तरुणाने शेळीपालनातून बसविला चांगला जम

पदव्युत्तर पदवी घेतलेल्या तुकाराम गरड यांनी (रानमसले, जि.. सोलापूर) सुरवातीला दुग्धव्यवसाय व आता विविध जातींच्या शेळीपालनातून पूरक व्यवसायात चांगला जम बसविला आहे.योग्य व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व थेट मटण विक्रीचा मार्ग अवलंबित व्यावसायिक फायदा मिळविण्यास सुरवात केली आहे.
शेळ्यांचे सुयोग्य शेड.
शेळ्यांचे सुयोग्य शेड.

पदव्युत्तर पदवी घेतलेल्या तुकाराम गरड यांनी (रानमसले, जि.. सोलापूर) सुरवातीला दुग्धव्यवसाय व आता विविध जातींच्या शेळीपालनातून पूरक व्यवसायात चांगला जम बसविला आहे. योग्य व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व थेट मटण विक्रीचा मार्ग अवलंबित व्यावसायिक फायदा मिळविण्यास सुरवात केली आहे. सोलापूर- बार्शी महामार्गावर वडाळ्यापासून आत सात-आठ किलोमीटरवर रानमसले (ता. उत्तर सोलापूर) हे गाव आहे. गावात गरड कुटुंबाची साडेतीन एकर शेती आहे. एकतर कमी क्षेत्र व पारंपरिक पीक पद्धतीमुळे आर्थिक उत्पन्न मनासारखं नव्हतं. वडील सुरेश हंगामी पिके घेत, शेतमजुरी करत घराचा गाडा ओढत आले. साधारण परिस्थितीतूनही त्यांनी नागेश आणि तुकाराम या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं. नागेश सध्या पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीत कार्यरत आहेत. तुकराम यांनी २०१४ मध्ये एमएस्सी (फिजिक्स) ही पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. त्यासाठी दोन वर्षे पुण्यात खासगी वर्गांचे मार्गदर्शनही घेतले. सन २०१५-१६ मध्ये स्पर्धा परीक्षा होऊ शकली नाही. पुढे मग शेतीतच काही तरी करावं या उद्देशानं ते गावी परतले. गाई, म्हशींचा गोठा ते शेळीपालन गावी शेतीत रमले असताना उळे (कासेगाव) येथील तानाजी कोल्हे या मित्राकडे एकदिवस गाई- म्हशींचा गोठा पाहण्यात आला. त्याचे अर्थकारण समाधानकारक वाटल्याने त्यात उतरण्याचा निर्णय घेतला. मित्राकडूनच तीन मुऱ्हा म्हशी उधारीवर घेत व्यवसायाला सुरवात केली. पुढे त्यातून चांगलं उत्पन्न मिळालं. मित्राचे पैसेही फेडले. काही शिल्लक राहिले. उत्साह वाढला. पुन्हा एका खासगी कंपनीकडून दीड लाखांचं कर्ज घेऊन दोन जर्सी गायी घेतल्या. पुढे गायींची संख्या तब्बल २२ पर्यंत पोचली. शेळीपालन पूरक व्यवसायाबाबत आत्मविश्‍वास आल्यानंतर तुकाराम मग शेळीपालनाकडे वळले. मग सहा गायी आणि तीन म्हशींपर्यंत मर्यादित व्यवसाय ठेवला. सध्या दोन्हीवेळीचे मिळून एकूण ३० ते ३२ लिटर दूध संकलित होते. ते डेअरीला दिले जाते. म्हशीच्या दुधापासून तूप करून प्रति लिटर एक हजार रुपयापर्यंत त्याची विक्री होते. जनावरांना लागणारा चारा, मिळणारे दूध, मिळणारा दर, त्यात जाणारा वेळ व श्रम या सर्वांच विचार करून शेळीपालनाकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करायचे ठरवले. कृषी विज्ञान केंद्राचे डॅा. पी..व्ही.कदम यांचे मार्गदर्शन त्यासाठी मिळाले. ‘फार्म’ चा विकास साधारण २०१९ मध्ये तुकाराम यांनी दोन शेळ्यांपासून सुरवात करीत बंदिस्त शेळीपालन सुरू केले. चांगले शेड उभारले. चारा-पाण्याची व्यवस्था केली. दीड एकरांत शेवरी, घासगवताची लागवड केली आहे. आलटून-पालटून हे खाद्य उपलब्ध होईल असे नियोजन केले. आजमितीला ७३ शेळ्यांचा फार्म विकसित झाला आहे. त्यात उस्मानाबादी ३० शेळ्या, सिरोही आणि कोटा अशा जाती आहेत. सर्वाधिक शेळ्या उस्मानाबादी होत्या. मात्र अधिकचे वजन आणि मटण मिळावं यासाठी संकरीकरण केलं. त्यातूनच १० करडे तयार झाली आहेत. शेळीपालन- ठळक बाबी

