agriculture story in marathi, Subhash Sharma is doing various experiments of Natural Farming to fecth goo returns & to increase the fertilty of soil. | Page 2 ||| Agrowon

नफा देणारी पीकपध्दती, विक्रीकौशल्य अन बांधावर खतनिर्मिती

मंदार मुंडले
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

शर्मा म्हणतात

 • माती, पर्यावरण, पाणी व आर्थिक स्थैर्य या मुख्य गोष्टींना मी सर्वोच्य स्थान दिले आहे. आर्थिक स्थैर्य आले की पैशांचा विनियोग कुठे, कसा करायचा त्याचा आवाका येतो.
 • देणं शिका, येणं आपोआप आहे.
 • दरवर्षी विद्यार्थी म्हणूनच राहायला आवडते. अनेक वर्षे विविध प्रयोग करतो आहे. पण, शिक्षण कधीच पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. दररोज नवा अनुभव. नवा प्रत्यय.
 • कोणत्या वेळी काय विकावे म्हणजे पैसे अधिक याचे कौशल्य विकसित करावे लागेल.

यवतमाळ शहरापासून चार किलोमीटवरील पारवा येथील क्षेत्र म्हणजे शर्मा यांचा संशोधन आणि विकास (आर ॲण्ड डी) विभागच म्हणावा लागेल. इथली जमीन लागवडीच्या दृष्टीने नवी आहे. ती विकसित करण्याबरोबरच वेगवेगळी उद्दिष्ट ठेऊन इथं नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू आहेत. इथल्या शेतातील पाणी पहिल्याच वर्षी पावसाळ्यात पूर्ण थांबविण्याचा प्रयत्न केला. माती वाहून जाणार नाही अशी दक्षता घेतली. मुक्तचराई बंद करून झाडे जगविण्यास सुरवात केली.

पहिल्याच वर्षी नफा मिळविण्याचे कौशल्य
क्षेत्र विकसित करताना पहिल्याच वर्षी आर्थिक नफा मिळवायचा हे उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने सुपीकतेच्या दृष्टीने पहिले पीक तुरीचे घेतले. त्याचा प्रयोग मागील भागात अभ्यासला. तर १०० दिवसांत पैसे हाती आले पाहिजेत या विचाराने एकरी चार ट्रॉली शेणखताच्या जोरावर व्यावसायिक पीक सोयाबीन व कोहळ्याचे घेतले. पैशांचा स्रोत अखंड सुरू राहावा, यासाठी ऑक्टोबरमध्ये वांगे व त्यात मेथीचे आंतरपीक घेतले. या हंगामात घेतलेल्या मेथीला चांगला दर मिळतो हा विचार होता. मेथी एकरी ३० क्विंटल झाली. तीस रुपये प्रतिकिलो दर मिळाला. वांग्यातील बराच खर्च भरून काढण्यासह नत्र स्थिरीकरणाचा अतिरिक्त फायदा मेथीने दिला. वांग्याने एकरी १० टन उत्पादन दिले तरी ते नफ्यातच राहील. जमीन जसजशी सुपीक होऊ लागेल तसतशी इथेही वांग्याची एकरी उत्पादकता तिवसा येथील जमिनीप्रमाणे वाढत जाईल. ऑक्टोबरमध्ये वांग्याला एकदाच चार ट्रॉली शेणखत दिले होते. पण, जूनपर्यंत पीक टिकवायचे असल्याने फेब्रुवारीत पुन्हा एक ट्रॉली अलौकिक खताचा वापर केला. मेथीनंतर कोथिंबीर व टोमॅटो घेण्याचा पर्यायही वापरता येतो.

