सुधारित बायोगॅस सयंत्र ठरते फायदेशीर

सुधारित बायोगॅस सयंत्र ठरते फायदेशीर
सुधारित बायोगॅस सयंत्र ठरते फायदेशीर

सामान्य रचना असलेल्या सयंत्राच्या तुलनेत ताज्या ओल्या शेणापासून स्थिर घुमटाच्या सयंत्रातून ३० टक्क्यांपेक्षा जास्त बायोगॅसची निर्मिती होते. सयंत्रात शेण, पाणी मिश्रणाऐवजी फक्त ओले शेण टाकले जाते. त्यामुळे बायोगॅस निर्मितीत वाढ होते.

बायोगॅस हे एक स्वच्छ व स्वस्त इंधन आहे. याच्या वापराने स्वयंपाकाचा वेळ वाचतो. इंधन धूरविरहीत असल्याने डोळ्यांची जळजळ, छातीचे विकार होत नाहीत. याचा वापर दिवे, डिझेल इंजिन आणि वीज निर्मितीसाठी होतो. सयंत्रातून निघणारी मळी हे सेंद्रिय खत आहे. यामध्ये दोन टक्के नत्र आणि १ टक्का स्फुरद, १ टक्का पालाश असते. ह्यूमसचे चांगले प्रमाण असते.

असा आहे बायोगॅस

  • बायोगॅस हा ज्वलनशील वायू अाहे. यात मुख्यतः मिथेन (५५-६० टक्के), कर्बाम्लवायू (३५-४० टक्के), नत्रवायू (१-२ टक्के) आणि अत्यल्प प्रमाणात हायड्रोजन व कार्बन मोनोऑक्‍साईड या वायूंचे मिश्रण असते.
  • मिथेन वायू ज्वलनशील, वासहीन, चवहीन असतो. परंतु त्यातील इतर वायूंच्या घटकामुळे यास लसणासारखा वास येतो. मिथेनवायू हवेपेक्षा २० टक्के हलका, बर्नरमध्ये जाळल्यावर ६५० ते ७५० अंश सेल्सिअस उष्णता देणारा, बीन विषारी, जळताना निळी ज्योत, काजळी न धरणारा आणि कुठलाही वास न येणारा वायू आहे.
  • दोन घनमीटर बायोगॅस सयंत्रामुळे दरमहा २६ किलो एलपीजी (दोन सिलेंडर), ८८ किलो लाकडी कोळसा, २१० किलो जळण (लाकूड) किंवा ७४० किलो जनावरांचे शेण एवढी बचत होते.
  • बायोगॅस सयंत्राचे भाग

  • जैववायू सयंत्राचे दोन भाग असतात. यापैकी डायजेस्टर हे जमिनीखाली विटा, सिमेंटने छोट्या विहिरीसारखे बांधलेले असते. त्यावर वायुपात्र टोपीसारखे बसवलेले असते. यामध्ये तयार झालेला वायू साठविला जातो.
  • वायुपात्राच्या वरच्या भागात वायू बाहेर पडण्यासाठी एक नळी लावलेली असते. एक पाइप डायजेस्टरमध्ये बसवलेला असतो. या पाइपद्वारे प्रवेश मार्गातून शेण पाण्याचे मिश्रण डायजेस्टरमध्ये सोडतात. तर वायुनिर्मितीनंतर डायजेस्टरमधील चोथा (मळी) निकास मार्गाने बाहेर येते.
  • सयंत्राचे कार्य सुरळीत चालू राहावे यासाठी सयंत्रामध्ये ओल्या शेणामध्ये तेवढेच पाणी टाकून (प्रमाण १ः१) एकजीव करावे.
  • सयंत्राची वैशिष्ट्ये