  • पहाटे साडेपाच वाजता स्वच्छता.
  • सहा वाजता करडी पाजून घेतली जातात.
  • त्यानंतर शेळ्यांना प्रत्येकी पाव ते अर्धा किलो खुराक. त्यात कडधान्यांचे मिश्रण.
  • त्यानंतर हरभरा, तूर, मका, ज्वारी यांचा सुका चारा. सकाळी साडेआठ वाजता पुन्हा पाव ते अर्धा किलो या प्रमाणात ओला चारा. त्यात शेवरी, घासगवत यांचा समावेश.
  • दुपारी बारा वाजता मका कुट्टी, कडवळ, बाजरीचा प्रत्येकी पाव ते अर्धा किलो चारा.
  • दुपारी तीन वाजता शेडची स्वच्छता.
  • -दुपारी चार वाजता पुन्हा करडे पाजून घेतली जातात.
  • त्यानंतर हरभरा, तूर, मका, ज्वारी यांचा सुका चारा.
  • पाण्याची व्यवस्था जागेवरच.
  • एकदिवसा आड कडबाकुट्टी, मुरघास प्रत्येकी अर्धा किलो.
  • थेट विक्रीने वाढवला नफा दर सहा महिन्यांनी सुमारे २५ ते ३० शेळ्या आणि २५ ते ३० बकऱ्यांची विक्री होते. ३०० रुपये प्रति किलोप्रमाणे शेळी तर ४५० रुपये प्रति किलोप्रमाणे बकऱ्यांची वजनावर विक्री होते. संकरित उस्मानाबादी शेळ्यांचे वजन ३० ते ३५ किलोच्या पुढे भरते. थेट विक्री व तीही मटणाची करण्यावर अधिक भर दिला जातो. त्याचे नियोजन करण्यासाठी मजूर तैनात केला आहे. त्यामुळे केवळ शेळ्या-बकऱ्यांच्या विक्री किंमतीपेक्षा दोन-अडीच हजार रुपये जास्त मिळतात. मटण विक्रीसाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असे खास वार ठेवले आहेत. परिसरातील घरगुती आणि हॅाटेल व्यावसायिकही जागेवर येऊन खरेदी करतात. त्यासाठी ‘ॲडव्हान्स बुकिंग’ ही घेतले जाते. प्रतिकिलो ६०० रुपये प्रमाणे दर असतो. या एका दिवसात ३० ते ४० किलोपर्यंत विक्री होते. लेंडीखताची विक्री बंदिस्त शेळीपालनामुळे चांगल्या प्रमाणात लेंडीखत उपलब्ध होते. त्यास शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असून सात हजार रुपये प्रति ट्रॅाली दराने वर्षाला सात ते दहा ट्रॅाली एवढी विक्री होते. उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत त्यातून उपलब्ध झाला आहे. संपर्क- तुकाराम गरड - ९०११११९५८९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com