केळीसह हळदीची तंत्रयुक्त शेती केली फायदेशीर 

चौधरी कुटूंबाची हळद व केळीची शेती
चौधरी कुटूंबाची हळद व केळीची शेती

जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील नाचणखेडा (ता. जि. बऱ्हाणपूर) येथील सुनील, सुधाकर व सुरेंद्र हे चौधरी बंधू यांनी केळीपट्ट्यात हळदीच्या तंत्रशुद्ध पद्धतीत नाव मिळवले आहे. हळद काढणी व उकळणी यंत्रणा त्यांनी यू ट्यूब चॅनेलवर अभ्यास करून घरीच विकसित केली. सांगली बाजारात त्यांच्या दर्जेदार हळदीला चांगला दर मिळतो. केळी तीसह व्यापारातही ते कार्यरत असून परिसरातील सुमारे १०० शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून देण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो.  नाचणखेडा हे गाव मध्य प्रदेशात असले तरी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्‍यापासून काही किलोमीटरवरच आहे. मुक्ताईनगर, रावेरमधील अनेक गावांशी येथील शेतकऱ्यांचा संपर्क असते. याच गावांतील सुनील, सुरेंद्र व सुधाकर यांची ५० एकर शेती आहे. त्याचबरोबर २० एकर शेती ते ‘लीज’वरही घेतात. सुरेंद्र जळगावात पाइपनिर्मितीचा कारखाना सांभाळतात. सुधाकर यांची मदत सुनील यांना शेती व्यवस्थापनात होते. आपल्या घरातील युवकांनीही चांगल्याप्रकारे शेती करावी, यासाठी सुनील यांनी आपले पुत्र विपूल यांना कृषी तंत्रज्ञान (बी.टेक) विषयातून पदवीचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानुसार विपूल शेतीत तरबेज होत आहेत.  पीक पद्धती  चौधरी यांच्या क्षेत्राला तापी नदीचा फायदा होतो. शिवाय कूपनलिका आहे, त्यामुळे पाणी मुबलक आहे. या भागातील मुख्य पीक केळी आहे. चौधरी देखील दरवर्षी सुमारे २० ते २५ एकरांत उतिसंवर्धित रोपांची जून ते ऑगस्टदरम्यान लागवड करतात. केळी व्यतिरिक्त हळदीची दरवर्षी १० ते १२ एकरांत लागवड असते. शिवाय कापूस, पपईचे पीक असते. सहा वर्षांपूर्वी हे कुटुंब हळद शेतीकडे वळले. कुंभारखेडा (ता. रावेर) येथून सेलम जातीचे वाण आणले. आता घरच्याच हळदीचा उपयोग लागवडीसाठी होतो.  घरीच तयार केली हळदीसाठी यंत्रे  जूनच्या पहिल्या आठवड्यात ठिबकची व्यवस्था करून हळदीची गादीवाफ्यावर लागवड होते. दोन गादीवाफ्यांमधील अंतर साडेपाच फूट असते. प्रती गादीवाफ्यावर हळदीच्या दोन ओळी असतात. दोन ओळींमधील अंतर एक फूट तर दोन ड्रीपमधील अंतर सव्वाफूट असते. एकरी आठ ते १० क्विंटल बियाणे लागते. साधारण १५ फेब्रुवारीनंतर काढणी सुरू होते. काढणीसाठी चौधरी यांनी ट्रॅक्‍टरचलित यंत्र बनविले. सुरेंद्र यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. यंत्र तयार करण्यासाठी यू ट्यूब चॅनेलचा उपयोग केला. त्यावर विविध यंत्रांची निर्मिती व कार्यक्षमता अभ्यासली. त्यानुसार बॉयलरदेखील घरीच तयार केला. दिवसभरात सुमारे १२५ ते १५० क्विंटल हळद उकळण्याची क्षमता या यंत्राची आहे. त्याला तापविण्यासाठी घरच्या शेतीतून निघालेल्या पऱ्हाट्या, तुराट्यांचा वापर केला जातो.  हळदीचे उत्पादन  एकरी २०० क्विंटल ओल्या तर वाळविलेल्या हळदीचे सुमारे ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. नव्या हंगामात लागवडीसाठी ओल्या हळदीचे जतन करतात. सावलीखाली थंड भागात ही हळद असते. हळदीच्या बेण्यावरील एकरी सुमारे १० हजार रुपयांचा खर्च ते दरवर्षी वाचवितात.  सांगली हेच मार्केट  चौधरी दरवर्षी सांगली बाजारपेठेतच आपली हळद पाठवतात. त्यास किमान सहा हजार ते कमाल ९३०० रुपये दर मिळतो असे ते सांगतात. हे मार्केट हळदीसाठी राज्यातील मोठे असल्याने तेथेच विक्रीसाठी पसंती दिली जाते.  केळीचीही चांगली शेती  उतिसंवर्धित केळीची सुमारे २५ किलोपासून ते ३० किलोपर्यंतची रास मिळवितात. निर्यातक्षम केळीचा १२ महिन्यांत हंगाम घेतात. चौधरी हे केळीचे पुरवठादार म्हणून काम पाहतात. गाव परिसरातील सुमारे ८० ते १०० शेतकऱ्यांची केळी ते बऱ्हाणपूर बाजार समितीत लिलावात देतात. काही निर्यातदारांनाही पुरवतात.  यामध्ये शेतकऱ्यांकडून ते कोणतेही कमिशन घेत नाहीत. तर ते केवळ व्यापाऱ्यांकडून घेण्यात येते.  तसेच, आपल्या गावापुरताच केळी खरेदी व पुरवठ्याचा व्यवसाय ते करतात. मागील दोन हंगामात निर्यातक्षम केळीला जाहीर लिलावात १७५० रुपये प्रती क्विंटलचे दर गावातील शेतकऱ्यांना मिळू शकले आहेत. या हंगामात एक हजार रुपये दर केळीला मिळत आहे. मागणी व पुरवठा या नुसार दरांचे गणित बदलते असे ते सांगतात.  पॅकहाउसचा फायदा  अलीकडे सुमारे तीन हजार चौरस फुटात केळीचे पॅकहाउस शेतात साकारले आहे. केळी निर्यातदार, खरेदीदारांना भाडेतत्त्वावर ते उपलब्ध करून देणार आहेत. त्याद्वारे दररोज ३० ते ४० मे. टन केळीची स्वच्छता, पॅकिंग करणे शक्य होणार आहे. पुढील काळात केळी साठवणुकीसाठी वातानुुकूलित चेंबरही तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. केळीसह हळदीच्या शेतीतही पीक फेरपालटीवर त्यांनी भर दिला आहे. शेतीकामांसाठी बैलजोडी, तीन गायी, दोन म्हशींचे संगोपन ते करतात. जमीन सुपीकतेसाठी एकरी १० ट्रॉली शेणखताचा वापर होतो. 

संपर्क- सुनील चौधरी- ९००९३५१००९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com