'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळख

पुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी आपली माती, हवामान व बाजारपेठांचा अभ्यास करीत त्यास सुसंगत द्राक्षवाणांची निवड केली. ‘रेड ग्लोब’ या वाणाच्या शेतीत अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांनी कुशलता व यश मिळवले आहे. बारा एकर द्राक्षशेतीत साडेचार एकरांत रेड ग्लोब तर उर्वरित क्षेत्रात अन्य रंगीत वाणांची शेती त्‍यांनी फुलवली आहे.
रेडग्लोब द्राक्षाचे निर्यातक्षम पॅकींग सुरु असताना
रेडग्लोब द्राक्षाचे निर्यातक्षम पॅकींग सुरु असताना

पुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी आपली माती, हवामान व बाजारपेठांचा अभ्यास करीत त्यास सुसंगत द्राक्षवाणांची निवड केली. ‘रेड ग्लोब’ या वाणाच्या शेतीत अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांनी कुशलता व यश मिळवले आहे. बारा एकर द्राक्षशेतीत साडेचार एकरांत रेड ग्लोब तर उर्वरित क्षेत्रात अन्य रंगीत वाणांची शेती त्‍यांनी फुलवली आहे.   पुणे जिल्ह्यातील नारायणगाव हा पट्टा द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक अनुभवी बागायतदार या भागात पाहण्यास मिळतात. खोडद येथील सुहास शिवाजी थोरात यांनीही रंगीत द्राक्षवाणांच्या शेतीत ओळख तयार केली आहे. येथील मुक्त विद्यापीठातून ‘बीएसस्सी ॲग्री’ ची पदवी त्यांनी घेतली असून तांत्रिक ज्ञानाचा उपयोग शेतीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वडिलांनी १९८६ मध्ये शरद सीडलेस या वाणापासून चार एकर द्राक्ष शेतीला सुरवात केली. सुहास यांनी शिक्षणानंतर शेतीत लक्ष देण्यास सुरवात केली. त्यांनी आपली माती, हवामान व बाजारपेठांची मागणी या बाबींचा अभ्यास केला. ‘रेड ग्लोब’ वाणावर भर सुहास म्हणाले की आमच्या मातीचा प्रकार चुनखडीयुक्त आहे. अशा मातीत व्हाइट व्हरायटीज’ चांगल्या प्रकारे येत नव्हत्या. रंगीत वाण तुलनेने असा जमिनीत चांगल्या येऊ शकतात असे समजले. सन २००२ पासून चुलत बंधू शशिकांत यांचे मार्गदर्शन मिळू लागले. त्यातूनच ‘रेडग्लोब’ या रंगीत वाणाच्या लागवडीला चालना मिळाली. हे वाण निर्यातीसाठी चांगले आहे. त्याची टिकवणक्षमता चांगली आहे. काढणीनंतर शीतगृहामध्ये चार ते पाच महिने टिकते. त्यास ‘क्रॅकींग’ची समस्या नाही. शिवाय जिबरेलीक ॲसिड, ६- बीए आदी संजीवकांचा वापर करण्याची गरज भासत नाही. साहजिकच डिपींगची मेहनत व त्यावरील खर्च कमी होतो. गेल्या काही वर्षांपासून हे वाण त्यामुळेच टिकवून ठेवल्याचे सुहास सांगतात. शेतीचे क्षेत्र

  • एकूण शेती २५ एकर
  • द्राक्षे - १२ एकर
  • पैकी रेड ग्लोब - ४.५ एकर
  • जम्बो - ४ एकर
  • सरिता २ एकर
  • पपई - ७.५ एकर
  • सीताफळ एएके गोल्डन - ४ एकर, बाळानगर- दीड एकर
  • शेतीतील व्‍यवस्थापन जुनी लागवड ८ बाय ६ व नवी ८ बाय पाच फुटावर आहे. मंडप पध्दत आहे. दरवर्षी शेणखताचा एकरी तीन ट्रक याप्रमाणे वापर केला जातो. शिवाय बोदावर उसाच्या पाचटाचे मल्चिंग केले जाते. दरवर्षी पान- देठ परिक्षण करूनच खतांचे व्यवस्थापन केले जाते. रेड ग्लोब वाणावर करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. एप्रिल महिन्याच्या छाटणीपासून कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर होतो. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी यांच्या शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर केला जातो. घडांचा आकार चांगला मिळण्यासाठी एप्रिल छाटणीनंतर प्रति दोन चौरस फुटावर एक काडी ठेवली जाते. मण्यांची फुगवण चांगली होऊन वजन चांगले मिळेल असे व्यवस्थापन असते. पाच पानांनतर शेंडा खुडला जातो. त्यानंतर पुढे काडी वाढविली जाते. वाफसा कंडिशननुसार झाडाला पाणी दिले जाते. हवामान विषयाच्या विविध ‘ॲप्स ’चाही वापर होतो. निर्यातक्षम घड निर्यातक्षम द्राक्षांसाठी मण्यांचा आकार २२ ते २८ मिलिमीटर पर्यंत तर १८ ते २० ब्रिक्स टक्केवारी असते. मण्यांचा लालसर गुलाबी रंग आणि आकार यामुळे त्यास बाजारपेठेत मागणी असते. जानेवारीत साधारण काढणी सुरु होऊन निर्यात होण्यास सुरवात होते. दरवर्षी श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, दुबई या देशांमध्ये स्थानिक व नाशिक येथील निर्यातदार कंपन्यांमार्फत माल पाठवला जातो. दरवर्षी एकरी ११ ते १२ टन उत्पादन मिळते. त्यातील ७० ते ८० टक्के मालाची निर्यात होते. रेड ग्लोब वाणाला शक्यतो किलोला ७० रूपयांपेक्षा कमी दर मिळालेला नाही. जंबो सीडलेस व सरीता हे वाण लोकलसाठी ठेवले आहेत. सरासरी सर्व वाणांना किलोला ७, ८० रुपयांपासून १०० ते ११० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकरी उत्पादन खर्च किमान दोन लाख रुपये येतो. आरोग्यदायी रेड ग्लोब सुहास म्हणाले की रेड ग्लोब हे सीडेड (बिया असलेले) वाण आहे. सुरवातीच्या काळात या वाणाविषयी अभ्यास करीत होतो. त्यावेळी कॅलिफोर्निया येथील एका तज्ज्ञाने या वाणाच्या बियांवर केलेल्या संशोधनाविषयी माहिती मिळाली. कर्करोगासारख्या आजारावर या बिया गुणकारी असल्याचे समजले. आम्हीही काही मण्यांमधून बिया वेगळ्या करून त्याची पावडर करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात याविषयी अद्याप संशोधन व अभ्यासाची गरज असल्याचेही सुहास म्हणाले. संपर्क- सुहास थोरात- ९८३४८३५६७६, ९८८१६९०७९०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com