विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’ची अट- लढायचंय नव्या समस्यांशी

मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) व अन्य विषाणूजन्य रोगांची गंभीर समस्या उद्‍भवली. तर रशियाने द्राक्षात फळमाशी आढळल्याच्या कारणावरून भारताला ‘अलर्ट’ जारी केला.
कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगामुळे प्रादुर्भावित झालेली टोमॅटोची फळे
कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगामुळे प्रादुर्भावित झालेली टोमॅटोची फळे

मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) व अन्य विषाणूजन्य रोगांची गंभीर समस्या उद्‍भवली. तर रशियाने द्राक्षात फळमाशी आढळल्याच्या कारणावरून भारताला ‘अलर्ट’ जारी केला. राज्यातील द्राक्ष बाग क्षेत्र कीडमुक्त असल्याची हमी देणारी नवी अट लादली. किडी-रोगांच्या नव्या समस्या, त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय व्यापारातील नवे निकष समोर येत आहेत. ताज्या घटनांच्या निमित्ताने या समस्यांची केलेली उकल.   मागील वर्षी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो पट्ट्यात (संगमनेर, नारायणगाव, फलटण- सातारा, नगर) उन्हाळी हंगामात अज्ञात रोगाची गंभीर समस्या आढळली. परिश्रमपूर्वक फुलवलेल्या टोमॅटोचे बाजारमूल्य घसरून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यातच कोरोना लॉकडाउनचे संकट तीव्र असल्याने रोगाचे निदान करून घेणे अशक्य झाले. त्यातूनही शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व बियाणे कंपन्यांनी प्रादुर्भावग्रस्त नमुने शास्त्रीय परीक्षणासाठी बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेकडे (आयआयएचआर) पाठवले. अशी लक्षणे दिसतात 

  • टोमॅटो पिवळा पडणे, आकार वेडावाकडा होणे
  • तपकिरी, लालसर, हिरवट चट्टे
  • फळ कडक होणे, न पिकणे
  • काही ठिकाणी शेंडे पिवळसर
  • काय आढळले परीक्षणात?

  • -एकूण २० नमुन्यांचे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, इलायसा व पीसीआर या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे परीक्षण
  • पुढील विषाणूजन्य रोग आढळले   १) कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) ८० टक्के  वाहक- मावा किडी २) ग्राउंटनट बड नेक्रॉसिस व्हायरस (जीबीएनव्ही)- (टॉस्पोव्हायरस)- २० टक्के - वाहक थ्रिप्स (फुलकिडे) ३) टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस (टीसीव्ही) २० टक्के वाहक- पांढरी माशी  

    वरील तीन रोग सर्वांत महत्त्वाचे ४) टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टीबीव्हीडीव्ही) १५ टक्के- वाहक मावा ५) टोमॅटो लीफ कर्ल न्यू दिल्ली व्हायरस  १० टक्के -वाहक पांढरी माशी ६) टोमॅटो मोझॅक व्हायरस (टीओएमव्ही) १० टक्के - बियाण्यातून प्रसार     ‘आयआयएचआर’चे विषाणूशास्त्रज्ञ व वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. कृष्णा रेड्डी यांनी ‘सीएमव्ही’ रोगाच्या अनुषंगाने दिलेली महत्त्वाची माहिती. प्रादुर्भावाचे प्रमुख कारण

  • ‘सीएमव्ही’ रोगाला मुख्य कारणीभूत वाहक मावा.
  • त्याच्या तीन मुख्य प्रजाती
  • ऑफिस क्रॅसिव्होरा
  • ऑफिस गॉसिपी
  • मायझस पर्सिकी
  • -थंड हवामानात त्यांचा आढळ व पुनरुत्पादन अधिक. तापमान उष्णतेकडे वाढले की त्यांचे प्रमाण कमी होते. लक्षणे उन्हाळ्यात का दिसतात? थंडीत माव्याच्या प्रादुर्भावानंतर झाडांत १० ते १५ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. मात्र या विषाणूने अलीकडील काळात थोडा बदल केल्याचे जाणवते. त्याची लक्षणे थेट फळांत दिसू लागतात. त्या वेळी उन्हाळ्याचा हंगाम असतो. त्यामुळेच रोगाची कल्पना त्वरित ध्यानात येत नाही. खरिपात धोका आहे काय? पावसात माव्याचा धोका असत नाही. मात्र पाऊस पडून गेल्यानंतर तापमान खाली येते. त्या वेळी मावा वाढू शकतो. प्रामुख्याने रब्बी व उन्हाळी हंगामात जास्त धोका राहतो.   सान्निध्यातील पिकांची जोखीम

