ज्ञान, अभ्यासातून यश साधलेले तोडकर

 उसात मेथी व कोथिंबिरीचे आंतरपीक
उसात मेथी व कोथिंबिरीचे आंतरपीक

ज्ञान, अभ्यास, अपेक्षित ते साध्य करण्यासाठी मेहनत या जोरावर कासेगाव (जि. सांगली) येथील विनोद तोडकर यांनी प्रयोगशील शेतकरी अशी ओळख तयार केली आहे. फेरपालट पद्धतीने ऊस, हळद, मिरची व आंतरपीक पध्दतीचे प्रयोग हा त्यांचा ‘पॅटर्न’ अभ्यासण्यासारखा आहे. उत्पादनवाढीसह मातीच्या आरोग्यावरही तितकेच लक्ष त्यांनी दिले आहे. सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील विनोद तोडकर हे प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची १२ एकर शेती असून ती तुंग येथे आहे. त्यांचा शेतीचा संबंध अलीकडील दहा वर्षांत आला. पूर्वी ते कासेगाव येथे कापड दुकान चालवायचे. आज मुलगा व काही प्रमाणात पत्नी ही जबाबदारी सांभाळतात. फायदेशीर शेती पध्दतीचा अभ्यास करताना विनोद यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे तंत्र पाहिले. प्रत्येक पिकाचा सूक्ष्म अभ्यास करून नफा कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिले. त्यातून आपली पीकपद्धती विकसित केली. ती पुढीलप्रमाणे...

  • ऊस- ऑगस्ट अखेरीस लागवड
  • उसाचा खोडवा तुटल्यानंतर हळद
  • हळदीनंतर ढोबळी मिरची (साधारण १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान)
  • मिरची साडेचार महिन्यांपर्यंत चालते
  • त्यानंतर त्याचे काड, मल्चिंग पेपर काढून उसाची लागवड
  • उसात दोन पिके दोनवेळा
  • उसात मेथी व कोथिंबीर- (मिरचीसाठी केलेल्या वरंब्यावर) पहिली बॅच ( प्रत्येकी एक एकर क्षेत्र)

  • साधारण दीड महिन्यांत ही पिके निघून गेल्यानंतर
  • पुन्हा हीच दोन पिके
  • पहिल्या व दुसऱ्या बॅचला दोघांपैकी एकतरी पीक पैसे देऊन जाते. अर्थात काहीवेळा काहीच हाती लागत नाही. ही देखील जोखीम आहे.
  • हळदीतील आंतरपिके अक्षय तृतीयेच्या दरम्यान हळदीची लागवड. यात वरंब्यावर मेथी, कोथिंबीर व सरीत स्वीटकॉर्न.

    उल्लेखनीय उत्पादने

  • ऊस - एकरी शंभर टन ते त्यापुढे.
  • हळद - हळदीचे उत्पादन मोजण्याची या भागात कुकरची पध्दत आहे. एकरी सुमारे ११६ कुकर होतात. प्रति कुकर ४० किलो हळद मिळते. या हिशोबाने ते ४६ क्विंटलपर्यंत जाते. मात्र, सरासरी उत्पन्न एकरी ४० ते ४५ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळते. यंदा ते ५० क्विंटलपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
  • ढोबळी मिरची - एकरी ५० ते ५५ टन. एकेवर्षी ते ६२ टनांपर्यंत मिळाले. मिरचीचे ८० टनांचे टार्गेट ठेवून वाटचाल सुरू.
  • व्यवस्थापनातील मुद्दे

  • केवळ उत्पादन, रासायनिक खते यांच्याकडे लक्ष न देता मातीचे आरोग्य, त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांकडे अधिक लक्ष. मातीचा प्रकार काळा
  • दरवर्षी मिरचीला एकरी चार ट्रॉली तर हळदीला पाच ते सहा ट्रॉली शेणखत
  • निंबोळी, करंज पेंड, लाभदायक सूक्ष्मजीवांचा दरवर्षी वापर
  • तीनही पिकांची फेरपालट. त्यामुळे उत्पादनवाढीला फायदा
  • हळदीचा बेवड मिरचीस फायदेशीर ठरतो
  • वीस वर्षांपासून उसाचे पाचट जाळलेले नाही
  • बांधावर सुमारे २७ प्रकारची झाडे. पर्यावरणपूरक शेती. त्यामुळे मधाची पोळी, पक्षी यांची संख्या चांगली
  • एकाच पिकावर अवलंबून न राहता बहुविध पीकपद्धतीतून जोखीम कमी करण्याचा प्रयत्न
  • हुमणी नियंत्रणासाठी अत्यंत कमी खर्चाचा प्रकाश सापळा तयार केला
  • दहा एकरांत मध्यावर विहीर व शेड. आत- येण्यासाठी रस्ता. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे ते मोबाईलला ‘कनेक्ट’ केले आहेत. त्याचा फायदा होण्याबरोबर विद्युत मोटर चालू बंद करणे हे देखील नियंत्रित करण्यात येते.
  • आंतरपिकांनी दिले भरपूर उत्पन्न

  • मागील वर्षी अति पाऊस झाला. अशा काळात उसातील मेथी व कोथिंबीर यांच्या दोन एकरांतील दोनवेळच्या उत्पादनातून तब्बल सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रतिपेंडीला ३० रुपये दर मिळाले. त्यामागील वर्षी दीड लाख रुपये मिळाले.
  • प्रतिपेंडी किमान चार ते पाच रुपये दर असला तरच विक्री करण्याचे तोडकर यांचे शास्त्र आहे. या आंतरपिकांमधून एकरी सुमारे ५० हजार रुपये मिळतात. उसाचा उत्पादन खर्च एक लाख रुपयांपर्यंत असतो. त्यातील निम्मा खर्च आंतरपिके कमी करतात. उसाची एकरी उत्पादकताही चांगली असल्याने हे पीक फायदेशीर ठरते. भाजीपाला कोकणात जातो. व्यापारी जागेवर खरेदी करतात.
  • स्वीटकॉर्न जागेवरूनच खरेदी होतो. किलोला ८ ते ९ रुपये दर मिळतो. दरवर्षी चाऱ्याची क्विंटलला सहा ते साडेसहा हजार रुपये दराने विक्री होते. मागील वर्षी अति पावसात एका शेतकऱ्याने चारा मागितला. मोफत देऊ केला तर तो घेईना. अखेर साडेपाच हजार रुपये दराने त्याने घेतल्याचे तोडकर यांनी सांगितले.
  • जमीन सजीव करण्यावर भर

  • मातीचे परिक्षण नियमित असते. सेंद्रिय कर्ब, टीडीएस तपासून पुढील व्यवस्थापन केले जाते.
  • माती परीक्षणाचे कीट तोडकर यांच्याकडे आहे. रासायनिक खतांसोबत किंवा दोन-तीन वर्षांच्या जुन्या शेणी बारीक करून सेंद्रिय पेंडी मिसळून देण्यात येतात. आपली जमीन भुसभुशीत, अगदी स्पंजासारखी झाली असल्याचे ते सांगतात.
  • हिशोबी तोडकर कापड दुकान असल्याने त्यातील हिशोबीपणा शेतीतही आणला आहे. प्रत्येक पिकावर होणारा खर्च, उत्पन्न असा सारा ताळेबंद ठेवतात. सुमारे पाच- सहा वर्षांचे रेकॉर्ड आहे. त्यामुळेच आपण फायद्यात आहोत की नाही ते समजते असे तोडकर म्हणतात.

    विनोद तोडकर- ७५८८१६७२५२ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com