agriculture story in marathi, Tembhe village of Nasik Dist. has achieved progress in agri. centered development works. | Page 2 ||| Agrowon

एकट्याने नव्हे, इतरांना घेऊन पुढे जाऊ; टेंभे गावाने साधली भरीव प्रगती

मुकूंद पिंगळे
शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021

एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे खालचे (ता. सटाणा, जि. नाशिक) या गावाने प्रत्यक्षात आणला. त्या बळावर मृद्‍- जलसंधारण, कृषिकेंद्रित विकास, वृक्षसंवर्धन, सोयीसुविधा अशा विविध क्षेत्रांत भरीव प्रगती साधली. नावीन्याचा ध्यास घेत परिवर्तन करीत हे गाव राज्यात आदर्श म्हणून पुढे येत आहे.

एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे खालचे (ता. सटाणा, जि. नाशिक) या गावाने प्रत्यक्षात आणला. त्या बळावर मृद्‍- जलसंधारण, कृषिकेंद्रित विकास, वृक्षसंवर्धन, सोयीसुविधा अशा विविध क्षेत्रांत भरीव प्रगती साधली. नावीन्याचा ध्यास घेत परिवर्तन करीत हे गाव राज्यात आदर्श म्हणून पुढे येत आहे.
 
नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात सटाणा तालुक्यातील काटवण परिसरात टेंभे (खालचे) हे गाव वसले आहे. सततचा दुष्काळ, अवर्षणप्रवण शेती, शिक्षणाचा अभाव अशी या गावाची एकेकाळची ओळख होती. बागलाणचे पहिले आमदार कै. सजन राघो पाटील यांचे हे गाव. त्यांनी परिवर्तनाला सुरुवात केली. गावकऱ्यांची साथ मिळाली. कृषिकेंद्रित ग्रामविकासाची चळवळ रुजण्यास मग फार वेळ लागला नाही. आज त्यातूनच विकासाचे अनेक टप्पे गाव यशस्वी पार करीत आहे.

जलक्रांतीतून घडली कृषिक्रांती
नाशिक- धुळे जिल्ह्यांच्या सीमेवरील व २४०० लोकसंख्या असलेले टेंभे गाव एकेकाळी आर्थिकदृष्ट्या मागासलेले होते. सिंचन सुविधेअभावी बाजरी, मका व भुईमूग या पिकांवर अर्थकारण अवलंबून होते. लोकसहभागातून प्रथम पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यास शासकीय योजनांची जोड मिळाली. वाटोळी नाल्यावरील जलसंधारण, केटीवेअर, मातीबंध अशी ६८ कामे पूर्ण झाली. त्यातून गाव बागायती होण्यास मदत झाली. परिसरात हरणबारी धरणाच्या लाभक्षेत्रात होऊ घातलेल्या तळवाडे भामेर पोहोच कालव्यासाठी गाव कायम अग्रक्रमाने पुढे राहिले आहे.

सर्वांगीण विकासावर भर
गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्यदिव्य व प्रेरणादायी असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्‍वारूढ शिवस्मारक उभारले आहे. गावाचा सुंदर व स्वच्छ परिसर, सुसज्ज ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दोन अंगणवाड्या, पशुसंवर्धन दवाखाना, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, तलाठी कार्यालय, सर्व प्रकारचे ऑनलाइन दाखल्यांसाठी केंद्र आदी सुविधा आहेत.रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. भूमिगत गटारी आहेत. प्रत्येक घरात पाणीपुरवठ्यासाठी नळजोडणी, पेव्हर ब्लॉक, गावात प्रकाश व्यवस्थेसाठी हायमास्ट बसविले आहे. संगनमताने व पोलिस यंत्रणेशिवाय वाद न होऊ घेता अतिक्रमणे काढून गावाने राज्यात निर्माण केला आहे. सरपंच कांताबाई अहिरे, उपसरपंच युवराज उत्तम कापडणीस व सदस्य यांचा सक्रिय सहभाग लाभला आहे.
 
महसूल वाढीचे प्रयत्न  
वृक्षारोपणातून महसूल वाढीचे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे. दोन वर्षांपासून चिंचेपासून गावाला ५० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. जांभूळ व मोहापासून दहा वर्षांत १० ते १२ लाख रुपयांचे हमीचे उत्पन्न सुरू होईल असे नियोजन केले आहे. ‘बिहार पॅटर्न’नुसार ग्रामपंचायतीमार्फत दोन हजार झाडांचे संवर्धन करून १० बेरोजगारांची सोय झाली. सर्व कामांमध्ये ग्रामस्थांसह गावातील ‘शिवमुद्रा ग्रुप’चाही हिरिरीने सहभाग असतो.

जैवविविधता संवर्धन
माजी सरपंच भाऊसाहेब अहिरे यांच्या एक घर एक झाड यासह ‘रस्त्याच्या दुतर्फा झाडेच झाडे’ या संकल्पनेतून जैवविविधता जपणूक झाली. वडाची सुमारे ७००, पिंपळ ३००, चिंच २०० झाडे, कडुनिंब ५००, मोह २५, जांभूळ ५०, नारळ ५०० यांसह भारतीय प्रजातीची असंख्य झाडे परिसरात पाहण्यास मिळतात. कोरोना
काळात तरुणांनी पिंपळाची पाचशे झाडे लावली. कमळाचे बेट तयार केले आहे.