  • टोमॅटो व मिरची ही दोन पिके एकमेकांजवळ असतील तर मोठा धोका. कारण मावा व ‘सीएमव्ही’ दोन्ही पिकांत पसरतो.
  • तीच बाब काकडीबाबतही लागू.
  • एकाच वर्षात टोमॅटो, मिरची व बटाटा ही पिके घेतल्यास जोखीम
  • वांग्यात मावा अढळू शकतो. पण हा विषाणू नाही.
  • गव्हाचे पीक व शेजारी टोमॅटो आहे तेथे माव्याची जोखीम असू शकते. काळा मावा टोमॅटोपेक्षा गव्हाला अधिक पसंत करतो. मात्र टोमॅटोतील रस पिऊन गेला, तरी सीएमव्हीसाठी पुरेसे असते. गव्हात ‘सीएमव्ही’ आढळत नाही.
  • ‘आफिस गॉसिपी’ मावा कापूस व भेंडीत अधिक आढळतो.
  • पंखी माव्यामुळे अधिक धोका. कारण एका पिकावरून दुसऱ्या पिकावर दूरपर्यंत प्रसार करण्याची क्षमता.
  • ‘सीएमव्ही’च्या अनुषंगाने अद्याप ढोबळी मिरचीचे तेवढे सर्वेक्षण झाले नाही. आतापर्यंत तपासलेल्या नमुन्यांमध्ये तो आढळला नाही. मात्र त्यात समस्या असू शकते. पॉलिहाउसमधील मिरचीच्या तपासलेल्या काही नमुन्यांत ‘लीफ कर्ल व्हायरस’ मुख्य आढळला.
  • केळीत सीएमव्ही वाढतोय डॉ. रेड्डी म्हणाले, की त्रिची येथील संशोधन केंद्रातील मित्र श्री. सेल्व्हराजन यांनी महाराष्ट्रात दहा दिवसांचा अभ्यास दौरा करून सर्वेक्षण व अहवाल तयार केला. त्यातून अलीकडील काळात या राज्यातील केळी पिकात सीएमव्ही मोठ्या प्रमाणात दिसू लागल्याचे आढळले आहे.   प्रादुर्भावाची अन्य कारणे व उपाय

  • एका पिकानंतर दुसरे पीक त्वरित घेतले जाते. त्यात किमान एक ते दोन महिन्यांचा विश्रांती कालावधी हवा.
  • पीक फेरपालट अत्यंत गरजेची. टोमॅटोनंतर शेंगावर्गीय (बीन्स) किंवा द्विदलवर्गीय पिके घ्यायला हवीत.
  • बनावट वा भेसळयुक्त कीडनाशके बाजारात मिळतात. आमचे उत्पादन विषाणूला मारते असे सांगून चुकीचे दावे केले जातात. हे चुकीचे आहे. विषाणूला मारता येत नाही. त्याचे केवळ व्यवस्थापन करता येते.
  • केवळ रासायनिक खतांचा वापर करून चालणार नाही. जमिनीला ताकद मिळायला हवी. ती कमी झाली की पिकात विविध समस्या तयार होऊ लागतात. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. तो सुधारणे गरजेचे आहे.
  • रासायनिक कीडनाशकांचा वापर अधिक प्रमाणात होतो. आपण सेंद्रिय कीडनाशकांचा वापर जितका वाढवू तेवढे मित्रकीटक वाढतील. त्यांची संख्या वाढवायची तर वाढ व पुनरुत्पादनासाठी हवामान व पोषक स्थितीही असायला हवी.
  • दौऱ्यातील निरीक्षणे डॉ. रेड्डी यांनी नारायणगाव, संगमनेर व नाशिक भागात नुकतेच काही टोमॅटो प्लॉट्‍स व रोपवाटिका यांचे सर्वेक्षण केले. तीन ठिकाणी शेतकऱ्यांसोबत बैठकांद्वारे संवादही साधला. दोन शेतांमध्ये काढणीच्या अवस्थेतील टोमॅटो प्लॉटमध्ये काही प्रमाणात ‘सीएमव्ही’ आढळला. फळ येण्यास सुरू झालेल्या अन्य शेतात रोगाचा प्रादुर्भाव तब्बल ९० टक्के होता. माव्याचे प्रमाणही तेथे मोठ्या प्रमाणात आढळले.   उचललेली पावले मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये ऑनलाइन वेबिनारद्वारे शेतकऱ्यांचे प्रबोधन व मार्गदर्शन यापुढे

