होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !

होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !

सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस उत्पादक विनायक पाटील हे पाण्याचा ताळेबंद मांडून ऊस शेतीला मोजून मापून काटेकोर पाणी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उसाला भरपूर पाणी लागते हा गैरसमज त्यांनी आपल्या प्रयोगातून खोडून काढला आहे. सुमारे ४५ एकरांत त्यांनी स्वयंचलित ठिबक (ड्रीप ॲटोमेशन) यंत्रणा बसवली आहे. सुमारे २४ गुंठ्यांत ८० टन (एकरी १४० टन) अशा विक्रमी उत्पादनाची नोंद त्यांच्या नावावर आहे. पाणी वापर संस्था व सामुदायिक ठिबक सिंचन उपक्रम राबवून परिसरातील शेतकऱ्यांनाही जलसाक्षर करीत त्यांनी त्यांचे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.    ऊस शेतीतील प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका म्हणून सांगली जिल्ह्यातील वाळव्याचे उदाहरण घेता येते. पाणी व रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे ऊस क्षेत्रातील शेकडो एकर जमीन क्षारपड झाली आहे. सध्या महाराष्ट्रात उद्भवलेली दुष्काळी स्थिती आणि भूगर्भात कमी झालेली पाण्याची पातळी लक्षात घेतली तर येणारा काळ ऊस शेतीसाठी आव्हानात्मक आहे. काळाची हीच पावले ओळखून तालुक्यातील गोटखिंडी येथील युवा शेतकरी विनायक आप्पासो पाटील यांनी पाण्याचा ताळेबंद मांडून तसे व्यवस्थापन करून पाण्याची बचत करताना एकरी उत्पादनातही वाढ केली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब हे त्यांच्या शेतीचे वैशिट्य आहे. ऊस हे भरपूर पाणी लागणारे पीक आहे अशी टीका सातत्याने होत असते. हा गैरसमज विनायक यांनी जलव्यवस्थापन केंद्रित शेतीतून दूर केला आहे.  पाण्यासाठीचा संघर्ष  तासगाव तालुक्यातील निमणी हे विनायक यांचं मूळ गाव. सन १९६१ मध्ये कठोर संघर्ष करताना वडिलांनी त्या काळात १६ किलोमीटरवरून पाणी आणून द्राक्षबाग जगविली. आईला भाऊ नसल्याने मग विनायक यांचे कुटुंब १९८५-१९८६ च्या दरम्यान गोटखिंडी येथे आले. इथं ४५ एकर शेती आहे. इथंही द्राक्षबागच लावली. पण पाणीप्रश्न समोर आ वासून उभा होता.  सामूहिक योजना  या भागात ऊस हेच प्रमुख पीक आहे. पाण्याअभावी परिसरात सर्वत्रच उत्पादनात घट व्हायची. पण रडत बसण्यापेक्षा संकटावर उत्तर शोधायचं हीच विनायक यांची वृत्ती. कुशल बुद्धीच्या आधारे त्यांनी एक योजना गावकऱ्यांसमोर मांडली. सात किलोमीटर पाइपलाइनद्वारे कृष्णा नदीवरून पाणी आणायचे होते. शेतकऱ्यांना ती पसंत पडली. त्यासाठी लागणारे पैसे शेतकऱ्यांनी गोळा गेले. सुरवातीला ५० एकरांवर योजना राबवण्याचे ठरले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात विनायक यांच्या वडिलांनी योजनेच्या मंजुरीसाठी तब्बल ११७ वेळा मुंबई गाठली. अखेर त्यास यश आले. ही योजना पाटपाण्याची होती. पुढे महादेव पाणीपुरवठा सहकारी संस्था १९८९ साली स्थापना झाली. हळूहळू सभासद संख्या वाढली.  जल व्यवस्थापन ठरले महत्त्वाचे  शाश्वत पाण्याची सोय झाली. पण ऊस पिकात त्याचा वापर हाच मुख्य मुद्दा होता. अती पाणी वापरले तर जमिनीची सुपीकता कमी होण्याची भीती होती. पाटपाणी असल्याने चाळीस ते पन्नास दिवस पाण्याचा फेर येत नव्हता. ही अडचण २०१० पर्यंत येत होती. एकरी उत्पादन ३० ते ३५ टनांपुढे जातच नव्हते. खते व न पाणी यांचा अनियंत्रित वापर होऊ लागल्याने जमीन क्षारपड होण्यास सुरुवात झाली. मग ठिबक प्रणालीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे लक्षात आले. पुन्हा सभासदांची बैठक घेतली. पाण्याचा वापर मोजून मापून केला तर आपण यशस्वी होऊ, हा मुद्दा चर्चेत एकमुखाने स्वीकृत झाला. इच्छाशक्ती आणि जिद्द यांच्या जोरावर संस्थेतील तरुण पिढीने सामूहिक ठिबक सिंचन प्रणाली बसविण्याचे निश्‍चित केले.  असा मांडला पाण्याचा ताळेबंद 