कांद्याची फायदेशीर शेती
शर्मा सांगतात, की प्रत्येक वनस्पती ही तापमानाशी जुळलेली आहे. ती सुसंगती जुळली तरच उत्पादनाचा फायदा घेता येतो. आम्ही काकरे पाडून कांद्याचे थेट बी लावतो. एकरी पाच किलो बी लागते. ऑक्टोबरमध्ये ‘हीट’ असल्याने त्या वेळी लागवड केलेल्या पातीच्या कांद्याचे एकरी १५० ते २०० क्विंटल तर नोव्हेंबरमध्ये थंडी असल्याने त्या वेळी लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते असा अनुभव आहे. ऑक्टोबरच्या कांदा पातीला १०, १५ ते २० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. एकरी तीन लाख रुपयांपर्यंत कमाई होते. चाळीस टक्के खर्च धरायचा. पातीचा कांदा किलोला सहा रुपयांवर येऊन ठेपतो त्या वेळी तो विकणे थांबवायचे. मग तो वाळवून विकण्यावरच भर द्यायचा. तो नैसर्गिक असल्याने २० रुपये प्रतिकिलो दराने ‘बूक’ झालेला असतो.

बहुविविधता हवी, पण एकाच जागी नको
शर्मा म्हणतात, की पिकांची बहुविविधता महत्त्वाची आहे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. कीड नियंत्रण उत्तम होते. काही जाणकार सांगतात, की नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीत एकाच जागी विविध पिके लावावीत. मी हे सगळे प्रयोग करून पाहिले. पण तसे करताना नाकीनऊ आले. ते काहीवेळा तोट्यातही गेले. माझे शेतकऱ्यांना सांगणे आहे की जे सोयीने करता येते तेच करा. सगळी पिके एकाच जागी लावून खिचडी करण्याची गरज नाही. माझ्याकडे प्रत्येक हंगामात पिकांची बहुविविधता असते. पण, बहुतांश पिके स्वतंत्र (सलग क्षेत्रावर) लावण्याकडे कल असतो. वांग्यात मेथीसारखे अपवाद सांगता येतील.
बहुतांश पिकांचे बियाणे घरचेच असते. संकरित बियाण्यांवरील खर्च त्यामुळे कमी होतो. नैसर्गिक शेती असेल तर हिरवळीचे खत म्हणून बोरू लागतोच. त्याचे बी देखील शेतातच तयार करतो. बियाण्यांसाठी क्षेत्र राखीव ठेवायला हवे. मक्यानंतर मेथी, त्यानंतर भुईमूग असे आम्ही करतो. संपूर्ण भुईमूग लावण्यापेक्षा अर्ध्या क्षेत्रात कलिंगडाचाही पर्याय निवडता येतो. अर्थात पाणी असेल तरच हे शक्य आहे. आपल्याला पाणी घडवायचे आहे. त्याचे शोषण करायचे नाही. मिळालेल्या उत्पन्नातील १० हजार रुपये खर्च करून एकरी पाच टन शेणखत वापरतो. ही गुंतवणूक आईच्या सुपीकतेसाठी असते.

पाणी वापराचे भान
आम्ही शिवारात पाणी थांबवून भूगर्भात जिरवतो. विहिरीतले पाणी हे आपले नाही. आधी त्यात टाकायला शिकले पाहिजे. मगच ते घ्यायचा अधिकार आपला. विहिरीत १०० लिटर पाणी टाकाल तेव्हा त्यातील फक्त ४० लिटर वापरायला हवे. हा वापर ७० ते ९० लिटरपर्यंत होत असेल तर त्याला काय अर्थ आहे? शिवाराच्या बाजूलाही तळे आहे. तरीही पाणी जपूनच वापरण्याची सवय आहे.
 
ठळक निरीक्षणे

 • वैरणीची ज्वारी असो की खाण्याचा मका असो त्यावर मेथी अप्रतिम येते. एका प्रयोगात
 • एकरी ४० ते ५० क्विंटल मेथी उत्पादन झाले.
 •  ठिबक व दांड अशा दोन्ही पध्दतीचे सिंचन प्रयोग करताना कोणती पध्दत कुठल्या पिकाला केव्हा फायदेशीर ठरते हे समजते. तूर, ऊस, हळदीला ‘ड्रीप’ फायदेशीर पण चारा ‘ड्रीप’ च्या तुलनेत कंटूरवर अधिक चांगला येतो. अभ्यास सुरू आहे. प्रयोगशील राहायला हवे.