  • नारायणगाव, संगमनेर व नाशिक अशी तीन प्रातिनिधिक ठिकाणी एकात्मिक कीड-रोग नियंत्रण’ (आयपीएम) पथदर्शक चाचण्या प्रकल्प राबवणार.
  • नर्सरी व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना नर्सरी, पुनर्लागवड ते काढणीपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन
  • प्रत्येक पट्ट्यातील हवामान, पीक पद्धती, शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसेस यांचा अभ्यास. त्यानुसार
  • भागनिहाय अनुकूल ‘आयपीएम शेड्यूल’ तयार होणार.
  • शेतकऱ्यांसह कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बियाणे उद्योगातील कंपन्या अशा सर्व घटकांचा प्रकल्पात सहभाग.
  • राज्यातील शेतकऱ्यांना चाचण्यांचे निष्कर्ष प्रत्यक्ष पाहता येणार
  •  तिरंगा काय आहे?

  • टोमॅटो फळात आढळणारी लक्षणे ‘तिरंगा’ या स्थानिक नावाने शेतकऱ्यांत लोकप्रिय.
  • झाडात एकावेळी एक किंवा त्याहून अधिक रोग एकमेकांसोबत असतात. (कॉम्प्लेक्स)
  • ‘सीएमव्ही’मध्ये टोमॅटोला पूर्ण हळदीचा वा पिवळा रंग येतो.
  • ‘टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस’मध्ये फळावर पिवळे ठिपके दिसतात.
  • ग्राउंटनट बड नेक्रॉसिस व्हायरस’मध्ये नेक्रॉटिक वा क्लोरोटिक रिंग्ज दिसतात. गुलाबी रंग दिसतो.
  •  प्रतिकारक वाण आहेत का? ‘सीएमव्ही’ला सहनशील किंवा प्रतिकारक वाण टोमॅटो पिकात भारतातच नव्हे, पण जगातही उपलब्ध नाहीत. काकडी पिकात मात्र उपलब्ध आहे. पूर्वी टोमॅटोत ‘लीफ कर्ल व्हायरस’ हा पांढऱ्या माशीमार्फत पसरणारा रोग सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळत होता. बहुतांश बियाणे कंपन्यांनी त्याला प्रतिकारक वाण आणले. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी झाले. ‘सीएमव्ही’ ला प्रतिकारक वाणावर ‘आयआयएचआर’ व खासगी कंपन्यांमध्येही काम सुरू आहे. त्याला तीन ते पाच वर्षे लागू शकतात. वाणांच्या चाचण्यांचे प्राधान्य कोणत्याही कंपन्यांचे वाण बाजारात येण्यापूर्वी त्याच्या चाचण्या संबंधित कृषी विद्यापीठांत घेतल्या जातात. मात्र संबंधित रोगाच्या अनुषंगाने चाचणी घेताना तेथे तेवढ्या तीव्रतेत तो रोग असेलच असे नाही. उलटपक्षी अशा चाचण्या सातत्याने प्रादुर्भाव असलेल्या भागांत घेतल्यास त्याचे परिणाम अधिक ठळक समोर येऊ शकणार नाहीत का? ‘ॲग्रोवन’ ने उपस्थित केलेल्या या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. रेड्डी म्हणतात, की टोमॅटो मुख्य पीक व वारंवार ‘सीएमव्ही’ वा अन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसतो अशा भागात घेतलेल्या चाचण्या अधिक फायदेशीर ठरू शकतात. खासगी कंपन्या ते करतातही. शेतकऱ्यांच्या पीकपद्धती, लागवड हंगाम वेगवेगळे असू शकतात. त्यादृष्टीनेही ते गरजेचे राहील. शिवाय चाचण्या यशस्वी ठरल्यास परिसरातील शेतकऱ्यांना दाखवता येतील. प्रत्येक विद्यापीठाचे त्या त्या भागात कृषी विज्ञान केंद्र आहे. त्यांची मदत घेता येईल. टोमॅटो ब्राऊन रोगस व्हायरस विषयी ‘सीएमव्ही’चे निदान होण्यापूर्वी टोमॅटोत ‘ब्राऊन रुगोस फ्रूट व्हायरस’ असल्याचे तर्क वर्तविण्यात येत होते. पुढे हा रोग नसल्याचे स्पष्ट झाले. सन २०१५ च्या सुमारास जॉर्डन, इस्राईलमध्ये हा रोग उद्‍भवला. तेथे तयार झालेले टोमॅटोचे बियाणे युरोपात पाठवण्यात आले. तेथे पॉलिहाउसमध्ये प्रुनिंग, कटिंगच्या माध्यमातून एका झाडातून दुसऱ्या झाडात पाणी, कात्री, चाकू यांच्या वापरातून संसर्ग होत राहिला. हा रोग किडींमार्फत पसरत नाही. अमेरिकेतही काही प्रमाणात हा रोग पोचला. पण बियाणे जाळून निर्मूलन करण्यात आले. आपल्याकडे शेती खुल्या पद्धतीची आहे. हा रोग आला तरी रोखणे व जाळून नष्ट करणे शक्य आहे. 

