agriculture story in marathi, success in horticulture, hanuman phal, successful farming in drought area. | Agrowon

डोंगर फोडून संघर्षातून उभारले फळबागेचे नंदनवन

गोपाल हागे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

कमी पावसाच्या प्रदेशात डोंगर फोडून फळबागांचे नंदनवन उभे करण्याची किमया वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा येथील वाशीमकर कुटुंबाने घडविली आहे. सर्व भावांच्या एकीचे बळ, त्यातून सातत्यपूर्ण प्रयत्न, संघर्ष, अडचणींवर मात करण्याची तयारी व स्थानिक परिस्थितीला अनुकूल अनुसरलेली व्यावसायिक पीकपद्धती हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. अपार कष्टातून उभारलेल्या या बागेतून हनुमानफळ, चिकू, पेरू, करवंदाची गोड फळे मिळत आहेत. थेट विक्रीद्वारे त्यांनी मार्केटिंगची समस्याही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

कमी पावसाच्या प्रदेशात डोंगर फोडून फळबागांचे नंदनवन उभे करण्याची किमया वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा येथील वाशीमकर कुटुंबाने घडविली आहे. सर्व भावांच्या एकीचे बळ, त्यातून सातत्यपूर्ण प्रयत्न, संघर्ष, अडचणींवर मात करण्याची तयारी व स्थानिक परिस्थितीला अनुकूल अनुसरलेली व्यावसायिक पीकपद्धती हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. अपार कष्टातून उभारलेल्या या बागेतून हनुमानफळ, चिकू, पेरू, करवंदाची गोड फळे मिळत आहेत. थेट विक्रीद्वारे त्यांनी मार्केटिंगची समस्याही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

वाशीम जिल्हा मुख्यालयापासून साधारणतः सात-आठ किलोमीटर अंतरावर केकतउमरा गाव आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील हा भाग आहे. येथील शेतकरी हंगामी पिके प्रामुख्याने घेतात. कापूस बीजोत्पादनातही गाव आघाडीवर आहे. वाशीमकर कुटूंब याच गावचे. गावाच्या शेजारी असलेली डोंगरमाथ्याची २० एकर पडीक जमीन कुटुंबातील बळीराम यांचे वडील सखाराम यांनी काही वर्षांपूर्वी जनावरांना चरण्याच्या उद्देशाने विकत घेतली. खडकाळ भाग असल्याने गवतही चांल्या पद्धतीने उगवत नव्हते. शेती करणे शक्यच नाही असेच अनेकांचे मत होते. पण कुटुंबाने जिद्दीने जमिनीचा कायापालट करण्याचे ठरवले.

अशक्य ते शक्य करण्याचे प्रयत्न
कुटुंबातील सर्वात मोठे भाऊ तुकाराम यांनी यांचा शब्द प्रमाण मानला जातो. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनीच सर्व कुटुंब एकत्र ठेवले. भागातील पावसाचे प्रमाण, पाणीटंचाई, जमिनीची स्थिती आदी सर्व बाबी लक्षात घेता फळबाग विकासावर लक्ष केंद्रित केले. त्याला अनुकूल पिके निवडली. त्यासाठी लागेल ते पाठबळ व आर्थिक नियोजन केले. बंधू बळीराम यांनी राज्यात विविध ठिकाणच्या फळबागा पाहिल्या. प्रशिक्षणे घेतली. काही वर्षांपूर्वी बारामतीतील अभ्यासदौऱ्यात पवार कुटुंबीयांनी डोंगरमाथ्यावर फुलवलेल्या फळबागा अनुभवल्या. तोच आत्मविश्‍वास घेऊन आपल्या खडकाळ जमिनीवर टप्प्याटप्प्याने विकास सुरू केला.

पाण्यासाठी सर्व काही
खडकाळ जमिनीत यंत्रांच्या मदतीने खोल खड्डे केले. प्रत्येक खड्ड्यात गाळाची माती टाकली. यासाठी १२ किलोमीटर अंतरावरून गाळ आणला. बागेने आकार घेतला. ठिबक केले. बोअर घेऊनही पाणी मिळवण्याचेही प्रयत्न केले. पण ते साध्य झाले नाही. विहीर खोदली. फार पाणी लागले नाही. मग शेतापासून दोन-तीन किलोमीटरवर असलेल्या धरणाच्या पायथ्याला बंधारा घालून पाण्याचा स्त्रोत तयार केला. वेगवेगळ्या ठिकाणीच्या शेतातील चार ते पाच विहिरी एकमेकांशी जोडून त्यांचे पाणी एका विहिरीत घेतले. शेततळे खोदले. त्यावर प्लॅस्टिक फिल्म अंथरली. मात्र तांत्रिक चुकांमुळे हा प्रयोग फसला. आजवर तीन ते चार वेळा भरलेले पाणी झिरपले. यंदा पुन्हा प्लॅस्टिकवर खर्च करावा लागणार आहे. तीन सौर पंपही बसविले. सात विहिरी, दोन बोअर घेतले.

हनुमानफळ व चिकू
बागेत हनुमानफळाची मुख्य निवड केली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातून रोपे आणली. हे फळ म्हणजे सीताफळ व रामफळ यांचा संकर असल्याचे बळीराम सांगतात. सुमारे २५० झाडांची लागवड झाली. एक ओळ हनुमान फळ आणि एक चिकू अशी सुमारे पाच एकर लागवड झाली. एक पीक हंगाम साधू शकले नाही, तरी दुसरे नक्कीच उत्पन्न देईल असा उद्देश होता. आज सुमारे आठ वर्षे झाली. दोन्ही फळे उत्पादन देऊ लागली आहेत. एखादे वर्ष पाण्याअभावी कमी उत्पादनाचे जाते. मात्र चिकाटीने बाग फुलवण्याचे कष्ट वाशीमकर यांनी थांबवलेले नाहीत.