  • पाणीपुरवठा संस्थेमार्फत परिसरात ५४० एकराला कृष्णा नदीच्या पाण्याचा पुरवठा. 
  • २३६ लिटर प्रतिसेकंद याप्रमाणे तेवढ्या क्षेत्रासाठी एक कोटी लिटर पाण्याची गरज. 
  • संस्थेने नऊ लाख लिटर क्षमतेची पाण्याची बांधीव टाकी बांधली. 
  • उसासाठी मार्च ते जूनपर्यंत २८ ते ३० हजार लिटर पाण्याची गरज असते. 
  • पाणीपुरवठा उभारणीसाठी ३५ हजार प्रति शेतकरी खर्च. 
  • सभासद संख्या- ३७२. 
  • क्षेत्र- ५४० एकर. 
  • प्रत्येक सभासदाला प्रति दिन चार तास पाणी वाटप. 
  • वार्षिक पाणीपट्टी १२ हजार ५०० रु. 
  • ५४ किलोमीटर पाइपलाइनचे जाळे. 
  • १९ किलोमीटरच्या परिघात केबलचे नेटवर्क. 
  • संपूर्ण योजना संगणकाद्वारे नियंत्रित. 
  • विनायक यांची आदर्श ऊस शेती  सामूहिक स्तरावर कार्यरत असताना विनायक आपल्या ऊस शेतीतही आदर्श व्यवस्थापन करीत होते. त्यांची ही वैशिष्ट्ये 

  • जल व्यवस्थापन 
  • स्वतःच्या ४५ एकर क्षेत्रावर स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली. 
  • ड्रीपरमधून ताशी एक लिटर पाण्याचा विसर्ग. 
  • दोन ड्रीपरमधील अंतर सव्वा फूट. 
  • तासाला एकरी ४८०० लिटर पाणी दिले जाते. 
  • वातावरण, हंगाम आणि बाष्पीभवनाच्या दरानुसार पाण्याचा वापर. 
  • उसाच्या सात फुटांमधील पट्ट्यात ओल नसल्यामुळे जमिनीस भेगा पडतात. मग जमिनीचा हार्डपॅन मोडला जातो. याचा फायदा पावसाळ्यात जाणवू लागतो. सुरवातीच्या काळातील पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरते. त्यामुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत. 
  • पाण्याच्या कार्यक्षम वापरामुळे शेतात वाफसा कंडिशन कायम. त्यामुळे उसाची मुळे कार्यक्षम. त्यामुळे जमिनीतील उपलब्ध मूलद्रव्यांचा वापर योग्य प्रकारे. 
  • पाण्याचा पुरवठा मुळांशेजारी केल्याने तण उगवत नाही. त्यावरील खर्च वाचतो. 
  • ठिबकद्वारेच ऊस तुटून जाईपर्यंत खतांचे नियोजन. मुख्य वाढीच्या काळात खते शिफारशीनुसार दिल्यास उत्पादनात वाढ. 
  • असे देतात पाणी (सरासरी व प्रति दिवस)  ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत- एकरी १५ ते १६ हजार लिटर  जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत- एकरी २० ते २२ हजार लिटर   मार्च ते जूनपर्यंत- एकरी २८ ते ३० हजार लिटर  पावसाचा हंगाम सोडून वार्षिक विचार केल्यास एकरासाठी सरासरी ५० ते ५५ लाख लिटर पाणी वापरले जाते. सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार एका वर्षात ऊस पिकासाठी ८० लाख लिटर पाणी वापरले जाते. हा फरकच विनायक यांचे काटेकोर पाणी व्यवस्थापन सिद्ध करतो.  विनायक यांची ऊस शेती 

  • जूनमध्ये उसाची रोप पद्धतीने लागवड. वाण को-८६०३२ 
  • सात बाय दीड फुटावर लागवड 
  • एकरी सरासरी ४९०० रोपे बसतात 
  • लागवडीचे अंतर जास्त. त्यामुळे एकरी लागणाऱ्या रोपांची संख्याही कमी लागते. परिणामी सुरवातीचा रोपांवरील खर्च कमी 
  • मुळ्या नेहमी कार्यशील 
  • मजुरीत ८० टक्के बचत 
  • उत्पादनात ४० टक्के वाढ 
  • जमिनीची प्रत सुधारली 
  • पाण्याचा अपव्यय असा टाळतात  -ठिबकच्या पाइप्स केवळ उसाच्या बुडख्यात मुळांच्या सानिध्यात ठेवल्यामुळे पाण्याचा पुरवठा फक्त कार्यक्षम मुळांच्या नजीक.  -उसाच्या बुडख्यापासून जवळपास सव्वा ते दीड फुटापर्यंत जमीन भिजली जाते.  उत्पादनात झाली वाढ  पूर्वी पाणी वापर संस्था सभासदांचे ऊस उत्पादन एकरी ३५ टनांपर्यंत होते. ठिबक सिंचन व आदर्श व्यवस्थापनाद्वारे लागवडीचा ऊस व खोडवा यांचे सरासरी उत्पादन ५० ते ५५ टन मिळू लागले. विनायक एकरी सरासरी ८० टन उत्पादन घेतात. आपल्या २४ गुंठे क्षेत्रात ८४ टन म्हणजे एकरी सुमारे १४० टन उत्पादनाची विक्रमी नोंद त्यांच्या नावे आहे.   

    (डाॅ. चोरमुले हे सिक्थ ग्रेन या कंपनीत अॅग्रोॅनाॅमीस्ट आहेत.)

      संपर्क- विनायक पाटील- ९८५०११४४२२ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com