    आपल्याकडे ‘टोबॅको मोझॅक व्हायरस’ पहिल्यापासून आहे. ‘टोमॅटो स्ट्रीक व्हायरस’ अन्य पिकांत होता. टोमॅटोत नव्हता. सद्यःस्थितीत एक टक्का प्रमाणातच आहे. ‘टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस’ टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, काकडीत येऊ लागला आहे.   केवळ माल नव्हे तर क्षेत्रही हवे कीडमुक्त द्राक्ष हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे पीक आहे. देशातील एकूण द्राक्षनिर्यातीत राज्याचा वाटा ९० टक्क्यांहून अधिक आहे. मागील वर्षी रशियाने द्राक्षात फळमाशी (फ्रूट फ्लाय) आढळल्याच्या मुद्द्यावरून भारताला ‘अलर्ट’ जारी केला. खरे तर ‘ग्रेपनेट’ व त्या अंतर्गत ‘आरएमपी’ (रेसिड्यू मॉनिटरिंग प्लॅन) माध्यमातून आपण युरोपीय देशांना दरवर्षी यशस्वी निर्यात करतो. मात्र फळमाशीचा नवा मुद्दा द्राक्षात मागील वर्षी प्रथमच उपस्थित झाला. आयातदार देशांकडून नवे नियम राज्याच्या कृषी विभागाचे शेतीमाल निर्यात सल्लागार गोविंद हांडे म्हणतात, की निर्यातीसाठी आवश्‍यक प्रमाणपत्रांपैकी ‘फायटो सॅनिटरी’ हे आवश्‍यक असते. त्यानुसार संबंधित माल किडी-रोगमुक्त असल्याची हमी दिली जाते. माल रासायनिक अवशेषमुक्त असणेही बंधनकारक असते. आता त्या व्यतिरिक्त काही आयातदार देशांकडून केवळ माल कीड-रोगमुक्त नको, तर त्याचे उत्पादन होणारे क्षेत्र संबंधित किडीपासून मुक्त हवे (पेस्ट फ्री एरिया) अशी अट लादली जात आहे. रशियाकडून या फळमाश्‍यांबाबत मिळाली सूचना

  • कॉफीन फ्लाय- Megaselia scalaris
  • ओरिएंटल फ्लाय- Bactrocera dorsalis
  • मेडिटेरेनियन फ्रूट फ्लाय- Ceratitis capitata
  • राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार रशियाकडून सूचित झालेल्या फळमाश्‍या भारतात आढळत नाहीत.

  • -आपल्याकडील द्राक्ष अनुषंगाने आढळणाऱ्या फळमाश्‍या
  • ड्रॉसोफिला मेलॅनोगेस्टर
  • झॅप्रिओनस इंडियानस
  • पाऊस येतो त्या वेळी पक्व होणाऱ्या द्राक्षात ‘क्रॅकिंग’ झाल्याने फळ सडते. अशावेळी फळमाशीचा प्रादुर्भाव होतो.
  • हांडे म्हणाले, की केंद्र सरकारने वेळीच सावध होऊन निर्यातीत असे अडथळे येणार नाहीत यासाठी पावले उचलली आहेत. कीडमुक्त क्षेत्र स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आयपीपीसी’च्या ‘आयएसपीएम’च्या (इंटरनॅशनल स्टॅंडर्डस फॉर फायटोसॅनिटरी मेजर्स) धर्तीवर मार्गदर्शक तत्त्वे- मानके (एनएसपीएम) मागील वर्षी १५ एप्रिलपासून लागू केली आहेत. केंद्रासह राज्यानेही पुढाकार घेत फळमाशीमुक्त द्राक्षक्षेत्र प्रकल्प कार्यान्वित केला आहे. प्रकल्प ठळक बाबी

