जास्त प्रमाणात पदार्थ सुकविण्यासाठी टनेल टाइप सौर ड्रायर

टनेल टाइप सौरड्रायर
टनेल टाइप सौरड्रायर

टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये गरम हवेचा वापर करून वाळविण्यासाठीचे पदार्थ कमीत कमी वेळात सुकवले जातात. बेदाणे, मसाल्याचे पदार्थ, मासळी इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणात सुकविता येतात.   सौरऊर्जेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर पदार्थ सुकविण्यासाठी टनेल टाइप सौर ड्रायरचा उपयोग केला जाऊ शकतो. टनेल टाइप सौर ड्रायरचे मुख्य भाग पुढीलप्रमाणे आहेत. १. सौरऊर्जा संकलक २. सुकवणी ट्रे ३. पारदर्शक आवरण ४. गरम हवा बाहेर जाण्यासाठी चिमणी

  • यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षित पॉलिकार्बोनेटची फिल्म अर्धवर्तुळाकार लोखंडी सांगाड्यावर घालण्यात येते.
  • या आवरणाद्वारे सूर्यकिरणे ड्रायरमध्ये विना अडथळा शिरतात.
  • ड्रायरचा तळभाग सिमेंट कॉंक्रिटचा असून त्यावर काळा रंग लावण्यात येतो.
  • सूर्यकिरणांमधील ऊर्जा शोषून घेतली जाते. मात्र जास्त तरंग लांबीची तळाद्वारे उत्सर्जित ऊर्जा बाहेर न पडल्यामुळे आतील तापमानात वाढ होते.
  • या ड्रायरची उंची माणूस सहज आतमध्ये जाऊन काम करू शकेल इतपत असते. त्याचे एका बाजूस साधारण १.६ बाय ०.७५ मी. आकाराचे दार असून त्याद्वारे ड्रायरमध्ये पदार्थ ठेवण्यात किंवा काढण्यात येतात.
  • या ड्रायरची उभारणी पूर्व पश्चिम अशी असते. उत्तरेकडील भिंतीवर उष्णतारोधक आवरण देण्यात येते. ज्यामुळे त्या भागातील उष्णतेचा संभाव्य ऱ्हास टाळता येतो. एक्झॉस्ट पंख्याद्वारे आर्द्रतेचे नियंत्रण करण्यात येते.
  • टनेल टाइप सौर ड्रायरच्या आतील बाजूस जमिनीवर उष्णता शोषक काळ्या रंगाचे आच्छादन केलेले असते. काळ्या रंगामुळे सौर ऊर्जा शोषली जाऊन संकलकामध्ये गरम हवेची निर्मिती होते.
  • संकलकाच्या बाजूस थंड हवेच्या प्रवेशासाठी खालील बाजूस छिद्रे असून त्याद्वारे वातावरणातील थंड हवा संकलकामध्ये प्रवेश करते व उष्णतेमुळे ती गरम होते.
  • संकलकाच्या आतील उत्तर बाजूस उष्णतारोधक पदार्थ वापरून ऊर्जेचा ऱ्हास टाळता येतो.
  • टनेल टाइप सौर ड्रायरमध्ये अॅल्युमिनियम अँगल व सच्छिद्र जाळी वापरून वाळविण्यासाठीचे पदार्थ ठेवण्यासाठी ट्रॉली व ट्रे यांची रचना करण्यात आलेली असते. यांचा उपयोग पदार्थ पसरून ठेवण्यासाठी होतो.
  • बाहेरील थंड हवा छिद्रांमधून आत येऊन उष्ण संकलकाच्या संपर्कात आल्यावर गरम होते, ज्यामुळे हवेतील आर्द्रता शोषण्याची क्षमता वाढते. अशा प्रकारे पदार्थातील आर्द्रता शोषली जाते.
  • गरम हवेला दुसऱ्या कोणत्याही बाजूने जाण्यास मार्ग नसल्यामुळे व वजनात हलकी, गरम हवा वर सरकण्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे ही हवा चिमणीद्वारे बाहेरील वातावरणात सोडली जाते.
  • या प्रक्रियेमध्ये गरम हवेचा वापर करून वाळविण्यासाठीचे पदार्थ कमीत कमी वेळात सुकवली जाते. या टनेल टाइप सोलर ड्रायरमध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणे, मसाल्याचे पदार्थ, मासळी इत्यादी पदार्थ सुकविता येतात.
  • संपर्क ः हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५ मयूरेश पाटील, ९०२१६८२३९५ (विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com