टेंभे गावातील आदर्श बाबी

 • पाणीदार गाव
 • दारूबंदी. व्यसनमुक्त गाव म्हणून ओळख
 • पर्यावरण संवर्धनात अग्रेसर. वसुंधरा अभियानात सहभाग

 शेती अर्थकारणाला चालना 

 • गावचे क्षेत्र- ५८८.६६ हेक्टर
 • कृषक क्षेत्र... ४६४.७७ हेक्टर
 • द्राक्ष- १०० एकर, डाळिंब- २५० एकर
 • कांदा, टोमॅटो, मिरची, भाजीपाला आदी- ६०० एकर
 • शेवगा- ७० एकर

पंधरा वर्षांपासून कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे शेती अर्थकारणाला गती मिळून गावचे उत्पन्न ७५ कोटींच्या पुढे गेले आहे. जिभाऊ कापडणीस, नीलेश चव्हाण, अभिजित अहिरे असे आदर्श शेतकरी गावाचे भूषण आहेत. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे क्षेत्र विस्तारण्यासह संरक्षित शेतीच्या अनुषंगाने प्रयोग होत आहेत. कांदा चाळींची उभारणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शिवाय गायी, म्हशींचे पालन होते. दुधाची नामपूर गावात विक्री होते. कृषी विभागाच्या योजनांचे पाठबळ मिळाले आहे.

शेतकरी कंपनीच्या माध्यमातून बळ
गावात सह्याद्री बागलाण विभाग ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन झाली आहे. ‘लागवड ते विपणन’ हे धोरण हाती घेऊन त्यात तरुणाई कार्यरत आहे. नीलेश केदा चव्हाण अध्यक्ष असून १० संचालक आहेत. कृषिज्ञान आदानप्रदान, संशोधन केंद्रांना भेटी, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, किफायतशीर दरात निविष्ठा विक्री व बाजारपेठ मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. मी एकटा पुढे जाणार नाही, इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार जोपासला आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे (मोहाडी) अध्यक्ष विलास शिंदे यांचे मार्गदर्शन मिळते. त्या माध्यमातून आरा १५ सारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धात्मक द्राक्ष वाणाच्या लागवडी येथे करण्यात आल्या आहेत.

शेतीमाल खरेदी- विक्री केंद्र
सन २०१३ मध्ये डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला. पिकाला काही काळ उतरती कळा लागली. पर्यायी म्हणून शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळाले. मात्र तयार रोपे उपलब्ध होणे खर्चिक होते. मग गुणवत्तापूर्ण, निरोगी रोपांची गरज म्हणून भाजीपाला रोपवाटिका व्यवसायाला चालना मिळाली. भाजीपाला क्षेत्र वाढीस लागल्यानंतर शेतकऱ्यांनी येथेच खरेदी विक्री केंद्रही उभारले आहे. येथून सुरत, मुंबई, दिल्ली येथे फळे- भाजीपाल्याची दररोज चार ते पाच वाहने भरून जातात. मका उत्पादनही मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचे खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे. वजन करून ‘विना अडत विना हमाली’ तत्त्वाने कृषी उद्योजक श्रीकृष्ण गांगुर्डे यांच्या पुढाकाराने रोख ‘पेमेंट’ शेतकऱ्यांना मिळते. परिसरातील शेतकऱ्यांनाही या केंद्रांचा लाभ होतो.

गावाला मिळालेले सन्मान

 • गिरणा गौरव, निसर्गमित्र, राज्य शासनाचा संत रोहिदास पुरस्कार
 • सन २०१९-२० चा १० लाखांचा स्मार्टग्राम.
 • अनेक आजीमाजी मंत्री तसेच कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या भेटी.

प्रतिक्रिया
राजकारण विरहित व पारदर्शक विकासकामे गावात होतात. लोकसहभाग व तरुणाईचा त्यात महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. राज्यात आदर्श गाव होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
सौ.कांताबाई भाऊसाहेब आहिरे, ९४२०२२७७३७
सरपंच

“आमची माती आमची माणसं ही शिकवण ग्रामस्थांमध्ये आहे. प्रगतीच्या नव्या वाटा शोधताना गावातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी असतो. ‘आम्ही ही घडलो, तुम्ही ही घडा’ ही लोकभावना रुजली आहे.
-जिभाऊ कापडणीस, ९४२०९०१०४६ 
प्रयोगशील शेतकरी


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
रेशीम शेतीतील समाधानकिनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन...
शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची...राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८...
पापड, बेकरी उद्योगात तयार केली ओळखभादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा...
गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी...
नागली उत्पादनांचा ‘स्टार बाइट’ ब्रॅण्डनाशिक ः  कोरोना संकटकाळात अनेकांनी संधी...
जागतिक दर्जाच्या शेतीतून वाटा केल्या...निघोज (जि. नगर) येथील आपल्या साठ एकरांत विज्ञान-...
निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा...परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट...
सालईबनला मिळाली नवी ओळखबुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत कांदा...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
टेरेसवर द्राक्ष बागेचा फिलकांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या...
‘ड्रायझोन’मध्ये आली गंगाअमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
मोबाईल अन्‌ प्रक्षेत्रभेटीतून मिळतोय...हवामान बदलाच्या काळात तातडीने हवामान, पीक नियोजन...
साहिवाल पालनात तरुणाने दाखवली जिद्दकुठल्याही व्यवसायात टक्के-टोणपे, यश -अपयश येतच...
कुक्कुटपालन, फलोत्पादनातून मिळवले...विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दीपक खैरनार यांना...
पूरक उद्योगातून शेती झाली किफायतशीरभातशेतीसह पशुपालन व्यवसायामध्ये उतरत एकात्मिक...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
रोपवाटिका व्यवसायातून साधली प्रगतीकामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील शुभांगी दळवी...
प्रयोगशीलतेतून वाढवले तुरीचे उत्पादनलोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील एकनाथ...