  • एनआरसी, आयसीएआर, कृषी विभाग, अपेडा, क्वारंटाईन विभाग समावेशित समिती.
  • द्राक्षातील महत्त्वाचे जिल्हे, तालुका विभागात क्षेत्र, शेतकरी निवड.
  • ‘ग्रेपनेट’ अंतर्गत सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांचे नोंदणीकरण. त्यापैकी बागांचे सर्वेक्षण.
  • कीड नियंत्रण- प्रतिबंधक व निवारणात्मक- उपाय व जागृती
  • सर्वेक्षण अहवाल तयार करून केंद्र सरकार संबंधित आयातदार देशांना क्षेत्र कीडमुक्त प्रमाणपत्र देणार
  • हांडे म्हणाले, की मानवी क्वारंटाइन, प्राणी क्वारंटाइन व वनस्पती क्वारंटाइन या तीनही बाबी आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. केरळमध्ये दीड वर्षांपूर्वी निपाह विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दुबई सरकारने तेथील भाजीपाल्यावर बंदी घातली. हा प्राणिजन्य रोग मानवातही पसरू शकतो. केरळ सरकारने रोग निवारणाचा संपूर्ण कार्यक्रम राबवून तशी हमी दुबईला दिली. त्यानंतर तेथे निर्यात सुकर झाली आहे.   ‘आंतरराष्ट्रीय’ मानके व उद्देश

  • तयार केलेली ‘एनएसपीएम’ मानके केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत फरिदाबाद येथील वनस्पती संरक्षण, क्वारंटाइन व साठवणूक संचालनालयाने तयार केली आहेत.
  • कीडमुक्त क्षेत्र तयार करणे, त्याची देखभाल व तसे मुक्त क्षेत्र जाहीर करणे त्यामागील उद्देश
  • निर्यातीसाठी ‘फायटोसॅनिटरी’ म्हणून त्याचा वापर.
  • ही संस्था ‘आयपीपीसी’च्या निकषांनुसार ‘नॅशनल प्लॅंट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (एनपीपीओ)’ म्हणून जबाबदारी घेते.
  • आयपीपीसी काय आहे?

  • जागतिक अन्न व कृषी संघटनेअंतर्गत (एफएओ) ‘आयपीपीसी’ (इंटरनॅशनल प्लॅंट प्रोटेक्शन कन्वेंशन) हा आंतरराष्ट्रीय करार
  • १८० हून अधिक देशांकडून त्यावर सह्या
  • -एका देशातील कीड, रोग, तणे वा तत्सम घटकांचा दुसऱ्या देशात प्रवेश होऊ नये, प्रसार व कीड स्थापित होऊ नये, उभय देशांतील व्यापार सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी ‘आयपीपीसी’ महत्त्वाची भूमिका बजावते. त्या अनुषंगाने ‘आयएसपीएम’ तयार केले आहेत.
  • फळमाशीचे महत्त्व

  • फळमाशी ही ‘क्वारंटाईन’ कीड
  • भारतातून आंबा निर्यातीसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, युरोप आदी देशांकडून फळमाशी, मिलीबग, स्टोन व्हिव्हील, स्केल इन्सेक्ट या किडींसाठी प्रक्रिया अटी. यात हॉट वॉटर ट्रीटमेंट, व्हेपर हीट ट्रीटमेंट, इरॅडिएशन आदींचा समावेश.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही उदाहरणे

  • अन्नधान्ये, द्विदलधान्य, पिकांचे बियाणे, प्रक्रियायुक्त उत्पादनांची आयात करतेवेळी त्यांचे उत्पादन क्षेत्र ‘स्ट्रायगा’ तणापासून मुक्त असावे लागते.
  • बटाटा निर्यातीत संबंधित उत्पादन क्षेत्र अँडीयन पोटॅटो मॉटल व्हायरस,
  • अँडीयन पोटॅटो लॅटेंट व्हायरस आदी रोग, पोटॅटो सीस्ट निमेटॉडस, कोलंबिया रूट नेमॅटोड, स्मट ऑफ पोटॅटो, बॅक्टेरियल विल्ट आदींपासून मुक्त हवे.
  • युरोपीय देशांना लिंबूवर्गीय फळांच्या निर्यात करण्यासाठी ‘झॅंथोमोनास सिट्री’ या जिवाणूंपासून क्षेत्रमुक्त असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com