‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा उत्पादनाला बळ

नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी नागपूर- काटोल भागात ‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानाचा आधार शेतकरी घेऊ लागले आहेत. त्यातून विविध शिफारशींसह सधन लागवडीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. दादासाहेब काळे (झिल्पी) यांनी याच माध्यमातून उत्पादकता वाढवण्यास सुरवात केली आहे.
-दोन ओळींत सहा मीटर अंतर सोडले आहे.
-दोन ओळींत सहा मीटर अंतर सोडले आहे.

नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी नागपूर- काटोल भागात ‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानाचा आधार शेतकरी घेऊ लागले आहेत. त्यातून विविध शिफारशींसह सधन लागवडीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. दादासाहेब काळे (झिल्पी) यांनी याच माध्यमातून उत्पादकता वाढवण्यास सुरवात केली आहे. जागतिक स्तरावर तसेच देशाच्या अन्य भागात असलेल्या संत्रा वाणांच्या तुलनेत नागपुरी संत्र्याची उत्पादकता कमी आहे. सातपुडा पर्वत रांगा तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण या वाणाला अधिक पोषक आहे. आता या भागातील शेतकऱ्यांसाठी ‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सधन लागवडीचा पर्याय उपलब्ध होत आहे. सन १८३६ च्या दरम्यान कोलकता स्वारीवर असलेले नागपूरचे राजे रघुजी भोसले यांना मणिपूर भागातून संत्रा रोपे भेट म्हणून देण्यात आली. नागपूरला परतल्यानंतर त्यांनी त्यांची लागवड केली. काही वर्षांनी त्यास फळधारणा झाली. दक्षिण भागात खासी जातीचा संत्रा होतो. तेच संत्रा वाण राजे रघुजी भोसले यांना मिळाले असावे असे तज्ज्ञ सांगतात. परंतु या भागातील वातावरणात त्यातील गुणधर्मांमध्ये बदल झाला. त्यामुळेच आंबट-गोड चव, रंग ही गुणवैशिष्ट्ये या संत्र्याला प्राप्त झाली. जागतिक स्तरावर मागणी असलेल्या या नागपुरी संत्र्याची उत्पादकता जेमतेम आहे. महाराष्ट्रात सुमारे एक लाख ३५ हजार हेक्टरवर नागपुरी संत्र्याची लागवड होते. हेक्टरी सरासरी उत्पादन साडेपाच टनांपर्यंतच आहे. याउलट पंजाब मधील किनो जातीचा संत्रा ४७ हजार हेक्टर क्षेत्रात होतो. तरीही त्याची प्रति हेक्टर उत्पादकता जास्त आहे. नागपुरी संत्रा वाणाची उत्पादकता देखील वाढावी अशी मागणी त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधून होत होती. ‘इंडो-इस्राईल सेंटर फॉर एक्सलन्स’ भारत आणि इस्राईल सरकार यांच्यात तंत्रज्ञान सहकार्याबाबत सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ विविध पिकांसाठी विकसित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत नागपूर कृषी महाविद्यालयाने नागपुरी संत्र्याची उत्पादकता वाढावी यासाठी सन २०१०-११ पासून या तंत्रज्ञानाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये हेक्‍टरी झाडांची संख्या वाढविली जाते. पारंपरिक लागवड पद्धतीत सहा बाय सहा मीटर हे अंतर शिफारशीत आहे. या अंतरानुसार हेक्‍टरी २७८ झाडे बसतात. मात्र झाडांची संख्या दुप्पट झाल्यास उत्पादकता वाढणार हे निश्चित. त्यातूनच या लागवडीला प्रोत्साहन देत दोन ओळीत सहा मीटर तर दोन झाडांमध्ये तीन मीटर असे अंतर शिफारशीत करण्यात आहे. यामध्ये हेक्‍टरी झाडांची संख्या २७८ वरून दुप्पट म्हणजे ५५५ पर्यंत होते. लागवड तंत्र शेतकरी सहा बाय सहा मीटर अंतरावर लागवड करतात. कृषी विद्यापीठाने सहा बाय सहा, सहा बाय चार, तीन व दोन मीटर अशा विविध लागवड अंतराच्या चाचण्या घेतल्या. गादीवाफा व सपाट वाफे तसेच जंबेरी आणि रंगपुर या खुंटांचा वापर केला गेला. छाटणी करण्यासाठी इटलीहून यंत्र आणले आहे. नागपूर कृषी महाविद्यालयांतर्गत काटोल येथे २ व अचलपूर आणि अकोला येथे प्रत्येकी एक याप्रमाणे ते शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध केले आहे. सर्व चाचण्यांअंती कृषी विद्यापीठाने सहा बाय तीन मीटर (वीस बाय दहा फूट) लागवड अंतर तसेच जमिनीपासून दहा फुटावर प्रूनिंग अशा प्रकारची शिफारस केली आहे. प्रकल्पाचे तज्ञ डॉ. रमाकांत गजभिये यांनी याबाबत माहिती दिली. प्रकल्पांतर्गत सात शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील चार तर अमरावती जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा याकरिता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. प्रकल्पासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून निधीची उपलब्धता करण्यात आली. सद्यःस्थितीत ५०० हून अधिक शेतकऱ्यांव्दारे इंडो इस्राईल पद्धतीने लागवड झाल्याचे नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले. रोग नियंत्रणात पारंपारिक लागवड पद्धत असणाऱ्या भागात शेतकरी बागेला पाटपाणी देतात. काही भागात ठिबकचा पर्याय देखील अवलंबिला जातो. मात्र संत्र्याची झाडे आणि मुळे पाण्याच्या सतत संपर्कात राहत असल्याने ‘फायटोप्थोरा’चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते. इंडो-इस्राईल तंत्रज्ञानामध्ये गादीवाफ्यावर लागवडीची शिफारस आहे. त्यासोबतच ‘डबल लॅटरल’, ‘फर्टिगेशन’ आदींच्या शिफारशींचाही समावेश आहे. परिणामी झाडांचा संपर्क पाण्याशी येत नाही. मुळांनाच पाणी उपलब्ध होते. त्यामुळे फायटोप्थोराचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यास देखील हे तंत्रज्ञान पूरक ठरले आहे. काळे यांचा अनुभव झिल्पी (काटोल) येथील दादासाहेब काळे यांची ५० एकर संत्रा बाग आहे. सन २०१६ पासून इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर ते बागेत करीत आहेत. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या बेडची तळातून रुंदी दहा फूट, उंची तीन फूट तर ‘टॉप’ एक मीटर आहे. तणांचा प्रादुर्भाव रोखणे त्यासोबतच पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी अल्ट्रा व्हॉयलेट मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. झाड लावण्यासाठी कात्रीने मल्चिंग पेपर कापले असता फायबर निघण्याची भीती होती. त्यामुळे लागवडी नुसार अंतर निश्चित करण्यासाठी ‘मार्किंग’ केले. उच्च गुणवत्तेचा मल्चिंग पेपर वापरल्याचे काळे सांगतात. अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी त्यांनी चर काढले आहेत. आसामहून कुंपण आणले आहे. उत्तर दक्षिण लागवड केली आहे. या तंत्रज्ञानानुसार दोन वर्षांपूर्वी एकरी १० टन व मागील वर्षी एकरी १० टन उत्पादन मिळाल्याचे काळे यांनी सांगितले. संपर्क- दादासाहेब काळे- ९४२२१४९२९८ डॉ. रमाकांत गजभिये- ८५३०४५२३८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com