आदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची शेती 

-तिजारे यांच्या बागेतील संत्रा झाडे
-तिजारे यांच्या बागेतील संत्रा झाडे

संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यात पारडसिंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील प्रमोद तिजारे यशस्वी झाले आहेत. संत्रा व्यवस्थापनाचा आदर्श घालून देणाऱ्या प्रमोद यांनी भाजीपाला लागवडीसाठी नजीकच्या काळात करारावर शेती कसण्याची पद्धत अवलंबिली आहे. नागपूर बाजारपेठ जवळ असल्याने सुमारे पाच एकरांवर त्यांची फ्लॉवरची लागवड असते.     नागपूर जिल्ह्यात पारडसिंगा (ता. काटोल) येथील प्रमोद तिजारे यांचे वडील परशरामजी यांनी ३० वर्षांपूर्वी संत्रा लागवड केली. त्या वेळी सुमारे एक हजार झाडांचे व्यवस्थापन त्यांच्याद्वारे व्हायचे. त्यातील सुमारे १५० झाडे योग्य व्यवस्थापन व पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून जगविण्यात प्रमोद यांना यश आले आहे. टप्प्याटप्प्याने भाऊ विनोद यांच्यासोबत काम करीत बागेतील संत्रा झाडांची संख्या त्यांनी अडीच हजारांवर पोचवली आहे.  संत्रा लागवड  बागेत सुमारे १६००, तर पाच वर्षांची सुमारे ६०० झाडे आहेत. नवी बागदेखील या वर्षी उत्पादनक्षम करण्यात यश आले आहे. थेट व्यापाऱ्यांना विक्री करण्यावर भर राहतो.  सन २०१६-१७ मध्ये ३८ हजार रुपये प्रतिटन, २०१७-१८ मध्ये २७ हजार रुपये प्रतिटनाप्रमाणे दर मिळाला. यंदा पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही बाग जगविण्यात तिजारे यशस्वी ठरले.  दुष्काळात जगविली बाग  बोअरवेल, विहीर यांसारखे पाण्यासाठीचे पर्याय आहेत. त्यांचा नियोजनबद्ध वापर करीत बाग जगविता आली. ठिबकदेखील फायदेशीर ठरले. बागेतील तण त्याच ठिकाणी वापरल्याने मल्चिंगसारखा त्याचा वापर झाला. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्‍वर भागात या वर्षी पाण्याचा अभाव आणि उन्हाच्या वाढत्या चटक्‍यामुळे अनेक बागा जळाल्या. परंतु सुयोग्य व्यवस्थापनातून बाग जगविण्यात तिजारे यशस्वी ठरले.  संयुक्‍त कुटुंबाचा जपला आदर्श  तिजारे कुटुंबीयांची २५ एकर शेती आहे. त्यातील ११ एकरांत संत्र्याची उत्पादनक्षम झाडे आहेत. पूर्वी टोमॅटो, फ्लॉवर, टरबूज यांसारखी पिके संत्र्यात घेण्यावर भर होता. आज फ्लॉवरची करार शेती तिजारे करतात. दोन भावंडांचे संयुक्‍त कुटुंब असून, घरचीच माणसे शेतीत राबत असल्याने मजुरांवरील खर्च वाचतो.  व्यवस्थापन  जमिनीचा पोत कायम राहावा यासाठी शेणखताचा भरपूर वापर केला जातो. दोन बैलजोड्या, एक म्हैस, एक गाय अशी जनावरे आहेत. मात्र तेढे खत पुरेसे ठरत नाही. अशा वेळी ते बाहेरूनही खरेदी केले जाते. यंदा पाच एकर शेती करारावर आहे. फ्लॉवरची रोपे नेटमध्ये व गादीवाफ्यावर तयार केली जातात. हा गादीवाफा १०० फूट लांब, चार फूट रुंद तयार करण्यात येतो. पुनर्लागवडीतील क्षेत्रात वर्षातून एकदा एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखताची मात्रा दिली जाते. गावरान बियाणे असल्यास ८० ते ९० दिवसांत, तर संकरित वाण असल्यास पीक त्याआधी परिपक्‍व होते असा अनुभव आहे. देशी बियाणे वापरल्यास एकरी १२ टन, तर संकरित वाणाचे एकरी १६ टनांपर्यंत उत्पादन मिळते.  मार्केटिंगचा पर्याय  भाजीपाला वाहतुकीसाठी स्वतःच्याच वाहनाचा पर्याय ठेवला आहे. बाजारात आवक वाढून दरात घसरण झाल्यास नफ्याचे प्रमाण अत्यंत घसरते. काही वेळा पीक काढून टाकण्याचीही वेळ येते.  रायपूर (छत्तीसगड), छिंदवाडा (मध्य प्रदेश) तसेच नाशिक भागातून कळमणा (नागपूर) बाजार समितीत भाजीपाल्याची आवक होते. त्याचादेखील दरांवर परिणाम होतो.  निर्यातक्षम संत्रा उत्पादन  प्रमोद आणि विनोद तिजारे यांनी संत्रा बागेच्या व्यवस्थापनात आदर्श तयार केला आहे. नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी नुकतीच त्यांच्या बागेला भेट दिली. त्यांच्या बागेतील आंबिया बहारातील संत्रा खरेदी प्रस्तावित आहे.  तिजारे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

  • सुमारे ३० वर्षे जुनी १५० झाडे जगविण्यात यश. 
  • सेंद्रिय आणि रासायनिक निविष्ठांचा नियोजनबद्ध वापर. 
  • व्यवस्थापनाच्या बळावर दर्जेदार संत्रा उत्पादन. 
  • अन्य राज्यांतील व्यापाऱ्यांना बाग देण्यावर भर 
  • शेतातील तणाचे जागेवरच मल्चिंग . 
  • संपूर्ण अडीच हजार झाडांचे पाणी व्यवस्थापन ठिबकद्वारे. 
  • करारावरील पाच एकर शेतीत कोबी लागवड. 
  • बोअरवेल व विहीर पाण्याचे स्रोत. 
  • शेती व्यवस्थापनात भाऊ विनोदचे सहकार्य. 
  • एकत्रित कुटुंब पद्धतीचा जपला आदर्श. 
  • संपर्क- प्रमोद तिजारे - ९८२३८५७५१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com