दुष्काळात ऊस वाचविण्यासाठी शास्त्रज्ञांचे बांधावर अभियान 

उत्पादकता वाढीसाठी गट तज्ज्ञ अजित चौगुले म्हणाले, की दुष्काळात आपल्याला खोडवाही जगवायचा आणि उत्पादकताही वाढवाची आहे असा दुहेरी सल्ला शेतकऱ्यांना देत आहोत. त्यासाठी काही पथदर्शी गावे निवडून शेतकरी गट तयार केले जात आहेत. दहा शेतकऱ्यांमागे एक गटप्रमुख शेतकरी नियुक्त केला जाईल. त्यांना दर महिन्याला मोफत सल्ला दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रज्ञांचे मार्गदशर्न होत आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शास्त्रज्ञांचे मार्गदशर्न होत आहे.

यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून खोडवा न ठेवण्याकडे त्यांची मानसिकता तयार झाली आहे. अशा प्रतिकूल स्थितीत शास्त्रज्ञांनी ‘पाचट जाळू नका, मल्चिंग करा’ असा मंत्र देत अभियानाद्वारे गावोगावी जाऊन प्रबोधन करण्यास सुरवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील पथदशर्क गावे निवडून काम सुरू झाले आहे. मराठवाड्यातही हे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. 

साचे खोडव्याखालील क्षेत्र राज्यात सुमारे ४० ते ४५ टक्के असते. हुमणी तसेच दुष्काळी स्थितीमुळे यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणात खोडवा काढून टाकतील. तसेच नवी लागवड घटेल. परिणामी पुढील हंगामात उसाची टंचाई राहील अशी भीती साखर उद्योगाला वाटते आहे. दुष्काळात ऊस उत्पादकांना सावरायला हवे. त्यासाठी त्यांना थेट बांधावर जावून दिलासा दिला पाहिजे असा विचार पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए), वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), ‘लॅन्डमार्क वर्ल्डवाईड’ आदी संस्थांचा सहभाग आहे. ‘डीएसटीए’चे अध्यक्ष मानसिंगराव जाधव आणि विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केवळ विचारांवर न थांबता अभियानाद्वारे तात्काळ कृती करण्याचा निर्णय घेतला. माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. शंकरराव मगर तसेच अन्य शास्त्रज्ञांनी अभियानात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ऊस शास्त्रज्ञ डॉ. सुभाष शिंदे, डॉ. मच्छिंद्र बोखारे, लक्ष्मणराव गायकवाड यांच्यासह ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी थेट शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहेत.  ऊस उत्पादन वाढीचे उद्दीष्ट  राज्यात को ८६०३२, कोएम ०२६५, को ९४०१२, एमएस १००००१, कोसी ६६१ आदी जातींची लागवड झाली आहे. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या लागवडीकडे अधिक भर आहे. मात्र त्यांचे पुढील व्यवस्थापन टिकवणे तेवढेच महत्त्‍वाचे आहे. अशावेळी कोणत्याही परिस्थितीत खोडवा न राखण्याचा विचार करू नका. उलट पाणीटंचाईशी सामना करीत अधिक उत्पादन घेण्याचे तंत्र समजावून घ्या असे प्रबोधन शास्त्रज्ञांकडून केले जात आहे. उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून ‘डीएसटीए’ प्रयत्नशील आहे. मात्र दुष्काळाच्या तोंडी आम्ही लागवडीच्या उसाचे एकरी १०० टन तर खोडवा उत्पादन टनाच्या पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांना समजावून सांगत आहोत असे ‘डीएसटीए’ चे म्हणणे आहे.  पथदशर्क प्रयोग  पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात दोन गावे निवडून तेथे पथदर्शक प्रयोग राबविण्यात येईल. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा दौरा केला जाणार आहे. पाचट न जाळता व आच्छादन तंत्र वापरून खोडव्याची उत्पादकता वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील करंदी तसेच तळेगाव ढमढेरे भागातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जावून प्रबोधन करण्यात आले.  अजिबात पाणी नसले तरी खोडवा काढू नका  विहिरी, नदी, नाले, कोरडेठाक असले तरी खोडवा काढून टाका. तो तग धरून राहील यासाठी उपाय करा, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे. पाचट न जाळता समप्रमाणात खोडव्यावर पसरावे. पाण्याशिवाय रान तसेच पडू द्यावे. वळवाचा जून, जुलैतील पाऊस मिळाला की खोडवा फुटतो. चांगले आच्छादन, सेंद्रिय पदार्थ भरपूर असल्यास खोडवा तग धरून रहातो. त्यानंतर खत, पाणी नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळेल असा दावा शास्त्रज्ञांचा आहे.  शास्त्रज्ञांनी दिल्या टीप्स 