शेणखताचा वापर
रासायनिक निविष्ठा हा शब्दच शर्मा यांच्या ‘डिक्शनरी’त नाही. अलौकिक व गोसंजीवक या दोनच खतांवरच त्यांची सारी मदार असते. अलौकिक खताचे दोन प्रकार तयार केले आहेत. खरिपातील पिकांसाठी खत द्यायचे असेल तर फेब्रुवारी ते जून कालावधीत त्याचे पूर्वनियोजित काम आवश्‍यक असते. तशी योजकता हवी. खत जेवढे उशिरा खत तयार होत राहील तेवढे ते ‘पॉवरफूल’ असते.

गोसंजीवकाची निर्मिती
तीनशे लिटर टाकीत त्याची निर्मिती होते. शेतीच्या पहिल्या वर्षी एकरी ६०० लिटर, दुसऱ्या वर्षी ४०० लिटर तर तिसऱ्या वर्षापासून ३०० लिटरप्रमाणे त्याचा वापर होतो. त्याचे कोणत्याही पिकात अप्रतिम ‘रिझल्ट’ मिळतात. पाटाच्या पाण्यात त्याची अंगठ्यासारखी धार धरायची. मग ते पूर्ण शेतात प्रवाहित होत राहते. तीनशे लिटर द्रावणात ९० लिटर शेण व ९ लिटर गोमूत्र व तीन किलो गूळ यांचा वापर होतो. साधारण १० दिवसांत हे खत तयार होते.

अलौकिक खतनिर्मिती- प्रकार १-
नैसर्गिक वा सेंद्रिय शेती सुरू करण्याच्या पहिल्याच वर्षी त्याचा वापर. त्यानंतर नाही.
साहित्य- एक ट्रॉली शेणखत, तीन क्विंटल तळ्यातील गाळ अथवा शेतातील माती
दोन किलो भुईमूग तेल, तीन किलो गूळ

दोन फूट उंचीचा बेड तयार करायचा. तीन क्विंटल तळ्यातील गाळ त्यात टाकायचा. तो एकसमान करून घ्यावा. पंधरा किलो तुरीची चुणीचा ढीग करायचा. त्यात दोन किलो भुईमूग तेल टाकावे. ते एकजीव झाले पाहिजे. ते समप्रमाणात बेडवर पसरवायचे. तीन किलो गुळाचे पाणी बेडवर समप्रमाणात पसरवून फावड्याद्वारे एकजीव करायचे. त्याचदिवशी बुडापर्यंत ओलावा मिळेल इतपत पाणी शिंपडायचे. मग पालापाचोळ्याने झाकून द्यायचे. एक महिन्याने पुन्हा त्यावर पाणी मारायचे. जिवाणूंची संख्या वाढावी हा त्यामागील हेतू आहे. सुमारे ५० व्या दिवशी खत वापरण्यायोग्य होते. त्या काळात वापरणे झाले नाही तर प्रत्येक महिन्यातून एकदा पाणी मारत राहायचे.

प्रमाण- एकरी एक टन- लागवडीवेळी

अलौकिक खत प्रकार २ (दरवर्षी वापरायचे)
एक ट्रॉली शेणखत घ्यावे. दोन फूट उंचीचा बेड तयार करावा. चार किलो गुळाचे पाणी करून
बेडवर शिंपडायचे. त्याचदिवशी ओलाव्यासाठी पाणी मारायचे. ५० दिवसांत खत तयार होते.
यात बेसनाचा वापर अजिबात करू नये. कारण, त्याचा नकोसा वाटणारा गंध उत्पन्न होतो. शिवाय जमिनीत बुरशींचा प्रादुभाव होऊ शकतो. बेसनला पर्याय म्हणून १५ किलो तुरीच्या चुणीचा वापर होऊ शकतो.

