agriculture story in marathi, storage facility for grains, self sufficient farming, antroli, solapur | Agrowon

दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श, संयुक्त कुटुंब पद्धती, कमी खर्चिक शेतीचा प्रयत्न, विविध धान्यांची साठवणूक 
सुदर्शन सुतार
मंगळवार, 14 मे 2019

बॅंकेचा कर्जदार नाही 
सुरवातीपासूनच कमी खर्चात आणि बचतीतून शेती करण्याकडे रावसाहेबांचा कल राहिला. मुलांना चांगले शिकवले, त्यांची लग्ने करून दिली. गावात टुमदार घर बांधले. हे सर्व साध्य झाले केवळ शेतीतील उत्पन्नावर. या सगळ्या प्रवासात कधीही बॅंकांकडे हात पसरले नाहीत. आज एकाही बॅंकेचे कर्जदार नसल्याचा त्यांना अभिमान आहे. 

नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे. त्यामुळेच दुष्काळाच्या झळा सोसूनही आपले कुटुंब व शेती स्वयंपूर्ण करण्याचा वस्तुपाठच त्यांनी उभा केला आहे 
 
सोलापूर जिल्ह्यात अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांची सुमारे ८८ एकर शेती आहे. गावाच्या मुख्य चौकाशेजारीच हे क्षेत्र आहे. पाण्यासाठी विहीर, बोअर आहे. तीन वर्षांपासून पाण्याची मोठी टंचाई जाणवते. एवढ्या मोठ्या शेतीच्या पसाऱ्याला पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. पण नियोजन करून चांगली शेती करण्याचा प्रयत्न असतो. 

पिकांचे हुशारीने नियोजन 
गावचे प्रगतिशील शेतकरी नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या प्रेरणेने महिमकर यांनी विविध प्रयोग केले. सध्या टंचाईमुळे केवळ २७ एकर ऊस वगळता अन्य क्षेत्रावर पिके नाहीत. पण दरवर्षी रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा, तूर, करडई, मका आदी पिके असतात. कांद्याचे तीन- चार एकर क्षेत्र व भाजीपाला असतो. कांद्याचा मोठा आधार असतो. यंदा तीन एकरांत सुमारे साडेचारशे क्विंटल कांदा मिळाला. दर समाधानकारक नसला तरी खर्च निघून थोडे पैसे मिळाले. ऊस, कांदा या नगदी पिकांमधून घरचा खर्च भागवला जातो. धान्यांची पेरणी ट्रॅक्‍टरद्वारेच होते. ट्रॅक्‍टर घरचाच आहे. तो चालवणाराही घरचाच. बियाणेही घरचेच. यंत्राद्वारेच मळणी होते. त्यामुळे पेरणी मजुरी, डिझेल, कोळपणी, काढणी, मळणी यावरील बहुतांश खर्च वाचतो. तुरीचे एकरी सहा क्विंटल तर ज्वारी, हरभरा आणि करडईचे प्रत्येकी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

एकत्रित कुटुंब पद्धतीचे बळ 
वय वर्षे ६४ असूनही रावसाहेब घरचा आणि शेतीचा सगळा डोलारा स्वतः सांभाळतात. ट्रॅक्‍टरचे स्टेअरिंग हाती घेऊन नांगरण, फणपाळी ही कामे स्वतः करतात. अण्णाराव हे रावसाहेब यांचे धाकटे बंधू. दोघांच्या कुटुंबातील सदस्य संख्या १९ आहे. सर्व एकत्रितच राहतात. मोठा मुलगा राजू बारावी आणि नरहरी एमएबीडपर्यंत शिकले आहेत. भावाचा मुलगा संगमेश्‍वर एमएबीएड आहे. भावाचा दुसरा मुलगा बसवेश्‍वर केवळ नोकरीत आहे. बाकी बहुतांश सर्व शेतीतच कार्यरत आहेत. घरचे मनुष्यबळ, कमीत कमी खर्च आणि प्रयोगशीलता ही या कुटुंबाच्या प्रगतीची वैशिष्ट्ये आहेत. 

धान्य साठवून योग्य वेळी विक्री 
रावसाहेबांच्या शेतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धान्य साठवून ठेवण्याची पद्धत. 
गेल्या तीन वर्षांत उत्पादित झालेली ९० क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी, १५० क्विंटल करडई, ३० क्विंटल हरभरा, २० क्विंटल गहू आजही त्यांच्या घरी शिल्लक आहे. यंदा त्यातील केवळ तूर विकली. घरची गरज व बाजारातील दर वाढले तरच विक्रीचा विचार होतो. घरासमोर धान्य साठवणुकीच्या आठ टाक्या आहेत. त्यात ही साठवणूक केली आहे. शिवाय घरातही खोल्यांमध्ये साठवणूक सविधा केली आहे. पोत्यांच्या थप्प्याही रचून ठेवलेल्या दिसतात. धान्य स्वच्छ करण्यासाठी चाळणी यंत्र आहे. ठराविक वेळेला चाळणी करून ते पुन्हा साठवले जाते. अलीकडेच त्यांचे चिरंजीव नरहर यांनी हरभरा, तुरीपासून डाळी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

चिपळूणकर तंत्राचा अवलंब 
उसाच्या २७ एकरांपैकी सात एकरांत कोल्हापूरचे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांच्या तंत्राने व्यवस्थापन केले जात आहे. दोन ओळीतील अंतर साडेतीन फूट पण पट्ट्यातील अंतर सात फूट ठेवले आहे. पाणी देताना पट्ट्यातील एकाच सरीला पाणी द्यायचे. त्यामुळे बाजूच्या दोन्ही सऱ्या एकाचवेळी भिजतात. परिणामी पाणी कमी लागते. लागवडीनंतर तणनाशक, त्यानंतर बैलाद्वारे मशागत होते. कोणत्याही प्रकारची मशागत वा खुरपण होत नाही. ऊसवाढीसाठी खतांचाही वापर फार नाही. अन्य १५ एकरांतही केवळ रासायनिक खतांचा मर्यादेत ठेवून एकरी ५४ ते ६५ टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

दुग्ध व्यवसायाचा हातभार 
आठ म्हशी असून सध्या हिरव्या चाराटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दररोजच्या २० लिटर दुधापैकी १० लिटर डेअरीला पाठवले जाते. हंगामात हेच दूध ३० ते ३५ लिटरपर्यंत पोचते. दूध विक्रीतून महिन्याला आर्थिक आधार मिळतो. 

संपर्क - रावसाहेब महिमकर- ९६२३१२८३६५ 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...