उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादन

जाधव यांच्या उसशेतीत पाचटाचा वापर
जाधव यांच्या उसशेतीत पाचटाचा वापर

कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्रकाश जाधव यांनी उसाची प्रयोगशील शेती केली आहे. सुमारे चौदा एकरांतील शेतीत लागवडीचा ऊस, खोडवा व त्यानंतर भाजीपाला व फेरपालट अशी त्यांची पीकपद्धती आहे. एकरी ८० टनांपर्यंत उसाची उत्पादकता आहे. मागील वर्षीच्या उसाचे ३८ गुंठ्यांत १४७.६ असे विक्रमी उत्पादन घेत त्यांनी उत्तम व्यवस्थापन, प्रयोगशीलता व सूत्रबद्ध शेती नियोजनाचा आदर्श प्रत्यय दिला आहे.   कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील औरवाड येथे प्रकाश जाधव यांचे कुटुंब राबते. जवळच कवठेगुलंद येथे त्यांची चौदा एकर शेती आहे. नितीश व निरंजन या मुलांच्या सहकार्याने प्रकाश शेती करतात. नितीश एम.कॉम झाले असून, निरंजन महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. पूर्णपणे शेतीला वाहून घेतलेले हे कुटुंब ऊस शेतीत प्रगतिशील ठरले आहे. जाधव यांनी आपल्या शेतीच्याच ठिकाणी घर बांधले आहे. त्यामुळे शेती व्यवस्थापन सूत्रबद्ध पद्धतीने करणे सोयीचे ठरले आहे. सातत्याने शेतीत प्रयोग करण्याच्या मानसिकतेतून शेती फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. शेतीचे सूत्रबद्ध नियोजन आडसाली म्हणजे जुलै व सप्टेंबरची लागवड असे दोन हंगाम घेतात. लागवडीच्या उसाबरोबर खोडवाही असतो. उसाच्या काढणीनंतर बाजारपेठेतील मागणीनुसार टोमॅटो, मिरची, काकडी, दोडका, वांगी, कारली आदींची लागवड होते. त्यातून ताजा पैसा व उसाला चांगला बेवड मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. भाजीपाला पिकांनंतर पुन्हा उसाच्या लागवडीचे नियोजन सुरू होते. भाजीपाला गरजेनुसार स्थानिक व अन्य बाजारपेठांत पाठविला जातो. सेंद्रिय घटकांच्या वापरावर भर पिकांची फेरपालट हेच मुख्य सूत्र ठेवून जाधव यांनी गेल्या काही वर्षांपासून शेतीची वाटचाल सुरू ठेवली आहे. चौदा एकरांपैकी तीन ते चार एकरांत भाजीपाला असतोच. भाजीपाला घेतानाच सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करायचा असे निश्‍चित केले आहे. त्यातून मालाचा दर्जाही चांगला मिळत असल्याचा अनुभव आहे. खोडवा काढल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते. एक महिन्याच्या कालावधीत थोडी विश्रांती दिल्यानंतर हंगामानुसार भाजीपाला लागवडीचे नियोजन होते. यात एकरी सुमारे १० ट्रॉली शेणखताचा वापर होतो. ते गरजेनुसार खरेदी केले जाते. साखर कारखान्याच्या माध्यमातून मातीचे परीक्षण केले आहे. काही वर्षांपूर्वी मातीचा सेंद्रिय कर्ब एकच्या जवळपास होता, असे जाधव सांगतात. जमीन काळी आहे. भाजीपाला पिके घेताना गादीवाफा, मल्चिंग आदींचा वापर होतो. योग्य व्यवस्थापन, उत्पादनात सातत्य ऊस उत्पादनात सातत्याने स्थिरता ठेवली आहे. को ८६०३२ या वाणालाच पसंती असते. लागवडीच्या उसाचे एकरी ७० ते ८० टन तर खोडव्याचे उत्पादन ६० टनांपर्यंत मिळते. सन २०११ पासून पाच फुटी सरीचा वापर करण्यास सुरुवात केली. एक डोळा पद्धतीचा वापर असतो. पाच बाय दोन फूट असे लागवडीचे अंतर असते. सुमारे १२ एकरांवर ठिबक सिंचन केले आहे. गरजेनुसार पाटपाण्याचाही वापर होतो. शास्त्रीय व तांत्रिक बाबींचा वापर करण्यावर भर असतो. बेसल डोस, बीजप्रक्रियेला महत्त्व असते. पाचटाचाही सरीत वापर होतो. विद्राव्य खतांची वर्षातून सुमारे चार वेळा फवारणी केली जाते. सुमारे ५०, ६५, ९५, १२० दिवसांनी फवारणीचे नियोजन होते. शेतीतून प्रगती भाजीपाला पिकांमधून सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतीतील उत्पन्नातूनच ट्रॅक्‍टर, ठिबक यंत्रणा, विविध साधने खरेदी केली आहेत. शेतातच टुमदार घर बांधणे शक्य झाले आहे. केवळ ऊस शेतीवर अवलंबून न राहता भाजीपाला व फेरपालट यामधूनच शेतीतील प्रगती साधली आहे. मागील हंगामातील उसाचे व्यवस्थापन मागील वर्षी श्री. दत्त साखर कारखान्याच्या एकरी दीडशे टन ऊस कार्यक्रमात जाधव यांनी सहभाग घेतला. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी तांत्रिक सहकार्य केले. कारखान्याच्या शिफारशीनुसार जाधव यांनी व्यवस्थापन केले. यंदा महापुराने कोल्हापूर भागातील ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले. जाधव यांनाही त्याचा मोठा फटका बसला. त्यांचे राहते घर ऊस शेतीबरोबर बारा ते तेरा फूट पाण्यात होते. आठवडाभर ऊस पाण्यात असूनही त्याचे विक्रमी उत्पादन घेण्यास जाधव यशस्वी झाले. कारखान्याने नुकतीच त्यांच्या उसाची तोड केली. त्यात ३८ गुंठ्यांत १४७. ६ टन असे विक्रमी उत्पादन त्यांना मिळाले. एकरी हे उत्पादन सुमारे १५४ टनांपर्यंत जाते. महापुराचा तडाखा नसता तर हे उत्पादन अजून वाढले असते, असे जाधव सांगतात. दरवर्षी त्यांना एकरी किमान ७५ हजार रुपयांचा उत्पादन खर्च येतो. या प्रयोगात तो सव्वा लाख रुपयांपर्यंत आला होता. कारखान्याकडून उसाला प्रतिटन २८०० रुपये दर मिळत असल्याचे जाधव यांनी सांगितले. संपर्क- - प्रकाश जाधव- ९८२२४२०७७७, ९६५७९११७७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com