विक्रीकौशल्य वापरले
शर्मा सांगतात की ज्ञान, योजकता, श्रम या तीन बाबी आम्ही उपयोगात आणतो. तुरीचे दरवर्षी एकरी १२ क्विंटल उत्पादन घेतो. त्याची डाळ करून विक्रीचा प्रश्‍नही कुशल मार्केटिंगद्वारे सोडवला. सुरवातीला तब्बल पाचशे ग्राहकांना एकेक किलो डाळ मोफत दिली. कुठलंही रासायनिक खत, कीटकनाशक वा कृत्रिम रसायन न वापरलेली ही अत्यंत पौष्टिक डाळ असल्याचं ग्राहकांच्या मनावर ठसवलं. सुदृढ जमिनीत जे ‘न्यूट्रीशन’ तयार करतो तेच डाळीत उतरतं ही संकल्पना ग्राहकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्याकडून मागणी येण्यास सुरवात झाली. कुणाला ४० किलो, कुणाला ५० किलो अशी एकूण मागणी २०० क्विंटल होती. माझ्याकडे केवळ ३० क्विंटलच डाळ उत्पादित व्हायती. मग कोणी आधी घ्यायची यावरून ग्राहकांमध्ये स्पर्धा लागली. इथे दरांचा फायदा घेता आला. किलोला ८० रुपये, मग १०० रुपये असे करत आता १२० रुपये दराने तूर डाळ हातोहात खपली जात आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी परिसरातील काही शेतकऱ्यांनाही तूर घेण्यास उद्युक्त केले.
हळदीचेही एकरी २४ क्विंटल उत्पादन घेतो. पावडर तयार करून नैसर्गिक म्हणून विकतो.
किलोला १९० ते २२० रुपये दराने ती खपते. ताजा भाजीपाला यवतमाळ मार्केटला तर तूर, चणा, हळद, धणे यांना चंदीगड, बंगळूर, हैदराबाद, मुंबई, पुण्यापर्यंत मार्केट मिळवले आहे.

तात्पर्य- मागणी ओळखून मार्केट तयार करणे व मध्यस्थांशिवाय विक्री करणे शक्य व्हायला हवे.

अर्थशास्त्र आणि रोजगारनिर्मिती
प्रतिक्विंटल तुरीत ७० ते ७५ किलो डाळीचा उतारा मिळतो. डाळविक्रीतील काही नफा मजुरांना देण्यात येतो. खडा नसला पाहिजे, गृहिणीला केवळ डाळ शिजविण्याचं काम राहिलं पाहिजे असं क्लिनिंगचं काम
त्यांना देण्यात येतं. एक महिला सरासरी चार पोती ‘क्लिनिंग’ करते. १५० रुपये प्रतिपोते दर त्यांना मिळतो. निंदणी, सोंगणीही हेच मजूर करतात. म्हणजे तुरीच्या शेतीतील बराचसा वाटा त्यांना जातो. गावातला पैसा गावात आणि घरातला पैसा घरात अशी रोजगारनिर्मिती झाली. आज मजूर शेतकऱ्याला चांगलं म्हणत नाही. आणि शेतकरी मजुराला चांगलं म्हणत नाही. दोघांच्यात ३६ चा आकडा. आमच्याकडे मात्र ६३ चा आकडा असतो असं शर्मा विनोदानं म्हणतात. शेतकरी आणि मजूर यांच्यात ज्या वेळी बंध तयार होतील त्याचवेळी शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असा गुरूमंत्रही ते देतात. काळ्या आईचा विचार, तिच्या लेकाचा म्हणजे शेतकऱ्याचा, मजुरांचा आणि ग्राहकाचा विचार या साऱ्यांतून अर्थशास्त्र तयार होतं.

