शेंगदाणा कूट, पिठी साखर इतर साहित्य मिसळून लाडू बांधावेत.
  • ३) सोयानटस्

  • उकळत्या पाण्यात सोडा व मीठ मिसळून सोयाबीन २० ते २५ मिनिटे शिजवावे.
  • गरम पाण्यातून सोयाबीन काढून थोडे सुकवून मायक्रोओव्हनमध्ये १०० अंश सेल्सिअस तापमानाला १२ मिनिटे बेक करावे किंवा शेंगदाणे किंवा चण्याच्या भट्टीत भाजून घ्यावेत. अशा प्रकारे खमंग व खुसखुशीत सोया नटस्‌ तयार करता येतात.
  • ४) सोया दूध सोयाडाळ स्वच्छ पाण्याने धुवून तीनपट पाण्यात ६ ते ८ तास भिजवावी. मात्र उन्हाळ्यात ३ ते ४ तास भिजवावी. डाळ स्वच्छ धुवून १ किलो सोयाडाळीसाठी ६ ते ८ लिटर उकळते गरम पाणी घेऊन मिक्‍सरमधून जाडसर बारीक करावे. बारीक केलेले मिश्रण १५ ते २० मिनिटे गॅसवर ठेवून सतत हलवत उकळून घ्यावे. हे दूध मलमलच्या कापडातून गाळून पुन्हा पाच मिनिटे उकळावे.

    ५) सोया पनीर (टोफू) सोया दूध ८० ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला उकळावे. २ ग्रॅम सायट्रिक ऍसिड पाण्यात विरघळून १ लिटर सोया दूधात मिसळावे. दूध हलके हलवून ५ मिनिटे तसेच ठेवावे. फाटलेले दूध मलमलच्या कापडातून गाळून घेऊन पाणी वेगळे करून कापडातील साका पनीर प्रेसने दाबून पाण्याचा पूर्ण अंश काढून टाकावा. जो पदार्थ तयार होतो, त्याला सोया पनीर (टोफू) म्हणतात. तयार पनीर थंड पाण्यात ५ ते १० मिनिटे ठेवून पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावे.

    दीप्ती पाटगावकर, pckvkmau@gmail.com (कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com