  • फेब्रुवारीपर्यंत तोड होणारे उसाचे खोडवे ठेवावेत. 
  • खोडव्याला यंदा दुष्काळामुळे अतिताण बसेल. मात्र डगमगून जावू नका. 
  • ठिबकद्वारे ५० टक्के पाण्यात उत्पादन मिळेल. 
  • सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. त्यामुळे पाणीधारण क्षमता वाढते. 
  • एक आड एक सरी पाणी द्यावे आणि रानात तण येणार नाही हे पाहावे. 
  • पालाशचा वापर मोलाचा. कारण त्यामुळे पानातून होणाऱ्या उत्सर्जनावर नियंत्रण मिळते. पर्णरंध्रांची उघडझाप मंदावते. पिकाला ताण जास्त काळ सहन करता येतो.
  • खोडव्याचे बाष्पोर्जन रोखावे. त्यासाठी केओलिन आठ टक्के बाष्परोधकाची तीन आठवड्याच्या अंतराने फवारणी अत्यावश्यक. 
  • झाडाला पाण्याचा ताण सहन करण्याचे प्रशिक्षण द्या. त्यासाठी डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत पाणी दोन ते तीन दिवसांनी वाढवत न्यावे. 
  • दुष्काळातही सुपीकता वाढू शकते  पाचट एकसारखे रानात पसरून द्यावे व वाळवावे. त्यानंतर कुट्टी यंत्राद्वारे त्याचे बारीक तुकडे करावेत. त्यावर कारखान्याची मळी किंवा मळीकंपोस्ट वापरावे. पाचट कुजवणारे जिवाणू, युरिया व एसएसपी यांचा वापर करावा. पल्टी नांगराद्वारे पाचट मातीआड करून पाणी दिल्यास ८० ते ९० दिवसांत पाचट कुजते. जमीन सुपीक होण्यास सुरवात होते.      दुष्काळात पाचट म्हणजे सोने   सुमारे ४० वर्षांपासून ऊस संशोधनात असलेले शास्त्रज्ञ डॉ. सुभाष शिंदे म्हणाले, की दुष्काळाशी लढण्यासाठी ऊस उत्पादकांच्या हाती पाचट आहे. ते सद्यःस्थितीत सोने आहे. तोडी झाल्यानंतर एकरी चार टनांपर्यंत पाचट मिळते. ते जाळाल तर दुष्काळाविरोधात लढण्याचे मोठे हत्यार नष्ट होईल. रुंद सरी पद्धतीत सर्व पट्ट्यांमध्ये पाचट समप्रमाणात मिसळावे. डॉ. शिंदे म्हणतात, की ऊस जादा पाणी घेणारे पीक असल्याचे सांगितले जाते. पाटपाण्याने वर्षभर तुम्ही अन्य कोणतीही तीन पिके घेतल्यास ते पाणी आणि उसाला लागणारे पाणी एकसारखेच असते. ठिबकचा वापर केल्यास ४० ते ५० टक्के पाणीबचत होते. राज्यात दहा लाख हेक्टरवर ऊस पीक घेतले जाते. एकूण शेतीच्या चार टक्केही ते क्षेत्र नाही.  मोफत मार्गदर्शनाची संधी  डॉ. मच्छिंद्र बोखारे म्हणाले, की आम्ही एक रुपया न घेता मोफत मार्गदर्शनासाठी घराबाहेर पडलो आहोत. मराठवाड्यात मागे दुष्काळी स्थिती आम्ही अभियान हाती घेतले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ३० हजार टन ऊस पिकवला. यंदाही अभियान सर्वांनी राबविल्यास लाखो टन ऊस वाचविता येईल.  ऊस विस्तारक व अभ्यासक लक्ष्मणराव गायकवाड म्हणाले, की ऐन दुष्काळात कृषी विद्यापीठांतील निवृत्त शास्त्रज्ञ, साखर कारखान्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळात धीर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मी या अभियानात सहभागी झालो आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचे मानधन आहे.  संपर्क- डॉ. सुभाष शिंदे- ९८२२४९८५२५ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com