मजुरांना बोनस
इथं आठ महिला व सहा मजूर पुरुष कायमस्वरूपी राबतात. त्यांची सुमारे सहा कुटुंबे शेतात गुण्यागोविंदाने राहतात. महिलांना दररोज ३०० रुपये तर पुरुषांना २५० रुपये मजुरी दिली जाते. वर्षाला एकदा त्यांना पर्यटनही घडवण्यात येते. माझे मजूर देशातील चारही धाम, दहा ज्योतिर्लिंग, उटी, पंचमढी आदी ठिकाणी जाऊन आल्याचे शर्मा अभिमानाने सांगतात. महिन्याला किमान ८० हजारांपर्यंत अधिक रक्कम तर वर्षाला काही लाख रुपये सहा परिवारांत वाटण्यात येतात. अर्थात हे देण्याची जमिनीची ऐपत आम्ही तयार केली आहे. हवामान, बाजारपेठ, दर आदी प्रतिकूल काळातही आपली शेती फायद्यात ठेवण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतात त्यातून मजुरांना बोनस, शेणखत खरेदी असा पैशांचा विनियोग करण्यात येतो.

अपयशातून शिक्षण
अर्ध्या एकरांत मालदांडी ज्वारी तर अर्धा एकरांत सोयाबीन होतं. ज्वारीची पहिली कापणी केली त्या वेळी ती १० फूट उंच गेली होती. एकूण तीन कापण्या केल्या. ज्वारीनंतर तिथं कांदा लावला. पण, त्याची वाढ झाली नाही. तो दाट झाला होता व चाऱ्याने जमिनीचे शोषण केले होते. या प्रयोगातून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे कोणते पीक जमिनीचे अधिक शोषण करणारे आहे त्याची माहिती घ्यायची. हे शास्त्र आता अवगत होते आहे. गहू व संकरित मुळ्यानंतर देखील दुसरे पीक चांगले येत नाही असा अनुभव आला.

प्रसंगाचे सोने करावे
अर्थात चाऱ्यानंतर लावलेला कांदा चांगला आला नाही म्हणून तो सोडून दिला नाही.
शक्य तेवढा पातीचा म्हणून विकला. बाकीचा चोप करून (रोपनिर्मीती) दुसरीकडे लावला. काहीच वाया नाही गेलं. प्रसंगाचे सोने करता आले पाहिजे ही शिकवणही शर्मा देतात.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी
शर्मा म्हणतात, की एकूण शेतीत किमान १० टक्के क्षेत्र वृक्षांखाली पाहिजे. त्यादृष्टीने मोह, उंबर, वड, पिंपळ, जांभूळ, पिंपळ, फणस आदी विविध झाडांची विविधता शेतीच्या बांधावर तयार केली आहे. हीच झाडे पिकांभोवती मायक्रोक्लायमॅट (सूक्ष्म वातावरण) तयार करतील.
एक झाड अनेक काम. आपल्या आरोग्यासाठी लागणारी शुध्द हवा या झाडांनी दिली. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड घेण्याचे काम झाडांनी केले. विषारी वायूंचे प्रमाण नियंत्रित झाले. आणखी फायदा म्हणजे झाडांमुळे पाखरांचा गोंगाट वाढला. त्यांनी नैसर्गिक कीड नियंत्रण केले. मग पाठीवरचे पंप निकामी ठरले.

पाखरांचं संगीत
मी जेवंढ प्रेम काळ्या आईवर करतो तेवढंच झाडांवर करतो. त्यांना लेकरांसारखं वाढवतो आहे. पाखरांचा गोंगाट म्हणजेच संगीत तयार झाले आहे. ते पिकांना किती आवडते! निसर्गात रमल्याशिवाय त्याचा अनुभूती घेता येणार नाही. हे एक विज्ञानच आहे. आपण ज्या वेळी निसर्गात रमू त्या वेळी या विज्ञानात दडलेली रहस्ये आपल्याला उलगडत जाता येईल, असे शर्मा म्हणतात.