लिंबू, पेरू व करवंदही
जोडीला लिंबू, पेरू तसेच बागेभोवती करवंदाच्या सुमारे दोनहजार झाडांचे कुंपण आहे. बाग नैसर्गिक पद्धतीने जोपासताना शेणखत, सेंद्रिय घटकांचा वापर होतो. उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. अशावेळी झाडांच्या बुंध्याशेजारी गवत, पीकअवशेषांचे आच्छादन होते.

थेट विक्री व्यवस्था
हनुमानफळ सीताफळासारखेच दिसते. आकाराने थोडे ओबडधोबड राहते. मात्र त्याला फोड कमी असतात. चवीला ते गोड असून बिया कमी तसेच गर अधिक असतो. प्रति झाड २० किलोपर्यंत उत्पादन मिळते. सुरुवातीला विक्री अकोला, वाशीम बाजारपेठेत करण्याचा प्रयत्न केला. तेथे किलोला ६० रुपये दर देऊ केला. त्यानंतर स्वतःच विक्री करण्याचे ठरवले. त्यासाठी शेतालगत केकतउमरा-वाशीम रस्त्यावर स्टॉल उभारला. हंगामात दिवसभरात ७० ते ८० किलो फळे खपतात. त्याला १०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो. हंगामात सव्वा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न ही बाग देऊ लागली आहे. पेरूचीही येथूनच ५० रुपये प्रति किलो दराने थेट विक्री होते. त्याचे उत्पादन प्रति झाड ७० किलोपर्यंत मिळते.

अन्य फळांचे उत्पन्न

 • चिकूचे उत्पादन प्रति झाड ३० ते ३५ किलो मिळते. ही बाग व्यापाऱ्याला देणे अधिक सोयीस्कर होते.
 • चार वर्षांपासून करवंदाचे प्रति झाड १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्यास दर २१००, २७०० ते
 • यंदा ३००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला आहे. व्यापारी फोनद्वारे संपर्क करून मागणी नोंदवतात.

अन्य उत्पन्नाची साथ
लिंबाचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. खरिपात सोयाबीन व तुरीचे एकरी ७ ते ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. रब्बीत गहू, हरभरा असतो. या पिकांच्या उत्पन्नाची चांगली साथ मिळते. दोन ट्रॅक्टर्स आहेत. ते भाडेतत्त्वावर देण्यात येतात.

एकत्रित कुटुंबाचा आदर्श
सखाराम वाशीमकर यांना बळीराम, तुकाराम, परशराम, सीताराम, राजाराम आणि श्रीराम अशी सहा मुले आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने काहींचे वास्तव्य वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी सहा जणांच्या भावांनी एकोपा जपला आहे. कुटुंबात लहान मोठे मिळून ३२ सदस्य आहेत. एकेकाळी सात एकर शेतीचे असलेले क्षेत्र त्यांनी १२० एकरांपर्यंत नेले आहे. कुटुंबाची नवीन पिढी मेडिकल स्टोअर, हॉटेल व्यवसाय, ट्रॅक्टर विक्री, कृषी सेवा केंद्र आदी व्यवसायात कार्यरत आहे. शेती व व्यवसाय यांचा मेळ साधत कुटुंबाची प्रगती वेगाने सुरू आहे.

वाशीमकर यांची शेतीपद्धती

 • एकूण शेती - १२० एकर
 • हनुमान फळ - २५० झाडे
 • चिकू - २५० झाडे
 • लिंबू - १२० झाडे
 • पेरू - ७५ झाडे
 • करवंद - दोनहजार झाडे
 • विहिरी - ७
 • सौरपंप - ३
 • बोअरवेल - २

संपर्क - बळीराम वाशीमकर - ८६००८०१६५६
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू,...अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत...
सिंचनाची गंगा अवतरली बांधावरयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये...
मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी...मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात...
सुशिक्षित तरुणाने शोधला मधमाशीपालनातून...बीएससी. मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिक्षण झालेल्या...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडएखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर...
मिरची पिकात प्रमोद पाटील यांनी तयार...सावळदा (ता. जि. नंदुरबार) येथील प्रमोद हिरालाल...
आंबा निर्यातीत नाव कमावलेले दामले कुटुंबतीनहजारांहून झाडांच्या चोख व्यवस्थापनातून...
गायकवाडवाडी झाली पेरू बागांसाठी प्रसिद्धपुणे शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवरील...
ज्ञानाचा व्यासंग केल्यानेच...मुर्शीदाबादवाडी (जि. औरंगाबाद) येथील संजय पवार...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
चार एकर शेततळ्यात आधुनिक पद्धतीने...नाशिक जिल्ह्यातील पुतळेवाडी येथील धारणकर...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
शेतीला मिळतोय मधमाशीपालनाचा मोठा आधारकेवळ अडीच एकर शेतीला उदरनिर्वाहासाठी...
भाजीपाला, फुलशेतीतून गटाने दिली नवी दिशाटिके (जि. रत्नागिरी) गावातील नवलाई आणि पावणाई या...
अॅग्री बीटेक’ तरुणाचा धिंगरी मशरूम... ‘ॲग्रिकल्चर बीटेक’ची पदवी घेतलेल्या अनंत...