तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळख

तीर्थपुरी येथील गणेश बोबडे यांची बहरलेली मोसंबीची बाग.
तीर्थपुरी येथील गणेश बोबडे यांची बहरलेली मोसंबीची बाग.

तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील शेतकऱ्यांनी अलीकडील वर्षांत मोसंबी पिकावर भर दिला आहे. अलीकडील वर्षांत दुष्काळात सातत्याने होरपळत असले तरी, त्यावर मात करत चांगले उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. अपुऱ्या पाण्यातही काहींनी उत्पादनापेक्षाही बागा जतन करण्याचा प्रयत्न केला. यंदा अन्यत्र व आंबिया बहराचे उत्पादन व आवक कमी असल्याने तीर्थपुरी भागातील मोसंबीला चांगला दर मिळत आहे. अंबड- घनसावंगी तालुक्‍यांप्रमाणेच तीर्थपुरीदेखील येत्या काळात मोसंबीचे आगार तयार होईल अशी शक्यता आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी गाव आहे. गावचे एकूण क्षेत्र जवळपास २४०० हेक्‍टर असून, लोकसंख्या पंधरा हजारांच्या वर आहे. येथील शेतकऱ्यांची मुख्य पिके ऊस, कापूस, सोयाबीन, मूग आहेत. गावातून जायकवाडी धरणाचा डावा कालवा गेल्याने बहुतांश क्षेत्र ओलिताखाली येत आहे. सर्वाधिक लागवड ऊस पिकाची आहे. शेतकरी वळले मोसंबीकडे जिल्ह्यातील अंबड- घनसावंगी तालुक्‍यात राज्यात सर्वाधिक मोसंबीची लागवड असावी. तीर्थपुरीतील शेतकरीही तीन-चार वर्षांपासून मोसंबीकडे वळले आहेत. आजमितीला पाचशे एकरांपर्यंत गावात मोसंबीची लागवड असावी. चांगले उत्पादन घेण्याबरोबर दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या पिकाला चांगला प्रतिसाद आहे. दुष्काळानंतर पुन्हा लागवड २०१२ च्या दुष्काळात मोसंबी उत्पादकांच्या उभ्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या होता. तरीही हिमतीने पुन्हा लागवड करून शेतकरी उभा राहिला. यंदा पुन्हा दुष्काळ निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले. अनेकांना बागा काढूनही टाकाव्या लागल्या. मात्र २०१२ च्या दुष्काळाचा धडा घेतलेल्यांनी शेततळी घेतली. काहींनी फळबहर न पकडता बागा जतन करण्याचा प्रयत्न केला. काहींनी विकत पाणी देऊन बहर टिकवला. उत्पादन व दर दोन्ही चांगले मोसंबी फळबागेला तीर्थपुरी भागात पोषक वातावरण असल्याने व्यवस्थापनाची जोड देत शेतकरी सरासरी एकरी दहा ते बारा टनांपर्यंत उत्पादन घेत आहेत. चांगले नियोजन व आधुनिक पद्धतीचा अवलंब करणाऱ्यांनी अगदी पंधरा टन व त्यापुढेही उत्पादन घेतले आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी आंबिया बहराचे नियोजन केले होते. परंतु दुष्काळी परिस्थितीत यंदा सुरवातीला पंचवीस हजार रुपये प्रतिटन दर सुरू झाला. नऊ सप्टेंबरपर्यंत हा दर चाळीस हजार रुपयापर्यंत पोचला. पुढील महिन्यात हाच दर ५० हजार रुपयांपर्यंत जाईल असे जाणकारांना वाटते. त्यामुळे चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा आहे. शेतकऱ्यांचे अनुभव गावातील विष्णू व गणेश हे बोबडे बंधू तीन-चार वर्षांपासून मोसंबीचे चांगले उत्पादन घेत आहे. या पिकामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. विष्णू गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ शेती पाहतात. तर गणेश महा ई सेवा केंद्र चालवतात. त्यांनी तीन एकरांत न्यूसेलर जातीच्या पाचशे झाडांची लागवड केली. २०१६ मध्ये त्यांनी बागेतून साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळवले. पुढील वर्षी व्यापाऱ्यांना ११ लाख रुपयांना बाग ठोक दरात दिली. मागील वर्षी एकूण क्षेत्रातून ५७ टन उत्पादन घेत त्यांनी चांगले उत्पन्न घेतले. यंदाही बाग चांगली बहरली असून, पाणी कमी पडू लागल्याने विकतचे घेत बाग जतन केली. शेततळ्याचाही चांगला फायदा झाला. यंदा एकूण क्षेत्रातून चाळीस ते पन्नास टन उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे. शेती व्यवसायावर दुमजली घर व चारचाकी वाहन त्यांना घेता आले. -गणेश सखाराम बोबडे संपर्क - ९९२२७३४००१ आमची सात एकरांत मोसंबी आहे. सध्या २८५ झाडांपासून उत्पादन सुरू आहे. योग्य नियोजन व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी दोन एकरांत ४० टन उत्पादन मिळाले. त्याला २८ हजार रुपये प्रतिटन दर मिळाला. यंदा दुष्काळाचा परिणाम झाल्याने तीस टनांपर्यंत उत्पादन मिळेल. तरीही दर चांगला असल्याने उत्पन्न चांगले मिळण्याची आशा आहे. आमच्या बारा एकरांत पूर्वी एक बोअरवेलचा आधार होता. वडील सीताराम पारंपरिक शेती करायचे. मोसंबीपासून चांगले उत्पादन मिळू लागल्याने गेल्या वर्षी दुष्काळात विहीर खोदली आहे. आबासाहेब सीताराम बोबडे संपर्क - ७०२८५२६९८४ आमची चार एकर जमीन असून, प्रत्येकी दोन एकरांत ऊस व मोसंबीची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी मोसंबी पिकातून सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा पाणीटंचाई निर्माण झाल्याने बाग जतन करण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागले. वारंवार दुष्काळ पडत असल्याने भविष्यात उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये यासाठी एप्रिलमध्ये शेततळे घेतले आहे. -चंद्रकांत अंकुशराव बोबडे संपर्क - ९४२१६४३३०२ आम्ही दोन एकर दहा गुंठ्यांत मोसंबी घेतली. यंदा चार वर्षे पूर्ण झाली. मोसंबीला ३५ हजार रुपये प्रतिटन दर मिळाला आहे. या पिकातून आर्थिक सक्षमता चांगली मिळू लागली आहे. -तुळशीराम वानखेडे संपर्क - ९५४५५७८७७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com