सर्वसुविधांनी युक्त शेती प्रशिक्षण केंद्र
शर्मा नियमितपणे प्रशिक्षणवर्ग घेतातच. पण, पारवा येथे कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्याबरोबरच शेतकरी व अभ्यासकांसाठी सर्व सुविधांनी युक्त प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न शर्मा यांनी सुरू कले आहेत. त्यांना ‘थेअरी’ बरोबरच प्रत्यक्ष शेतातील प्रयोग एकाच ठिकाणी अनुभवता येतील. निवास, भोजनाचीही सोय असेल.

शर्मा म्हणतात

 • माती, पर्यावरण, पाणी व आर्थिक स्थैर्य या मुख्य गोष्टींना मी सर्वोच्य स्थान दिले आहे. आर्थिक स्थैर्य आले की पैशांचा विनियोग कुठे, कसा करायचा त्याचा आवाका येतो.
 • देणं शिका, येणं आपोआप आहे.
 • दरवर्षी विद्यार्थी म्हणूनच राहायला आवडते. अनेक वर्षे विविध प्रयोग करतो आहे. पण, शिक्षण कधीच पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. दररोज नवा अनुभव. नवा प्रत्यय.
 • कोणत्या वेळी काय विकावे म्हणजे पैसे अधिक याचे कौशल्य विकसित करावे लागेल.
 • अनेकवेळा विक्रमी किंवा लक्षणीय उत्पादन मिळालं. नफाही चांगला मिळाला. काळ्या आईला सांगतो की तू भरभरून अन्नधान्य दिलंस! आता तू सेंद्रिय अन्न घे. आई म्हणते बेटा, तूच जास्त घे. अशी मायलेकांमध्ये स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा म्हणजेच शेती. केवळ आईचं शोषण करणं ही चांगली वृत्ती नाही.
 • कापूस एके कापूस, सोयाबीन एके सोयाबीन या पीक पध्दतीत अडकून न पडता त्या कक्षेच्या बाहेर जावे लागेल.

  संपर्क- सुभाष शर्मा- ८८३०१७४६६१


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज  पुणे ः राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर...
आता हवी भरपाईची हमी चालू खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठीची काल...
कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत...पुणे : बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता.४)...
साखर कारखान्यांची देखभाल दुरुस्ती गतीनेकोल्हापूर: कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साखर...
बियाणे न स्वीकारणाऱ्यांना ‘महाबीज'कडून...अकोला ः  या हंगामात ‘महाबीज’ने विक्री...
विदर्भात तीन महिन्यांत ५ कोटींच्या...अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी...
देशातील धरणांमध्ये जलाशयांमध्ये ४१...नवी दिल्ली: देशातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक...
‘पीएम-किसान’ योजनेचे अकरा लाख अर्ज पडूनपुणे: पंतप्रधान किसान सन्मान योजनेत (पीएम-किसान)...
मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०४ टक्के...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
पीकविम्यासाठी दमछाक पुणेः यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी विमा...
साखरेची बफर स्टॉक योजना बंद केल्यास...कोल्हापूरः साखरेची बफर स्टॉक योजना बंद...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
कोकण, मध्य महाराष्ट्रात उद्या मुसळधार...पुणे : पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या विविध...
लॉकडाउन महिन्याभरासाठी वाढविला; मात्र ‘...मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत...
सोयाबीन बियाणे प्रकरणात उत्पन्नावर...नगर ः निकृष्ट बियाण्यामुळे उगवण झाली नसल्याने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर...सिंधुदुर्ग: जिल्ह्यात १ हजार ५०० हेक्टरवर काजू...
अमरावती जिल्ह्यात सोयाबीन कंपन्यांकडून...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन उगवण विषयक ९५...
खत विक्रीच्या प्रत्येक बॅगची कृषी विभाग...बुलडाणा ः नांदुरा तालुक्यातील कृषी निविष्ठा...