जनावरांतील गोचीड ताप

गोचिड नियंत्रणासाठी गोठा आणि जनावरांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
गोचिड नियंत्रणासाठी गोठा आणि जनावरांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

गोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच शेपटीच्या मागील भागांवर आढळतात. गोचीड आपली सोंड जनावराच्या त्वचा व मांसल भागामध्ये खोलवर खुपसून सायफन पद्धतीद्वारे रक्त शोषतात. एकदा चावा घेतल्यावर पोटभर रक्त शोषल्याशिवाय त्या जनावरांचे शरीर सोडत नाहीत.   जनावरांच्या अंगावर मुख्यतः कान व शेपटीच्या मागे, तोंडावर, छातीच्या भागावर तसेच कासेवर गोचीड चिकटलेले असतात. गोचीड रोज हळूहळू जनावराच्या शरीरातील रक्ताचे शोषण करत असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर कोणत्याही आजाराला सहज बळी पडते. गोचीड विविध रोगप्रसार करणाऱ्या रक्तातील जिवाणू, विषाणू व एक पेशीय परजीवींचा देखील प्रसार करतात. त्यामुळे जनावरे एक पेशी परजीवीला बळी पडतात. त्यामुळे माणसांमध्ये व जनावरांमध्ये ताप येतो. गोचीडाच्या चाव्यामुळे येणाऱ्या तापाला ‘गोचीड ताप' असे म्हणतात. गोचिडीद्वारे थायलेरीयाओसीस, बेबेओसीस, ॲनापालज, ॲलीकओसीस या एकपेशी परोपजीवींचा प्रसार होतो. माणसामध्ये केएफडी व सीसीएचएफ या रोगांचा प्रसार गोचिडीमार्फत होतो.   गोचीडचे प्रकार हार्ड गोचीड ः

  • या गोचिडीचे बाह्य आवरण टणक असते. शरीर गोल किंवा अंडाकृती आकाराचे असते. डोके आयताकृती, त्रिकोणी किंवा षट्कोनी आकाराचे असते.
  • नर गोचीड आकाराने लहान असून ते जनावरांच्या शरीरावर फार काळ राहत नाहीत. तर मादी गोचीड आकाराने मोठा (वाटाणा/शेंगदाण्याच्या बी सारखा) असून प्रामुख्याने रक्त शोषणाचे कार्य करते. याद्वारे थॉलेरीयाओसीस, बेबेओसीस, ॲनापालज, ॲलीकओसीस सारख्या प्राणघातक रोगांचा प्रसार होतो.
  • गोचीडच्या सवयी ः

  • गोचिडीचा प्रादुर्भाव हा वातावरणातील पोषक तापमान व आर्द्रतेवर अवलंबून असतो.
  • त्यांना विशिष्ट प्रकारच्या यजमानाची आवश्‍यकता नसते. त्या कोणालाही चावा घेतात. काही गोचीड त्यांच्या जीवनकाळातील सर्व अवस्था एकाच जनावरावर तर काही वेगवेगळ्या जनावरांवर पूर्ण करतात.
  • गोचीड कान, पंजा, उदर, बारीक व मलमलीत त्वचा तसेच शेपटीच्या मागील भागावर आढळतात.
  • गोचीड आपली सोंड जनावराच्या त्वचा व मांसल भागामध्ये खोलवर खुपसून सायफन पद्धतीद्वारे रक्त शोषतात.
  • एकदा चावा घेतल्यावर पोटभर रक्त शोषल्याशिवाय त्या जनावराचे शरीर सोडत नाहीत.
  • हानिकारक प्रभाव ः काटेरी जखम ः चावा घेतलेल्या भागामध्ये जिवाणूंच्या प्रभावामुळे दुखापत होते. रक्त शोषण्याची सवय ः एक मादी गोचीड एका दिवसामध्ये ०.५ ते २ मिलि रक्त शोषते. त्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन ॲनिमिया होतो. तसेच रोग प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात कमी होते. गोचीड लखवा ः

