प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्श

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता.. निपाणी. जि.. बेळगाव ) येथील सुरेश पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याने केवळ अडीच एकरांत एकात्मिक शेती व त्यातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळवला आहे.
सुरे्श पाटील यांची ऊसशेती
सुरे्श पाटील यांची ऊसशेती

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता.. निपाणी. जि.. बेळगाव ) येथील सुरेश पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याने केवळ अडीच एकरांत एकात्मिक शेती व त्यातून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळवला आहे. ऊस, भुईमूग शेतीसह यांत्रिकीकरण, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’, मुक्त संचार गोठा, मूरघास व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती अशी त्यांच्या शेतीची विविध वैशिष्ट्ये सांगता येतील. कोल्हापूर- बेळगाव महामार्गावर निपाणीपासून सात किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यात बुदिहाळ (जि.. बेळगाव) गाव आहे. गावातील सुरेश पाटील यांची अडीच एकर शेती आहे. ऊस हे मुख्य पीक असून त्याची दीड एकरांत लागवड होते. हंगामात भातही असतो. आडसाली ऊस दरवर्षी असतो. त्यात आंतरपीक म्हणून भुईमूग असतो. उसाचा खोडवा गेल्यानंतर उन्हाळ्यात जमीन नांगरली जाते. त्यानंतर एकरी चाळीस बैल गाड्या शेणखत वापरले जाते. साडेपाच फुटी सरी सोडून शेत तयार केले जाते. जुलैच्या दरम्यान बोदावर भुईमुगाची टोकण सहा इंचावर झिगझॅग पद्धतीने होते. एकरी १५ ते २० किलो बियाणे प्रक्रिया करून वापरले जाते. ऑगस्टमध्ये को ८६०३२ वाणाच्या उसाची रोप पद्धतीने लागवड होते. एकरी ४००० ते ४२०० रोपे लावण्याचे नियोजन असते. ऊस भरणीला येईपर्यंत भुईमुगाची काढणी होते. एकरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. विक्री न करता घरी वापरासाठी व तेल काढण्यासाठी वापर होतो. लागवडीच्या उसाचे एकरी ८० ते १२० टन तर खोडव्याचे ७० टनांपर्यंत उत्पादन मिळते. निपाणी येथील सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवला जातो. २८०० रुपये प्रति टन त्यास दर मिळतो. दुग्धव्यवसाय व प्रक्रिया शेतीला उत्पन्नाची जोड म्हणून दुग्धव्यवसाय आहे. हरियाना राज्यातील जींद येथून मुऱ्हा म्हशी आणल्या. सध्या चार जातिवंत म्हशी, एक एचएफ गाय व बैल अशी बारा जनावरे आहेत. ३५ बाय ३५ फूट जागेत ‘हेड टू हेड’ तर ५१ बाय ५१ फूट क्षेत्रावर मुक्त संचार गोठा आहे. शेण व गोमूत्र गोबरगॅस प्लांटला जाण्याची व्यवस्था आहे. त्या इंधनावर सहाजणांचा स्वयंपाक बनविला जातो. त्यातून सिलिंडरची बचत केली आहे. शेणापासून गांडूळखतनिर्मितीही होते. वर्षभर चारा निर्मिती दीड एकरांत संकरित नेपिअर घेत वर्षभर हिरव्या चाऱ्याची गरज भागवली जाते. पन्नास किलोच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये मशिन प्रेस’ करून मूरघास तयार केला जातो. वर्षभर विक्रीही केली जाते. हिरवा चारा, मूरघास, पशुखाद्य आणि मिनरल मिक्शर यापासून ‘टोटल फीड रेशन’ बनवून दोन वेळा दिले जाते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य व दुधाची गुणवत्ता चांगली टिकवली आहे. दूध व प्रक्रिया

  • प्रतिदिन सुमारे ४० ते ५० लिटर दूध उत्पादन. ग्राहकांना ५५ रुपये प्रति लिटर दराने रतीब. ग्राहक गोठ्यात येऊनही खरेदी करतात.
  • दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी आदी पदार्थही बनवले जातात. अमृत लस्सी
  • ब्रँडद्वारे निपाणी शहरातील कोल्ड्रिंक्स दुकाने व हॉटेल्स ठिकाणी फिरून विक्री.
  • खर्च वजा जाता या व्यवसायातून महिन्याला किमान २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न.
  • -वर्षाला सुमारे ३० ट्रॉली शेणखत. तीन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री होते.
  • एक बैल औजार निर्मिती अल्पभूधारक शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे खर्चिक झाले आहे. ही विचार करून एका बैलावर चालणाऱ्या अवजाराची निर्मिती सुरेश यांनी केली आहे. पाती बदलून विविध पिकांत त्याद्वारे आंतरमशागत करता येते. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सन २०१५ मध्ये दुष्काळाच्या झळा लागल्या. त्यावेळी टॅंकरने पाणी आणावे लागले. त्यानंतर पाण्याची शाश्‍वत सोय करण्यासाठी कूपनलिका खोदली. दोन- तीन वर्षानी असे लक्षात येऊ लागले की उन्हाळा सुरू झाल्यानंतर एक महिना आधी बोअरवेलला पाणी कमी होऊ लागले. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली. एप्रिल-मेमध्ये कूपनलिका कोरडी पडू लागली. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडून पाणी वाहून नदीला पूर यायचा आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडायचं. मग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ची यंत्रणा उभारली. यात कूपनलिकेच्या भोवतीने ‘मार्किंग’ करून पंधरा बाय पंधरा आकाराचा सहा फूट खोलीचा खड्डा केला. त्यातील मुरूम व माती स्वच्छ केली. केसिंग पाइप्स स्वच्छ करून घेतल्या. त्याला सर्व बाजूंनी पाच एमएम आकाराचे चार इंचावर गोलाकार छिद्र मारले. त्यानंतर नायलॉनची मेश गोलाकार बांधून घेतली. जेणेकरून त्यात पाण्याबरोबर माती किंवा केरकचरा जाऊ नये. खड्ड्यात दोन फूट व्यासाचे दगड दीड फुटापर्यंत भरून घेतले..नंतर दीड फूट उंचीवर एक फूट व्यासाचे दगड भरले. त्याहून लहान दगड आणि खडीचा थर घेतला. शेवटी खडीवर पूर्ण नायलॉन जाळी अंथरून घेतली. चोहो बाजूने पक्के बांधकाम करून घेतले. जेणेकरून पावसाबरोबर वाहून येणारी माती आत येऊ नये. आता जमिनीत पाण्याची पातळी वाढून कूपनलिकेला चांगले पाणी येऊ लागले आहे. कृषी पंडित पुरस्काराने गौरव गेल्या पंधरा वर्षांपासून शेतीत प्रयोग करणाऱ्या सुरेश यांचा कर्नाटक राज्याने २०२० मध्ये कृषी पंडित पुरस्कार देऊन सन्मान केला. राष्ट्रीय पातळीवर कृषी मानांकन स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. ‘कॅच द रेन कॅम्पेन’ अंतर्गत शेतकरी, शाळा, महाविद्यालयांतून पावसाचे पाणी संवर्धन करण्याबाबत सुरेश प्रात्यक्षिकांद्वारेही मार्गदर्शन करतात. संपर्क- सुरेश पाटील- ९७४१६२१६५०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com