  • सामान्य रचना असलेल्या सयंत्राच्या तुलनेत ताज्या ओल्या शेणापासून स्थिर घुमटाच्या सयंत्रातून ३० टक्क्यांपेक्षा जास्त बायोगॅसची निर्मिती होते. सयंत्रात शेण, पाणी मिश्रणाऐवजी फक्त ओले शेण टाकले जाते. त्यामुळे बायोगॅस निर्मितीत वाढ होते.
  • शेणासोबत मिश्रणासाठी पाण्याची गरज नाही. किंबहूना कमीत कमी पाणी लागते. त्यामुळे ताजे ओले घनरूप शेण सहजतेने भरता येते.
  • सुधारित सयंत्रातून निघणारी मळी (स्लरी) घट्ट स्वरूपात असल्यामुळे ही एक आठवड्यात वाळते. त्यामुळे शेतात वाहून नेण्यासाठी फार जागा व कष्ट लागत नाहीत.
  • बांधकामाचा खर्च हा सामान्य रचना असलेल्या (भारतीय मानक ९४७८ः१९८९ नुसार) इतकाच येतो.
  • सुधारीत सयंत्राच्या प्रवेश पाईपचा कोन ठरवून दिलेल्या (७५ अंश) मापापेक्षा कमी नसावा.
  • कोन कमी झाल्यास जनावरांच्या शेणाचा, प्रवेश मार्गातील प्रवाह हळू होईल. या सयंत्रामध्ये उष्टान्न टाकल्यास चांगल्या प्रतीचा बायोगॅस मिळतो.
  • सुधारित सयंत्राच्या निर्मितीसाठी अनुभवी आणि कुशल कारागिराची निवड करावी.
  • सुधारित जनता बायोगॅस सयंत्र
  • नवीकरणीय ऊर्जा स्राेत प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जा स्राेत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला केंद्राच्या मार्गदर्शनाखाली अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, जळगाव, गडचिरोली, पुणे आणि सांगली जिल्ह्यामध्ये २ ते १० घनमीटर क्षमतेचे एकूण ८० सुधारित बायोगॅस बसविलेले असून ते उत्तम तऱ्हेने कार्यरत आहेत.
  • आपल्या कुटुंबाची गरज लक्षात घेऊन बायोगॅस सयंत्र आपणास उभारता येते. दोन घनमीटर हे सगळ्यात लहान सयंत्र असून त्यासाठी ३ ते ४ जनावरांचे शेण पुरेसे आहे.
  • सुधारित जैववायू सयंत्राची रचना

  • उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईग्रस्त प्रदेशात शेणात मिश्रणासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे चालू असलेले सयंत्र अकार्यक्षम होते. हे लक्षात घेऊन जनावरांचे ताजे घट्ट शेण सयंत्रामध्ये पाचन करण्याबाबतचे संशोधन झाले आहे. या तंत्रज्ञानातून सुधारित जैववायू संयंत्रांची निर्मिती केली आहे.
  • सुधारित जैववायू सयंत्र पूर्णतः विटा आणि सिमेंट वापरून तयार करण्यात आले आहे. डायजेस्टर व वायुपात्र (घुमट) तयार करताना आर.सी.सी. वापरले नाही. सध्याच्या प्रवेश मार्गाऐवजी बाजारात मिळणारा ३० सें.मी. व्यासाचा २.५ मीटर लांबीचा आर.सी.सी. पाइप जमिनीशी ७५ अंश कोनातून लावला. पाइपचे खालचे टोक डायजेस्टरच्या तळापासून ३० सें.मी. उंचावर घेतले.
  • सयंत्राच्या निकास मार्गाचा आकार एकूण मळीचे आकारमान सामावेल एवढे वाढविले. निकास मार्गातील पायरीसारखे बांधकाम बदलून तेथे तिरप्या भिंतीचे बांधकाम करण्यात आले. घट्टमळी सहजपणे बाहेर यावी यासाठी निकास मार्गाचे चॅनल १५ सें.मी. ऐवजी ३० सें.मी. वाढविण्यात आले.
  • अतिरिक्त/वाढीव वायुचा दाब सहन करण्यासाठी आणि वायुगळती रोखण्यासाठी घुमटाच्या आतील बाजूस १ः१ या प्रमाणात सिमेंट व वाळूचे ८ मि.मि.चे अतिरिक्त प्लॅस्टर करण्यात आले. या प्रचलित सयंत्राच्या डायजेस्टरची रचना, निर्माण साहित्य तसेच बांधकाम पद्धतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
  • संपर्क ः अनिल कांबळे ः ९८८१०५६९४० (नवीकरणीय ऊर्जा स्राेत प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जा स्राेत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com