  • इक्‍टोडीअस नावाच्या गोचडामुळे कुत्रा व मांजरामध्ये श्‍वसननलिकेचा लकवा आढळून येतो.
  • या लकव्यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. मृत्यू मुख्यतः गोचीड संख्या, गोचिडीचा कालावधी व गोचिडीचे जनावरांच्या शरीरावरील स्थान या गोष्टींवर अवलंबून असतो.
  • गोचिडाच्या चाव्यामुळे जनावराचे खाणे कमी होते. त्यामुळे दूध उत्पादनात घट येते.
  • नियंत्रण

  • सर्वात प्रभावी आणि महत्त्वाची पद्धती म्हणून डिपिंग पद्धत ओळखली जाते. यामध्ये जनावराचे पूर्ण शरीर हे खड्ड्यामध्ये मिसळलेल्या द्रावणात बुडवले जाते. त्यामुळे जनावराच्या पूर्ण शरीरावर औषधाचा समप्रमाणात व योग्य प्रकारे उपयोग होतो.
  • औषधांचा डस्टिंग, फवारणी (यंत्राच्या साहाय्याने किंवा हाताद्वारे) पद्धतींने वापर केला जातो.
  • निरुपयोगी चारा जाळून टाकल्यामुळे गोचीडच्या सर्व अवस्था नाहीशा होण्यास मदत होते.
  • जमिनीची मशागत करावी. सूर्यप्रकाशामुळे गोचीडचा नायनाट होण्यास मदत होते.
  • चारा क्षेत्रामध्ये जनावरांना चरायला सोडू नये. त्यामुळे गोचीड भुकेमुळे मरून जातात.
  • जैविक नियंत्रण ः

  • मेलिनिस/सिनोडॉन/पेनिसॅटम सारख्या गवतामुळे गोचीड नियंत्रण करता येते.
  • जनावरांच्या गोठ्यातील कुक्कुट पक्ष्यांच्या वावरामुळे गोचिडीचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
  • आनुवंशिक नियंत्रण ः काही जनावरांमध्ये गोचिडीचा प्रादुर्भाव होत नाही. या आनुवंशिक गुणधर्मामुळे त्यांच्यामध्ये गोचिडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. अशा प्रकारची जनावरे गोठ्यामध्ये असणे आवश्‍यक आहे. तसेच गाई व म्हशींचा गोठा वेगळा असावा. लसीकरण ः बीएम-८६ ही लस बुफिलस मायक्रील्पस या जातीच्या गोचिडीसाठी प्रभावीपणे वापरली जाते. जनावरांचे ग्रुमिंग ः यामध्ये जनावरांच्या शरीरावरील गोचीड ब्रशद्वारे काढल्या जातात. ग्रुमिंग केल्यामुळे जनावरांच्या त्वचेतील रक्ताभिसरण क्रिया सुधारते. तसेच, विविध त्वचारोग कमी होण्यास मदत होते. गोठ्याचे व्यवस्थापन ः जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा. गोठा सिमेंट काँक्रीटचा असल्यास, त्यामध्ये पडलेल्या भेगा सिमेंटने भरून घ्याव्यात. कारण अशा भागांत गोचीड सहज लपून बसतात व अंडी घालतात. त्यामुळे गोठ्यातील भेगा किंवा छिद्र लिपून घ्यावीत व कीटकनाशकांची फवारणी करावी.   गोचीड ताप आलेल्या जनावरांची काळजी ः

  • गोचीड ताप आलेल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी. आजारी जनावरे गोठ्यापासून बाजूला बांधावीत.
  • पशुवैद्यकियांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. किमान ५ दिवस औषधोपचार करणे आवश्‍यक आहे.
  • निरोगी जनावरांमध्ये हा रोग पसरणार नाही याची काळजी घ्यावी.
  • संपर्क ः डॉ. प्रशांत पवार, ९७३०३८३१०७ क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ (जि. सातारा) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com